उजेडाची नाव : आस्वाद
उजेडाची नाव : आस्वाद
मानवी जीवनात व्यक्त होणे ही एक महत्त्वाची गरज आहे. अनादी काळापासून अनेक प्रकारे तो व्यक्त होत आहे. व्यक्त होण्यासाठी मानवाने अनेक कला विकसित केल्या. संगीत, नृत्य, चित्रकला, साहित्य . लेणी , गुहा - चित्रे हेही मानवाच्या व्यक्त
होण्याच्या गरजेची निर्मिती आहे . अगदी वाळूत , मातीत रेघोट्या मारून माणूस आपल्या भाव -भावना व्यक्त करतो.
सध्याच्या काळात तर व्यक्त होण्यासाठी अनेक माध्यमांचा वापर केला जातो.
पैकी एक म्हणजे कविता होय .
कविता म्हणजे जीवन-जाणीवांना फुटलेला झरा होय . आत खोलवर रुतलेलं काही आपसूक शब्दरूप घेऊन बाहेर येतं आणि मग त्याची कविता होते.
तसं बघितलं तर मानवात इच्छा असुनही प्रत्येकाला व्यक्त होता येतंच असं नाही. प्रतिभा असली तरी व्यक्त होण्याची संधी प्रत्येकाला उपलब्ध होतेच असेही नाही. भारतीय समाजात वर्ण व्यवस्थेने अनेक समुहाचे अभिव्यक्तीचे अधिकार हिरावून घेतले होते . यात सर्वात जास्त शोषण स्त्री वर्गाचे होत आले आहे.
महिलांचे जगण्याचे सगळेच मुलभूत अधिकार अमान्य करून त्यांचं माणूसपणच नाकारण्यात आले होते . या अन्यायाविरुद्ध , विषमतेविरूद्ध बुद्धापासून तर महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पर्यंत अनेक महापुरुषांनी संघर्ष केला . त्याची फलश्रुती म्हणून उपेक्षित वंचित समाज लिहिता झाला .
स्त्रियाही आपलं जगणं , भोगणं शब्दबद्ध करू लागल्या. या जाणीवा प्रगल्भ होत होत विस्तारत जाऊन स्व कडून समष्टीला कवेत घेऊन व्यक्त होऊ लागल्या.
माणसाला व्यक्त होण्याची गरज तेव्हाच भासते जेव्हा त्याचे आत्मभान जागृत होते. अभिव्यक्ती हे आत्मभान जागृतीचं पहिलं लक्षण आहे.
विमल शेंडे यांचा 'उजेडाची नाव' हा आत्मभानाच्या वाटेवरील समग्र जीवन जाणिवांचा आलेख असलेला कविता संग्रह आहे.
सिद्धार्थ,
बोधिसत्व ते बुद्धत्वाचा
तुझा प्रवास अनंत कल्पाचा
पुब्बेनिवासानुसती स्मरण करीत
(पुर्व जन्माची स्मृती)
दहा पारमिताचाही केला अभ्यास
त्याही नेल्या पुर्णत्वास
दहा स्थित्यंतरे बुद्धत्वाची
ब्रम्हांड ते निसर्गातल्या
प्रत्येक सत्वाशी मैत्री तुझी
तू सांगितलेस चार आर्यसत्य
तृष्णा हेच कारण दुःखाचे
पुन्हा पुन्हा भवचक्रात गुरफटण्याचे
तू निक्षून सांगितले तृष्णेला
ह्या युगातला जन्म शेवटचा
मी केल्या कड्या भग्न
नाही करणार तू घर आता
पंचशील,अष्टशील, अष्टांग मार्ग
सुखी जीवनासाठी मानवाला
दाखविला सन्मार्ग
बोधिसत्वा तथागता तू झालास
सम्यक संबुद्ध//
प्रवास बुद्धत्वाचा, या कवितेत कवयित्रीने बुद्धत्वाचा प्रवास उलगडून दाखविला आहे.
बुद्ध विचार आत्मसात करून आचारणात कवयित्रीच्या लिखाणत हाच विचार आशयाची
ही एकच कविता नाही तर इतिहास क्रांतीचा या कवितेतही हा देश बुद्धाचा देश आहे, असा विचार मा़डला आहे. करुणा, प्रेम, मैत्री, ही मानवी मुल्य बुद्धाने जगाला दिली . हेही कवयित्रीने ठासून सांगितले आहे.
ज्ञानसागर ही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची महती सांगणारी कविताही मनाला भावते .
बुडते हे जन
न देखवे डोळा
म्हणोनी कळवळा
येत असे
असं विद्रोही संत जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात.
कोणत्याही मातृहृदयी व्यक्तीला मानवाचे अधःपतन बघून कळवळा येतोच येतो.
भेदून टाक चक्रव्यूह/ गर्भगृह शांतीचे /
या कवितेतून जनमानसाबद्दल हाच कळवळा दिसून येतो . उजेडाची नाव या कविता संग्रहात अशा अनेक कविता आहेत की ज्यात समतेची आस दिसून येते. न्यायाची निकड दिसून येते. आत्मबल वाढवणारी उर्जा दिसून येते. बुद्धाचे तत्व आणि सत्व दिसून येते .
वर म्हटल्याप्रमाणे अभिव्यक्तीचा प्रवास हा ' स्व ' कडून समष्टीच्या दिशेने होत जातो . भारतीय समाज आणि वरून स्त्रीजन्म त्यामुळे भोग हा अटळ आहे. अशाच
स्व दु :ख जाणिवांच्या काही कविता यात पहायला मिळतात.
गणित चुकले आयुष्याचे
दोष कुणाला द्यावा ?
मावळतीच्या उजेडाचा
अर्थ कुणी सांगावा ? / अघटित - पान ४४
बाजारी वेदनेच्या
मुल्यहीन भावना/
मिटलेल्या पापण्या
उसवती पुन्हा पुन्हा
कुठे काय चुकले माझे
सांग रे वेड्या मना / वेड्या मना - पान ४२
या कविता मनाला चटका लावून जातात .
विमल शेंडे यांच्या कवितेचा विषय एकुणच प्रबोधन, न्याय समता बंधुता मानवता यांची पेरणी करणारा आहे . यात माणसाचा कळवळा , बुद्धाची करूणा वाहताना जाणवते . त्यांनी अजून असंच कसदार व भरपूर लिखाण करावं .
विमल शेंडे यांना रमाई पुरस्कार मिळाला त्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !!
व पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा !!
@ छाया बेले नांदेड.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा