साम्राज्ञी ते गुलाम: स्त्रीच्या अधोगतीचा प्रवास - -भाग एक | मराठी लेख




भाग १ : साम्राज्ञी ते गुलाम — स्त्रीच्या अधोगतीचा प्रवास


      भारतीय समाजाला मातृसंस्कृतीचा समृद्ध असा वारसा म्हणजेच न्याय, समता व शोषणमुक्त व्यवस्थेचा वारसा असूनही या समाजात स्त्रीदास्य अस्तित्वात यावं आणि ते हजारो वर्षे टिकून राहावं, ही अतिशय खेदाची बाब आहे.
शोषणमुक्त संस्कृतीचे पतन होऊन तिथे भेदावर, शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण होणं, हीच भारतीय समाजाच्या पतनाची सुरुवात म्हणावी लागेल.
आदिमानव जेव्हा आदिम अवस्थेत होता, तेव्हा आपल्या जन्माला फक्त माता कारणीभूत आहे, असा त्याचा समज होता. शेतीचा शोध स्त्रीनेच लावलेला असल्याने स्त्रियांमध्ये काहीतरी अलौकिक शक्ती आहे, अशी त्यावेळी मान्यता होती. त्यामुळे मातृसंस्कृतीत स्त्रियांचे वर्चस्व सर्वांना मान्य होते.
स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेत स्त्री ही राज्यकर्ती होती. तिला गणिका असे संबोधले जात होते. गणिका म्हणजे गणाची मालकीण, आपल्या जमिनीचे आपल्या कुलात समान वाटप करणारी गणराणी. आम्रपालीसुद्धा अशीच एक गणराणी होती. ती समानतेच्या लोकशाहीच्या तत्त्वावर शासन चालवत असे. त्यामुळेच गौतम बुद्धांनी अनेक राजपुत्रांच्या जेवणाचे निमंत्रण न स्वीकारता आम्रपालीचे निमंत्रण स्वीकारून तिच्या घरी जेवण घेतलं.
त्या समाजात स्त्री पूजनीय होती. त्या काळात जन्माला येणारी मुले ही आईच्या नावाने ओळखली जात होती. त्या मुलावर आईचा अधिकार होता. कुंतीची मुले ही कौंतेय किंवा कुंतीपुत्र या नावाने ओळखली जातात, हे मातृसंस्कृतीचे ठळक उदाहरण होय. कुटुंबप्रमुख महिला असायची. त्यावेळी माणसामाणसात कुठलाही भेद नव्हता. स्त्री ही जन्मदात्री, निर्माती आहे म्हणून आदरणीय होती व सगळी सूत्रे, सगळे अधिकार तिच्याकडे होते.
या काळातील स्त्रीचं वर्णन करताना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्रीमुक्तीचे युद्ध' या ग्रंथात डॉ. यशवंत मनोहर लिहितात —
“इ.स. पूर्व तीन हजार वर्षापर्यंत एकूण जगाच्या पाठीवरील स्त्री मुक्त होती. ती पाखरासारखी स्वच्छंदी होती. तिच्या पंखात स्वप्ने होती आणि स्वप्नापुढे मोकळे, असीम आकाश होते. दास्याच्या कोणत्याही बेड्या तिच्या पायात पडल्या नव्हत्या. तिला कोंडण्यासाठी सोन्याचे पिंजरे निर्माण करायचे कोणाला सुचले नव्हते. तिचे मन वाऱ्यासारखे सर्वसंचारी होते. तिची नजर निर्भय होती. ती स्वावलंबी आणि स्वयंप्रकाशित ग्रहासारखी होती.”
पुढे नांगराचा शोध लागला आणि पुरुषाचं शेतीवर वर्चस्व प्रस्थापित झालं. त्याचबरोबर मूल जन्माला येण्यात पुरुषाचा सहभाग असतो, असा बोध झाला आणि स्त्रीचे महत्त्व कमी होत गेले.
पुढे विवाह, कुटुंब, धर्म, वर्ण, जाती अशा संस्था निर्माण केल्या गेल्या. आणि हे सगळे टिकवून ठेवण्याकरिता स्त्रीला बंदिस्त व गुलाम करून ठेवणे आवश्यक होतं.
हे सगळं साध्य करण्यासाठी स्त्रीचे महत्त्व कमी करून तिला हीन दर्जाची ठरवणं आवश्यक होतं. म्हणूनच मग धर्मशास्त्रे निर्माण केली गेली. त्यातून स्त्रीवर अनेक आरोप करीत तिला अनेक बंधनांच्या बेड्यात अडकवले गेले. तिचे सगळे अधिकार काढून घेऊन मूल जन्माला घालण्यासाठी घर नावाच्या कोठडीत कैद केले गेले.
तिला दृष्ट, पापी, स्वैर ठरवून स्वातंत्र्याच्या लायक नाही, असा आरोप करून अनेक क्रूर कायदे तिच्यावर लादण्यात आले.
उदाहरणासाठी मनुस्मृतीमधील 'स्त्रियांचे धर्म' या शीर्षकाखाली, पान क्र. १३४ वर सांगितलेले नियम —
बाल्यावस्थेतील मुलीने, तरुण स्त्रीने किंवा वृद्ध बाईने गृहातील एखादे लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये. बाल्यावस्थेत पित्याच्या अधीन होऊन राहावे. तरुणपणी पतीच्या आज्ञेत असावे व पती मरण पावल्यावर पुत्राच्या अधीन चालावे; पण स्वतंत्र कधीही होऊ नये. पिता, पती किंवा पुत्र यास सोडून राहण्याची स्त्रीने कधीही इच्छा करू नये. पती जरी विरुद्ध असला, तरी स्त्रीने प्रसन्न मुद्रेने असावे. पिता किंवा त्याच्या अनुमतीने चालणारा भ्राता ज्याच्या स्वाधीन करील, तो जिवंत असेपर्यंत तिने त्याची सेवा करावी.
वाग्दानानेच ती पतीची वस्तू होते. तिच्याशी विवाह करणारा पती तिला ऋतुसमयी व नसताना नेहमी या लोकी सुख देणारा आहे. पती सदाचारी असो की दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करणारा असो, की विद्यादि गुणशून्य असो, तो कसाही असला तरी साध्वी स्त्रीने देवाप्रमाणे त्याची सतत सेवा करावी. स्त्रियांस दुसरा यज्ञ नाही.
पती मरण पावल्यावर परपुरुषाचे नावही घेऊ नये. मरणापर्यंत क्षमायुक्त व नियमयुक्त होऊन पूर्ण ब्रह्मचर्य पाळून राहावे. ज्या साध्वी स्त्रिया आहेत, त्यांना दुसरा पती करण्याविषयी कोणत्याही शास्त्रात सांगितले नाही.
भर्त्यास सोडून परपुरुषाशी समागम करणारी स्त्री या लोकी निंद्य होते व मेल्यावर ती शृगालयोनीमध्ये उत्पन्न होते.
याचसोबत पुरुषांकरिता नियम — पूर्वी मेलेल्या भार्येस अंत्यकर्मामध्ये अग्नीत समर्पण करून गृहस्थाश्रमाकरिता पुत्र झालेला असो की नसो, पुनर्विवाह करावा.
स्त्रियांना वेद शिकण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांचे संस्कार वैदिक मंत्रांशिवाय करायचे. वैदिक मंत्र उच्चारला तर पाप नष्ट होते, ज्या अर्थी स्त्रिया वैदिक मंत्र उच्चारू शकत नाहीत, त्या अर्थी त्या असत्य पापमय स्थितीत राहणाऱ्या आहेत. स्त्रियांना वेद शिकण्याचा अधिकार नसल्याने त्यांना संन्यासवृत्तीचा अधिकार नाकारला गेला.
“स्त्रियांपेक्षा अधिक पापी जगात दुसरे काहीही नाही. पुरुषांना मोहित करण्यासाठी परमेश्वराने स्त्रियांच्या रूपात हडळी निर्माण केल्या आहेत.” — महाभारत (४४६)
धर्मशास्त्राच्या पानापानांतून स्त्रियांना अपमानित, लाचार बनवणारे, त्यांचं माणूसपण नाकारणारे व आपली सत्ता, वर्चस्व कायम राहील असे कायदे, नियम एवढ्या हिनकसपणे तयार केले गेले. पशूपेक्षाही हीन दर्जा स्त्रीला देण्यात आला.
मातृसंस्कृतीत ज्या गोष्टींना प्रतिष्ठा होती, त्या गोष्टी हीन ठरवल्या गेल्या. मातेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी योनीरूपात उपासना केली जात होती; मात्र धर्मशास्त्रांनी तिला नरकाचे द्वार ठरवून टाकले. तिचं चरित्र, शील, पवित्रता सर्व फक्त योनीशुचितेशी जोडून तिच्या अस्तित्वाचा संकोच करण्यात आला. तिला ज्ञानार्जन वर्ज्य करून आत्मविकासाच्या वाटा बंद केल्या.
या कपटपूर्ण तयार केलेल्या नियमांचा ताराबाई शिंदे यांनी 'स्त्री-पुरुष तुलना' या ग्रंथात समाचार घेतला आहे —
“एकदा सौभाग्य गेले म्हणजे स्त्रियांनी आपली तोंडे अगदी एखाद्या महान खुन्यापेक्षाही महाजबर अपराध्याप्रमाणे काळी करून आयुष्यभर अंधार कोठडीत रहावे त्याप्रमाणे बायका मेल्या म्हणजे दाढ्या मिशा भादरून यावत् जन्मपर्यंत कोठेही अरण्यवासात का राहू नये बरे? एक बायको मेली म्हणजे दहाव्या दिवशी दुसरी करून आणावी असा तुम्हाला कोणत्या शहाण्या देवाने दाखला दिला आहे तो दाखवा बरे?”
ताराबाई शिंदे यांनी १८८२ साली व्यवस्थेचे ढोंग उघडे पाडले.
'स्त्री ही जन्मत नाही, तर घडविली जाते,' हे सिमोन द बोहुआर यांचे वाक्य समस्त स्त्रीजीवनाचा सार आहे.
“स्त्रीवर लादलेले निकृष्ट जीवन हे एकूण भारतीय समाजाच्या निकृष्टतेचे व दुरावस्थेचे एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे.” — आ. ह. साळुंखे, हिंदू संस्कृती आणि स्त्री
क्रमशः…
— छाया बेले


टिप्पण्या

  1. भारतीय स्त्रियांच्या दुःखाचे मूळ शोधण्याचा अभ्यासपूर्ण प्रयत्न केला आहे... खूप छान..!

    उत्तर द्याहटवा
  2. अभ्यासपूर्ण लेख... आणि सहमत आहे तुमच्या मतांशी..

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .