आस्वाद: घामाची ओल धरून ( कविता संग्रह)
आस्वाद : घामाची ओल धरून ( कवितासंग्रह)
आबासाहेब पाटील यांचा
' साध्या माणसाच्या कविता ' हा संग्रह वाचला आणि कविता मनात घर करून गेली .
सोशल मिडियावर हल्ली कवितेचा धो धो पाऊस पडतोय . त्यात " कविता " खूप कमी सापडतात . या पसाऱ्यात काहीच कविता आपलं अस्तित्व ठळकपणे अधोरेखित करतात .
चंद्र , सुर्य , पाऊस , नदी , समुद्र यांना स्वतःची ओळख करून द्यावी लागत नाही . तसंच कवितेलाही तिची ओळख करून देण्याची गरज नसते .
कवितेला ही कविता आहे असं सांगावं लागत असेल तर ती कविता असेलच असे नाही .
आबासाहेबांची कविता हिमनगासारखी आहे. तिची खोली आणि उंची सारखीच . जीवनाच्या गल्लीबोळातून वाहात थेट तळ गाठते . वर येऊन पर्वत होते .
आबासाहेब पाटील यांचा " घामाची ओल धरून " हा कविता संग्रह नुकताच हाती आला आणि पुन्हा पुन्हा वाचून काढला . आबासाहेबांची कविता प्रत्येकवेळी नवी भासते . नव्याने उलगडत जाते . तर कधी आपल्या अलवारपणाने संमोहित करून बधिर अवस्थेत घेऊन जाते .
माझ्या वेदनेने झाला
काळाकुट्ट पांडुरंग
इंद्रायणी बुडविते
माझ्या सत्वाचा अभंग
हे आबासाहेबच लिहू जाणे .
आबासाहेबांच्या शब्दगभाऱ्यात वाचक नतमस्तक होतो .
कवीच्या शब्दपरीसाने दुःखाचंही सोनं केलंय .
काळवेळ बघत जा जरा
असं अवेळी लाडात येणं बरं नाही .
लोक काय म्हणतील ?
एकमेकांत साखळीसारखी कामं सोडवून घेताना
कळत नाही मला... कधी उजाडतं अन् मावळतं
माझ्या प्रिय अधिर कविते
माझं लक्ष आहे तुझ्या कडे .
जीवन व्यवहार सुरू असताना मधेच आडव्या येणाऱ्या कवितेची समजूत घालणाऱ्या या ओळीं तरलता कवी आणि कवितेची एकरुपता दर्शवतात .
आबासाहेबांची कविता जगण्याच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करते .
जीवन - मरणाच्या आत जो जगण्याचा पसारा आहे त्यातल्या प्रत्येक क्षणावर कवीने आपला ठसा उमटवला आहे . जीवन प्रवाहात सदैव वाहणाऱ्या वेदनेच्या झऱ्यांना कवी शब्दांत जोजवतात .
ज्ञानदेवा
आमच्या बापाची भूक बारकी
त्यानं मागितलं नाही
जगासाठी पसाभर दान
लेकरांनी भाकरीला भिडावं
एवढं त्याचं सपान
या कवितेतून कवी बापाची महती सांगतात तेव्हा शब्द आभाळ होतात .
ही कविता कधी कनवाळू आई होते . कधी विद्रोह करून प्रवाहाच्या विरुद्ध वाहते .
' स्व " ला स्पर्शून आलेली कविताच कविता असते ' आबासाहेब पाटीलांच कवितेविषयीचं हे मत त्यांच्या कविता वाचताना लक्षात येतं . त्यांची कविता ही स्व ला स्पर्शून आलेली आहे . नंतर ती परकाया प्रवेश करून कातडीखाली ठसठसणाऱ्या सर्वच मुक्या वेदनांना आपल्या शिरावर घेऊन चालत राहते .
कवितेची एक कोरी वही
पडून आहे कपाटात
लयीत न बसलेली उलघाल
काळजात
असं जरी कवी म्हणत असले तरी , प्रत्येक जीवनजाणीव कवीने आपल्या कवितेत लयीत पकडून नेमकेपणाने टिपलीय .
कवितेने जीवनातील सुखदुःख कवेत घेऊन , त्यावर उपाययोजनांची मलमपट्टी करून वाहत जाणं हीच तर कवितेची समृद्धी होय . ही समृद्धी आबासाहेब पाटील यांच्या कवितेकडे आहे .
ही कविता सयंमी आहे . कुठेही आक्रस्ताळेपणा दिसून येत नाही .
घरातील वडिलधाऱ्या व्यक्तीने समजुतीने चार हिताच्या गोष्टी सांगाव्यात तसं ही कविता जीवनाचा पट उलगडून दाखवते त्याचबरोबर कधी कान टोचत , कधी औपरोधीकपणाने तर कधी आईच्या ममतेने , कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष उपाय सुचवीत जाते .
शब्दशिवार प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या
" घामाची ओल धरून" या समर्पक शिर्षकखाली प्रकाशित आबासाहेब पाटील यांचा हा कविता संग्रह. अंतर्बाह्य सुरेख असा संग्रह आहे . कवितेच्या दर्दी लोकांनी हा संग्रह वाचलायलाच हवा . एकशे चौव्वेचाळीस पानांच्या या संग्रहातील प्रत्येक पान आपल्या संपन्नतेने कवितेने सार्थकी लावले आहे.
अर्थाची खोली गाठणारं मुखपृष्ठ कविता संग्रहाच्या उंचीला साजेसं आहे .
कवीने ' शब्दांशिवाय कविता जगणाऱ्या सहजीवांना ' हा संग्रह अर्पण केला आहे .
आबासाहेब पाटील यांनी अजून खूप लिहावं . त्यांच्या पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा!!
छाया बेले.
पुस्तक: घामाची ओल धरून ( कवितासंग्रह )
कवी : आबासाहेब पाटील
प्रकाशन : शब्दशिवार प्रकाशन
पृष्ठे : १४४
मुल्य : २०० रू
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा