कारण ती बाई आहे | मराठी कविता
पोटाच्या खळगी साठी
त्याच्या सोबत उन्हात राबून
घरी येताच
झोंबते चुलीला
शरिराच्या ठणका
घालते चुलीत
लाकडासह...
कारण ती बाई आहे
तो कष्टानं कण्हत असलेला पाहून
चेपते अंग मायेनं
चिल्यापिल्यांना भरवून
अर्धवट भरल्या पोटानं
देते त्रुप्तिचा ढेकर
कारण ती बाई आहे
आलीच देहाची हाक
तर
शिरते अलगद कुशीत
त्याच्या चेहऱ्यावरचा शिण पाहून कळवळते
आपल्या देहाची भूक
पटकुरात बांधून घेते उशाला
अन्
तान्हूलं बाजूला सारून
त्यालाच ममतेनं घेते कुशीत
कारण ती बाई आहे
...............
तो मात्र हवं तेव्हा
केस ओढून घेतो
जीवघेणी ठणक उतरते
केसाच्या मुळातून
काळजापर्यंत
तरीही ती शांत
कारण ती बाई आहे
दिवसाबरोबर
उठणारे
त्याचे फुत्कार
घेते सामावून
धरतीनं म्रुतदेहाचे
अवषेश
सामावून घ्यावं तसं
कारण ती बाई आहे !
छाया बेले ✍🏼
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा