योगिराज वाघमारे : साहित्य व व्यक्तिमत्त्व
योगिराज वाघमारे : साहित्य व व्यक्तिमत्त्व
समाजाला शहाणं करण्याचा उद्देश घेऊन साहित्य लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक योगिराज वाघमारे सरांचं जवळपास संपूर्ण साहित्य अनेक वेळा वाचून झालं आहे. खरं तर अशा काही साहित्यकृती असतात की त्या साहित्यावर क्रिया- प्रतिक्रिया न देता त्यातील विचार आत्मसात करावेत . त्यापैकीच योगिराज वाघमारे सरांचं साहित्य आहे.
योगिराज वाघमारे सरांची आणि माझी ओळख माझ्या पहिल्या कथासंग्रहाच्या वेळी झाली कथासंग्रहाला सरांचे प्रस्तावना घ्यायचे ठरले नंबर मिळून फोन केला एवढ्या मोठ्या साहित्यिकाला कसं बोलायचं याचं दडपण आलं होतं. प्रस्तावनेसाठी सरांना फोन केला.
'पाठवून द्या मी प्रस्तावना देतो महिला कथाकार खूप कमी आहेत तुम्ही कथा लिहीत आहात याचं खूप कौतुक वाटतं अभिनंदन लिहीत राहा '
सरांच्या या शब्दांनी माझं दडपण नाहीसं झालं. लगेच हस्तलिखिताचा झेरॉक्स करून सरांना पाठवून दिला .केवळ एक महिन्यात कथेच्या सूक्ष्म निरीक्षणासह दीर्घ अशी प्रस्तावना लिहून पाठवली माझ्यासारख्या नवलेखीकेसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण होता.
अधूनमधून सरांशी फोनवर सवांद होत राहतो. यातून प्रत्येक वेळी काही तरी अमुल्य असं शिकायला मिळतं.विचारांचे, अनुभवाचे संचित आपल्या पदरात आपसूकच येऊन पडतं.
दुसरी संस्मरणीय घटना म्हणजे नांदेड येथे अस्मितादर्श साहित्य संमेलन भरले होते.व्यासपिठावर साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला. तिथे कळलं, योगिराज वाघमारे सरही संमेलनात उपस्थित आहेत. मुख्य हॉल मधील नागराज मंजुळे यांचे अध्यक्षीय भाषण सुरू असतानाच सरांची भेट घेण्यासाठी मी सरांना फोन केला.सर म्हणाले
"बाजूच्या हॉलमध्ये कथाकथन सुरू आहे कथाकथनाच्या हॉल मध्ये या."
मी हॉलमध्ये प्रवेश केला. सर, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. दारातून सरांना अभिवादन केलं.सरांनी हाताने खूण करून मंचावर येण्यास सांगितले.
मात्र मंचावरील साहित्यिकांची गर्दी बघून मी तिकडे न जाता कार्यक्रम संपल्यानंतर सरांची भेट घेऊ म्हणून हॉलमध्ये एका खुर्चीवर बसून घेतले.पाच मिनिटे गेली असतील वाघमारे सर अध्यक्षस्थानावरून उठून माझ्याकडे आले.तो माझ्या साठी आश्चर्याचा सुखद धक्का होता. सन्मानाची बाब होती .
थोडा वेळ जवळ बसून पित्याने मुलीची चौकशी करावी अशी प्रेमळपणे विचारपूस केली सरांच्या बोलण्यात कुठेही अहंभाव किंवा परकेपणा जाणवला नाही. मी एका जेष्ठ साहित्यिकासमोर बसलेय याची जाणीवही सरांनी होवू दिली नाही. आपल्याच परिवारातील प्रेमळ व्यक्तीच्या समोर बसले असं वाटत होतं.
थोड्यावेळानंतर सर आपल्या अध्यक्षीय स्थानाकडे परत गेले. या नितळ मानाच्या प्रेमळ व्यक्तिमत्वाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे नतमस्तक होऊन पाहत राहिले.
पुढे वाघमारे सरांचं सगळं साहित्य मागवून वाचून काढलं. यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या . नवीन आलेले सर्व ग्रंथ सरांच्या सहीसह माझ्या कडे येत असतात. याचा खूप आनंद वाटतो.
उद्रेक, रमाई ,आक्रंदन, शाळेचे दिवस, गावाकडच्या गोष्टी, पडझड, अलीकडे यशोदीप प्रकाशनाकडून आलेली नवीन कादंबरी दत्तू मास्तर, शोध ही माझ्या संग्रही असलेली सरांची महत्त्वाची ग्रंथसंपदा अनेकदा वाचून काढली आहे .
वाघमारे सरांच्या साहित्याचा सार जर लक्षात घेतला तर असे लक्षात येईल की गौतम बुद्धाच्या विचारांचे तत्वागुण त्यातून ओसंडून वाहताना दिसतात.
भोवतालाचे वास्तव दर्शन घडविताना मानवी कल्याणाच्या विचारांची पेरणी करणारे वाघमारे सरांचे साहित्य आहे. इतकच नाही तर समष्ठीतील सगळ्याच जीवांविषयीचा कळवळा या साहित्यिकाच्या हृदयात भरून आहे, हे त्यांच्या आक्रंदन या कादंबरीवरून लक्षात येतं.
मानवाने जंगलतोड करून मुक्या जीवांच्या जगण्यावर केलेलं अतिक्रमण, त्यामुळे त्यांचे धोक्यात आलेलं अस्तित्व हे वाघमारे सरांनी अतिशय तळमळीने मांडलं आहे.
रमाई हा सुद्धा अनेक वेळा वाचावा असा ग्रंथ आहे.
दत्तू मास्तर ही कादंबरी वाचकाला नवीन दिशा देऊन जाते. माणसातलं माणूसपण जागे करते. एक शिक्षक किंवा कोणतीही सामान्य व्यक्ती जर ठरवलं तर समाजात खुप काही चांगल बदल घडवून आणू शकते. समाजाकरिता बरच काही करू शकते. हा संदेश योगीराज वाघमारे सरांनी आपल्या दत्तू मास्तर या कादंबरीतून दिला आहे. नोकरीनिमित्त गावात आलेले दत्तू मास्तर मुलांना तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देतातच. सोबतच गावाच्या विकासात मोलाची कामगिरी बजावतात. स्वतःच्या जीवाची परवड करून घेत त्या गावाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत असतात. गावातील लोकांची दुःख त्यांच्या अडचणी कशा दूर करता येतील यासाठी ते रात्रंदिवस कार्यरत असतात. गावात दवाखाना नसल्याने गावातील लोकांचे हाल दत्तू मास्तरांना बघवत नाहीत.
आपली नोकरी करत मुलांच्या विकासाकडे पूर्ण लक्ष देत दत्तू मास्तर वैद्यकीय क्षेत्राचे ज्ञान संपादित करून गावातील लोकांची सेवा करतात. दत्तू मास्तर या माणसाच्या रूपात मानवतेचा झरा माणसाकडे वाहत राहतो. तिथे कसलेही भेद कोणत्याही भिंती शिल्लक राहत नाहीत. माणूस आणि माणुसकी एवढाच शिल्लक राहते.
दत्तू मास्तरसारखे समाज शिक्षण मानवी मूल्यांचा होत चाललेला ऱ्हास थांबवून समाजाला एक नवचेतना प्रदान करून मानवाचं जगणं सुंदर करू शकतात.
असा संदेश लेखक कादंबरीतून देतात. शोध या छोटेखानी ग्रंथातून योगीराज वाघमारे सरांनी आपल्या परिसरातील इतिहास संशोधन करून त्याची जपणूक करण्याचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. प्रत्येक गावातील गावकऱ्यांनी तो करायला हवा.
शाळकरी वयातच असे संस्कार मुलांवर झाले तर अनेक संशोधक निर्माण होतील त्याकरिता मुलांमध्ये चिकित्सक संशोधक वृत्ती वाढीस लागावी याकरिता शिक्षकांनी प्रयत्न करायला हवेत ही मोलाची शिकवण या ग्रंथात द्वारा दिलेली आहे. एकूणच योगीराज वाघमारे सरांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणजे जगात जे मंगल आहे, ज्या विचाराद्वारा मंगल होऊ शकते ह्याची मांडणी करतात. वाघमारे सर यांचे साहित्य विश्व कल्याणाचा संदेश देणारे आहे समाज प्रबोधन करणारे परिवर्तनवादी साहित्य आहे . सरांनी अजून खूप खूप लिहावं हार्दिक शुभेच्छा !!
छाया बेले, नांदेड.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा