मां साहेब : मराठी कविता

मां साहेब




मनोगत :  मां साहेब तुम्ही होता म्हणून.

      मी जेव्हा जिजाऊ माँ साहेबांचा विचार करते, तेव्हा मला त्या फक्त शिवरायांच्या आई वाटत नाहीत. त्या मला पहिल्या स्त्री-गुरू वाटतात, पहिल्या क्रांतिकारी विचारवंत वाटतात. ज्या काळात स्त्रीला स्वतःचं नावही नव्हतं, त्या काळात एका माऊलीने आपल्या गर्भात   स्वराज्याचं स्वप्न पोसलं. अंधार युग संपविणारा सूर्य पोसला. 
हा विचारच मला थक्क करतो. 

आज आपण मुलांना काय संस्कार देतो? मोठा हो, नोकरी कर, पैसा कमव. पण जिजाऊंनी काय सांगितलं? "शिवबा, रयतेचे राज्य आण." आपलं नाही, रयतेचं. आणि दुसरा मंत्र, "परस्त्री मातेसमान जाण." आज स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी आपण किती कायदे करतो, पण एका आईने दिलेला हा एकच संस्कार जर प्रत्येक मुलाने पाळला, तर एकही कायदा करायची गरज पडणार नाही.

म्हणूनच मी या कवितेत म्हटलंय, विषमतेचं कुंदाड काढलं खणून. शिवरायांनी फक्त परकीय शत्रूशी लढा दिला नाही, तर जाती-भेद, विषमता या आतल्या शत्रूंशीही लढा दिला. सर्व जाती धर्माचे लोक त्यांचे जीवाला जीव देणारे मावळे होते. 
आणि हे बीज त्यांच्या मनात पेरलं ते जिजाऊंनी.

ही कविता म्हणजे  एका  लेकीने आपल्या असामान्य आईला वाहिलेली एक छोटीशी शब्द- सुमनांजली आहे. मां साहेब, तुम्ही होता म्हणून आम्ही आज ताठ मानेने उभ्या आहोत.

- छाया बेले


मां साहेब, 
अंधार युग 
मध्यानीवर असताना
तुम्ही पोसला सूर्य 
आपल्या गर्भात
अन् स्वराज्याची 
उजेड स्वप्ने 
घातली जन्माला

"शिवबा रयतेचे राज्य आण
परस्त्री मातेसमान जाण"
तुमचा हा गुरुमंत्र जपत
रयतेच्या राजाने
यवनाच्या छातीवर पाय रोवून 
ठेचले उशाखालचे कित्येक साप
रयतेला उराशी धरून
उभारले रयतेचे राज्य
रयतेसाठी
विषमतेचं कुंदाड
काढलं खणून
भेदाचा कचरा जाळून 
आणि केली मानवतेच्या 
बीजांची पेरणी 
स्वराज्याच्या भूमीत
हे सगळं घडलं
मां साहेब तुम्ही होता 
म्हणून !!

@छाया बेले 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .