माणसातील माणूसपण प्रकाशमान करणारे साहित्यसूर्य अण्णा भाऊ !! //
// माणसातील माणूसपण प्रकाशमान करणारे साहित्यसूर्य अण्णा भाऊ !! //
-छाया बेले
साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यावर आतापर्यंत खूप लिहिलं गेलंय. अनेकांनी त्यांच्या साहित्यावर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली, अनेकांनी ग्रंथ लिहिले. तरीही अण्णा भाऊंवर लिहायचं संपलं असं कधीच होत नाही. हेच तर या महामानवाच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्यावर जेवढं लिहावं तेवढं कमीच आहे. कारण त्यांचं कार्यच एवढं विशाल, एवढं अथांग आहे. अण्णा भाऊंचं साहित्य जितक्या वेळा वाचावं, तितक्या वेळा एक नवा पैलू, एक नवा प्रकाश समोर येतो.
अण्णा भाऊंनी शोषितांचं दुःख, दैन्य, दारिद्र्य जगाच्या चव्हाट्यावर आणलं. झोपडपट्टीत, वाडीत, वस्तीत दबलेल्या माणसाला त्यांनी साहित्यातून आत्मभान दिलं. स्त्रियांना तर त्यांनी केवळ पात्र म्हणून नाही, तर स्वाभिमानाची मशाल म्हणून उभं केलं. त्यांच्या साहित्यातून न्याय, समता, बंधुता ही मूल्यं जगली. मानवकल्याणाचा विचार त्यांनी मांडला.
जे कार्य गौतम बुद्धांनी, तुकाराम महाराजांनी, बसवेश्वरांनी केलं, जो विचार, जे तत्वज्ञान या महामानवांनी जगाला दिलं, त्याच तत्वज्ञानाचा धागा अण्णा भाऊंच्या साहित्यात सापडतो. फरक इतकाच की त्यात जीवनाचं सौंदर्य ठासून भरलेलं आहे. दुर्दम्य आशावाद आहे. मानवतेप्रती दया, करुणा, वात्सल्य भरून वाहतंय.
"हा देश सुखी, समृद्ध नि सभ्य व्हावा, इथे समता नांदावी, या महाराष्ट्र भूमीचे नंदनवन व्हावे अशी मला रोज स्वप्नं पडत असतात. ती स्वप्नं पाहत मी लिहित असतो."
वैजयंता कादंबरीच्या प्रस्तावनेत अण्णा भाऊंनी हे मत मांडलंय. यावरूनच कळतं की ते मानवी जीवनाच्या उत्कर्षाचा उद्देश समोर ठेवून लिहीत होते. केवळ लिहिण्यासाठी लिहिणं नव्हतं, तर माणसाला उंचीवर नेण्यासाठी लिहिणं होतं.
अण्णा भाऊंचं साहित्य सामान्य माणसाच्या जगण्याला बळ पुरवणारं आहे. सामान्यातील असामान्यत्व दाखवून देणारं आहे. खचलेल्या मनाला हिंमत देणारं आहे. त्यांच्या साहित्यातील पात्रांनी परिस्थितीसमोर कधीच गुडघे टेकले नाहीत. उलट प्रतिकूल परिस्थितीला नामोहरम करून त्यावर आपल्या जिद्दीची विजयी पताका फडकवली.
अशी लढवय्यी पात्रेच अण्णा भाऊंच्या साहित्यात दिसतात, ज्यांनी आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही.
झोपडपट्टीतील गुंडाशी झुंज देणारी चंदन आहे. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध बंड पुकारणारा क्रांतिकारक फकिरा आहे. भावाने केलेल्या फसवणुकीचा, आपल्यावर झालेल्या अन्यायाचा विद्रोह करीत रामोशी समाजातील नायकाशी लग्न करणारी आवडी आहे. आपल्या प्रियकरावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि कठीण प्रसंगी खांद्यावर बंदूक घेऊन लढणाऱ्या नायिका केवळ अण्णा भाऊंच्याच साहित्यात दिसतात.
माणसाच्या जगण्याला उंची देण्याचं काम साहित्यसम्राट अण्णा भाऊंनी केलं आहे. त्यांनी कुठेही माणुसकीचं, माणूसपणाचं तेज कमी होऊ दिलं नाही. माणूस केवळ उत्कर्षासाठी आहे, हेच त्यांनी आपल्या जीवनातून आणि साहित्यातून दाखवून दिलं.
अण्णा भाऊंना कुठलाही शैक्षणिक, साहित्यिक वारसा नव्हता. तरीही स्वतःच्या जीवनात प्रचंड संघर्ष करीत राजकीय, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात त्यांनी जे उत्तुंग कार्य केलं, त्याला तोड नाही.
अण्णा भाऊंनी जे जे विषय हाताळले, ते सर्व विषय त्यांनी सारख्याच उंचीला नेऊन ठेवले. उपेक्षित, वंचित घटकांच्या जगण्यातील दैदिप्यमान माणूसपण त्यांनी उजेडात आणलं. त्यांच्या साहित्यात तत्वासाठी प्राण पणाला लावणारे नायक आहेत, तेवढ्याच ताकदीच्या नायिका आहेत. त्यांच्या वाट्याला पराकोटीचा संघर्ष आलेला असताना त्यावर मात करण्याची जिद्दही तेवढीच मोठी आहे.
केवळ जगण्यासाठी, भाकरीसाठी संघर्ष नाही, तर सत्यासाठी, न्यायासाठी, माणूस म्हणून जगताना त्या माणूसपणाची शान राखणारे अण्णा भाऊंचे नायक-नायिका आहेत. माणूस कसा असावा, हे अण्णा भाऊंच्या साहित्यातून कळतं. मानवी जीवनाला प्रकाशमान करण्याचं काम अण्णा भाऊंचं साहित्य करतं.
अनुभवाचं विस्तृत आभाळ, विचारांची पक्की बैठक, उच्च कोटीची प्रतिभा, त्याला असलेली तत्वज्ञानाची जोड, जगाकडे पाहण्याची खुली नजर, दुर्दम्य इच्छाशक्ती - याच्या बळावर अण्णा भाऊंनी मानवतावादी साहित्याचा जणू हिमालय निर्माण केला.
जीवनाच्या अस्सल भावभावनांचं सत्व, त्यावरची निष्ठा, प्रामाणिकता हे केवळ अण्णा भाऊंच्या साहित्यात सापडतं. अण्णा भाऊंनी मानवी दुःखाला, त्याच्या संघर्षाला जेवढं दैदिप्यमान केलं, तेवढंच मानवाठायी असलेल्या भुकेलाही त्यांनी दैदिप्यमान केलं आहे. ती कुठेही विकृत स्वरूपात समोर येत नाही.
भूक ही सनातन आहे. प्रत्येक जीवाच्या ठायी ती वेगवेगळ्या स्वरूपात वास्तव्य करते. प्राण्यांची भूक ही शरीर पातळीवर असते, तर तीच भूक मानवाच्या जगात अनेक रूपं धारण करते. या वेगवेगळ्या भुकांमुळेच माणूस हा प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. माणसाला भाकरीची भूक जेवढी तीव्र आहे, तेवढ्याच तीव्र इतरही भूका आहेत. सकारात्मक-नकारात्मक दोन्ही प्रकारची भूक माणसात दिसते.
अण्णा भाऊंच्या साहित्यात जी मानवी भूक गडद रूपात प्रकट होते, ती एक तर भाकरीची भूक आहे, दुसरी स्वाभिमानाची आहे. माणसातील माणूसपण उंचावण्याची आहे, त्याच्या विजयाची आहे. मानवाचं सत्व आणि तत्व उंचावर नेणारी आहे.
उजेडाचे बीज, उजेडाचे झाड
पसरे उजेड, रानोमाळ //
अण्णा भाऊंसाठी या ओळी नकळत ओठावर येतात.
मानवतेला उजेड देण्यासाठी रात्रंदिवस सूर्याची तपन सहन करणाऱ्या या महामानवास विनम्र अभिवादन!
@छाया बेले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा