स्त्री-उद्धाराचा खरा अर्थ : फुले दांपत्याच्या संघर्षापासून आजच्या स्त्रीपर्यंत
स्त्री-उद्धाराचा खरा अर्थ : फुले दांपत्याच्या संघर्षापासून आजच्या स्त्रीपर्यंत
स्त्रियांचा जर उद्धार करायचा असेल, तर त्यांना शिक्षण देणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे, हे महात्मा फुले यांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू करून या कार्याची सुरुवात केली. केवढे मोठे धाडस होते हे!
ज्या काळात ख्रिश्चन स्त्रीच्या हस्ते चहा स्वीकारला म्हणून न्यायमूर्ती रानडे यांना समाजाच्या दबावाखाली प्रायश्चित्त घ्यावे लागले, त्या काळात महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शूद्रातिशूद्रांपेक्षाही शूद्र गणल्या गेलेल्या बहुजन स्त्रियांना शिक्षित करण्याचे, भटांच्या मते महापातक केले होते. त्यांना याचे काय परिणाम भोगावे लागले असतील, याची कल्पना न केलेलीच बरी.
माय सावित्रीने दगड, शेण अंगावर झेलत, मुलींच्या शिक्षणासाठी समाजाच्या नियमांविरुद्ध जाऊन सामाजिक रोषाला सामोरे जात, आजीवन संघर्ष करून मुलींच्या शिक्षणाच्या वाटा मोकळ्या करून दिल्या. फुले दांपत्यांनी घेतलेल्या स्त्री-उद्धाराच्या ध्यासापायी त्यांना आपल्याच घरातून बेदखल करण्यात आले. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक सर्वच पातळ्यांवर अत्यंत अडचणींचा सामना करीत या महामानवांनी स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडून दिली.
याचाच परिणाम म्हणून आज स्त्रिया सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहेत. अगदी बस, ट्रेन, विमानचालकापासून ते अवकाश संशोधन क्षेत्रापर्यंत स्त्रियांनी आपला ठसा उमटवला आहे. ही नक्कीच समाधानाची बाब म्हणावी लागेल. हे महात्मा फुले व माय सावित्रीच्या त्यागाचे आणि संघर्षाचे फळ आहे.
आज स्त्रिया शिकून घराबाहेर पडून अर्थार्जन करीत आहेत. वडील, नवरा, भाऊ यांच्या मागे-मागे चालत बाहेर पडणारी स्त्री कामानिमित्त एकटी बाहेर फिरताना दिसत आहे. वरवर पाहता स्त्री मुक्त झाली असे चित्र दिसते.
मात्र हे वास्तव चित्र आहे की भास आहे? खरंच स्त्री मुक्त झाली आहे? मुक्त होणे म्हणजे तरी काय?
पुरुषसत्ताक मानसिकतेत स्त्रीमुक्तीचा अर्थ स्वैर असा सांगितला जातो. मुक्त होणे म्हणजे स्वैर होणे नाही, तर स्वयंप्रकाशित होणे. योग्य-अयोग्य याची जाण व भान येणे. या आत्मभानातून जागृत झालेली स्वत्वाची जाणीव. त्या जाणीवेतून स्वतःचा शोध घेत सद्सद्विवेकबुद्धीने योग्य त्या गोष्टीची निवड करणे, निर्णय घेणे, अन्यायकारक गोष्टींना, रूढींना, परंपरांना नकार देणे, याला मुक्ती असे म्हणता येईल.
मात्र खरंच या गोष्टीची जाणीव महिलांमध्ये जागृत झाली आहे का? हाच खरा प्रश्न आहे.
शहरी भागात काही प्रमाणात मुलींच्या शिक्षणाप्रती समाज जागृत झालेला पाहायला मिळतो. ग्रामीण भागात अजूनही मुलींच्या शिक्षणाला फारसे महत्त्व दिले जात नाही. आर्थिकदृष्ट्या मागास वर्गात फक्त मुलांना शिकवण्याकडे कल असतो. याचे कारण, मुलगा शिकला तर घराला हातभार लागेल, आर्थिक परिस्थिती सुधारेल हा उद्देश असतो. मुलीला शिकवून ती लग्न करून सासरी जाईल, तेव्हा तिच्या लग्नाचा व तिच्या शिक्षणाचा दुहेरी खर्च करून आपल्याला काय फायदा होणार? असा व्यवहारी विचार मुलीच्या बाबतीत तिचे जन्मदाते करताना दिसतात.
यासोबतच मुलगी शिकली तर स्वतःचे निर्णय स्वतः घेईल व जातीबाहेर लग्न करून आपल्या प्रतिष्ठेला धक्का लावेल, अशा प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पना खेड्यातून दिसून येतात. या विचारातून समाज बाहेर पडलेला नाही. यात महिलांचाही तेवढाच पाठिंबा असतो. कोणतीही आई आपल्या मुलीला शिकवण्यासाठी हट्ट करताना दिसत नाही. म्हणजे पुरुषसत्ताक मानसिकता फक्त पुरुषांत असते असे नाही, ती स्त्रियांमध्ये सुद्धा तेवढीच भिनलेली आहे. या मानसिकतेचे त्या काटेकोरपणे पालन करतात व ते पुढच्या पिढ्यांत रुजवत जातात.
भारतीय समाजात कुटुंबव्यवस्था जशी स्त्रीमुळे टिकून आहे, तशा अनेक गोष्टी तिच्यामुळे टिकून आहेत. जातिव्यवस्था, धर्मव्यवस्था टिकून राहण्यात स्त्रियांचा फार मोठा वाटा व सहभाग आहे. त्याला कारण पूर्वापार चालत आलेल्या रूढी-परंपरा स्त्रिया जशाच्या तशा चालवत असतात. त्यांना कुठेही बदल नको असतो. नियम मोडला गेला तर लोक काय म्हणतील, या गोष्टीचे फार मोठे दडपण स्त्रियांच्या मनावर असते.
निसर्गाने स्त्रीकडे सृजनाचे काम सोपवले आहे. तिच्या या कार्यासाठी पोषक असाच गुण तिच्या अंगी निसर्गतः असतो. स्त्री जेवढी वत्सल, करुणामय तेवढीच कणखर असते. तिच्यात अफाट सहनशक्ती व तेवढीच जिद्द असते. म्हणूनच स्त्री आपल्यात एका नवीन जीवाची निर्मिती करून, नऊ महिने नऊ दिवस म्हणजेच जवळपास एक वर्षाचा कालावधी त्या जीवाला आपल्या शरीरात सांभाळते. प्रसववेदना सहन करून नवे जीवन जन्माला घालते. या कार्यासाठी तिला तग धरून राहण्याकरिता तेवढी सहनशक्ती लागते, तेवढी शक्ती प्रत्येक स्त्रीकडे असते.
एवढे सगळे असूनही स्त्रिया स्वतःला कमकुवत का समजतात? याचे कारण हे आहे की, स्त्रीच्या मनावर कायम हे बिंबवले गेले आहे की ती कशी कमकुवत आहे. तिची खरी ओळख तिला पटूच दिली जात नाही. अनेक विशेषणे लावून तिला मानसिकदृष्ट्या कमकुवत व परावलंबी बनवण्याचा प्रयत्न पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेने केलेला आहे. या व्यवस्थेच्या लाभार्थ्यांना माहीत असते की, स्त्री जर जागृत झाली, तिला स्वतःची, आपल्यातील क्षमतांची ओळख पटली, तर ही व्यवस्था उद्ध्वस्त होण्यास फार काळ लागणार नाही.
म्हणून तिला त्याच पारंपरिक विचारात गुरफटून ठेवण्यासाठी त्याच विचाराचे नवे वर्जन, नवीन अपडेटसह स्वरूप बदलून तिच्यासमोर ठेवले जाते. संस्कार, रीतिरिवाज, परंपरा अशा गोंडस नावाखाली तिच्याभोवती गुलामगिरीचा सापळा रचला जातो.
अल्प प्रमाणातील अपवाद सोडले, तर आजच्या काळातही स्त्रियांच्या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. आजचे आयुष्य त्यांच्यासाठी जास्तच आव्हानात्मक झाले आहे. प्रश्नांचे स्वरूप बदलले आहे एवढेच. आजच्या स्त्रीला घरात आणि बाहेर दोन्ही आघाड्यांवर अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो. आत्मसन्मानासाठी लढावे लागते. तिला स्वतःशीही संघर्ष करावा लागतो.
स्वातंत्र्य हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. हाच स्थायीभाव निसर्गाचा घटक म्हणून मानवाच्या ठायी जन्मताच असतो. मात्र या तिच्या नैसर्गिक स्वातंत्र्याच्या स्थायीभावाच्या आड अनेक अडथळे निर्माण करून ठेवलेले आहेत. तिला मानसिकरित्या गुलाम कसे करता येईल, हा व्यवस्थेचा प्रयत्न असतो. या प्रयत्नात व्यवस्था यशस्वी सुद्धा झाली. पूर्वीच्या मातृसंस्कृतीचे रूपांतर पुरुषसत्ताक व्यवस्थेत करण्यासाठी मातृसंस्कृतीच्या विरोधात सर्वच स्तरांवर चळवळ उभारली गेली. साहित्य, लोककला, मौखिक स्वरूपातील साहित्य, सर्वच स्तरांवर मातृसंस्कृतीच्या ऱ्हासाचा उद्देश ठेवून निर्मिती केली गेली. स्त्रीला हतबल, असहाय करून बंदिस्त करण्यात आले. शिक्षण, ज्ञानार्जन वर्ज्य ठरवण्यात आले. संपत्तीवरील अधिकार काढून घेऊन तिला पूर्णपणे परावलंबी व गुलाम करण्यात आले. तिच्या गुलामगिरीचे गौरवीकरण करण्यात आले. जी महिला चांगली गुलाम, तिला श्रेष्ठ ठरवून सर्व महिलांना त्या मार्गावरून जाण्यास उद्युक्त करण्यात आले. हा सगळा इतिहास आज अनेक संशोधनातून समोर आलेला आहे.
शिक्षणातून आलेले आत्मभान, आपल्या हक्काची, अधिकाराची झालेली जाण यातून महिला समानतेच्या स्तरावर स्वतःला उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मनावर लादलेले पारंपरिक विचारांचे ओझे, त्याचा भार सहनही होत नाही आणि उतरवताही येत नाही. यासाठी अनेक आघाड्यांवर स्त्रियांना संघर्ष करावा लागतो. एक तर स्वतःवर झालेले पिढ्यानपिढ्या गुलामीचे संस्कार, त्यासोबतच जागृत झालेल्या तिच्या ‘स्व’ ची जाणीव आणि त्या ‘स्व’ ने व्यवस्थेला दिलेला नकार, मानसिक, कौटुंबिक व सामाजिक स्तरावर करावा लागणारा संघर्ष... यातून होणारे मानसिक खच्चीकरण, त्यामुळे महिलांचा हा संघर्ष टाळून आहे ते स्वीकारून जगण्याकडे कल असतो.
अमृता प्रीतम यांचे एक वाक्य आहे - "भारतीय समाजात स्त्रीची अवस्था मळलेल्या कणकेच्या गोळ्यासारखी आहे, घरात ठेवली तर उंदीर कुरतडतात, बाहेर ठेवली तर कावळे टोचे मारतात." लेखिकेने या वाक्यातून अगदी तंतोतंत भाष्य केले आहे. आज कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना या मानसिकतेला सामोरे जावे लागते. घरातही अशिक्षित महिला सतत दुय्यम समजली जाते, म्हणजे तिने आपल्या मर्जीप्रमाणे कुठलेही काम करू नये, निर्णय घेऊ नये, निर्णयात सहभागी होऊ नये, इतकेच नाही तर तिने स्वतःच्या बुद्धीने विचार करणे हे सुद्धा या व्यवस्थेला मान्य नाही.
हे नाकारलेपण जगण्याची महिलांच्या मेंदूलाही सवय झाली आहे. खरे तर तिथूनच आधी पुरुषसत्ताक मानसिकतेचा स्वीकार करणाऱ्या विचाराची पाळेमुळे खणून काढणे अत्यंत आवश्यक आहे. स्त्रियांनी स्वतःचे माणूसपण स्वीकारून आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा द्यायला हवा.
वर्षानुवर्षे व्यवस्थेने लावलेले दुय्यमत्व स्वीकारून जगत असूनही महिलांना कधीच, कुठलेच प्रश्न पडू नयेत, ही शोकांतिका म्हणावी लागेल.
पन्नास टक्के लोकसंख्या असलेला घटक घुसमटलेले जीवन जगत आहे. सासरी आणि माहेरी फक्त पोटार्थी, आश्रितासारखे राहावे लागते. याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणून स्त्रियांना दास्यातून मुक्त करून माणूसपण बहाल करण्याचा प्रयत्न केला.
मात्र अजूनही कायदेशीर लढाई लढल्याशिवाय स्त्रियांना वारसाहक्क मिळत नाही. लढल्याशिवाय तिला मुलाप्रमाणे संपत्तीत वाटा का मिळू नये? यासाठी महिलांनी पुढाकार घ्यायला हवा. इमोशनल ब्लॅकमेल करत तिला या गोष्टीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र महिलांच्या आत्मसन्मानासाठी, समानता रुजण्यासाठी संपत्तीवर अधिकार असणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कमीत कमी येणाऱ्या पुढील पिढ्यांना तरी माणूस म्हणून जगता येईल.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्कांसाठी जो लढा दिला, जे कार्य केले, त्याची जाणीव, ते विचार अजूनही म्हणावे तसे रुजलेच नाहीत. ते रुजणे, त्याचे बहरून येणे अत्यंत आवश्यक आहे.
यासाठी महिलांनी सगळ्या शक्यता पडताळून आत्मशोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा. हीच खऱ्या अर्थाने माय सावित्रीला आदरांजली ठरेल.
- छाया बेले, नांदेड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा