छोटीशी आशा | मराठी कथा
छोटीशी आशा
प्रिय आकाश,
मला घराबाहेर पडून आज एक वर्ष झालं. या वर्षभरात कितीतरी वेळा तुम्हाला पत्र लिहावंसं वाटलं, पण प्रत्येक वेळी हातात पेन घेतला की वाटायचं - माझ्याकडून नकळत तुमचं मन दुखावलं जाईल. म्हणून पुढे ढकलत गेले. आज बाहेर पाऊस कोसळतोय आणि त्याने मनातली सगळी दारं उघडली आहेत. म्हणून आज थांबता आलं नाही.
आजच्या या पावसाने मला पुन्हा उटीत नेऊन उभं केलंय.
आपण लग्नानंतर उटीला गेलो होतो, तेव्हाही असाच पाऊस होता. आपण व्हरांड्यात उभे होतो, समोर धुक्यात हरवलेले डोंगर होते. अचानक मी पायऱ्या उतरून पावसात गेले. मनसोक्त भिजले. मनात एक छोटीशी इच्छा होती - तुम्हीही यावं आणि आपण दोघांनी मिळून भिजावं.
पण तुम्ही तिथेच थांबलात. चेहऱ्यावर तेच शांत, प्रसन्न हसू. तुम्ही मला थांबवलं नाहीत, फक्त पाहत राहिलात. मी चिंब भिजून आत आले तेव्हा तुम्ही टॉवेल घेऊन उभे होतात. माझं डोकं अलगद पुसून दिलंत आणि गरम कॉफी हातात दिलीत. त्या क्षणी वाटलं होतं, तुम्ही मला किती जपता.
आज मागे वळून पाहताना त्या आठवणीचा अर्थ वेगळा लागतो. टॉवेल घेऊन उभं राहणं, गरम कॉफी देणं - ही तुमच्या प्रेमाची भाषा होती. आणि तुमचा हात धरून पावसात भिजणं - ही माझ्या प्रेमाची भाषा होती. दोघांचं प्रेम खरं होतं, फक्त भाषा वेगळी होती.
कदाचित आपल्यातलं अंतर तिथूनच सुरू झालं असावं.
मला लग्नानंतर महाबळेश्वरला जायचं होतं. मी मनात खूप स्वप्नं रंगवली होती. तुम्ही उटी ठरवलीत. उटी खूप सुंदर होतं, माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त. तरीही मनात कुठेतरी एक सल राहिली. ती उटीला गेल्याची नव्हती, ती माझी छोटीशी इच्छा मी बोलूनही न दाखवल्याची होती.
तुम्ही मला नेहमी सर्वोत्तम तेच दिलंत. पण ते बहुतेक वेळा तुमच्या पसंतीचं होतं. आणि मी हसून ते स्वीकारत गेले.
आठवतं, आपल्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला तुम्ही सुंदर पार्टी ठेवली होतीत. सगळी तयारी तुम्ही केली होतीत. माझ्यासाठी घागरा-चोळी आणि स्वतःसाठी शेरवानी आणली होतीत. तुमची पसंत अप्रतिम होती.
मी मात्र माझी आवडती मोती रंगाची साडी काढून ठेवली होती. पार्टीत घालण्यासाठी.
तुम्ही अगदी सहज म्हणालात, "हा ड्रेस तुझ्यावर खूप सुंदर दिसेल. चल, घालून ये."
मी काहीच बोलले नाही. साडी कपाटात ठेवली आणि तुमच्या पसंतीचा ड्रेस घातला. तो खरंच सुंदर होता, सगळ्यांनी कौतुकही केलं. पण माझं मन त्या मोती रंगाच्या साडीतच अडकून राहिलं.
गोष्ट त्या साडीची नव्हतीच. गोष्ट होती माझ्या निवडीची.
तुम्ही कधीच बंधनं घातली नाहीत, माझ्या सुखसोयींची सगळी काळजी घेतलीत. पण माणसाला फक्त सुखसोयी पुरत नाहीत, त्याला स्वतःचा श्वासही हवा असतो.
एक सोन्याचा पिंजरा एवढंच माझ्या जगण्याचं ध्येय नव्हतं. मला माझं आकाश हवं होतं.
मला प्रत्येक क्षण भरभरून जगायचा होता. पावसात भिजायचं होतं, उन्हं झेलायची होती, काही न ठरवता रस्त्यावर निघून जायचं होतं. मला तुमची सोबत हवी होती, पण तुमच्या सावलीत नाही, तर तुमच्या बरोबरीने.
तुम्ही ऑफिसवरून आल्यावर दार उघडताच माझ्या कपाळावर घेतलेलं ते हळुवार चुंबन - तो स्पर्श आजही मनात जिवंत आहे. आज थकून घरी आले की त्या स्पर्शाची उणीव जाणवते.
आणि त्याच वेळी एक खंतही टोचते - मी कधी तुम्हाला धावत जाऊन घट्ट मिठी मारू शकले नाही. कधी सहज म्हणू शकले नाही, "आज तुमची खूप आठवण आली."
प्रेम होतं, पण व्यक्त होण्याच्या वाटा बंद झाल्या होत्या. आपण एकाच घरात होतो, पण हळूहळू दोन वेगळ्या खोल्यांसारखे झालो.
म्हणूनच मी बाहेर पडले.
मी "मला काही दिवस एकटं राहू द्या" म्हणाले तेव्हा तुम्ही आक्षेप घेतला नाहीत, का म्हणूनही विचारलं नाहीत. तेव्हा तुमच्या शांततेचा राग आला होता. आज वाटतं, कदाचित तुमच्या मनातही हेच प्रश्न होते, जे माझ्या मनात होते.
या एका वर्षात मला स्वतःची ओळख पुन्हा सापडली. माझ्या इच्छा, माझा आवाज पुन्हा माझ्याशी बोलू लागला.
पण या सगळ्या पलीकडे एक गोष्ट तशीच राहिली - तुमची जागा. गर्दीत, रस्त्यावर, आणि विशेषतः पावसात डोळे नकळत तुम्हालाच शोधतात.
म्हणून हे पत्र लिहितेय. तुम्हाला परत बोलवण्यासाठी नाही, कोणतीही अपेक्षा ठेवण्यासाठी नाही. फक्त एवढं सांगण्यासाठी की दूर गेल्यावर तुमचं महत्त्व अधिक जाणवलं.
बाहेर पाऊस अजूनही कोसळतोय. रेडिओवर गाणं सुरू आहे - "तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं..." आज सुट्टी आहे, पावसामुळे बाहेर जाता येत नाही, म्हणून अमृताचं 'पिंजर' वाचून काढावं म्हणतेय.
आकाश, जर हे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचलं तर एवढंच समजा - मी तुमच्यावर प्रेम केलं नाही असं नाही. खूप केलं. फक्त माझ्या पद्धतीने व्यक्त करता आलं नाही.
अजूनही उशीर झाला नसेल तर कदाचित आपण एकमेकांना नव्याने समजू शकतो. पूर्वीसारखं नको, त्याहून सुंदर.
जिथे तुम्ही मला जपाल आणि मी तुमच्या काळजीला प्रेमाने सामावून घेईन. जिथे मी पावसात भिजायला गेले तर तुम्ही टॉवेल घेऊन उभं राहण्याआधी म्हणाल - "थांब, मीही येतो." आणि मी तुमचा हात धरून म्हणेन - "चल, दोघं मिळून भिजूया."
पत्र इथेच थांबवते. बाकी राहिलं असेल तर कधीतरी प्रत्यक्ष बोलू.
कळावे,
तुमचीच,
श्रुती
श्रुतीने पत्र दुमडलं. लिफाफा काढला, पण त्यात ठेवलं नाही. कुठे पाठवणार होती? हे पत्र आकाशपर्यंत पोहोचण्यासाठी नव्हतंच, ते तिच्या स्वतःच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी होतं.
तिने पत्र टेबलावर ठेवलं आणि पुस्तक हातात घेतलं.
तेवढ्यात - ट्रिंग... ट्रिंग...
दाराची बेल वाजली. एवढ्या पावसात कोण?
तिने दार उघडलं आणि जागच्या जागी थिजली.
समोर आकाश. पूर्ण भिजलेला. केसांतून पाणी टपकत होतं, चेहऱ्यावर तेच शांत, प्रसन्न हसू.
"आकाश... तुम्ही?"
तो हलकंसं हसला, हात पुढे करत म्हणाला,
"नाही... आकाश. तू असं म्हण."
श्रुतीच्या डोळ्यांत पाणी आलं. तिने त्याचा हात धरला.
आकाशने तिला अलगद बाहेर ओढलं. पाऊस कोसळत होता.
पुढच्या क्षणी श्रुतीने त्याला घट्ट मिठी मारली. कित्येक वर्षांपासून अडकून पडलेली ती मिठी आज मोकळी झाली.
यावेळी श्रुती एकटी भिजत नव्हती. आकाश तिच्यासोबत भिजत होता. उटीत अपूर्ण राहिलेली इच्छा आज पूर्ण झाली होती.
पाऊस कोसळत राहिला. जुनं सगळं धुऊन काढत. आणि दोन मनांच्या कोरड्या धरतीवर अगदी अलगद एक नवी हिरवळ रुजत राहिली.
पाऊस कोसळत राहिला... नव्या रुजवणीसाठी.
@छाया बेले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा