| इस्कोट | मनश्री आर्ट द्वारा आयोजित स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त मराठी कथा
// इस्कोट //
"आट दिसापासून धोध्धारर लागून बसलाय.. घरात दाना न्हाई..घरातले उंद्र दिक्कील पळून गेले.. म्या कुठ जाऊ ह्या चिंगीला घेऊन ? चापला पैसे धाडून देत व्हता.. ते बी न्हाई आले .. आता काय खाऊ घालू ह्या परदिशी जीवाला..? ना माय ना बाप.. माझ्या म्हातारीच्या जीवावर टाकून गेले... निराधार म्हणून पैसे देत होते आता सगळंच बंद हाय .. काय खावाव गरिबांनं.. गावातून काही मागून आन्ल आस्त..व्हळ भरून चाल्लंय "
घमसू म्हातारी.. झोपडीच्या दारातून बाहेर कोसळणाऱ्या पावसाकडं बघून चरफडत स्वतःशीच बोलत होती.
पाऊस आपल्याच धुंदीत निर्दयपणे कोसळत होता.त्याचा तांडव बघून सगळेच जीव दबा धरून बसले होते.
" भातल.. "
' चिंगीच्या आवाजाने घमसू तंद्रीतून बाहेर आली.
काय खाऊ घालू गं माय तुला ? भाकर,, भाकर लावलीस एकच.. कुठून आनू भाकर तुला ?"
कातडीं झाकलेले दोन हाडाचे सांगाडे झोपडीत भुकेने व्याकुळ झाले होते.
चिंगीच्या हातापायाच्या सलमकाड्या झाल्या होत्या.डोळ्याची बुबळं फाकली होती.. छातीची बारीक सारीक सगळी हाडं उघडी पडली होती..ं केस रंग उडूनन गेल्यासारखे धुरकट झाले होते.. श्वास मंदावला होता.. घमसू तिच्या छातीकडे लक्ष देवून ती जीवंत असल्याची खात्री करून घेत होती.
घमसूनं भुईवर पळसाची पानं टाकून त्यावर एक पटकूर अंथरून चिंगीला निजवलं होतं.
चिंगी राहून राहून एकच शब्द उच्चारीत होती..
"भातल.. "
तो शब्द ऐकून घमसुच्या काळजाची घालमेल अधिकच वाढत होती.
' एक पोरगं पदरात घेऊन किती नेटानं सौसार केलो.. नवरा, लेकरू ल्हान असताना रंडकी करून गेला.. तरी म्या भिलो न्हाई.. एकरबर गायरान गड्यावनी कसून लेकरं जगविलो.. आज हे कसे दिवस आले..'
घमसू मनातून व्यथित झाली होती.
बबन्या लहान असताना घमसूचा नवरा रानात गेला आणि वीज पडून ठार झाला.. दोन महिन्याच्या बबन्याला छातीला धरून घमसू धोंड्यागत बसून राहिली. डोळ्यातून एक टिपूस गाळला नाही. ती कधीच रडली नव्हती आज तिला रडावं वाटत होतं पण अंगात रडायलाही बळ नव्हतं. डोळ्यात पाणी नव्हतं.
नवऱ्याने एकरभर गयरान कसलं होतं. बबण्याला पाठीवर घेऊन.. घमसू तेच गायरान टिकावानं खंदून त्यात पिवळ्याचं बियाणे शिंपडून पेरणी करू लागली.
त्यात पोटापुरते दाणे पिकवून लेकराचा सांभाळ करू लागली. बबन्याला पाठीवर घेऊन.. एक शेळी घेऊन रानावनात भटकून दिवस काढीत होती.
भावांनं आपली माय नसलेली पोरगी आणून पदरात घातली.." बाई माह्या परदेशी लेकराला जगवून घे"
असं म्हणून टाकून निघून गेला.
घमसू , बबन्याहून पाच सहा महिन्यानं मोठी असलेल्या हिरीचीही माय झाली.अन् तिलाही जिवापाड जपू लागली. हिरी- बबन्या दोघं सोबत हसत खेळत मोठे होत होते.
" दिसामागं दिवस कधी गेले की माय.. ध्यानात बी आलंनाई.. हिरी शानी दिख्खील झाली.. "
घमसूच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. अचानक डोळे बारीक करून ती दुरवर एकटक पाहात कसल्यातरी विचारात गढून गेली.
" बबन्याबी डामगा झालायं .. हिरिला दुसरीकडं देन्यापरीस दोगाचं लगन लावून देतो.. मजे दोनी लेकरं सोबतीनं ऱ्हातील .. तसं बी दोघं एकमेकाला सोडून ऱ्हायनात.."
धाटाच्या बुडाची माती मोकळी करीत घमसू विचार करीत होती.
तिची नजर शेरडा म्हागं हिंडणाऱ्या हिरी- बबन्यावर खिळली होती.
"उद्याच चापलाला बोलवून घेतो."
" बाई एवड्या गरबडीनं का बोलीलीस .. "
दोन-चार टेकड्या चढून उतरून घामाघूम झालेला चापला खांद्यावरून मातीने लालबुंद झालेल्या उपरण्याला तोंड पुशीत बोलला.
"घे पाणी पी.. आदी बस.." चापलाच्या हातात पाण्याची चरवी देत बोलली.
चापलानं, तांब्याभर पाणी पायावर घेतलं.. तोंडावर पाणी मारलं.. उरलेलं पाणी घशात ओतलं झोपडीत येऊन धारनाला टेकून बसला.
घमसूनं खोपटावरच्या सलमकाड्या घेतल्या. त्या मोडून चापलाच्या पुढं करीत म्हणाली.
" चकमक पाड च्या करतो तुला."
चापलानं खिशातून चकमक काढली गारगोटीवर रुई ठेवली आणि त्यावर लोखंडी चीप मारून रूई पेटवली अन् सलमकाड्यावर ठेवली.तोवर घमसू शेळीचं दूध काढून आणली अन् जरमलच्या भगून्यात टाकून चुलीवर ठेवली. त्यात कागदात पुडी बांधून ठेवलली साखर टाकली पत्तीच्या पुडीतली अर्धी पत्ती टाकली.
अन् चापलाच्या तोंडाकडं टक बघत बसली.
चापलाही तिच्या बोलण्याची वाट बघत तिच्या तोंडाकडं टक लावून बसला होता.
" म्या काय मन्तो.. भिया .. छोरीला पदर आलाय.. लग्न कराव लागते.. लोकाला देवूस्तर बबन्याचं तिचं लगन लावून टाकूत.. ल्हानपनापसून जोडी हाय जलमबर संग ऱ्हातील.. "
घमसू एका दमात आपला बेत सांगून चुलिकडं वळली. जरमलच्या पेल्यात चहा ओतून पाचलाच्या पुढं ठेवला.त्यानेही आपल्या कवळाभर मिश्या मागं सारून दोन घोटात चहा पिऊन घेतला.
घमसू पेल्यातला चहा ढवळत त्याच्या उत्तराची वाट बघू लागली.
"बाई , तिला सा म्हयन्याची व्हती तवाच तुज्या पदरात आनून घातलो.. छोरी तुजीच हाय तू मन्चील ते कर.. मला पुसायची काय गरज हाय... "
भावाच्या बोलण्यानं घमसुला समाधान वाटलं.
" भेगीनच उरकून टाकूत.. लई उशीर करायचा न्हाई .. पायली- दीडपायली घवाची खीर शिजवून करून टाकूत .."
" पुढच्या आईतवारीच करून टाकूत.. वसूरच्या गिरनीतून म्या घऊ भरडून आन्तो ..तुमचे तिगाचे कपडेबी म्याच आन्तो.. तिकडच्या तंड्यावरचे धा-बारा मान्स संगं घेऊन येतो..तुज्या तंड्यावरचे धा-बारा मान्स एवड्याला पुरल की तेवडी खीर.. ?"
"बक्कळ व्हते .."
" तुमचे तिगाचे कपडे म्याच आन्तो.. काही चिंता करू नगं.. तू तयारीत ऱ्हा .."
घमसू तयारीला लागली.हिरी बबण्याला शेण गोळा करायचं काम लावलं. स्वतः चलम्याचं पाणी आणून झोपडीचा कुड, भुई ,अंगण सारवून निर्मळ करून ठेवलं.
घमसू मनातून हरखली होती.. टेकडीच्या बुडातून पाणी वर आणत होती. तरी तिला शिण येत नव्हता. माझ्या लेकराचे दोनाचे चार हात होतील. दोन्ही लेकरं माझ्या जवळच राहतील. या विचारानं तिचा मन आनंदून गेलं होतं.
बबन्या हिरी मनातून सुखावले होते.कळायच्या आधीपासून ते सोबत होते व सोबतच राहणार होते.
आतापर्यंत ते क्षणभरही एकमेकांपासून दूर गेले नव्हते.
" अये.. बबन्या..चल शेण आन मन्ली याडी.."
हिरी शेनाचे शिंदाडे हातात घेऊन बबन्याला ढकलत पुढं घातली..
दोघांचेही शिंदाडे शेणानं भरले होते. बबन्या कमिजाच्या बाहीनं घाम पुशीत माळाच्या टेकाडावर टेकला.हिरिनंही आपलं शिंदाड उतरवलं , त्याच्या शेजारी बसली.
"याडीनं बरं केलं.. हाय की न्हाई.?.आता तुला कुट्टबी जायाची गरज न्हाई.."
त्याच्या वाक्यानं उन्हाच्या तिरपेत हिरीचा चेहरा अजूनच तजेलदार दिसला.
ती " हूं .." एवढंच म्हणाली.
चापला , आपल्या तंड्यांवरची पाच सहा गडीमाणसं घेऊन शुक्रवारीच हजर झाला.सोबत चार पायल्या हायब्रीड ज्वारीचं पीठ आणलं होतं.किलोभर गोडतेल, खोबरेल तेल, दोन पायल्या गहू भरडून आणले होते. सोबत खिरीसाठी गुळ आणला होता.
घमसू ज्वारीच्या पिठाच्या भाकरी व त्याचच पिठलं करून करून खाऊ घालीत होती.
चापला सगळ्यात आधी, संग आणलेल्या पोरांना घेऊन लाकडं गोळा करून घेतला.
खैराच्या मोठमोठ्या डिळी आणून झोपडी पुढं मांडव घातला मांडवात मुरूम माती टाकून टाकून ओटा तयार केला. गोन्नीचे चे फोक आणून ताटवे करून मांडवावर टाकले. आंब्याच्या डहाळ्या लावून मांडव सजवला मांडवात बोहला तयार केला. घमसूनं सांगितल्यानुसार शनिवार धरून कासारीन आली.
"घसमूबाई आलो बग तुज्यासटी.. माळं चडंत "
" बरं केलीसये बाई.. "
असं म्हणून घमसूनं तिच्या हातातली पिशवी घेऊन मांडवात टेकवून तिच्या डोक्यावरचं ओझंं उतरवून घेतलं.
तांड्या वरच्या शेजरणीला पाच पाच बांगड्या भरल्या.
"तू भी लेव ग वर माये.. पैसे म्या देतो.. कसारणी वरमाईला दोन्ही हात भरून काकनं घाल बग.. "
घमसुची चुलती चेहऱ्यावर लावलेला वळण्याचा साज हलवत बोलली.
"व्हयये याडे वरमायला भरावच लागते.. "
तिच्या हो मध्ये हो मीसळत कासारीन बोलली.
दोन्ही तांड्यावरच्या बाया रात्रभर गाणी म्हणत, गळ्यात गळे घालून रडत , नवरा नवरीला हळद लावीत होत्या.
"बबन्यालाच लई लावा तेच लई काळं हाय.." हिरिच्या या बोलण्यावर सगळ्या बाया हसल्या.
दुसऱ्या दिवशी बबन्या आणि हिरीवर अक्षता टाकून, दोघाला एका धाग्यात बांधून सगळे आपापल्या वाटेने निघून गेले.
चापलानं बहिणीच्या म्हणण्याप्रमाणे सगळं करून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी दोन बाजा घेऊन परत आला.
"बरं केलास.. म्याच म्हणणार होतो तुला.."
" हळदीच्या अंगानं लेकरं कुठे खाली झोपतील मनून घेऊन आलो.. बाई मला लय आनंद झाला बघ आपले लेकरं न्हेमीकरता एक झाले बग ."
"व्हय" घमसूच्या चेहऱ्यावर एक समाधान पसरलं.
" आता मला कसली चिंता राहिली न्हाई बग.. येत जाईन अधून-मधून"
असं म्हणूनच चापला समाधान घेऊन परतला.
घमसूही आपल्या कामाला लागली. शेळ्या फिरवीत, घोटरं, डिंक, बिब्बे, चारोळी गोळा करीत रानात भटकत होती.
हळदीच्या अंगाला उन्ह लागंल म्हणून बबन्याला आणि हिरिला घरात बसून रहायला सांगून गेली होती .
दोघं गजगे खेळत बसले होते.
तेवढ्यात घमसू आली.
" ह्या दोगाचं ल्हानपण काही गेलं न्हाई आजून.. लगन झालंय तरी बी गजगे खेळत बसल्यात.." मनाशीच म्हणाली.
." याडी भाजी काय करू..?
" त्या कुंचीत खेकडे हाईत.. कडी कर.. चलम्याच्या कपारीत व्हते आन्लो कडी कराव मनून.. "
हिरीनं धपा धपा पाच - सहा भाकरी टाकल्या , खेकडे उखळात वाटून खेकड्याची कढी केली.
तीघं माय लेकरं एकाच ताटात बसून हसत खेळत जेवण उरकून घेतले.
" छोरी, बबन्याला मदी बाज टाक. मला इतं मांडवात टाक. "
बबन्याला झोपडीत बाज टाकली. घमसूची बाज मांडवात टाकून अंथरूण टाकलं.
" ऐ छोरा तू मदी झोप.. म्या इत़ झोपतो.. "
"याडी, ह्या छोरीला मांडवाच्या भाईर झोप मनाव.."
बबन्या तिला चिडवत.. चिडवत झोपडीतल्या बाजंवर जाऊन पडला.
"तूच झोप भाईर.. "
हिरी त्याला उत्तर देत नेहमीसारखी घमसूच्या कुशीत जाऊन झोपी गेली.
पडताच दोघंही घोरायला लागली.
" कदी कळलं ह्या पोराव्हायला .. ?
सांगू तर कसं सांगू ? कदी सौसार सुरू व्हईल ह्यायचा ? दोन्ही एकसारकेच " हिरिच्या डोक्यावरून हात फिरवत पडून राहिली.
घमसू या काळजाच्या दोन्ही घडानां घरी ठेवून रानोमाळ भटकत होती.
हे दोघं गजगे खेळण्यात भांडण करण्यात दंग होते.
" उन्हात नकर घराकड जाऊन भाकर जाऊन खाऊन येतो.."
असं म्हणून घमसू शेळी ओढत दोन पाटरांना हाकारीत घराकडं आली.
शेळी मांडवाच्या डिळीला बांधली पाटरं मोकळे सोडले. ,"छोरी मला बाटी दे नकर .. चरवीत पानी दे .. "
" बबन्या मजी ढाई हाय बग.. याडीला बाटी देवून येतो."
हिरी झटक्यात उठली घमसूला जेवायला देऊन आली.
" ऐ दे मजे गजगे.. मजी ढाई हाय.. "
बबन्यानं गजगे हातात गच्च धरून ठेवले होते. नजर दुसरीकडेच कुठेतरी खिळली होती.
" बबन्या , गजगे दे मजे .. लंडी करू नगं ..मजी ढाई हाय.. "
ती त्याच्याशी झटापट करू लागली.
त्याने तिला ओढून जवळ घेतलं आणि तिला डोळ्यानं खूण करून तिकडे बघायला सांगितलं.
त्याच्या हातातील गजगे काढून घेण्याच्या प्रयत्नातच तिने त्या दिशेला पाहिलं तर.. शेळिची पाटरं खेळत होती.
बबन्यानं हिरीला जवळ ओढलं.
आजवरच्या स्पर्शापेक्षा हा स्पर्श तिच्यासाठी अनोळखी होता . सुरवातीला ती गोंधळली नंतर त्याच्या स्पर्शात हरवून गेली.
सकाळी सकाळी हिरी खोपटाच्या बाहेर डोकं दोन्ही हातानं दाबून धरून बसली होती.
" ऐ छोरी काय झालं.. तसी का बसलीस दोस्क धरून ?"
" उल्टी झाली.. "
काही दिवसांपासून हिरी बरोबर जेवतंही नव्हती. बारीक वाटत होती.
" लग्नाला वरीसबी झालं न्हाई की आजून.. लेकरु ऱ्हायलय छोरीला... "
घरासमोरून जाता जाता पारूयाडी बोलली.
" याडी, काय मन्ली पारुयाडी.. "
" काय न्हाई.. व्हते दोन तीन म्हयने आसंच.. "
" कशानं..?"
" पोरगं आसल तर सतविते .. पोरगी आसल सतविना "
घमसूचं बोलणं ऐकून हिरी लाजली. बबन्याला खूप आनंद झाला.
"काय खावू वाटलेलं सांग. नस्ता लेकराचा कान फुटते."
हिरी अजून लाजली व घरात पळाली.
शेरडं बांधत बांधत बबन्यानं घमसूचं बोलणं ऐकलं . मनाशी खुणगाठ बांधली.
" उद्यापसून हिरीला खायाल काईतरी घेऊनच येतो...
तिलाच इचारून घेतो काय खाव वाटते मनून.."
" हिरी, तुला काय खाऊ वाटते सांग बर ? उद्या पसून आन्तो" तिला कुशीत ओढून घेत त्यानं विचारलं.
" कैबी खाऊ वाटना तोंडाकड नेलं की उल्टी येते.."
त्याच्या छातीवर डोक टेकवत कसनुसं तोंड करीत हिरी बोलली.
त्याने तिला अजून जवळ ओढत ओठांवर ओठ टेकवले.
घमसू समद्या रानातला सगळा रानमेवा तिच्यासाठी गोळा करून आणत होती. कारं ,चार, टेंबरं, कवठं, घोटरं, बिब्याची फुलं. तिला काहीतरी आवडलं म्हणून सगळं गोळा करीत होती.
बबन्या दर दिवशी भाजीसाठी तितरं, भुरळं, मोर, ससुलं नाहीच सापडलं काही तर खेकडे, बारीक बारीक मासोळ्या, घेऊन येत होता. काही केलं तरी हिरीला दोन घासही जात नव्हते.
" आये छोरी.. तशीच उठलीस का? जेवढे जाईल तेवडं पोटातलौ लेकरु उपाशी र्हाते"
" हिरे,,, याडी काय म्हणली ऐकलीस का..? थोडीतरी खा नसता म्याबी खायना.." त्याच्यावर नजर रोखून हिरी पुन्हा ताटावर बसली.
हिरा नऊ महिने भरत आले होते. चापला एक दिवसाआड चकरा मारीत होता.
" यै याडी,, किती मोट्टं पोट आलंय एवडूश्या पोरीचं? हात पाय मातर काडी झाल्यात... रातच्याला पोटबीट दुकलं तर बोलीव मला.... "
बोलत बोलत सिता याडी गवऱ्याच्या टोपल्यावरचा लाकडाचा भारा सांभाळत पुढे गेली.
" बरं..बरं.. बबन्याला धाडतो.."
" ते बग तुज्यामज्यावनी हाय ती जोडी.. सोडून ऱ्हायनात... नुसते मुके घेत ऱ्हात्यात.. "
बबन्या शेरडाच्या पाटराच्या जोडीकडं खुणवीत म्हणाला.
" तू कुटं घेतूस.."
"ये मंग आताच घेतो.. " असं म्हणून तो पुढे सरकला..
तशी हिरी लाजून गवताशी चाळा करीत राहिली.
सगळीकडे हिरवळ पसरली होती. सृष्टीच्या कणाकणात जीवन बहरून आले होते. सगळेच जीव आपल्या कुवतीप्रमाणे चिमुट,पसा,ओंजळ, भरभरून हा बहर आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करत होते.
"आजूक काई दिवसानं आपलं लेकरू आपल्या संग येईल.. तवर आपल्या शेळ्याचा खांडबी मोट्टा व्हईल.. आपून तिगं शेळ्या घेऊन येवूत..."
"नगं,, आपल्या लेकराला बाराळीच्या शाळंत टाकूत आपून.. "
" तुज्या मनावर..."
हिरीचं लक्ष त्याच्या बोलण्याकडं नव्हतं. सारखी उठत होती, बसत होती.
" तोंड का सुकलंय तुजं ? उट.. बस का करतीस.. काई दुकत आसल तर सांग.. "
त्यानं तिचा हात धरुन जवळ बसवलं.
तिनं तिच्या सवयीप्रमाणे झटक्यात हात सोडवून घेत उठली. साडी रक्तान भरली होती.
" य्ये हिरी बग तुज्या म्हागं काय लागलंय, साडीला.." काही न बोलता हिरी हळूहळू पाय उचलत घमसू निंदत असलेल्या ढेल्यात तिच्या जवळ जाऊन काही तरी बोलली.
" य्ये बबन्या शेरडं घेऊन ये, म्या छोरीला घेऊन घरला जातो." घमसू पाण्याची चरवी, खुरपे, कुंची सावडून घेऊन हिरिच्या हाताला धरून घराकडं चालू लागली.
दिवस मावळला होता. सगळी चिमण्या पाखरं, गुरं ढोरं आपल्या घराकडे परत निघाले होते.
काळोख सृष्टीला झाकून तिचं अस्तित्व तिचं अस्तित्व नाकारता होता.
हिरी चालता चालता वाटेत बसली. तसं तिच्या शरिरातून चरवीभर पाणी सांडलं.
"याडी.... "
घमसूकडं प्रश्नार्थक नजरेने बघत राहिली.
"काय व्हयना .. चल हळूहळू.." असं म्हणून घमसू तिच्या हाताला धरून चालू लागली.
पारूयाडी प्रयत्न करीत होती.
"पयलारू हाय आन् लेकरू पायाळू आलंय की गं "
"याडी कायबी कर मज्या छोरीला वाचवून घेय्यं"
घमसू पारूयाडीची विनवणी करीत होती. घमसूच्या जीवाची घालमेल सुरू होती.
बबन्या बाहेर कुडाला टेकून बसला होता. आतलं बोलणं कानात जीव आणून ऐकत होता.
काय होणार या विचाराने त्याचं डोकं बधीर झालं होतं.
हिरी किंचाळत होती. शांत होत होती.
"छोरीच्या जीवाचं किती हाल हायीत गं "
पारू याडी कळवळत होती.
"एकदाचं आलं लेकरू भाईर "
पारूयाडीच्या या बोलण्यानं घमसू अन् बबन्याला हायसं वाटलं.
रक्ताचा पाट काही केल्या थांबत नव्हता.
. रात्रभर अंगातलं सगळं रक्त वाहून जाऊन, एका कोवळ्या जीवासह बबन्याला सोडून निघून गेली.
तेव्हापासून बबन्या हातात गजगे घेऊन पाटराच्या जोडीकडं बघत बसत होता. त्याला ना खाण्यापिण्याचं भान होतं ना स्वत:चं . तोंडातून एक शब्दही उच्चारला नव्हता.
घमसू त्याला सावरण्याचा खूप प्रयत्न करीत होती. हिरी तिचिही लेक होती. घमसूला तिच्या जाण्यानं खूप दु:ख झालं होतं. मात्र तिला या दोन जीवांनाही सांभाळायचं होतं.
बबन्याकडं बघून चापलाचाही जीव तुटत होता.
" बाई ह्याला कुठंतरी घेऊन जातो. धोंडा व्हवून बसलाय निस्ता. मुंबईला घेऊन जातो काहीतरी कामला लावतो कामात विसर पडल, पडला तर.."
" कर बाबा काईतरी.. छोरी तर गेली,, हेबी हातचं जाईल..नुस्तं बगत बसतंय डोळे तारवटून .. लेकराला दिक्कील घेयना.. बळबळं भाकरीचा नकरसा तुकडा खाऊ घालतो. ."
" तड्यांवरचे सगळेच मान्स चाल्यात कामाला.. ह्यालाबी घेऊन जातो... जागा बदललीकी येईल थाऱ्यावर.."
" चापला ते दोन पाटरं, शेळी ईकून काई पैसे घरी देऊन बबण्याला घेऊन गेला, ते वरीस झालं. मजा बबन्या डोळ्यात खेळते मज्या नुसता. हे लेकरूबी वाचायचा भरोसा नाही. असा कसा इस्कुट झाला सगळा.." ?
घमसू मनाशी बोलत होती.
" भातल.. "
चिंगीच्या आवाजानं घमसू भानावर आली.इतक्यात हवेवर तरंगत जनावरांना हाकारण्याचा आवाज तिच्या कानावर पडला. तशी घमसू वाऱ्यासारखी झोपडीच्या बाहेर आली. पलीकडच्या टेकडीवर एक म्हातारा माणूस ढोराचा खांड घेऊन आला होता. डोक्यापासून पायापर्यंत पळसाच्या पानाचं पंजाळ करून पांघरलं होतं.
हातात चिरगुटात बांधलेली भाकर दिसत होती. घमसू कसलाही विचार न करता त्याच्या दिशेनं निघाली.
एक माळ उतरून दुसरा माळा चढून त्याच्या जवळ पोहोचली.
"दादा मला भाकर असली तर दे थोडी. बारकी पोरगी उपाशी हाय. कोरबरच तुकडा राहिला कीये माय,, हाय तेवडा घेऊन जा. आत्ताच खाल्लो मी.
नकर आदी येत व्हतीस तर तुलाच देलो आस्तो सगळी भाकर..."
"ऱ्हावूदे जेवडी हाय तेवडी दे.."
घमसू भाकर घेऊन पुन्हा एक माळ उतरून एक चढून झोपडीत आली. चिंगीच्या अंगावर टोपलंभर माश्या बसल्या होत्या. डोळे अर्धवट उघडे होते.
"चिंगी, हे खाय माय भाकर आन्लो म्या.." तिच्या अंगावरच्या माश्या झटकून घमसू तिला उठवायचा प्रयत्न करीत होती. चिंगीचं शरीर थंडगार पडलं. हात पाय लुळे पडले होते. घमसू धोंडा होऊन चिंगीच्या डोळ्याकडं बघत राहिली.
बाहेर पाऊस आक्रोश करीत कोसळत होता.
छाया बेले.
हेही वाचा -
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा