धगीतून चालते ती // अभिप्राय!!
कळलावी, घरफोडी, कुरघोडी करणारी, कुलटा, शिकलेली असेल तर ती स्वैर वागणारी , कुठल्याही जबाबऱ्या न स्विकारणारी अशाच प्रतिमा व प्रतिकातून स्त्री साहित्यातून भेटत आली आहे.
मात्र तिला खऱ्या रूपात समोर आणणे, तिचा संघर्ष, जिद्द, जिवनजाणीवा, जगण्यावरील तिची निष्ठा , तिचा स्वाभिमान , जिवनाला भिडण्याची उर्मी , तिच्याठायी असलेलं सत्व साहित्याच्यातून मांडणे इथल्या पुरुष सत्ताक मानसिकतेच्या साहित्यिकांना कधीच जमलं नाही.
मात्र साहित्य सम्राट, अण्णाभाऊ साठे यांनी स्त्रियांना सन्मान देत तिला तिच्या खऱ्या स्वरूपात मांडले.
नायिकांना नायका एवढ़च महत्त्व , तेवढंच महत्त्वाचं स्थान, मान त्यांनी आपल्या साहित्यातून दिला. अण्णाभाऊनी खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या बाबतीत मानवतावादी दृष्टिकोन ठेवून लिखाण केले.
व मराठी साहित्याला एक नवी दिशा नवा विचार दिला.
याच विचाराचा धागा घेऊन मिलिंद कांबळे यांची नवीन स्त्रीप्रधान कादंबरी धगीतून चालते ती , वाचकांच्या भेटीला आली आहे.
" मन अस्वस्थ होवू लागले .. धुमसू लागले.. टाहो फोडायला लागले.. मनाच्या गाभाऱ्यातून शब्दरूपी ठिणग्या बाहेर पडू लागतात... कधी कविता.. कधी कथा.. कधी कादंबरीरूपात बाहेर पडतात " या शब्दानीं लेखक कादंबरीची सुरुवात करतो.
या शब्दात त्याच्या विचारांचा प्रांजळपणा, समाजाप्रती असलेली तळमळ , लिखाणमागची भुमीका स्पष्ट होते.
या वरून एवढं लक्षात येतं की तो लेखक होण्याच्या हौसे पोटी लिहीत नाही. किंवा स्वानंदासाठीही लिहीत नाही. संवेदनशील मनाला
जे आतून अस्वस्थ करतं , धडका देऊन बाहेर येतं . तोच शब्द रुपात मांडत जाणारा खरा लेखक म्हणायला हवा.
डॉ. मिलिंद कांबळे यांचे आतापर्यंत आठ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत व दोन प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
तसेच त्यांच्या साहित्याचा नांदेड विद्यापीठ व नागपूर विद्यापीठ अभ्याक्रमात समावेश आहे.
एवढ्या लहान वयात एवढी ग्रंथ संपदा असणे ही साहित्य व समाज यावरील निष्ठा या शिवाय शक्य नाही.
" धगीतून चालली ती "
या एका स्वाभिमानी व कष्टाळू मुलीची कहाणी आहे.
गरीब दलित कुटुंबात जन्मलेल्या निर्मितीचा प्रवास लेखकाने रेखाटला आहे.
निर्मिती लहानपणापासून हुशार असल्याने तिने खूप शिकावं ही तिच्या आईची इच्छा निर्मिती पुर्ण करीत ,जाते.
अठराविश्व दारिद्रय , रोजच्या जगण्याशी संघर्ष,, तरी ही निर्मितीची शिकण्याची जिद्द, दोघी माय लेकी एकमेकिला धीर देत माय सावित्री, म. फुले व बाबासाहेबांनी दाखवलेल्या शिक्षणाच्या वाटेवरून चालण्याची जिद्द आणि चिकाटीने रोजचा,. दिवस मागे टाकतअसतात.
बाप व्यसनी.. त्याचा आधार असून नसल्यासारखा
पावसाळ्यात घरावरील पत्रे उडून जातात. तो प्रसंग अंगावर काटा उभा करतो. त्या विचाराने मन सुन्न होते.
गंगाबाई रडत असते.
तेव्हा निर्मिती तिला धीर देते
" माय तू रडू नको पाऊस थांबलाय "
गरिबीत वाढणाऱ्या लेकरांना परिस्थितीने वयाच्या आधीच पोक्त व शहाणं केलेलं असतं. कोणत्याही परिस्थितीला तोंड देत लव्हाळी सारखं अस्तित्व टिकवून ठेवणे हे त्यांना माहीत असतं.
होतं.घरात कधी खायला असतं तर कथी सगळेच उपाशी पोटी .
या परिस्थितीचा परिणाम निर्मिती कधीच आपल्या शिक्षणावर होवू देत नाही . लोकाच्या घरात धुणीभांडी करत निर्मितीचं कॉलेज जीवन सुरू होतं. घरात सगळे आनंदी.. तिच्या समोर अनेक आव्हाने. श्रीमंताची पोरं फक्त टाईमपास म्हणून कॉलेज करणारी. सगळीकडे मोहाचे क्षण. निसरडी वाट.. मात्र निर्मिती खंबीरपणे आपल्या धेय्यावर लक्ष देत पुढे जात राहते.
वडिलांचं निधन, बहिणीचा विस्कटलेला संसार, सावकारासारख्या वासनांध लोकांच्या विकृत नजरांचा सामना.
अशा एक ना अनेक अडचणी तिच्या जीवनात कायम येत राहतात.
तर गायकवाड सरांसारखे काही प्रेमळ माणसं सदैव तिच्या पाठीशी उभे असतात.
या बळावर, आत्मविश्वासाच्या बळावर ती न डगमगता शिक्षणाच्या वाटेवरून वाटचाल करीत राहते.
कादंबरी वाचत असताना असं लक्षात येतं, एक परिवर्तनवादी, मार्गदर्शक विचार लेखकाने मांडला आहे. स्त्री शिक्षणाचा महत्त्वाचा विषय घेऊन मुलिंच्या विचाराची जडणघडण याविषयी अतिशय चिंतनात्मक भाष्य केले आहे.
आपल्या ज्ञानाच्या बळावर निर्मिती समाजात मार्गदर्शक म्हणून वावरते. जुन्या रूढी अंधश्रद्धा यांना नकार देत आपल्या घरापासूनच या सुधारणेचा पाया घालते.
डॉ. मिलिंद कांबळे यांची " धगीतून चालतली ती " ही कांदबरी एक नवा , क्रांतीकारी विचार घेऊन वाचकासमोर येते.
आजही गरीब समाजात मुलिच्या शिक्षणाचा फारसा गांभिर्याने विचार केला जात नाही. तिच्या शिक्षणाशी जन्मदाते आपल्या फायद्या तोट्याचा विचार जोडून पाहतात. हा विचारात बदल घडवून आणण्यासाठी ही कादंबरी नक्कीच उपयुक्त ठरेल. समाजपरिवर्तन साठी असं लिखाण होणं अतिशय आवश्यक आहे.
या व्यतिरिक्त सामाजिक एकोपा. व इतर अनेक जसे की धर्मांतराचा प्रश्र्न अशा सामाजिक प्रश्नांना सामावून घेत तसेच अनेक
उदारमतवादी विचार मांडत कथा पुढे सरकते. उपेक्षित समाजजीवन त्यांच्या भोवतीचा काटेरी परिघ या सर्व गोष्टींचा आढावा मिलिंद कांबळे यांनी सुक्ष्म निरिक्षणातून वाचका समोर ठेवला आहे.
जगण्याचा संघर्ष. मुलिच्याबाबत तेच पारंपारिक विचार, घरातून लवकर लग्नाची घाई मुलीच्या शिक्षणाच्या आड येणाऱ्या सर्वच अडचणींच्या कारणांचा शोध लेखकाने घेतलेला आहे, गंगुबाई अडाणी असुनही निर्मितीच्या शिक्षणाचा ध्यास घेते. व तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते हा एक परिवर्तनवादी व आशादायी विचार लेखकाने मांडला आहे.
कादंबरीत येतात.
कादंबरी वाचत. असताना अण्णाभाऊच्या कणखरं नायिका वाचकाला आठवत राहतात.
डॉ. मिलिंद कांबळे यांच्या हातून असंच प्रबोधनकारी भरपूर लिखाण होत राहो..
हार्दिक अभिनंदन व अनेक आशिर्वादासह खूप खूप शुभेच्छा !!
@छाया बेले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा