तुझ्या साठीही असतो एखादा दिवस ? | मराठी कविता
माहितही नव्हतं तेव्हा
मात्र तूच फिरत रहायचीस
श्वसाच्या सांदिकोपऱ्यातून
तुझा चेहरा पाहून उघडायचं
हा हट्ट असायचा डोळ्यांचा
तू यायचीस समोर
कधी गवताचा भारा
कधी लाकडाची मोळी
कधी पाण्याची घागर
डोक्यावर घेऊन
अन् उगवायचा माझा दिवस
येता जाता जवळ नाही घेतलंस कधी
मात्र शाळेत जाताना घातलेल्या वेण्या
जवळ ओढून पदरानं रगडून तोंड पुसणं
नको म्हणताना दप्तरात कोंबलेली भाकर
क्वचित कपाळावर टेकवलेले ओठ
या आठवणींना जीवनाचं तत्त्वज्ञान
सांगून कितीही दूर सारलं तरी
तेवढ्याच निग्रहाने गडद होत राहतात
काळजातून काही वेगळं करणं
तसंही नसतंच सोपं
तुझ्या शिवाय जगायचं असतं
एकटीने तगायचं असतं
हे नव्हतंच माहित तेव्हा
अंधार पसरू लागताच
कड्याच्या टोकावरून दिलेली हाक ऐकून
तू यायचीस वर हातात खुरपे
चेहऱ्यावर हसू घेऊन
माझी हाक ऐकून
येशील नेहमीच समोर
हेच अमर सत्य वाटायचं तेव्हा
तू हात सोडवून
विसावलीस सरणावर
मी मात्र जळत आहे अजुनही
गरगरतेय
काळाच्या भोवऱ्यात
मी नाही म्हणत,
तू माझं जग होतीस
बाहेरचं जग तर होतं तसंच आहे
पण आतलंच काही तरी लयाला गेलंय
कदाचित चेतना..
मला माहित नाही तू माझं काय होतीस...
@ छाया बेले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा