मनिषा पाटील यांच्या कवितेवरील रसग्रहण
*****************************
बायका टाळतात बायकांना
*****************************
बायका टाळतात बायकांना
त्या उपाशी राहतात
संवादाशिवाय.....
कित्येक दिवस
कित्येक महिने .
तुरटी फिरवून
गप्पकन बसवता येत नाही त्यांना
मनाच्या कोपऱ्यांना चिकटलेली असुयेची राळ.
त्यांना लागत नाही कारण बिरण
कित्येकदा विनाकारणही
त्या टाळत राहतात
ऐकमेकींना...
समारंभाच्या झगमगाटात..कधी बाजाराच्या गर्दीत
कधी भगभगीत रस्त्यावर
तर कधी फेसबुक,व्हाॕट्सअॕपवर.
बायकांना नकोसा वाटतो
ऐकमेकींचा नेञकटाक्ष...
अगोदरच ठाण मांडून बसलेल्या जावेसारखी
बाई असह्य होते बाईलाच.
वरचढपणाच्या तालेवार कटारी
घुसत राहतात काळजात...
बायका कुजबुजतात
त्यांना सोसत नाहीत
मैञिणीच्या फोटोचे शेकडो लाईक्स,.,,
कुबट अंड्यासारख्या त्या
घुमत राहतात दुर्गंधीने
बायका टाळतात बायकांना .
बायकांना नको नको वाटतात बायका
त्यांच्यासमोर मिरवणा-या...
त्यांच्या ताणलेल्या त्वचेत
दिसत नाही
मोनालिसाचे स्मित...
बायका फुलत नाहीत
कोणत्याच बहरात मोकळेपणाने.
त्या खुरट्या झाल्यात बोराटीसारख्या...
बायका विसरताहेत
ऐकमेकींचा हात हातात घेणं
झिम्मा ,फुगडी खेळणं...
झोपाळ्यावर हिंदळणं...
मूठभर मोगरीला वाटून घेणं...
दिसभर गंधात वाहत राहणं....
बायका टाळताहेत बायकांना
त्या सांगत नाहीत
आपली खरी ओळख ऐकमेकींना
त्या वावरताहेत कठपुतळीसारख्या नटूनथटून
पण त्या बोलत नाहीत ...हसत नाहीत ...
त्यांना मंजूर नाही
आपल्या डोळ्यांतील
निरागस फुलपाखरु
ऐकमेकींना दाखवणं...
जिथे फुलू शकतो
मैञीचा निष्पाप ताटवा..
मनीषा पाटील.
देशिंग हरोली
बायका टाळतात बायकांना
या कवितेत कवयित्री, मनिषा पाटील यांनी स्त्रियांच्या मानसिकतेवर अतिशय मार्मिक भाष्य केले आहे.
पुरुष सत्ताक व्यवस्थेकडून त्यांच्यावर लादलेले दुय्यमत्व, त्यातून निर्माण झालेली त्यांची श्रेष्ठत्वाची ओढ.
इथेच मग बायका बायकांच्या स्पर्धक होतात. एकमेकिंना मागे खेचू पाहतात असं निरिक्षण कवयित्रीने या कवितेत नोंदवलं आहे.
स्त्रियांनी पुरुषांचं श्रेष्ठत्व मान्यच केलेलं असतं त्यामुळे त्या पुरूषांसोबत स्पर्धा करीत नाहीत.
तर त्या आपसात स्पर्धक म्हणून उभ्या टाकतात. कोणी आपलं स्थान टिकविण्यासाठी, तर कोणी वरचं स्थान मिळवण्यासाठी एकमेकिंना कमी लेखून तिचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात.
यात सासू, सून .. जावा जावा, नंणंद भावजय , अशा अनेक नात्यात हेवेदावे पहायला मिळतात.
तेही पुरुषांच्या नजरेत श्रेष्ठ ठरण्यासाठी सगळा आटापिटा केला जातो.
आजच्या सुशिक्षित स्त्रियांनी मनातील असुयेचा गाळ विचारांची तुरटी फिरवून तळाशी बसवायला हवा.
असा मोलाचा विचार , सल्ला कवयित्री देते.
खरंच यावर महिलांनी अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
समोरच्या स्त्रीचं नातं, जात ,धर्म हे पाहण्याआधी, ती आधी एक स्त्री आहे हा अद्वैत भाव मनात असायला हवा.
महिलांनी महिलांच्या बाजूने उभं राहण्याची खूप गरज आहे. त्यामुळे समाजातील अनेक प्रश्न सुटतील.
अनेक चुकीच्या रुढी परंपरा नष्ट होतील.
डोळ्यात अंजन घालणारी ही एक महत्त्वाची कविता आहे. या विचारावर सर्व महिलांनी चिंतन करायला हवं
कवयित्री, मनिषा पाटील यांच हार्दिक अभिनंदन !!
छाया बेले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा