पोतराज प्रथा समाजातील विघातक प्रथा | मराठी लेख





   पोतराज प्रथा : समाजातील विघातक प्रथा.


         महाराष्ट्रात आजही परंपरेच्या नावाखाली टिकून असलेल्या काही प्रथा समाजाला पुढे नेत नाहीत, तर मागे खेचतात. पोतराज ही अशीच एक प्रथा आहे . नुकताच एका चॅनेलवर अशा 'कायर' उत्सवाचा  व्हिडिओ पाहण्यात आला.
यात  श्रद्धेच्या नावावर माणसाचे माणूसपण हिरावून आणि मूक्या जीवांचा बळी दिला जातो.
कोणतीही प्रथा का निर्माण झाली कोणी केली याचा शोध घेण्यासाठी आपल्याला इतिहासाच्या गुहेत जाऊन सत्य शोधून काढता येईल. पोतराज हा देवीचा भाऊ, देवीचा रक्षक अशा मान्यता या प्रथेचे समर्थन करणाऱ्या लोकांत दिसून येतात.
या मान्यता मातृसत्ताक संस्कृतीची खुण असु शकते. मातृसत्ताक काळातील कर्तृत्ववान राज्यकर्त्या स्त्रियांना केवळ देवाची पत्नी म्हणून देवी करून मंदिरात बसविले . व त्यांच्याशी संबंधित गोष्टींचे , त्यांच्या समर्थकांचे विकृतीकरण केले गेले. 
यापैकी पोतराज हे मातृसत्ताक, मातृवंशाचे वारस वाहक असं मानलं तरी, आजच्या काळात ही प्रथा अपमान , उपेक्षा,  दारिद्र्य याची वाहक  आहे. 
अर्थातच अशा प्रथा शोषकांनी शोषितांच्या माथी मारलेल्या असतात. 
मात्र आपण येथे या प्रथेचा मानवी जीवनावर होणारा परिणाम याविषयी चर्चा करणार आहोत. 
कोणतीही अंधश्रद्धा  माणसाच्या मनातील भीती, अज्ञान व शोषणाशी अधिक संबंधित आहे. अशा प्रथेमध्ये  एका व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होते.  
पोतराज ही  अशीच एक प्रथा आहे. यात पोतराजाचं आयुष्य नवसात गहाण पडलेलं 
 असतं.
पोतराज ठरवला जाणारा माणूस देवासाठी जन्मलेला नसतो.
तो समाजाच्या दबावाखाली, भीतीपोटी आणि अज्ञानातून अंधश्रद्धेच्या खाईत लोटला जातो.
न कळत्या लहान वयातच त्याचं भविष्य ठरवून टाकलं जातं . 
शिक्षण बंद, स्वप्नं संपलेली, स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार हिरावलेला.
हे सगळं देवाची सेवा म्हणून स्वीकारलं जातं;
प्रत्यक्षात मात्र ही मानवी जीवनाची , स्वातंत्र्याची उघड पायमल्ली आहे. पोतराज प्रथा सन्मान देत नाही, तर
दारिद्र्य, अपमान आणि मानसिक गुलामगिरी
 उपेक्षा देते.
भीक, विधी, विचित्र पोशाख, लोकांची भीती किंवा थट्टा हे सगळं सहन करीत जगणं हेच त्याचं जीवन होऊन जातं.
 माणसाला अपमान सहन करायला शिकवणारी कुठलीही श्रद्धा 
डोळस  असू शकत नाही. 
अशी ही श्रद्धा नाही ही मानसिक गुलामगिरी आहे.
पोतराज प्रथेशी जोडलेली पशू हत्या हे हिंसेचं दुसरं भयाण रूप होय.
नवस पूर्ण झाला म्हणून, देव प्रसन्न व्हावा म्हणून
कोंबडे, बोकड, म्हशी यांचा बळी दिला जातो.
रक्त सांडल्याशिवाय देव नवसाला पावत नाही,
हा विचार देवाने नाही, माणसाने निर्माण केला आहे. माणसाने आपल्या भीतीतून मुक्त होण्यासाठी हा मार्ग काढला आहे .
हिंसा कधीच पवित्र असू शकत नाही.हातात शस्त्र आणि तोंडात मंत्र असले,तरी ती हत्या हत्याच राहते. रक्ताने देव प्रसन्न होतो, हा विचारच माणसाला करुणेपासून दूर, आणि क्रौर्याच्या जवळ नेतो. एकीकडे माणसाने केलेला आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगापर्यंतचा  प्रवास केलेला प्रगत समाज 
 दुसरीकडे अंधश्रद्धेच्या खाईत अडकलेला अज्ञानी समाज , 
या मानवी जगण्याच्या विरोधाभासतील दरी कमी होणं आवश्यक आहे. 
  अशा प्रथातून 
आपण पुढच्या पिढीला काय शिकवतोय ?
अशा विधी पाहणारी मुलं काय शिकतात?
 संकट आलं की देवाच्या नावाने बळी द्यावा लागतो.
 किंवा मनातील भीती घालवण्यासाठी  बळी द्यायचा असतो , 
अशा विचाराला खतपाणी घातले जाते. यातून समाजाला संवेदनशील बनत नाही तर 
तो अजून निर्दयी बनतो.
डोळस श्रद्धा आणि अंधश्रद्धा भेद असा आहे की,
श्रद्धा माणसाला माणूस बनवते.
अंधश्रद्धा माणसाला आणि मूक जीवालादोघांनाही बळी बनवते. तरीही दोन्हींत अतिशय बारीक रेषा आहे हे लक्षात घ्यावं लागेल. पोतराज प्रथा व यासारख्या अनेक प्रथा यासाठीही टिकून आहेत की हतबल शोषित माणूस जीवनाला आधार, सुरक्षेच्या शोधात असतो. तर कधी देवीचा भक्त म्हणून एक दिवस पुजनीय ठरतो उपेक्षित जीवनाला मिळणारा हा मान सुखावणारा असतो.
या अशा अनेक गोष्टी या प्रथा टिकण्यासाठी कारणीभूत आहेत.
या लोकांचं प्रबोधन होणे आवश्यक आहे. आवश्यक तेथे कायद्याचा आधार घेऊन अशा अंधश्रद्धा  समाजातून हद्दपार करणे आवश्यक आहे.
शेवटच्या माणसापर्यंत सन्मान , न्याय,समता बंधुता पोहचायला हवी.

@छाया बेले


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .