बाईच्या वेदनेचा तळ शोधणारी कविता : बाईचा दस्तऐवज | पुस्तक परिचय |







           




बाईच्या वेदनेचा तळ शोधणारी कविता : बाईचा दस्तऐवज!!


कविता ही कवीच्या अनुभवाचे संचित असते. कविता जन्माला येण्याआधी खूप काही घडून गेलेलं असतं. आतली पडझड, मोडणं, घडणं, ध्वस्त होणं, निर्माण होणं याला आतून मिळालेला प्रतिसाद म्हणजे कविता. हे सगळं त्या कवीचं व्यक्तिगत जगणं असेल असंही नाही. भवतालात घडणाऱ्या घटना, तिचे पडसाद कवीमनाला स्पर्श करून आपली खूण सोडत असतात. लोहचुंबकाकडे लोहकण आकर्षित व्हावे तसेच समष्टीच्या सुख-दुःखाचे झरे कवीच्या दिशेने वाहत येतात. तो कधी घायाळ होतो तर कधी फुलारून येतो, तर कधी कोमेजून जातो. त्याच्या शब्दातून भवताल आकार घेत राहतो. अभिव्यक्तीचं सर्वात प्रभावी व सुंदर माध्यम म्हणजे कविता आहे असं मला वाटतं.

इतिहासात डोकावून पाहिले तर काळाच्या पटलावर कविताच टिकून राहिलेली आहे. कविता अजरामर आहे असंच म्हणता येईल. तुकोबांची गाथा असो की कबीराचे दोहे असो, कवितेने अनेक सामाजिक, राजकीय क्रांत्या घडवून आणल्या, सत्ता पालट केले. आपल्याकडे सामाजिक क्रांती घडवून आणणारे संत साहित्य याचा उत्कृष्ट नमुना आहे. कवितेचा परिणाम हा मानवी मनावर खूप खोलपर्यंत होत असतो. त्या कवितेत तेवढी ताकद असावी लागते. उच्च प्रतिभेच्या आविष्काराने वाचकांच्या काळजाला स्पर्श करता येतो. म्हणूनच काही कविता काळजाला हात घालणाऱ्या असतात. अशीच ताकदीने लिहिली गेलेली कविता म्हणजे कवी श्रीनिवास मस्के यांचा ‘बाईचा दस्तऐवज’ हा कविता संग्रह होय.

बरडशेवाळा, ता. हदगाव या छोट्याशा गावात जन्मलेले कवी श्रीनिवास मस्के हे नव्या पिढीतील महत्त्वाचे आणि ग्रामीण कविता दमदारपणे लिहिणारे कवी आहेत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, सुप्रसिद्ध कवी, व्याख्याते म्हणून सगळा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. त्यांच्या मंचीय कविता श्रोत्यांच्या मनावर गारुड करतात. कवी, वक्ते, विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षक अशा अनेक भूमिका पार पाडत ते समाजासाठी आपलं योगदान देत आहेत. खेड्यात जन्मलेल्या या कवीचं मातीशी, तिथल्या समग्र जीवनाशी खूप जवळचं नातं आहे, हे प्रत्येक कविता वाचताना जाणवत राहतं. त्यांनी आपल्या कवितेतून बाईचं समग्र जीवन, तिचं जगणं उलगडत तिच्या व्यथा-वेदनांना शब्दरूप दिले आहे. त्यांची कविता ही केवळ कल्पनेतून आलेली नाही, तर ती शेताच्या बांधावर, खळ्यात, उखळ-मुसळाजवळ आणि चुलीजवळ बसून ऐकलेली, पाहिलेली कविता आहे.

बाईचा दस्तऐवज मधून खेड्यातील कष्टकरी बाईच्या जगण्याची मांडणी जेवढ्या आत्मीयतेने केलेली दिसते, तेवढ्या आत्मीयतेनं कवितेतून कोणीही मांडल्याचं दिसत नाही. याचा उत्कृष्ट नमुना या ओळी आहेत -

_तो कासऱ्याचा दोर करतो, 
झाडाला लटकतो,
ती कासऱ्याची धांद करते, 
खरडणी लागलेल्या विहिरीतून पाणी शेंदते...._

ग्रामीण स्त्रीच्या जगण्याचं सारच या ओळींतून कवीने अगदी नेमकेपणाने टिपून घेतलं आहे. इथे पुरुष आत्महत्येचा मार्ग निवडतो, पण बाईला मरणाचीही चैन नसते. तिला विहिरीतून पाणी काढून कुटुंब जगवायचं असतं. एका प्रसंगातून अख्ख्या व्यवस्थेचं दर्शन घडवण्याची ही ताकद मस्के यांच्या कवितेत आहे. सध्याच्या काळात कवितेचा पसारा जास्तच वाढला आहे. मात्र या पसाऱ्यात देवकणासारखी अस्सल कविता अगदी चिमूटभर सापडेल. याच अस्सल कवितेच्या चिमूटभरात श्रीनिवास मस्के यांची कविता येते. कारण ती फॅशन म्हणून लिहिलेली नाही, तर ती जगण्यातून आलेली आहे.

कालच हा संग्रह हाती आला आणि लगेच वाचायला घेतला. या संग्रहातील कविता वाचताना आपण अनेकदा निःशब्द होतो. परकाया प्रवेश करून बाईच्या जगण्याचे वेगवेगळे संदर्भ देत, संवेदनेच्या अंतिम टोकावरून अवतरलेली ही कविता आहे. चूल आणि मूल यातून नुकतंच उंबरठ्याबाहेर पडू लागलेल्या स्त्रीच्या जगण्या-भोगण्याचे उसासे शब्दरूप घेऊन बाहेर पडत आहेत. तिच्या श्रमाला कधीच मोजमाप नाही, तिच्या त्यागाला कधीच पावती नाही, ही सल या कवितेतून सतत जाणवते.

खरं तर शोषण व्यवस्थेविरुद्ध ‘डोईचा पदर आला खांद्यावरी / भरल्या बाजारी जाईन मी’ असं म्हणत संत स्त्रियांनी खूप आधी बंड पुकारले आहे. तोच वारसा घेऊन स्त्रिया लिहीत आहेत. अति शोषणामुळे स्त्रियांची कविता काही वेळा आक्रमक, आक्रस्ताळी झालेली पाहायला मिळते. मात्र स्त्रीचं दुःख एखाद्या पुरुषाने एवढ्या सखोलपणे तेवढ्याच संयमाने मांडावे, हे खरोखरच खूप कौतुकास्पद आहे. हाच या संग्रहाचा मोठा विशेष आहे. स्त्रीच्या वेदनेकडे पाहण्याची एक सम्यक, संवेदनशील पुरुषी नजर येथे दिसते. तो तिच्याबद्दल सहानुभूती दाखवत नाही, तर सहअनुभूतीने तिच्या सोबत चालतो.

_किती खुणा शोधाव्यात 
मातीशी भिडलेल्या बाई माणसांच्या
शब्द पेरताना.. पाऊलवाटेतील काटे बाजूला सारलीत त्यांनी
खुरपं गोंदून पायांना.._

कवितेतील अशा ओळी वाचत असताना ओठातून बाहेर पडणारा ‘वाह..!’ आधीच त्या ओळींनी आपल्यात सामावून घेतलेला असतो. आपण फक्त शब्दांकडे एकटक पाहत राहतो. कारण या ओळींमध्ये शतकानुशतकं मातीशी भिडलेल्या बाईच्या पायातील खुरप्याच्या जखमा बोलतात. तिने पेरलेले शब्द आणि गाडलेले काटे यांची ही कथा आहे.

खेड्यातील कष्टकरी बाईचं जगणं या कवितेतून जेवढ्या उत्कटपणे मांडलं आहे, तेवढं कोणी मांडलं असेल असं वाटत नाही. मस्के यांची कविता सिमेंटच्या भिंतीवरून वाहून जाणाऱ्या पावसासारखी नाही, तर ती मनाच्या तळापर्यंत उतरत जाते. ही कविता मातीत ओल झिरपत जावी तशी झिरपत जाते. कविता कोणत्याही रसातील असो, ती मातीशी एकरूप झालेली दिसते. बाईच्या जगण्याची दाहकताही नुकत्याच उगवून आलेल्या कोवळ्या कोंबांसारखी अलवार शब्दरूप लेऊन येते, हे या कवितेचं वैशिष्ट्य आहे. ही कविता आपल्या स्वतंत्र शैलीत व्यक्त होते. कुणाचीही सावली तिच्यावर दिसून येत नाही. हीच तिची अस्सलता आहे.

_बाई, तू तर कुण्या दस्तऐवजातही सापडत नाहीस
किती शतकं झालीत मातीला विंचरतेय, येणी घालतेस
सजवतेस लेकीसारखं, साऱ्या वापराच्या खुणा बदलल्या
तू बदलली नाहीस_

बाईचं जगणं हे आजही आश्रित आहे. ज्या मातीला ती लेकीसारखं जीव लावते, ती माती तिच्यासाठी परकीच असते. सातबाऱ्यावर तिचं नाव नसतं, पण शेतात तिच्या घामाचा वास असतो. ही आर्तता व्यक्त करतानाही मातीतून उगवून आलेल्या अस्सल प्रतिमा-प्रतिकांचा साज चढवून ही कविता बहरत जाते आणि मग वेदनाही रानफुलासारखी सुंदर होते. ही कविता बाईच्या जगण्याचे संदर्भ देतानाच वाचकाच्या मनात धूसर होत चाललेला गावही गडद करून जाते. ग्रामीण कवितेची गढी कधीही कोसळणार नाही, एवढी आश्वासकता श्रीनिवास मस्के यांची कविता देते.

कोणतीही कला असो, तिच्यातून जेव्हा सकल जीवांची सहवेदना प्रकट होते, तेव्हा ती पूर्ण विकसित झालेली असते. ‘बाईचा दस्तऐवज’ हे पूर्ण विकसित कवितेचं उदाहरण आहे. येथे केवळ बाईचे दुःख नाही, तर तिच्या जगण्याचा उत्सवही आहे, तिच्या प्रतिकाराची बीजेही आहेत.

बाईपणाचं जगणं विस्तवाशी सोईरपण असतं, हे कळून येण्याची जाणीव, ती शहाणीव कवीकडे आहे, हे कविता वाचत असताना लक्षात येते.

_हे कधी समजून घेत जा, बाई नसते केवळ रात्रीपुरती
थानपित्या बाळाचं रडणं, खाटेवरच्या म्हाताऱ्याचं कण्हणं
सासूचं इचकळ बोलणं, तुझा उन्माद पेलणं
किती करावं तिनं घरासाठी ?_

असा सवाल करत ही कविता बाईची आई होऊन तिच्या जखमेवरची खपली होते. घरासाठी ती किती पदरांनी तुटते, याचा हिशेब कोण ठेवणार, हा प्रश्न कवी विचारतो.

_तिलाही वाटतं पुरुषासारखं मोकळं हसावं
आभाळाखाली एकत्र मैफलीत बसावं_

बाई सुद्धा माणूस आहे. तिलाही जगायचं असतं मनसोक्त. मात्र समाजाला तिचं माणूस असणं मान्य नाही. मानवी समाजात ती केवळ ‘औरत’ आहे, या मान्यतेला खिंडार पाडून तिच्याकडे माणूस म्हणून बघण्याची सम्यक दृष्टी ही कविता देते. तिला आभाळाखाली मोकळं बसावं वाटतं, पण तिच्या वाट्याला नेहमी आढ्याला टांगलेलं आभाळच येतं.

अस्सल ग्रामीण प्रतिमा-प्रतिकांतून बाईचं दुःख, तिचं जगणं या संग्रहातील पानापानावर डोंगरावर फुटलेल्या झऱ्यासारखं वाहत येऊन वाचकांच्या मनाचा कोपरा सादळून टाकतं. या कविता संग्रहात ‘आभाळ न्हाते तळ्यात’, ‘जांभळाचा गर’ अशा काही रांगड्या बाजाच्या प्रेमकविताही मनाला भावणाऱ्या आहेत. त्या प्रेमकवितांमध्येही मातीचा ओलावा आहे, हाच त्यांचा वेगळेपणा आहे. तसेच दिशा पिंकी शेख यांच्यावरील एक सुंदर कविताही या संग्रहात आहे, जी संघर्षशील स्त्रीच्या लढ्याला सलाम करते.

‘गाव मातीत अखंड राबत असलेल्या बाईचं वेदन म्हणावं तितकं उजागर झालेलं नाही, ही सल सतत वाटत होती. युगाच्या आरंभापासून तिचं धुमसत जाणं सुरूच आहे. तिच्या या अस्वस्थतेचा शोध घेत.. बाईच्या वेदनेचा दस्तऐवज शोधत मीही निघालोय.’ कवीची ही भूमिका महत्त्वाची व बाईला दिलासा देणारी आहे. या कणवेचा एक दिवस मोठा वृक्ष नक्कीच होईल, तेव्हा बाईला माणूस म्हणून जगता येईल. हा दस्तऐवज केवळ कवितेचा नाही, तर आपल्या काळाचा, आपल्या गावाचा आणि आपल्या माणूस असण्याचा दस्तऐवज आहे.

अक्षरवाङ्मय पुणे यांनी या संग्रहाला सुंदर रूपात प्रकट केलं आहे. ज्येष्ठ कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी साजेशी पाठराखण केली आहे. सरदार जाधव यांचे अर्थपूर्ण मुखपृष्ठ कवितेचा आशय स्पष्ट करणारे आहे. निर्मिती मूल्य जपत आशयाला न्याय देणारं हे पुस्तक आहे.

कवितेवर प्रेम करणाऱ्यांसाठी, कविता लिहिणाऱ्यासाठी कविता कशी असावी हे जाणून घेण्यासाठी हा बाईचा दस्तऐवज नक्कीच वाचायला हवा! ग्रामीण स्त्रीच्या जगण्याचा खरा अर्थ शोधायचा असेल तर हा दस्तऐवज प्रत्येकाने वाचायलाच हवा.

कवी श्रीनिवास मस्के यांना पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा!

@छाया बेले, नांदेड.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .