बोल्ट- घरी आला तेव्हा - भाग एक
आमचा बोल्ट्या आला तेव्हा...
हा जेव्हा घरी आला तेव्हा... खरं सांगू? तो ससाही नव्हता, बाहुलाही नव्हता. तो होता माझ्या तळहातावर अलगद मावेल एवढासा जीव!
मी दोन्ही हाताची ओंजळ केली, तर त्या ओंजळीत तो गपगार बसे. इतका छोटा की मला भीतीच वाटायची, जोरात श्वास घेतला तर कुठे उडून जाईल की काय!
आणि त्याचे डोळे... अरे बापरे! त्याचे डोळे काचेच्या दोन लहानशा गोट्या कोणी त्याच्या चेहऱ्यावर चिकटवल्यात असं वाटायचं. पाणीदार, काळेभोर, सारखे लुकलुकणारे. जेव्हा तो माझ्याकडे बघायचा, तेव्हा वाटायचं जणू दोन छोट्या काचेच्या गोटया ठेवल्यात !
त्या लुकलुकत्या डोळ्यांमागे, अगदी पिंगपॉंगच्या चेंडूवर छोटासा चेहरा चिटकवावा, तसा त्याचा चेहरा. 'गोड', 'क्यूट', 'छान' हे सगळे शब्द त्याच्यापुढे फिके पडतील. इतका गोड की पाहताच एकदम गुदगुल्या व्हाव्यात मऊ.
डोक्यावर दोन लांब, मऊ-मऊ कान. त्याचे कान सारखे टवकारलेले. कधी उजवीकडे, कधी डावीकडे - सारखं काहीतरी ऐकत असल्यासारखे. आम्ही हळूच "बोल्ट्या..." म्हणालो तरी ते कान एकदम ताठ व्हायचे!
आणि मिशा? मांजराला असतात तशा बारीक, पांढऱ्या काळ्या रंगाच्या. नाकाजवळून फुटलेल्या. जेव्हा तो काहीतरी हुंगायचा, तेव्हा त्या मिशा थरथर कापायच्या.
त्याचा रंग तर आणखीनच भारी. शरीराचा बराचसा भाग काळा - अगदी कोळशासारखा काळाभोर. पण मधेच, पोटावर, पायांवर पांढरे ठिपके. जणू कोणी पांढरा रंग सांडलाय! आणि सगळ्यात भारी म्हणजे मानेवर एक पांढरा पट्टा. अगदी जणू छोट्या बाळाने पांढरा मफलरच घातलाय असं वाटायचं!
चेहरा बोटभर लांबीचा चेहरा. पण त्याचाही अर्धा भाग काळा, अर्धा भाग पांढरा. जणू दोन रंगांनी मिळून त्याचा चेहरा रंगवलाय!
इवलेसे, गुलाबी ओठ. वरचा ओठ मधून दोन भागात चिरलेला . त्या छोट्या ओठांच्या आत डोकावलं की दिसायचे सुईसारखे, टोकदार, पांढरे शुभ्र दात. छोटेशे, पण एकदम तीक्ष्ण!
आणि पाठीमागे? इंचभर, छोटीशी, काळी पांढरी गोंडेदार शेपूट. बटन लावलं अशी.
त्या शेपटीच्या खाली दोन थोडे लांब, मजबूत पाय - उड्या मारण्यासाठी तयार. आणि समोरचे दोन पाय थोडेसे आखूड, पण गाजर पकडण्यासाठी एकदम एक्सपर्ट!
आता तुमच्या लक्षात आलं असेलच मी कोणाबद्दल सांगतेय ते!!
उं... हूं... ससा नाही हं...!!
हा आहे आमचा बोल्ट!!
हो, त्याचं नाव बोल्ट! तो घरभर सुसाट पळायचा म्हणून बोल्ट!
आम्ही त्याला लाडाने बोल्ट्या म्हणायचो.
काय? तुमचेही कान आता बोल्ट्यासारखे टवकारले ना! पुढे काय झालं हे ऐकण्यासाठी!
हो हो, सगळं सांगणार आहे. थांबा हं...
@ छाया बेले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा