महिलाच भोंदू बाबांच्या जाळ्यात का अडकतात? | अंधश्रद्धेचं सामाजिक वास्तव
भोंदूबाबांच्या जाळ्यात जास्तीत जास्त महिलाच का अडकतात?अंधश्रद्धेचं सामाजिक वास्तव!
सध्या आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला एका विकृत बाबाच्या विकृत कृत्यांनी हादरवून सोडले आहे. ज्या महाराष्ट्रात महामानवांनी, संतांनी अंधश्रद्धेचा अंधार संपविण्यासाठी कार्य केले त्या महाराष्ट्रात एका व्यक्तीने अंधश्रद्धेचा फायदा घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचं शोषण करावं ही माणुसकीला, समाजाला काळीमा फासणारी घटना आहे.
असंही बोललं जातंय की यात तथाकथित प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या घरातील महिलांचा समावेश आहे.
इथे प्रश्न पडतो की, महिलाच अशा जाळ्यात का अडकतात? जाळं बाहेरचं आहे की त्यांच्या आतच ते निर्माण केलं जातं? की अजून काय कारणं असू शकतात? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
मानवी जीवनात श्रद्धा ही केवळ धार्मिकता या भावनेपुरती मर्यादित नसून ती मानसिक स्थैर्य, आशा आणि आधाराचं साधन आहे. संकटात श्रद्धा माणसाला धैर्य देते, जगण्याचं बळ, प्रेरणा देते आणि अनिश्चिततेतही आशेचा किरण दाखवते. परंतु श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा अत्यंत सूक्ष्म असते. विवेक, तर्क आणि चिकित्सक वृत्ती नसेल, तर हीच श्रद्धा अंधश्रद्धेत परिवर्तित होते, आणि तेथून पुढे शोषणाची प्रक्रिया सुरू होते.
म्हणून श्रद्धा जितकी महत्त्वाची आहे तितकाच विवेकही आवश्यक आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
आजच्या विज्ञाननिष्ठ, शिक्षणप्रसार झालेल्या तंत्रज्ञानयुग समजल्या जाणाऱ्या समाजातही अशा दुष्ट प्रवृत्तीचं
अस्तित्व टिकून आहे, ही बाब विचार करण्यास भाग पाडणारी आहे. विशेषतः महिलांचा मोठा वर्ग अशा व्यक्तींच्या प्रभावाखाली येताना दिसतो. या घटनेचे वरवर विश्लेषण केल्यास “महिलांची भोळसट वृत्ती” किंवा “अंधविश्वास” अशी कारणे पुढे केली जातात, मात्र ही सबब अपुरी आणि दिशाभूल करणारी आहे. कारण हा प्रश्न केवळ व्यक्तीच्या स्वभावाचा नसून सामाजिक संरचना, सांस्कृतिक परंपरा, सत्तासंबंध आणि महिलांची मानसिक जडणघडण यांचा परस्परसंबंध लक्षात घेणं आवश्यक आहे.
“भोंदूबाबा” हे विशेषण अशा व्यक्तींसाठी वापरले जाते, ज्या व्यक्ती स्वतःकडे अलौकिक किंवा दैवी शक्ती असल्याचा दावा करतात व त्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करतात. ते स्वतःला रोगनिवारक, भविष्यवक्ता, संकटमोचक किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सादर करतात. भारतीय समाजात गुरु-शिष्य परंपरेला प्राचीन काळापासून अत्यंत उच्च स्थान आहे. गुरूची महती सांगताना संत कबीर म्हणतात,
गुरू गोविंद दोऊ खडे
काके लागूं पाय
बलिहारी गुरू आपने
गोविंद दियो बताय
तसेच अनेक संतांनी गुरूचा महिमा सांगितलेला आहे. आपल्या समाजात जास्तीत जास्त लोक या परंपरेला मानणारे आहेत.
मात्र गुरूची निवड करताना ती डोळसपणे करणं हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. उदाहरण द्यायचं झालं तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना गुरू मानले ते महात्मा फुले, संत कबीर, यांचे
विचार व कार्य प्रकाशवाट दाखविणारे होते. म्हणूनच डॉ बाबासाहेबांनी यांना गुरू मानलं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना आपले अध्यात्मिक गुरु मानले होते. ते तुकोबांच्या कीर्तनाला जात असत आणि त्यांना तुकाराम महाराजांचा आध्यात्मिक सल्ला व आशीर्वाद मोलाचा वाटत असे .
गुरू हा ज्ञानाचा स्रोत, नैतिक मूल्यांची शिकवण देणारा, आध्यात्मिक उन्नतीचा मार्गदाता मानलं गेलं आहे. याच विश्वासाचा गैरफायदा घेत काही व्यक्तींनी स्वतःला “दैवी” म्हणून, स्वयंघोषित गुरू बनून लोकांची फसवणूक करतात हे भारतीय समाजाचं वास्तव आहे. हे वारंवार घडत असतानाही लोक पुन्हा पुन्हा त्याला बळी पडतात.
काळानुसार भोंदू बाबागिरीच्या या प्रक्रियेत बदल होत गेले. पूर्वी पोट भरण्यासाठी गावोगावी फिरणारे साधू-बुवा आज माध्यमांच्या साहाय्याने व्यापक पातळीवर पोहोचले आहेत. सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाणी कार्यक्रम, सार्वजनिक कीर्तन-प्रवचने यांमधून त्यांनी स्वतःचा प्रभाव वाढवला. अशा प्रकारे श्रद्धेचे व्यापारीकरण झाले असून ती वैयक्तिक अनुभव न राहता एक प्रकारची बाजारपेठ बनली आहे.
जिथे लोकांच्या भावनांवर आधारित व्यवहार घडतात.
या सगळ्याला महिलाच जास्त का बळी पडतात, याचं कारण त्यांच्या सामाजिक स्थितीमध्ये आणि दैनंदिन जीवनातील असमानतेमध्ये दडलं आहे.
भारतीय समाज हा पितृसत्ताक रचनेवर आधारलेला आहे. या रचनेत महिलांची भूमिका ही इतरांच्या हितासाठी आहे हे मनावर सातत्याने बिंबवले जाते. “अमावस्येला केस धुवू नयेत”, “पौर्णिमेला केस विंचरू नयेत”, “कुंकू नाही लावलं तर नवऱ्याचं आयुष्य कमी होतं”, “मंगळसूत्राशिवाय जेवण केलं तर पाप होतं” अशा अनेक समजुती तिच्या मनात खोलवर रुजवल्या जातात.
तिची स्वतःची मानव म्हणून प्रतिष्ठा आहे, तिचंही स्वतंत्र महत्त्व आहे, हे तिला सांगितलं जात नाही. उलट तिच्या जीवनाची किंमत पुरुषाशी जोडली जाते. मुलगा जन्माला घालणारी स्त्री भाग्यवान, नवरा जिवंत असेल तर सौभाग्यवती—अशा संकल्पनांमुळे ती सतत पुरुषांच्या हितासाठी जगण्याची सवय लावून घेत असते.
महिलांच्या जीवनातील वडील, भाऊ, नवरा हे सगळेच पुरुष प्रिय असल्याने त्यांच्या हितासाठी जे सांगितलं जातं, ते योग्य-अयोग्य न तपासता त्या स्वीकारतात. अनेक वेळा प्रेम, भीती, सामाजिक दबाव आणि दोषारोप यांच्या मिश्रणातून त्या निर्णय घेतात. नातं टिकवण्यासाठी, कुटुंब वाचवण्यासाठी आणि “वाईट घडलं तर दोष माझ्यावर येईल” या भीतीमुळे त्या स्वतःचा आवाज दाबून ठेवतात.
महिलांवर घरगुती जबाबदाऱ्यांचा प्रचंड भार असतो. कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे, नातेसंबंध टिकवणे, परंपरांचे पालन करणे या गोष्टी त्यांच्याकडून अपेक्षित असतात.
मात्र निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग मर्यादित असतो. अनेक वेळा आर्थिक स्वातंत्र्य नसल्यामुळे त्यांच्या आयुष्यावर इतरांचे नियंत्रण असते. परिणामी असुरक्षितता, परावलंबित्व आणि एकाकीपणा निर्माण होतो. अशा परिस्थितीत जेव्हा एखादी व्यक्ती त्यांना आधार देण्याचं सुरक्षितता देण्याचं अश्वासन देते, तेव्हा त्या अशा लोकांच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता वाढते. अशा भोंदूबाबाकडे एकटी बाईच जाते असं नाही तर तिचे सगळे कुटुंब तिला तिकडे घेऊन जाते. जे करायला सांगितलं जातं ते करण्याचा दबाव तिच्यावर आणला जातो.
यात तिचा स्वतःचा स्वार्थ क्वचितच असू शकतो.
जास्तीत जास्त तर कुटूंबाच्या फायद्याची गोष्ट असते.
मुल होत नसेल तर कुटुंबातील लोक अशा लोकांकडे त्या महिलेला घेऊन जातात. नवऱ्याच्या आरोग्यासंबधी, वैवाहिक जीवन सुरळीत नसेल तर आर्थिक समस्या हे सगळं सोडविण्यासाठी ती स्वतःच स्वतःला अशा गर्तेत जाते. किंवा कुटुंबाकडून तिचा बळी दिला जातो.
मानवी मन संकटाच्या काळात अत्यंत संवेदनशील बनते. व्यक्ती जेव्हा अनिश्चिततेत अडकते, तेव्हा तिला उपाय, आधार आणि निश्चितता हवी असते. महिलांच्या बाबतीत ही परिस्थिती अधिक तीव्र असते कारण त्यांच्यावर कुटुंबीयांच्या अपेक्षांचा दबाव अधिक असतो.
भोंदूबाबा या मानसिक स्थितीचा अचूक फायदा उचलतात. ते व्यक्तीच्या समस्यांशी संबंधित काही गोष्टी सांगून विश्वास निर्माण करतात, त्यानंतर भीती निर्माण करतात“ तुमचं काहीतरी वाईट होणार आहे” किंवा “तुमच्यावर संकट आहे, मी ते दूर करतो ' असं म्हणत उपाय सुचवतात. ते किती अघोरी असले तरी नडलेली व्यक्ती करण्यास तयार होते.
हळूहळू ही प्रक्रिया व्यक्तीला त्यांच्या नियंत्रणाखाली आणते. ही एक प्रकारची मानसिक नियंत्रणाची प्रक्रिया आहे.
विश्वास ठेवण्याची आणि नातेसंबंध जपण्याची प्रवृत्ती महिलांमध्ये समाजाने अधिक बिंबवलेली असते. योगायोगाने परिस्थितीत थोडी सुधारणा झाली की त्या अनुभवामुळे त्यांचा विश्वास अधिक दृढ होतो, मग त्या अधिक खोलवर अंधश्रद्धेत अडकत जातात.
उच्चशिक्षित महिलाही अशा अंधश्रद्धेला बळी पडतात कारण त्या देखील भावनिक ताण, नातेसंबंधातील समस्या किंवा वैयक्तिक संकटांचा सामना करत असतात.
त्या वेळी निर्णय तर्कावर आधारित नसून भावनांवर आधारित घेतले जातात.
भारतीय समाजात धार्मिक परंपरांना मोठे महत्त्व आहे. महिलांवर या परंपरांचे पालन करण्याची जबाबदारी अधिक असते. पूजा, व्रत, उपवास यांसारख्या गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग मोठा असतो. “लोक काय म्हणतील” ही मानसिकता त्यांना प्रश्न विचारण्यापासून परावृत्त करते. अनेक वेळा घरातील समस्यांसाठी महिलांनाच दोष दिला जातो, चांगलं झालं तर श्रेय घेणारे इतर असतात जर काही वाईट झालं तर घरातील सुनेचा पायगूण असं म्हटलं जातं.
ज्यामुळे महिलांच्या मनात अपराधी भावना निर्माण होते. त्या उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करत असताना अशा बाबांच्या जाळ्यात अडकतात.
भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्याचे परिणाम जीवनाच्या सर्वच स्तरावर होतात. मानसिक तणाव वाढतो. जीवन भयग्रस्त होते. आर्थिक नुकसान होते.
समाजाच्या पातळीवर अंधश्रद्धा वाढते आणि अशा प्रकारच्या शोषणाला प्रोत्साहन मिळते.
या समस्यांवर उपाय करण्यासाठी वैयक्तिक, कुटुंबीय आणि सामाजिक स्तरावर प्रयत्न आवश्यक आहेत. तर्कशुद्ध विचारसरणी विकसित करणे, कोणत्याही गोष्टीवर प्रश्न विचारण्याची सवय लावणे गरजेचे आहे. कुटुंबाच्या स्तरावर महिलांना माणूस म्हणून तिची प्रतिष्ठा मान्य करणे, सुरक्षितता देणे, भावनिक आधार देणे, त्यांचं म्हणणं ऐकून घेणे आणि निर्णयस्वातंत्र्य देणे आवश्यक आहे.
सामाजिक स्तरावर अंधश्रद्धेविरोधात प्रबोधन करणे, शिक्षण आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. महिलांचे आर्थिक सशक्तीकरण आणि आत्मविश्वास वाढवणे हे देखील अत्यंत आवश्यक आहे. अंधश्रद्धेच्या जाळ्यात महिलाच अडकतात, ही बाब वास्तव असली तरी त्यामागे त्यांचा निर्बुद्धपणा आहे असं नाही तर
सामाजिक रचनाच महिलांना तसं घडवते, मानसिक जडणघडण आणि सांस्कृतिक प्रभाव यांचा हा एकत्रित परिणाम आहे. या समस्येवर मात करण्यासाठी समाजाने महिलांना दोष देण्याऐवजी त्यांना समजून घेणे, त्यांना सक्षम बनवणे आणि विवेकनिष्ठ विचारसरणीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
श्रद्धा ही मानवी जीवनाची शक्ती आहे; परंतु ती विवेकाच्या आधारावरच टिकली पाहिजे. विवेक हरवला, तर श्रद्धाच कधी अंधश्रद्धा बनते कळतही नाही. आजही आपला समाज विवेकहीन श्रद्धेत अडकलेला आहे आणि त्यामुळेच असे विकृत लोक लोकांच्या भावनेशी खेळ करून शोषण करीत आहेत.
यातून मुक्त होण्यासाठी सामूहिक जागरूकता आणि प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत.
— छाया
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा