थोर समाजसुधारक मानवतावादी अण्णाभाऊ साठे
थोर समाजसुधारक मानवतावादी अण्णाभाऊ
ऐसी कळवळ्याची जाती
लाभावीन करी प्रिती
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या
या ओळी थोर समाज सुधारक साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाशी तंतोतंत जुळून येतात. या थोर समाजसुधारकाचं मानवतेवर माणसावर अपार प्रेम होतं.
त्यांनी संपूर्ण आयुष्य हे मानव कल्याणासाठी खर्ची घातलं .
अण्णाभाऊचं जीवन एखाद्या महाकाव्याचा सारखा आहे . एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी वाटेगाव, जिल्हा. सांगली येथे निवडुंगाच्या जाळीत
वसलेल्या ,ब्रिटिशांनी गुन्हेगार ठरवलेल्या, मांग वस्तीत जन्माला आलेले अण्णाभाऊंचा तुकाराम ते साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे प्रवास थक्क करणारा आहे. कोणाचाही वरदहस्त पाठबळ नसताना दुनियेच्या विद्यापीठात अनुभवाचे शिक्षण घेत हे साहित्यसम्राट घडले. आपल्या वाट्याला आलेल्या खडतर जीवनाचे सोयरसुतक न बाळगता अण्णा भाऊ हे कायम इतरांसाठी लढत राहिले. कामगार व उपेक्षित समाज हा अण्णाभाऊंच्या साहित्याची प्रेरणा होता.
या उपेक्षित समाजाची होणारी पिळवणूक त्यांचा जीवनसंघर्ष हे अण्णा भाऊंना लिहिण्यासाठी प्रेरित करत. या शोषित घटकाला न्याय मिळावा, उच्चनीचतेची दरी संपून समाजात सगळीकडे समानता प्रस्थापित व्हावी.
हे या थोर समाजसुधारकांचे स्वप्न होते .
या उदात्त ध्येयासाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला. मार्क्सवाद, आंबेडकरवाद किंवा कुठल्याही वादात अण्णाभाऊंना बसवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. त्यांचे विचार त्यांचे कार्य आहे आहे वैश्विक स्वरूपाचे आहे .
अण्णाभाऊ चा संघर्ष हा कोणत्या एका घटका विरुद्ध नाही. किंवा पूर्वग्रहदूषित नाही.
हा संघर्ष म्हणजे समतेच्या, न्यायाच्या, मानवतेच्या मूल्यांसाठी आहे.
अण्णाभाऊ ग्रामीण भागातील उपेक्षितांचे दैन्य ही मांडतात ्याच बरोबर शहरात झोपडपट्टी सारख्या बकाल वस्तीत राहणाऱ्या ,जगण्यासाठी धडपडणार्या लोकांचा संघर्षही मांडतात. म्हणूनच आण्णाभाऊ म्हणतात
" त्यांची झुंज यावर माझा विश्वास आहे त्यांना विद्रूप करणारे मात्र मला आवडत नाही "
अण्णाभाऊंची जीवनावरील निष्ठा त्याविषयीची सौंदर्यदृष्टी या वाक्यातून प्रतीत होते.
अवघ्या एकोणपन्नास वर्षाच्या आयुष्यात आण्णाभाऊंनी जगण्यासाठी संघर्ष करता करता समाजासाठी भरीव कामगिरी केली.
ती मैलाचा दगड ठरावी अशी आहे .त्यांच्या शाहिरीने अवघा महाराष्ट्र पेटून उठला. तर सरकारला त्यावर बंदी आणावी लागली. हीच तर खरी जननायक असण्याची खूण होय.
अण्णाभाऊ म्हणतात " आपण जे जीवन जगतो, तेच जीवन जगणाऱ्या बहुसंख्य जनतेच्या मनातील उदात्त स्वप्ने विचार शब्दबद्ध करावे या मोहने मी लिहीतो.
जुन्या प्रतिगामी चालीरिती दूर साऱाव्या पण प्रगत प्रथांना पुन्हा पुढे आणावे वर हेवेदावे द्वेष वैर यांचे गंभीर परिणाम दाखवावेत. महाराष्ट्रात प्रेम सलोखा नांदावा असं मला वाटतं . माझा माझ्या देशावर जनतेवर नि तिच्या संघर्षावर विश्वास आहे. हा देश सुखी समृद्ध व्हावा या भूमीचे नंदनवन व्हावे. ही स्वप्ने पहात मी लिहीत असतो . "
वरील विचारातून अण्णाभाऊचे मानवते वरील तसेच आपल्या देशा वरील अपार प्रेम कळवळा दिसून येतो.या महामानवाने अमुक एक घटक समोर ठेवून कार्य न करता संपूर्ण विश्वातील उपेक्षित घटक समोर ठेवून आपले लेखन कार्य केले.
अण्णाभाऊंनी स्वतःला समाजापासून कधीच वेगळं समजलं नाही. किंवा वेगळं केले नाही. तर त्याचा एक भाग बनून ते जगले. म्हणूनच अण्णाभाऊंना शोषित उपेक्षित अन्यायग्रस्त समाजाचं अंतरंग अगदी जसं आहे तसं कळलं आणि ते आपल्या साहित्यातून तेवढ्याच ताकतीने उतरवता आले. म्हणूनच त्यांच्या हितासाठी या घटकाच्या परिस्थितीत सुधारणा कशी घडवून आणता येईल एवढा एकच उद्देश घेऊन ते जगले.
आपल्या लिखाणातून समाजाला मार्गदर्शन केले. .आपल्या न्याय्य हक्कासाठी संघर्ष कराण्याची शिकवण अण्णाभाऊंचे साहित्य देते. त्याच बरोबर काय चूक काय,
बरोबर काय ,स्वीकारायला हवं,
किंवा काय टाकायला हवं , याविषयी आत्मभान अण्णाभाऊ यांच्या साहित्यातून आपल्याला मिळतं. माणसाचे माणूसपण किती सुंदर असू शकतं हे अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून माणूसपणाचं सुंदर दर्शन घडवले आहे .
जीवनाचा अस्सलपणा हा जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या माणसात दिसून येतो. आणि हाच अस्सलपणा अण्णाभाऊंनी आपल्या प्रतिभाशाली लेखणीने जगासमोर मांडला. आपल्या साहित्यातून रुजवला, फुलवला, बहरून आणला .
म्हणूनच वाटेगावातील तुकाराम नावाचा उनाड मुलगा ते थोर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे
हा प्रवास यशस्वी झाला.
एवढी साधी सोपी गोष्ट नाही समाजाला स्वतःसह अजून काय देता येईल हा ध्यास अण्णाभाऊ साठे या थोर समाजसुधारकाने घेतला होता. माणूसपणाच्या उच्चतम स्थितीचे दर्शन आपल्याला अण्णाभाऊ यांच्या साहित्यातून त्यांच्या जीवनातून घडतं. समाजासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या व्यक्तीने किती निस्वार्थ असावं लागतं हेच त्यांच्या जीवनाकडे बघून लक्षात येतं.
अण्णाभाऊंनी एवढ लिखाण केलं तेवढं अजरामर आहे .
कारण अण्णाभाऊ च्या साहित्य मधून जीवनाचं खरं तत्वज्ञान कळतं .
माणसाला माणसाशी जोडण्याचे काम त्यांचे साहित्य करते. फकिरा या अजरामर
साहित्यकृतीमधून अण्णाभाऊंनी नायकाचा इंग्रज सरकार सोबत तसेच सरंजामशाही विरुद्ध लढा दाखवला आहे. मात्र गावगाड्यात असलेला एकोपा व जिव्हाळाही तेवढ्याच प्रांजळपणे मांडला आहे.
कुठल्याही एका विशिष्ट समाजघटकाविषयीचा आकस त्यांच्या साहित्यातून दिसून येत नाही.
अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून अंधश्रद्धेचा विरोध केला आहे. अंधश्रद्धा निर्माण होईल किंवा संभ्रम निर्माण होईल अशा गोष्टी येणार नाही याची याची अण्णाभाऊंनी पूर्ण खबरदारी घेतली आहे.
जगा आणि जगू द्या हा मूलमंत्र मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. मात्र मानवी समाजात शोषण हीच संस्कृती होत चालली आहे.
या शोषण संस्कृतीच्या विरोधात महामानवांनी कायम लढा दिला आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे, बिरसा मुंडा, राजे उमाजी नाईक , यांनी शोषण व्यवस्थेविरुद्ध लढा दिला.
आपलं सर्वस्व पणाला लावलं. हे सर्वच महानायक व्यवस्थेच्या आगीत होरपळले होते. हा दाह घेऊन ही शोषण व्यवस्था जाळून राख करण्यासाठी त्यांनी जीवन संघर्ष केला. या महामानवांच्या विचारांचा व कार्याचा वारसा अण्णाभाऊंनी चालवला. अण्णाभाऊंनी उपेक्षित घटकाच्या हक्कासाठी ,न्यायासाठी समतेसाठी संघर्ष करीत राहिले. समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा ध्यास घेऊन ते जगले. अण्णाभाउंनी स्त्रियांना लढण्याचं बळ दिलं. त्यांच्या साहित्यातून त्यांनी स्त्रियांना सन्मान दिला. सत्वशील विद्रोही नायिकांचे पात्र चित्रित करून स्त्रियांचे आत्मभान जागृत केले. प्रस्थापित साहित्यात स्त्रियांची अवहेलनात्मक चित्र दाखवले गेले. मात्र अण्णाभाऊंनी सत्वशील व विद्रोही स्त्रीपात्रांमधून अण्णाभाऊंनी आत्मभान, आत्मप्रेरणा, याची जाणीव करून दिली .
अण्णाभाऊंना हे माहित होतं की स्त्रियांना स्वतःची ओळख होणं खूप आवश्यक आहे त्याशिवाय त्यांचा व समाजाचा विकास होणार नाही. स्त्रिया जागृत होणं खूप आवश्यक आहे त्याशिवाय समाज प्रगती करू शकत नाही. हे अण्णाभाऊंची दूरदृष्टी होती. अशा समाजाच्या सर्वच आघाड्यांवर मार्गदर्शक ठरणारं अण्णाभाऊ च साहित्य आहे.
त्यांच्या साहित्यातून कुठेही समाजात संभ्रम निर्माण करणारं विधान ते करीत नाहीत. विघातक गोष्टीचं समर्थन करीत नाहीत . समाजाला पोषक असेच विचार अण्णाभाऊंनी मांडले आहेत. म्हणूनच ते साहित्यसम्राट तर होतेच सोबतच ते थोर समाज सुधारक होते यावर कुणाचेही दुमत असणार नाही.
थोर समाज सुधारक व साहित्य जन्मशताब्दी
वर्षानिमित्त कोटी कोटी वंदन !!
साहित्यसम्राट , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर आतापर्यंत खूप लिहिलं गेलंय . अनेकांनी त्यांच्या साहित्यावर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आहे .
" साहित्य सुर्य अण्णाभाऊ साठे कर्तृत्व आणि व्यक्तीमत्व " हा सुरेश पाटोळे यांनी अण्णाभाऊंच्या जीवनकार्य तसेच साहित्य याची सखोल चिकित्सा करणारा सहाशे अडसष्ठ पानी ग्रंथ लिहिलेला आहे . अनेकांनी छोटे मोठे ग्रंथ लिहिले तरी सुद्धा अण्णाभाऊवर लिहिण्यासाठी काही शिल्लक राहिले नाही असं होत नाही . हेच तर या महामानवाच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्यावर जेवढं लिहीलं तेवढं कमीच आहे . अण्णाभाऊचं कार्यच एवढं विशाल आहे .
त्यांचं साहित्य जितक्या वेळा वाचलं तितक्या वेळा एक वेगळा पैलू समोर येतो .
अण्णाभाऊंनी शोषितांचं दुःख दैन्य दारिद्रय जगाच्या चव्हाट्यावर आणलं . स्त्रीयांना साहित्यातून आत्मभान दिलं . साहित्यातून अण्णाभाऊंनी न्याय, समता, बंधुता मांडली . मानवकल्याणाचा विचार दिला . जे कार्य गौतम बुद्धांनी ,तुकाराम महाराजांनी केले बसवेश्वरांनी केले जो विचार, जे तत्वज्ञान या महामानवानी जगाला दिले त्याच तत्वज्ञान धागा अण्णाभाऊंच्या साहित्यात सापडतो . त्याचबरोबर त्यात जीवनाचं सौंदर्य ठासून भरलेलं आहे . दुर्दम्य आशावाद आहे . मानवतेप्रती दया , करूणा , वात्सल्य भरून आहे .
" हा देश सुखी, समृद्ध नि सभ्य व्हावा, इथे समता(समानता) नांदावी, या महाराष्ट्र भूमीचे नंदनवन व्हावे अशी मला रोज स्वप्नं पडत असतात. ती स्वप्न पाहत मी लिहित असतो." साहित्य सुर्य अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या वैजयंता या कादंबरीच्या प्रस्तावनेत वरील मत मांडले आहे . यावरून असं लक्षात येतं की अण्णाभाऊ मानवी जीवनाच्या उत्कर्षाचा उद्देश समोर ठेवून लिखाण करीत होते .
अण्णाभाऊचं साहित्य सामान्य माणसाच्या जगण्याला बळ पुरविणारं आहे. सामान्यातील असामान्यत्व दाखवून देणारं आहे . खचलेल्या मनाला हिंमत देणारं आहे .
त्यांच्या साहित्यातील पात्रांनी परिस्थितीसमोर कधीच गुडघे टेकले नाही तर प्रतिकूल परिस्थितीला नामोहरम करून त्यावर आपल्या जिद्दीची विजयी पताका फडकवली . अशी लढवय्यै पात्रेच अण्णाभाऊंच्या साहित्यात दिसून येतात ज्यांनी आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही .
यात झोपडपट्टीतील गुंडाशी झुंज देणारी चंदन आहे . ब्रिटिश साम्राज्याविरूद्ध बंड पुकारणारा क्रांतिकारक फकिरा आहे . भावाने केलेल्या फसवणूकीचा आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध विद्रोह करीत रामोशी समाजातील नायकाशी लग्न करणारी आवडी आहे . आपल्या प्रियकारावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि कठीण प्रसंगी खांद्यावर बंदूक घेऊन लढणाऱ्या नायिका केवळ अण्णाभाऊंच्या साहित्यात दिसून येतात .
माणसाच्या जगण्याला उंची देण्याचं काम साहित्य सम्राट अण्णाभाऊंनी केलं आहे . त्यांनी कुठेही माणुसकीचं , माणूसपणाचं तेज कमी होवू दिलेलं नाही . माणूस केवळ उत्कर्षासाठी आहे , हेच त्यांनी आपल्या जीवनातून, साहित्यातून दाखवून दिले आहे .
अण्णाभाऊ .
कुठलाही शैक्षणिक , साहित्यिक वारसा नसताना अण्णाभाऊंनी स्वतःच्या जीवनात संघर्ष करीत राजकीय , सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात जे उत्तुंग कार्य केलं त्याला तोड नाही .
अनुभवाचं विस्तृत आभाळ , विचारांची पक्की बैठक , उच्च कोटीची प्रतिभा , त्याला असलेली तत्वज्ञानाची जोड , जगाकडे पाहण्याची खुली नजर , दुर्दम्य इच्छाशक्ती याच्या बळावर अण्णाभाऊंनी मानवतावादी साहित्याचा जणू हिमालय निर्माण केला .
अण्णाभाऊंच्या साहित्याचे गाढे अभ्यासक सुरेश पाटोळे, अण्णाभाऊंच्या लिखाणसंदर्भात आपल्या
" साहित्य सुर्य अण्णाभाऊ साठे कर्तृत्व आणि व्यक्तीमत्व" या ग्रंथात म्हणतात - " अण्णा भाऊंचा मन:पिंड माणुसकीने ओथंबलेला होता. करूणेने निथळला होता. जे जे म्हणून कुणी अंधार यात्रिक असतील त्यांना सूर्यसन्मुख करण्याचे अण्णा भाऊंचे व्रत होते. अण्णा भाऊंचा 'दलित' जात वाचक दलित नव्हता. त्या पलीकडे तो उभा होता. शोषित, श्रमजीवी मग तो कुणीही असो, तो दलित अशी अण्णा भाऊंची व्याख्या होती. अण्णा भाऊंचा जनतेवर माणसावर मोठा विश्वास होता. हा विश्वास कसा मोजता येईल ? आकाश, धरती व्यापून उरणारा हा विश्वास आहे. माणसाच्या सृजनशीलतेवर त्यांची प्रगाढ निष्ठा आहे. माणसाइतका दुसरा सृजनात्मा पाहिला नाही. असाच त्यांचा दावा आहे. म्हणून माणूस वाढला पाहिजे. मोठा झाला पाहिजे ही अण्णा भाऊंची दृष्टी आहे. माणसाच्या वयाबरोबर संस्कृतीही वाढल्याखेरीज समाजाला भवितव्य नसते त्या दिशेने अण्णा भाऊ ने चालत राहिले. हे सूत्र त्यांच्या लेखनात येतं.
अण्णा भाऊंचे सारे साहित्य संघर्ष आणि वाङ्मय या अद्वैतात आहे. त्याची फारकत करून त्याचा अन्वयार्थ लावता येत नाही. अण्णाभाऊंच्या साहित्याच्या निर्मितीची बीजे आणि प्रेरणा, चिंतनाच्या मूठभर कक्षा आणि आकलनाचा आवेग, वास्तवाच्या मर्यादांचे व्यापकत्व आणि स्वप्नांचे न दिसणारे पाय, कलामूल्यांचे स्वरूप आणि जीवनदृष्टीचे डोळस न आंधळेपण, साम्यवादी विचार प्रणालीची बांधिलकी आणि आत्मिय अलिप्ततेचे आंधळेपण दारिद्र्याच्या ड निशाणीखाली एकत्रित होऊन जगण्यासाठी पत्करावे लागणारे हौतात्म आणि माणूस म्हणून जगण्याविषयीचे आवाहन आदी साऱ्या गोष्टींची उकल या अद्वैतात आहे. अण्णा भाऊंना समजावून घेण्याची ती खूण आहे, त्यासाठी त्या वाटेचे वाटसरू झाले पाहिजे. अण्णा भाऊंच्या या साऱ्या लेखन सूत्राचा अस्वाद घेण्याचा प्रयत्न पुढील साऱ्या प्रकरणातून करत करत अण्णा भाऊंचं एकूण वाङ्मय सूत्र उलगडवत जाण्याचा ? जुजबी प्रयत्न असणार आहे नि या लेखन सूत्राला बळकटी आणण्यासाठी त्यांच्याच वाङ्मयाचे दाखले देत त्यांची वाङ्मयीन घौडदौड याची देही याची डोळा मी बघून आपणास दाखवण्याचा प्रयत्न करतोय इतकंच !! " लेखक सुरेश पाटोळे यांच्या वरील मताची सार्थता अण्णाभाऊंचं साहित्य वाचत असताना वेळोवेळी प्रत्ययास येते . जीवनाच्या अस्सल भावभावनांचं सत्व , त्यावरची निष्ठा , प्रमाणिकता हे केवळ अण्णाभाऊंच्या साहित्यात सापडते .
उजेडाचे बीज,उजेडाचे झाड
पसरे उजेड, रानोमाळ
अण्णाभाऊसाठी या ओळी नकळत उतरून येतात.
मानवतेला उजेड देण्यासाठी रात्रंदिवस सुर्याची तपन सहन करणाऱ्या या महामानवास विनम्र अभिवादन !!
@छाया बेले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा