नात्यात प्रेमापेक्षाही जास्त महत्त्वाचे काय आहे? | Healthy Relationship Truth

 नात्यात प्रेमापेक्षा काय महत्त्वाचे आहे? | Healthy Relationship Truth


प्रेम पुरेसं आहे का?

नात्यांविषयी बोलताना आपण नेहमीच “प्रेम” या भावनेवर अधिक बोलत असतो. त्यावरच जास्त चर्चा करतो. एखादं नातं टिकण्यासाठी प्रेम असणं आवश्यक आहे, हे निर्विवाद आहे. मात्र नातं फुलण्यासाठी,ते टिकण्यासाठी नात्यात प्रेम असणं एवढंच पुरेसं आहे का?

तर नातं कोणतंही असो त्यात केवळ प्रेम असणं पुरेसं नाही. अनेक नात्यांमध्ये प्रेमाची भाषा असते, एकत्र राहण्याची इच्छा असते , तरीही तिथे अस्वस्थता, दडपण,गुदमरलेपण असतं.

त्यामुळे बाहेरून स्थिर दिसणारं नातं आतून तुटत चाललेलं असतं. अशा वेळी प्रश्न पडतो नेमकं काय कमी पडत आहे?

आणि याचं उत्तर आहे सन्मान (respect) !!

सन्मान: नात्याचा खरा पाया

नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रेम महत्त्वाचं असतंच त्या शिवाय कोणतंही नातं निर्माण होत नाही किंवा फुलतही नाही , मात्र नात्याला टिकाऊ, निरोगी, निकोप, आनंदी बनविणारा पाया म्हणजे आदर होय.

प्रेम आहे तिथे सन्मान असतोच हे गृहीत धरलं जातं.

 प्रेम, आदर या गोष्टी वरकरणी एकमेकांशी जोडलेल्या वाटतात, परंतु त्यांतील फरक समजून घेतल्याशिवाय नात्याचं वास्तव स्वरूप उलगडत नाही.

आदर म्हणजे केवळ सभ्य वागणूक नव्हे. आदर म्हणजे समोरच्या व्यक्तीचं स्वतंत्र अस्तित्व स्वीकारणं. तिच्या विचारांना, भावनांना, निवडींना आणि मर्यादांना मान्यता देणं. एखाद्या व्यक्तीला “माझ्यासारखं बनवण्याचा” प्रयत्न न करता, ती जशी आहे तशी स्वीकारणं. हा त्याच्या अस्तित्वाचा आदर करणं होय.

ज्या नात्यात आदर असतो, तिथे भीती नसते, सतत स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. तिथे व्यक्ती स्वतःच्या चुका, शंका, कमतरता याबद्दलही मोकळेपणाने बोलू शकते. हीच भावनिक सुरक्षितता कोणत्याही निरोगी नात्याची खरी ओळख तर आहेच त्याचबरोबर ती सुदृढ नात्याची गरजही आहे.

प्रेम, की नियंत्रण ?

प्रेम ही भावना दोन व्यक्तींना  जवळ आणते. जिथे प्रेम असेल तिथे जिव्हाळा, ओढ, आपुलकी असते. प्रेमामुळे माणूस दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधतो, त्याच्या सुख-दुःखात सहभागी होतो. जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी प्रेम आवश्यक आहे. परंतु प्रेमाची ही सुंदर भावना अनेकदा चुकीच्या अर्थाने वापरली जाते. समाजात प्रेमाला मालकी हक्काशी जोडण्याची प्रवृत्ती दिसते. “तू माझा आहेस” किंवा “तू माझी आहेस” या भावनेतूनच नियंत्रणाची सुरुवात होते. प्रेमाच्या नावाखाली दुसऱ्याच्या जगण्यावर मर्यादा घालणं ही गोष्ट अनेकदा योग्य ठरवली जाते.

“मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तुला असं करायला सांगतो”, “तुझ्या भल्यासाठी मी तुला अमूक गोष्ट करू देत नाही ” अशा वाक्यांमध्ये काळजी असू शकते असं सांगितलं जातं,मात्र त्यामागे जास्त वेळा नियंत्रण करण्याची वृत्ती असू शकते.

सुरुवातीला हे नियंत्रण छोट्या मोठ्या गोष्टींपासून सुरू होतं त्यामुळे ते निरुपद्रवी वाटतं. परंतु हळूहळू ते व्यक्तीच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात हस्तक्षेप करू लागतं. कुठे जायचं, कोणाशी बोलायचं, कपडे कसे घालायचे,केस कसे बांधायचे, काय करायचं, काय नाही करायचं.

या सगळ्यावर बंधनं येऊ लागतात. या प्रक्रियेत व्यक्तीचं वेगळ असलेलं नैसर्गिक अस्तित्व संपुष्टात येतं. ज्याच्यावर हे नियंत्रण लादलं गेलं त्याचा आत्मविश्वास कमी होत जातो. ती नकळतपणे दुसऱ्यावर अवलंबून किंवा स्वतः निष्क्रिय होते.

नियंत्रणाची ओळख

नियंत्रणाची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे ते सुरुवातीला नियंत्रण वाटत नाही. ते काळजीच्या रूपात येतं. पण जसजसं नातं पुढे जातं, तसतसं ते अधिक स्पष्ट होतं.

सतत चौकशी करणं, फोन तपासणं, आर्थिक निर्णयांवर ताबा ठेवणं, वरून आरोप लावत दुसऱ्यालाच अपराधी असल्याचं भासवणं, ही नियंत्रणाची लक्षणं आहेत.

या सगळ्याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिकतेवर होतोच त्याच बरोबर संपुर्ण आयुष्यावर होतो. आत्मविश्वास कमी होतो, निर्णयक्षमता कमी होते, आणि व्यक्ती स्वतःवरच शंका घेऊ लागते. ती हळूहळू स्वतःची ओळख गमावते.

सन्मान असलेलं नातं कसं असतं?

याउलट सन्मान ही संकल्पना नात्याला स्थैर्य देते. सन्मान म्हणजे समानतेची जाणीव. दोघेही व्यक्ती म्हणून समान आहेत, हा स्वीकार.

सन्मान असलेल्या नात्यात मतभेद असतात, पण ते व्यक्त करण्याची मोकळीकही असते. संवाद खुला असतो, आणि कोणत्याही निर्णयात दोघांचाही सहभाग असतो.

सन्मानामुळे नात्यात विश्वास निर्माण होतो. व्यक्तीला स्वतःच्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याची मुभा मिळते. अशा नात्यात प्रेम अधिक खोल आणि अर्थपूर्ण होतं.

प्रेम, नियंत्रण , सन्मान  यातील फरक

प्रेम, नियंत्रण आणि सन्मान यातील फरक समजून घेतला, तर नात्यांचं स्वरूप स्पष्ट होतं.

प्रेम माणसाला जवळ आणतं, नियंत्रण त्याला बांधून ठेवतं, तर सन्मान त्याला उभं करतो. प्रेमात भावना असतात, नियंत्रणात भीती असते, आणि सन्मानात विश्वास असतो. प्रेमात जवळीक असते, पण सन्मानात स्वातंत्र्यही असतं.

हा फरक ओळखणं अत्यंत आवश्यक आहे, कारण अनेकदा नियंत्रणाला प्रेम समजण्याची चूक होते.

समाज व नाते यातील असमतोल

या सगळ्या प्रक्रियेमागे सामाजिक संस्कारांचीही भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या समाजात स्त्रियांना सहनशीलता आणि समायोजन शिकवलं जातं.

दुसरीकडे पुरुषांना निर्णय घेण्याची आणि वर्चस्व ठेवण्याची सवय लावली जाते. या दोन्ही गोष्टींमुळे नात्यांमध्ये असमतोल निर्माण होतो. नियंत्रणाला प्रेमाचं रूप दिलं जातं, आणि सन्मानाची गरज मागे पडते.

स्त्रियांचे अनुभव

अनेक स्त्रिया आपल्या अनुभवातून सांगतात की त्यांना नात्यातील बंधनं प्रेमासारखी वाटली.

“तो मला जाऊ देत नाही कारण तो माझी काळजी घेतो” किंवा “तो मला कोणाशी बोलू देत नाही कारण तो मला जपतो” अशी समजूत तयार होते.

परंतु काळानुसार हे लक्षात येतं की ही काळजी नसून नियंत्रण आहे. मात्र तोपर्यंत व्यक्ती त्या परिस्थितीत इतकी गुंतलेली असते की तिला स्वतःच्या भावनांचंही भान राहत नाही.

निरोगी नात्याची लक्षणं

निरोगी नात्याची काही स्पष्ट लक्षणं असतात. अशा नात्यात संवाद खुला असतो, एकमेकांच्या मतांना महत्त्व दिलं जातं, आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा सन्मान केला जातो.

दोघेही एकमेकांच्या वाढीसाठी साथ देतात. नातं हे ओझं न राहता एक आधार बनतं. व्यक्ती स्वतःची ओळख टिकवून ठेवत नातं जगते.

व्यवहारिक दृष्टिकोन

व्यवहारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, प्रत्येकाने स्वतःच्या भावनांना आणि अनुभवांना महत्त्व देणं आवश्यक आहेच. त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत आपणं जे करतो ते योग्य आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

स्वतःच्या व इतरांच्या मर्यादा निश्चित करणं, हेही आवश्यक आहे.

संवाद: नात्यांचा प्राणवायू

नात्यात संवाद असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुतर्फा संवाद हा नात्यांचा प्राणवायू आहे.

सवांद नसेल तर वाद निर्माण होतात. गैरसमज वाढतात. नातं संपुष्टात येतं जरी कागदोपत्री असलं तरी हृदयातून संपलेलं असतं.

आपल्या भारतीय समाजात पतिपत्नीचं नातं हृदयातून संपलेलं असतं हे वास्तव आहे. अख्खं आयुष्य माणूस प्रेमाशिवाय जगतो ज्यात आदरही उरत नाही.

नातं टिकवणं महत्त्वाचं असलं, तरी ते स्वतःला हरवून औपचारिकता म्हणून नसावं.

नातं टिकवण्यासाठी प्रेम आवश्यक आहे, परंतु ते पुरेसं नाही. सन्मान हा नात्याचा खरा पाया आहे.

जिथे सन्मान असतो, तिथे प्रेम अधिक गहिरं आणि स्थिर होतं. जिथे सन्मान नसतो, तिथे प्रेम हळूहळू नियंत्रणात बदलतं आणि नातं आतून रिकामं होत जातं.

म्हणूनच प्रत्येकाने स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारण्याची गरज आहे, आपण प्रेमाच्या नावाखाली नियंत्रण करत आहोत का?

दुसऱ्याच्या ताब्यात जगत आहोत का, की खऱ्या अर्थाने सन्मानावर आधारलेलं नातं जगत आहोत?

जरूर विचार करायला हवा. हा मानवी जगण्याचा महत्वाचा भाग आहे.

— छाया बेले

टिप: तुमच्या मते नात्यात प्रेम जास्त महत्त्वाचं की सन्मान? तुमचं मत नक्की कमेंट करा.


हेही वाचा:

आत्मसन्मान म्हणजे काय?

स्त्रियांनी माणुसपणाकडे वाटचाल करायला हवी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .