स्त्री-उद्धाराचा खरा अर्थ : फुले दांपत्याच्या संघर्षापासून आजच्या स्त्रीपर्यंत स्त्रियांचा जर उद्धार करायचा असेल, तर त्यांना शिक्षण देणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे, हे महात्मा फुले यांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू करून या कार्याची सुरुवात केली. केवढे मोठे धाडस होते हे! ज्या काळात ख्रिश्चन स्त्रीच्या हस्ते चहा स्वीकारला म्हणून न्यायमूर्ती रानडे यांना समाजाच्या दबावाखाली प्रायश्चित्त घ्यावे लागले, त्या काळात महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शूद्रातिशूद्रांपेक्षाही शूद्र गणल्या गेलेल्या बहुजन स्त्रियांना शिक्षित करण्याचे, भटांच्या मते महापातक केले होते. त्यांना याचे काय परिणाम भोगावे लागले असतील, याची कल्पना न केलेलीच बरी. माय सावित्रीने दगड, शेण अंगावर झेलत, मुलींच्या शिक्षणासाठी समाजाच्या नियमांविरुद्ध जाऊन सामाजिक रोषाला सामोरे जात, आजीवन संघर्ष करून मुलींच्या शिक्षणाच्या वाटा मोकळ्या करून दिल्या. फुले दांपत्यांनी घेतलेल्या स्त्री-उद्धाराच्या ध्यासापायी त्यांना आपल्याच घरातून बेदखल करण्यात आले. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक सर्वच पातळ्यांव...