आठवणीतील होळी : रंग जेव्हा नैसर्गिक होता
होळी हा आमच्यासाठी फक्त सण नव्हता, तो ऋतू बदलाचा उत्सव होता.
तो पुरणपोळीचा सण होता. होळीच्या पूजेसाठी पुरणपोळीचा निवद असायचा .
या दिवसांत शेतातील कामं आवरतीला आलेली असायची. रब्बीच्या पिकाची काढणी झालेली, खळ्यावर धान्याच्या राशी पडलेल्या असायच्या, सोबतच बैलगाड्या भरभरून कडबा घरी यायचा. उंचच उंच बनमी रचल्या जायच्या. शेत मोकळं झालं की माणूसही मोकळा व्हायचा. नेमकं त्याच वेळी अग्नीचा रंग लेवून पळस फुलायचा.
लालभडक, केशरी पळस. डोंगर माथ्यावर जागोजागी चुलीतील पेटत्या इंगोळाचा ढीग ठेवून दिला असं वाटायचं.पळसाचं फुलणं हेच होळीच्या येण्याचं पहिलं, निसर्गाने दिलेली सुचना असायची. सगळी लहान लहान पोरं रानातून घरी येताना पळसाची फुलं घेऊन यायचे.
आठ दिवस आधीच छोट्या छोट्या टंबरेलात पळसफुलाचं रंगीत पाणी करून एकमेकावर टाकायचे. माझ्यावर कधी कोणी रंग टाकला नाही याचं कारण माझा बाबा म्हणजे आजोबा. लहान, थोरले सगळेच त्याला घाबरून रहायचे. त्यामुळे मी फक्त इतरांना रंग खेळताना बघितलेलं.
त्या सुंदर रंगातून झालेली सुरवात मग चिखल शेण राख, कोळसा मिसळून रंगाचा खेळ शेवटी किळसवाणा व्हायचा. आयुष्य पण असंच काहीसं होत जातं ना...
मराठवाडा परिसरात तेव्हा एक अतिशय जिव्हाळ्याची पद्धत होती. आता ती आहे की कालबाह्य झाली, माहीत नाही.
होळीच्या सणासाठी सासुरवाशीणीला माहेराहून खोबरे, खारीक, दोऱ्यात ओवून तयार केलेले हार आणि चोळखण यायचे.
काहीजण हे सगळं जिव्हाळ्याने करायचे, तर काहीजण इच्छा नसताना केवळ 'लोक काय म्हणतील' म्हणून औपचारिकता म्हणून करायचे. मात्र सासुरवाशीण बायांसाठी ते अनमोल असायचं. त्या निमित्ताने माहेरचं कोणीतरी यायचं. तिकडच्या माणसांची ख्यालीखुशाली कळायची.
मनाच्या आत साठलेलं मोकळं व्हायचं. तो एक मनावर उपचार असायचा.
फाल्गुन महिना लागला की त्यांचे डोळे रस्त्याला लागायचे. सगळ्या सासुरवाशीणी माहेरच्या माणसांची वाट बघायच्या. कुणाचा म्हातारा बाप काठी टेकत-टेकत यायचा, कुणाचा भाऊ सायकलवर हार अडकवून यायचा, तर कुणाचा लहानगा भाचा उड्या मारत यायचा.
त्या बाईच्या हातात घरचा कारभार असेल तर ती माहेरच्या माणसाला बोटव्या करून, पुरणपोळी, करून प्रेमाने जेऊ घालून पाठवायची. आणि जर सासूच्या हातात कारभार असेल, तर तो माणूस फक्त दारातूनच हार देऊन, पाणी पिऊन आल्या पावली परत निघायचा. त्या हारात फक्त खोबरं-खारीक नसायची. त्यात माहेरची माया असायची .तो हार गळ्यात घालून की सासुरवाशीण एक दिवसासाठी पुन्हा माहेरवाशीण व्हायची.
होळीच्या दिवशी आमच्या गावात दोन होळ्या पेटायच्या.
एक होळी वेशीच्या आत, गावातील लोकांनी, पाटलांनी पेटवलेली. आणि दुसरी वेशीबाहेर, पूर्वीच्या महारवाड्यात, मारोतीच्या पाराला लागून थोडं खालच्या बाजूला पेटायची.
रूढी अशी होती - आधी गावातील होळी पेटायच्या आधी महारवाड्यातील होळी पेटवली जायची. तिची पूजा व्हायची. आणि मग त्याच होळीचा जळता विस्तव घेऊन गावातील होळी पेटवली जायची.
गावकुसाबाहेरचा सगळा समाज त्या दुसऱ्या होळीची पूजा करायचा. बायका पुरणाची पोळी, खोबऱ्याचा हार होळीला अर्पण करायच्या. होळीच्या भोवताली पिठाची रांगोळी आखली जायची.
आणि मग गावातील पोरंसोरं "होळी रे होळी, पुरणाची पोळी..." म्हणून बोंब मारायची. दोन दिवस त्यांना बोंबलायची पूर्ण मोकळीक असायची. कुणाला हाक मारायची, कुणाची गंमत करायची. त्या बोंबेत कसलीही तक्रार नसायची, फक्त सणाचा निरागस, गावभर दुमदुमणारा आनंद असायचा.
त्या काळात बाजारातले कृत्रिम रंग खूप कमी प्रमाणात होते, नाहीच असायचे म्हणा ना! लाल, हिरवा, जांभळा रंग माहितीच नव्हता.
सगळेजण एक-दोन दिवस, तर अतिउत्साही काहीजण चार-पाच दिवस आधीपासून पळसाची फुलं गोळा करून पोत्यात भरून ठेवायचे. मोठ्या दगडावर वाटून वाटून त्याचा
किंचित तांबडा रंग तयार केला जायचा. त्या रंगाला फुलांचा, वास असायचा.
ह्याच पळसफुलांच्या रंगाने होळी खेळली जायची. आमचा दहा-बारा घरांचा वाडा होता. तिथल्या सुना, मुली आपसात रंग खेळायच्या. एकमेकींना घट्ट धरून रंग लावायच्या, पिचकारी नव्हती, तर हातानेच ओंजळ भरून रंग टाकायच्या. माझ्या वडिलांना हे आवडत नसल्याने ते मला खेळू द्यायचे नाहीत. मग मी दाराच्या आड उभी राहून, तिरक्या नजरेने हा खेळ दूरून बघायचे. त्या खेळात कसलाही उन्माद नसायचा, कसलीही विकृती नसायची.
आमच्या गावात एकच मुस्लिम कुटुंब होतं .
त्या घरच्या बायका, सकिना मावशी, नजमा, गावातील इतर बायांसोबत अगदी मनसोक्त रंग खेळायच्या. पुरुषही एकत्र येऊन, रंग खेळायचे. त्या दिवशी सगळे फक्त 'गावकरी' असायचे. तेव्हा आमच्या गावात तरी रंगाला जात धर्म नव्हते.
खेळाची झिंग चढलेली असायची आणि मधेच पळसाचा रंग संपायचा, तेव्हा मग शेण, चिखल, कधी कधी तर शाईही! याचाही वापर व्हायचा. सगळं हसण्यावारी नेलं जायचं. कोणी रागवायचं नाही. आता समाजात काही गोष्टी बघितल्या की होळीचा तो शेवटचा टप्पा आठवतो... जेव्हा रंग संपतो आणि हाताला लागेल ते फासलं जातं, अगदी माणुसकीवरही.
पहिल्या दिवशी पुरणपोळीचा गोडवा, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे धूळवडीच्या दिवशी गावभर मटणाचा घाट असायचा.प्रत्येक घरात मटणाचा,वास दरवळायचा.
गावातील एक दोन माणसं सकाळीच तांड्यावर जाऊन दारू पिऊन वाकडे-तिकडे पाय टाकत, मोठ्याने बडबडत गावात परतायचे. त्यांना बघून मला खूप भीती वाटायची. मी घरात जाऊन, कवाडामागे लपून बसायचे. 'घाबरू नको, काय नाही करत हे,
त्यांचं त्यान्ला नीट चलता येयना झालंय ' आई म्हणायची.तरीही ते डोळ्याआड जाईपर्यंत पोटात भीतीचा गोळा फिरत रहायचा. ते आठवून आज हसू येतं.
तेव्हाचे दिवस आठवले की वाटतं
...
आज बाजारात विविध रंग आहेत, पिचकाऱ्या आहेत, मात्र त्या पळसफुलांचा मातकट-पिवळा रंग, माहेरच्या हारातली माया, दोन होळ्यांची एकत्र येणारी आग आणि जात न बघणारी ती माणसं...
ते सगळं खूप, खूप आठवतं. तेव्हा माणूस एवढा उपद्रवी नक्कीच नव्हता..!
© छाया बेले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा