शोषण व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारी कविता : तूर्तास तरी
शोषण व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारी कविता : तूर्तास तरी
कोणतीही कला असो, त्यात कलाकाराने भोगलेल्या सुखदुःखाचे प्रतिबिंब हे उमटलेलेच असते. ते त्याचे स्वतःचे असो की भवतालातील असो. कलाकार त्या आगीत स्वतःला झोकून देऊन होरपळत राहतो. भवतालातील वादळात गरगरत राहतो, घायाळ होतो. त्या वेदनेच्या प्रतिध्वनीतून अस्सल कलाकृतीचा जन्म होतो.
कवितेचंही तसंच आहे. हाडाचा कवी हा कोणत्याही एका समूहाचा किंवा गटाचा असू शकत नाही. तो समतेचा, मानवतेचा पाईक असतो. सौंदर्याचा उपासक असतो. माणसामाणसातील भेदभाव, निर्माण झालेली दरी मिटवण्यासाठी समतेची पायाभरणी करीत असतो. शोषण व्यवस्था, तिने मानवतेचे केलेले विद्रूपीकरण थांबवण्यासाठी कवी स्वतःला सोलून घेत राहतो. मानवतेला अंतर्बाह्य सुंदर करताना कवी आपली हयात खर्ची घालतो. असाच मानवतेचा झेंडा घेऊन निघालेला कवी म्हणजे बुद्धभूषण साळवे.
बुद्धभूषण मूळात संवेदनशील चित्रकार आहेत. त्यांचा "तूर्तास तरी..." हा कवितासंग्रह नुकताच हाती आला. समाज माध्यमांतून त्यांच्या कविता वाचनात आल्या होत्या. दर्जेदार वाचनाच्या तृप्तीचा आनंद देणाऱ्या त्यांच्या कविता असल्याने त्यांचा कवितासंग्रह वाचण्याची उत्सुकता होती. "तूर्तास तरी..." हाती येताच मी माझं सुरू असलेलं कादंबरी लेखन बाजूला ठेवून आधी काव्यसंग्रह वाचून काढला. हाकेचा प्रतिध्वनी उमटावा तसा मनात उत्स्फूर्तपणे उमटलेला प्रतिध्वनी मी येथे नोंदवत आहे.
मस्तवाल शोषण व्यवस्था दुर्बल घटकांचे क्रूरपणे शोषण करीत आली आहे व करीत आहे. भारतीय समाजात स्त्री-पुरुष समानतेवर आधारित लिंगभेद, गरीब-श्रीमंत यांच्यातील आर्थिक विषमता, जाती-जातीतील श्रेष्ठ-कनिष्ठता यातून एका घटकाकडून दुसऱ्या घटकाच्या होणाऱ्या शोषणाविरुद्ध कवी बुद्धभूषण साळवे यांची कविता बंड पुकारते. वाळवीसारखं माणूसकीला पोखरणाऱ्या शोषकवृत्तीचा निषेध करते. दांभिक प्रवृत्तीवर प्रहार करते.
भूमिगतासारखं
मला कोंडून घेता येत नाही
स्वतः स्वतःला
कुठल्याच कचकडी तावदानात
मी होतो बेईमान आणि लिहितो
एक इमानदार कविता
उद्याच्या परीघांसाठी
... हाकललेला निळा समुद्र डोळ्यात भरून
'तूर्तास तरी' या बुद्धभूषण साळवे यांच्या संग्रहातील ही कविता. प्रत्येक पानावर अशा इमानदार कविता या संग्रहात वाचायला मिळतात. दुःख, विद्रोह, वेदना सगळंच इमानदारीने मांडलं गेलं आहे. म्हणूनच बुद्धभूषण साळवे यांची प्रत्येक कविता काळजाला भिडते. शोषण व्यवस्थेने शोषितांच्या माथी मारलेले अन्याय-अत्याचार, दैन्य, अपमान याचा भार उचलून कवी आपल्या कवितेवर घेतो.
तूर्तास तरी...
स्थगिती देता येणार नाही मला
या अपूर्ण संघर्षाला...
असं स्वतःला संघर्षरत ठेवून कवीला सूर्य होऊन अंधार वस्त्या उजळून टाकायच्या आहेत. सामाजिक जाणीव ही कवितेची सुरुवात असते. त्याकरिता वेदना ही पूर्वअट असते. भुईच्या गर्भात न साठणारा एखादा उमाळा अनेक कातळं छेदित वर यावा आणि तो झरा अमेझॉन नदीसारखा दीर्घ प्रवास करत विस्तारत जावा, तसंच कवितेचंही असतं.
विद्रोह ही भावना तेवढीच नैसर्गिक व आदिम आहे जेवढी भूक ही भावना. जिथे दमनाने शेवटचे टोक गाठले, त्या टोकावर विद्रोहाचा जन्म होणे निश्चित असते. कवी बुद्धभूषण साळवे यांचा विद्रोह सर्व शोषित घटकांसाठीचा आहे. मानवकल्याणासाठी जो संतांनी केला, महामानवांनी केला. मुक्या वेदनांचा आवाज होत मानवमुक्तीचे विराट स्वप्न पाहणारी बुद्धभूषण साळवे यांची ही विद्रोही कविता आहे.
व्यवसायाने अभियंता असलेले बुद्धभूषण साळवे चित्रकार व विद्रोही कवी म्हणून परिचित असले तरी कविता वाचत असताना त्यांच्या हळव्या मनाचा प्रत्यय अनेक कवितांमधून येतो.
हे युगनायका
तू उगवलास असा की
झालास अखंडतेचा सूर्य
म्हणूनच तर तू आहेस
आमचा मायबाप
जन्मोजन्मीचा...
'युगायुगाचा नायक' (पान ५९) ही महामानवाचे ऋण व्यक्त करणारी प्रकाशमान कविता आहे. 'आमच्या रक्तातून वाहणारा...' (पान ५७) ही अजून एक कविता बाबासाहेबांविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारी आहे.
अफाट प्रतिभेच्या कवीने विद्रोह, दुःख, वेदना या सगळ्याला प्रतीमा-प्रतीकांचे कोंदण चढवून वेगळंच सौंदर्य प्राप्त करून दिले आहे. बुद्धभूषण साळवे यांची कविता वाचकांच्या मनाचा तळ ढवळून अस्वस्थ करणारी आहे, विद्रोह पेरणारी आहे.
बुद्धभूषण साळवे यांनी अजून खूप लिहावे. पुढील निर्मितीसाठी आभाळभर शुभेच्छा.
- छाया बेले, नांदेड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा