शंकर भाऊ साठे: व्यक्तीत्व व कर्तृत्व: पुस्तक परिचय !!
दलित साहित्यिकांच्या वाट्याला कायम उपेक्षाच आलेली आहे. प्रस्थापीथ साहित्याने त्यांची फारशी दखल घेतलेली नाही. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सारखे जगप्रसिद्ध साहित्यिक सुद्धा यातून सुटले नाहीत.शंकर भाऊ साठे सारख्या अशाच एका महत्त्वाच्या तरीही उपेक्षित राहिलेल्या साहित्यिकांवर पीएचडी करून डॉक्टर मारुती कसाब यांनी अतिशय मोलाचे कार्य केलेले आहे. 344 पानाच्या या ग्रंथातून अतिशय सखोल असं संशोधन करून शंकरभाऊंच्या साहित्यिक कारकिर्दीसह त्यांच्या जीवनाचा ही विस्तृत आढावा घेतला आहे. एवढंच नाही तर मातंग समाजाच्या साडेतीन हजार वर्षांपूर्वीपासून चा इतिहास या ग्रंथात नोंदवला आहे.
मांग ही भारतात सिंधू संस्कृती मधील मूळनिवासी क्षत्रिय जमात असल्याचे प्राचीन अवशेषावरून लक्षात येते. प्राचीन काळात मातंग वंशाचा एक समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेला राजवंश असला पाहिजे . असा निष्कर्ष ते अनेक पुराव्यासह मातंगाचा इतिहासाबद्दल प्रस्तुत ग्रंथात नोंदवतात.
मांग हा शब्द कानडी व तेलुगू भाषेतील मंग शब्दाचे मराठी अपभ्रंश रूप असून वानर ह्या वंशाचे 'टोटेम ' असून दक्षिणेतील तुंगभद्रा नदीच्या तीरावरील किस्किंदा प्रांताचे राज्य हे मांगाचेच होते. मांग हा देशाचा मध्य भूमिपुत्र आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या लेखनाचे तसेच इतर अनेक पुराव्यांचे दाखले देत मांगाच्या इतिहासाबद्दल डॉ. मारोती कसाब वरील निश्कर्ष प्रस्तुत ग्रंथात नोंदवतात.
मांग ही राज्यकर्ती जमात ते अस्पृश्य गुन्हेगार जमात असा दीर्घ इतिहास अतिशय सखोल अभ्यासातून संशोधकांनी नोंदवलेला आहे. मांगाचे गावगाड्यात असलेले स्थान ग्रंथाच्या पूर्वार्धात मांगाचे सांस्कृतिक जीवन विस्ताराने आलेले आहे.
कृषी परंपरेत मातंग जातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण कृषीचा शोध लावणारी पहिली स्त्री मांग कुळातील होती. (जी मांतगी किंवा आदिगणमाता निर्ऋती या नावानेही ओळखली जाते ) असंही लेखक म्हणतात. क्रांतिगुरू लहुजी साळवे, तसेच पहिली विद्रोही धर्मचिकित्सा मुक्ता साळवे, क्रांतिकारी वीर फकीरा यांच्या विषयीची माहिती वाचावयास मिळते.
शंकर भाऊंच्या काळातील सामाजिक राजकीय परिस्थिती व लोकशाहीर आण्णाभाऊंचे व शंकर भाऊंचे जन्मस्थान असलेल्या वाटेगावचा इतिहासही अतिशय बारकाईने मांडला आहे.
त्यानंतर येतो शंकर भाऊ च्या घराण्याचा इतिहास शंकर भाऊच्या आजोबा कडे असलेली 50 एकर जमीन गावातील एका शेतकऱ्याला कसायला दिलेली असते. आणि तो शेतकरी ही जमीन मी विकत घेतली असे सांगून त्यावर कब्जा करतो.अशा परिस्थितीत भाऊरावांना म्हणजेच शंकर भाऊंच्या वडिलांना आपल्या कुटुंबाच्या उपजिविकेसाठी मुंबई गाठावी लागते.शंकर भाऊंच्या कुटुंबाचा वाटेगाव ते मुंबई असा प्रवास. त्यानंतर अण्णाभाऊ व शंकर भाऊचे दुनियेच्या विद्यापीठात अनुभवाचे शिक्षण सुरू होते. जगण्याच्या संघर्षा सोबतच अण्णा भाऊचं गिरणी कामगार ते कम्युनिस्ट चळवळीतील कार्य. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील लाल बावटा या कलापथकाच्या माध्यमातून लोकशाहीर आण्णाभाऊ अमर शेख व गवांकर या मित्रांनी अवघा महाराष्ट्र पेटवला.हे शंकर भाऊंनी
जवळून पाहिलं आणि ते त्यात सक्रीय सहभागी होत गेले. यातून शंकर भाऊची झालेली वैचारिक जडणघडण याविषयी विस्ताराने मांडणी केलेली आहे.
व्यक्तिगत आयुष्यातील अनेक अडचणी दुःख दैन्य बाजूला ठेवून आपण समाजाला, देशाला काय देऊ शकतो या उदात्त भावनेतून हे दोघे भाऊ आयुष्यभर कार्यरत राहिले त्यांच्या जीवन कार्याचा आढावा लेखकाने विस्ताराने घेतला आहे.
आई पत्नी व मोठा भाऊ तसेच मुलगा संजय या प्रियजनांचा एकामागे एक मृत्यू शंकर भाऊंना पाहावे लागले.आयुष्यभर अण्णाभाऊंच्या कुटुंबाची जबाबदारी शंकरभाऊंनी स्वतःवर घेऊन पार पाडली.
मुलं लहान असताना पत्नीचा झालेला मृत्यू. लहान मुलांना मोठं करण्याची जबाबदारी एकट्याने पेलले. शेवटच्या दिवसात त्यांना अतिशय हलाखीचे एकाकी जीवन जगावे लागले.शंकर भाऊंनी आपल्यातला संवेदनशीलपणा जपत समाजातील तळागाळातील लोकांनासाठी ते लिखाण करीत राहिले.
व समाज प्रबोधनाचे कार्य शेवटपर्यंत सुरूच ठेवले.
शंकर भाऊ च्या साहित्य प्रवासाला सुरुवात आण्णाभाऊंच्या निधनानंतर झाली.
" माझा भाऊ अण्णाभाऊ" या अण्णाभाऊंच्या चरित्राने ते लिहिते झाले.
अण्णा भाऊ नंतर त्यांचा भाऊ म्हणून समाजाचा मार्गदर्शक, लेखक, कादंबरीकार म्हणून ते महाराष्ट्रभर वावरले दबलेल्या, पिचलेल्या, उपेक्षित समाजाला उभारी देण्याचे काम त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत केले याचीही नोंद लेखकाने आत्मीयतेने घेतली आहे.
शंकर भाऊंची लेखनामागची भूमिका विशद करताना संशोधक म्हणतात.
साहित्यिकाचेही दोन गट पडतात एक घरात बसून स्वांत सुखाय हेतूने लिहिणारे व दोन लोकात मिसळून लोकात राहून बहुजन हिताय, बहुजन सुखाय या भावनेने लिहिणारे. शंकर भाऊ हे वरील वर्गवारीत दुसऱ्या गटातील लेखक होते.
त्यांच्या साहित्य लिहिण्यामागे एक भूमिका आहे बहुजन वर्गाच्या हिताविषयी सतत जागृत असलेल्या जिवंत मनाची प्रेरणा आहे. केवळ हौस मौजेने लिहिणाऱ्या लेखकासारखे त्यांचे लेखन नाही. एक असिधाराव्रत म्हणून स्वतःहून स्वीकारलेले ध्येय आहे. सामाजिक बांधिलकीतून लिहिणारे शंकर भाऊ हे एक महत्त्वाचे साहित्यिक होत.
शंकर भाऊ साठे संशोधन ग्रंथ वाचत असताना वरील विचार मनाला पटत जातात.
आठ ते दहा वर्षाच्या कालावधीत शंकरभाऊंनी चरित्र व बारा कादंबर्याचे लेखन केलं. हे लेखन जबाबदारीने व जाणीवपूर्वक केल्याचे लक्षात येते.
या ग्रंथात लेखकांनी शंकर भाऊ च्या कादंबऱ्याचा सखोल अभ्यास करून त्याचे विषय सार याचेही त्रयस्थपणे व सुंदर विवेचन केले आहे.
शेवटच्या विभागात शंकर भाऊंच्या साहित्यातील म्हणींचा मुक्त वापर, त्यांच्या साहित्यातील सामर्थ्य व शंकरभाऊ यांच्या साहित्याच्या मर्यादा याचा आढावा लेखकाने घेतलेला आहे.
शंकर भाऊंच्या साहित्यातील सामर्थ्य नोंदविताना लेखक म्हणतात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पावलावर पाऊल ठेवत शंकर भाऊ साठे यांनीही उपेक्षितांच्या जीवनाचे दर्शन मराठी साहित्यविश्वाला घडविले.
काळाच्या उदरात गडप झालेल्या समाज नायकांना आपल्या साहित्यातून न्याय दिला.
उपेक्षित समाजाला त्याच्या जाज्वल्य पराक्रमाचा त्यागाचा शौर्याचा आणि परोपकारी जगण्याचा इतिहास शंकर भाऊंनी आपल्या साहित्यातून दाखवून दिला.
शंकरभाऊंच्या साहित्याच्या मर्यादा दाखवताना संशोधक शंकरभाऊंनी कम्युनिस्ट विचारसरणीतून लेखन केल्याचे नमूद करीत कोणताही विचार स्वीकारला की आपसूकच मर्यादा येतात हे शंकर भाऊच्या साहित्य एवढीच प्रांजळ नोंद लेखकाने घेतलेली आहे.
शंकर भाऊ च्या साहित्याचा शोध घेणारा हा प्रबंध इतिहासातील अनेक महत्त्वाच्या दुव्यांचा शोध घेतो. कोणत्याही विषयाचा अभ्यास असेल तर या ग्रंथात काही ना काही सापडल्याशिवाय राहत नाही एवढा ग्रंथ महत्त्वपूर्ण व संग्रही ठेवण्यासारखा आहे. शंकर भाऊ सारख्या महत्त्वाच्या मात्र उपेक्षित राहिलेल्या कादंबरीकाराला प्रकाशात आणून घराघरात पोहोचविले त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !!
व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !!
छाया बेले, नांदेड.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा