कुटुंब व समाजाच्या शांतीमागची शारिरीक , भावनिक श्रमिक स्त्री!!
कुटुंब व समाजाच्या शांतीमागची शारिरीक , भावनिक श्रमिक स्त्री!!
अचानक एक ऑडिओ बुकसमरी समोर आली आणि
सर्वात आधी भावनिक श्रम ही संकल्पना
म्हणजे काय कळले. व स्त्रीयांच्या भावनिक विचार मनात आला.
अनेक गोष्टी आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित असतात मात्र त्या विषयी आपल्याला माहीत नसतं.
अदृश्य श्रम असलेल्या “भावनिक श्रमाची” व्याख्या समाजशास्त्रज्ञ आर्ली रसेल होश्चाइल्ड यांनी द मॅनेज्ड हार्ट या
ग्रंथातून मांडली. त्यांनी या ग्रंथात असे
दाखवून दिले आहे की अनेक व्यावसायिक क्षेत्रांत काम करत असताना व्यक्तींना त्यांच्या भावनांचे नियमन करावे लागते .
द मॅनेज्ड हार्ट" हा आर्ली रसेल हॉचस्चाइल्ड यांनी नोकऱ्यांमध्ये गुंतलेल्या कर्मचाऱ्यांच्या भावनिक श्रमाचा शोध घेतो. जिथे कामगारांना त्यांच्या खऱ्या भावना दाबाव्या लागतात आणि खोट्या भावना प्रदर्शित कराव्या लागतात, ग्राहकांसमोर हसणे, संयम राखणे, सकारात्मकता दर्शवणे इत्यादी. सततच्या या कृत्रिम व्यवहारामुळे मनावर ताण येतो.
ज्यामुळे अनेकदा दीर्घकाळ चाललेल्या ताणतणावामुळे मानसिक, भावनिक आणि शारीरिक थकवा येतो . त्याच बरोबर एकटेपणा वाढतो . डिप्रेशनही येते, असं आर्ली रसेल होश्चाइल्ड यांनी आपल्या ग्रंथात मांडले आहे.
हे संशोधन बाहेर काम करत असलेल्या लोकांच्या जगण्याशी संबंधित आहे.
मात्र घरगुती आणि कौटुंबिक क्षेत्रातही भावनिक श्रमांची प्रक्रिया तितकीच सक्रिय असते. आणि ती प्रामुख्याने स्त्रीच्या वाट्याला येते.
इथं स्त्रीला स्वतःच्या भावनांचे नियमन करून
इतरांच्या भावनांचे जपणूक करावी लागते.
घरातील स्त्री या दोन्ही भूमिका निभावते. ती स्वतःचा राग दाबते , आणि इतरांचा राग शांत करते. ती स्वतःचे दुःख बाजूला ठेवते आणि इतरांच्या वेदनांना हृदयात जागा देते.
अमूक एखाद्याचं घर किती शांत आहे, म्हणजे सगळं ठीक आहे आपण सहज मानतो.
घरात मोठे वाद नाहीत, नात्यांमध्ये तडे दिसत नाही, मुलं सावरलेली आहेत, दैनंदिन जीवन सुरळीत चालू आहे . तिथे संसार व्यवस्थित आहे, असे गृहित धरले जाते.
परंतु या बाह्य शांततेच्या मागे एक न दिसणारी, न मोजली जाणारी आणि बहुधा न मान्य केली जाणारी स्त्री आपली सगळी उर्जा खर्च करून सतत कार्यरत असते. घरातील भावनिक संतुलन राखण्यासाठी ती अखंड धडपडत असते.
ती स्त्री म्हणजे, आई, पत्नी, सून, मुलगी किंवा बहीण पैकी कोणीही असू शकते.
भावनिक व्यवस्थापनाची प्रक्रिया केवळ “काळजी घेणं” इथपर्यंत मर्यादित नाही, तर सातत्याने इतरांच्या भावनांचे व्यवस्थापन करणं, ताण ओळखणं, राग झेलून घेणं, समोरच्या व्यक्तीचं कोसळणं थांबवणं हे सगळं आलं. इथे ती स्वतःच्या भावनांना दुय्यम ठरवत असते . याच प्रक्रियेला “भावनिक श्रम” असे म्हटले जाते.
इथे आपण स्त्रीच्या भावनिक श्रमांचा सामाजिक, मानसिक आणि सांस्कृतिक कारणे व त्यांची अदृश्यता याविषयी कारणे यावर चर्चा होत नाही. तिच्या या श्रमांना मान्यता देण्याची आवश्यकताही वाटत नाही. समाज म्हणून हे आपल्या ध्यानीमनीही येत नाही .
सामाजिक संरचना आणि भावनिक जबाबदारीचे स्त्रीकरण केले आहे.
जसं की, घरातील सगळ्यांच्या भावना समजून घेणं आईचं काम आहे.
नातेसंबंध टिकवण्यासाठी मुलगी समजूतदार असावी लागते.
घर सांभाळणं, भावनिक आधार देणं हे स्त्रीचं कर्तव्य आहे
म्हणजेच,भावना सांभाळण्याची जबाबदारी समाजाने जास्त करून स्त्रियांवर टाकली आहे.
भारतीय सामाजिक रचनेत स्त्रीला “घर सांभाळणारी” म्हणूनच घडवले जाते. लहानपणापासूनच तिला जुळवून घेणे, समजूतदारपणा दाखवणे म्हणजेच, प्रत्येक वेळी
माघार घेणे. स्वतःला मागे ठेवून
नात्यांना प्राधान्य देणे आणि त्यासाठी तिनेच तडजोड करावी असे शिकवले जाते.
या प्रक्रियेत एक सूक्ष्म सामाजिक संदेश अंतर्भूत असतो ,
तो म्हणजे, घरातील भावनिक संतुलन राखणे ही स्त्रीची जबाबदारी आहे.
विवाहानंतर सासरी या अपेक्षेवर शिक्कामोर्तब केले जाते.
भारतीय समाजात सासर हे स्त्रीचं स्वतःचं घर आहे असं मनावर बिंबवलं जातं. त्यामुळे ती सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेते.
नवऱ्याच्या कामाचा ताण, सासरच्या अपेक्षा, मुलांच्या गरजा या सगळ्यांचे केंद्र ती असते.
घरातील भावनिक वातावरणाचे स्थैर्य स्त्रीच्या प्रतिसादांवर अवलंबून असते असं मानलं जातं.
तिच्या संयमामुळे ताण निवळतो, तिच्या शांततेमुळे वाद टळतात, तिच्या मध्यस्थीमुळे नाती टिकतात. अशी अमानवी अपेक्षा समाज स्त्रीकडून करत असतो. त्याची पुर्तता करण्यासाठी ती सतत दडपणाखाली जगत असते.
मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. या टप्प्यावर तिच्या
भावनिक श्रमांचा अजून विस्तार होतो.
मातृत्व हे केवळ शारीरिक किंवा जैविक प्रक्रिया नसून ते भावनिक श्रमांचा प्रचंड विस्तार असतो. मुलांच्या निकोप वाढीसाठी ती सतत दक्ष राहण्याचा प्रयत्न करते.
आपण कुठे कमी तर पडणार नाही?
त्यामुळे आपल्या मुलांचं काही नुकसान तर होणार नाही या विचाराने व त्या संबंधित इतरांच्या अपेक्षानी तिचे भावनिक श्रम अजून वाढतात.
मुलांच्या भावनिक चढ-उताराशी आई जोडली जाते. त्यांच्या यशात तिला मागे ठेवले जाते.
त्यांच्या अपयशात तिला दोषी ठरवले जाते. मुलांच्या सुरक्षिततेची, मानसिक स्वास्थ्याची सामाजिक स्वीकाराची ती सतत काळजी करते.
ही सततची भावनिक सजगता स्त्रीच्या मानसिकतेवर परिणाम करते. घरातील भावनिक व्यवस्थापनाची जबाबदारी स्त्रियांच्या मानसिक थकव्याचे कारण ठरू शकते.
दीर्घकाळ भावनिक श्रम करत राहिल्याने भावनिक थकवा निर्माण होऊ शकतो.
समाजात मातृत्वाचा गौरव करताना या अदृश्य श्रमांची दखल क्वचितच घेतली जाते.
सततच्या अति भावनिक श्रमामुळे मानसिक थकवा येतो. महिलांना स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करणे लहानपणापासून शिकविल्यामुळे त्या या मानसिक ताण किंवा थकवा याकडे दुर्लक्ष करतात.
कारण समाजाने तिला शिकवलेले असते की तिची भूमिका समजूतदार असण्याची आहे, तक्रार न करणारी असण्याची आहे.
तिनेही स्वतःला हे लेबल लावून घेतलेलं असतं. मौन राहून सगळं सहन करते.
स्त्रीच्या या लादलेल्या मौनाला अनेकदा “स्वभाव” म्हटलं जातं जातं. तर कधी “संस्कार” म्हणून गौरवलं जातं.
घरकाम, मुलांची काळजी, सगळ्यांच्या भावना सांभाळणं
यात खूप मेहनत असते.
मात्र त्यातून थेट पैसे मिळत नाहीत,
म्हणून समाज त्याची श्रम म्हणून गणना करत नाही.
म्हणजेच आर्थिक मूल्यनिर्मितीच्या निकषांवर स्त्रीच्या शारीरिक किंवा
भावनिक श्रमांची गणना होत नाही. घरातील आर्थिक उत्पन्न देणाऱ्या व्यक्तीला “कमावणारा” म्हटले जाते, तर भावनिक संतुलन राखणाऱ्या स्त्रीचे काम 'काही करत नाही' अशा दृष्टिकोनातून पाहिले जाते.
परंतु भावनिक श्रम हे सामाजिक स्थैर्याचा महत्त्वाचा भाग आहेत. कुटुंब या संस्थेचे स्थैर्य टिकवण्यासाठी भावनिक व्यवस्थापन अत्यावश्यक असते.
जर घरातील भावनिक श्रम अचानक थांबले, तर तणाव उघडपणे दिसू लागतील.
म्हणजेच, घर टिकवण्याच्या प्रक्रियेत स्त्री केवळ भूमिका निभावत नाही तर ती आपल्या श्रमावर कुटूंब व्यवस्था टिकवून ठेवते.
आता कुठेतरी बदलाची गरज आहे.
स्त्रीचे भावनिक श्रम हे तिचे “कर्तव्य” नसून श्रम आहेत, ही जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे.
बदलासाठी पुढील बाबीवर विचार करता येईल.
घरातील सर्व सदस्यांनी एकमेकांची भावनिक जबाबदारी घेणे.
मुलांना भावनिक शिक्षण देणं ही तशीच सामुहिक जबाबदारी असावी.
स्त्रीच्या “मी थकले आहे” या वाक्याला गांभीर्याने घेणे.
घरातील भावनिक संतुलन राखणे ही केवळ स्त्रीची जबाबदारी नाही. ती एक कौटुंबिक जबाबदारी आहे. याचा स्विकार करून ती सर्वांनी मिळून पार पाडणे.
समाजाच्या शांततेची किंमत स्त्रीने आपल्या भावनांचा बळी देऊन मोजलेली असते.
ती घरातील वाद टाळते, नात्यांचे धागे सांभाळते, ताण स्वतःवर घेते, नेहमीच स्वतःला मागे ठेवते.
परंतु समाज, कुटुंब तिच्या या श्रमांना कर्तव्य म्हणून गृहित धरत राहिले , तर तिच्या मनाची झीज वाढत राहील.
स्त्रीचे भावनिक श्रम मान्य करणे म्हणजे तिला विशेषाधिकार देणे नव्हे,तर तिलाही माणूस म्हणून स्वीकारणे आहे.
घर टिकवण्याच्या प्रक्रियेत तिचा वाटा केवळ अदृश्य राहू नये.
तो मान्य, सन्मानित आणि सामायिक व्हावा.
कारण शांततेचा अर्थ केवळ आवाजाचा अभाव नाही.
तो न्याय्य आणि समतोल भावनिक वाटणीचा परिणाम असावा.
@छाया
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा