भय इथले संपत नाही- मराठी लेख

भय इथले संपत नाही 

     दर ५३ मिनिटांत एका चिमुकलीवर अत्याचार होतो अशी बातमी नुकतीच वाचली. वाचत आलोय. आता हे सगळं इतकं वारंवार घडताना दिसतं, की ते सामान्य वाटू लागलं आहे. हीच सर्वात भयानक गोष्ट आहे. कारण जेव्हा एखाद्या समाजाला निरपराध चिमुकलीवर होणारा अत्याचार “नेहमीची घटना” वाटू लागते, तेव्हा त्या समाजातील माणसाचं माणूसपण, संवेदना मरायला लागलेली असते. ठिकाण, शहर वेगळं असतं, घटना सारखी असते, क्रौर्य सारखंच, क्रौर्य जिच्यावर घटित होतं तिची वेदना सारखीच असते. 

    प्रत्येक चिमुकलीवर होणारा अत्याचार आपला समाज बघतो. काही दिवसांसाठी संताप व्यक्त केला जातो. निषेध नोंदविला जातो. लेख लिहिले जातात. कविता लिहिल्या जातात. मेणबत्ती पेटवून मोर्चे काढले जातात. हाताशी असलेल्या सोशल मीडियावर राग व्यक्त केला जातो. फार तर त्या चिमुकलीची,मग त्या विकृत नराची जात तपासली जाते. मग जातीचे राजकारण. मग सत्तेचे राजकारण. आणि शेवटी निष्पत्ती काय? पुन्हा शांतता. पुन्हा विसर. पुन्हा पुढच्या घटनेची वाट पाहणारा समाज.

पुन्हा एखादी घटना उजेडात येते. काही दिवस माध्यमांमध्ये तिची चर्चा चालते. आरोप-प्रत्यारोप होतात. टीव्हीवरील चर्चांमध्ये संताप व्यक्त केला जातो. मात्र त्या मुलीच्या वेदना कोण समजून घेतं? तिच्या तुटलेल्या श्वासाचं ओझं कोण उचलतं? 
घटना घडून जाते, एका चिमुकलीला या मानवी समाजाकडून भयावह मृत्यू दिला जातो. 
मग सुरू होते कायद्याची दीर्घ लढाई. त्या जीवाच्या, त्या वेदनेच्या बदल्यात तुटपुंजा न्याय मिळतो. कधी तोही मिळत नाही. मग त्याचं राजकारण होतं. आणि शेवटी सगळाच विसर पडतो.

     समाज म्हणून आपण किती दिवस मेणबत्ती हातात घेऊन अशा घटनांची वाट पाहत बसणार आहोत? प्रत्येक वेळी हळहळ व्यक्त करून आपली जबाबदारी संपते का? अशा घटनांनंतर वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय पातळीवर नेमके कोणते प्रयत्न केले जातात? मुलींना, महिलांना सक्षम करण्यासाठी कोणते उपाय केले जातात? ही जबाबदारी कोणाची आहे?
   जर ही जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नसेल, तर निषेध नोंदविण्यात काही अर्थ उरत नाही. तरीही ही कृती केली जाते. कारण अर्ध्या जगासमोर उभं राहता यावं म्हणून. आपल्या घरातील बाईच्या नजरेला नजर देता यावी म्हणून. 
  आत्तापर्यंत तेच ते सगळं करून नेमका काय बदल झाला? हा प्रश्न तसाच मागे राहतो. 
आजही मुलगी घरात सुरक्षित नाही. अंगणात सुरक्षित नाही. मंदिरात सुरक्षित नाही. समाजात कुठेही सुरक्षित नाही. याला फक्त एखादा विकृत पुरुष जबाबदार नाही, तर हा संपूर्ण समाज जबाबदार आहे. इथला संकुचित, विकृत दृष्टीकोन जबाबदार आहे.

मुलगी म्हणून तिच्या जीवाची किंमत शून्य समजली जाते. तिच्याकडे माणूस म्हणून न बघता मादी म्हणून बघितलं जातं. स्त्रीला व्यक्ती म्हणून स्वीकारण्याची मानसिकता अजून समाजात तयार झालेली नाही. तिच्या शरीराकडे पाहण्याची विकृत सवय समाजाच्या विचारांत खोलवर रुजलेली आहे. आणि ही विचारांत असलेली घाण अशा कृतीतून बाहेर पडते.
जेवढा जबाबदार अत्याचाराची कृती करणारा आहे, तेवढीच जबाबदार इथली व्यवस्था आहे.
इथला समाज आहे.
कारण इथल्या असंवेदनशील समाजाचं भय असण्याचं काही कारण उरलेलं नाही. न्यायव्यवस्था, पोलिस प्रशासन — हे सुद्धा याच समाजाचा भाग आहेत. त्यामुळे समाज जसा विचार करतो, तशीच व्यवस्था वागते. 

   सर्वात गलिच्छ इथलं राजकारण आहे. कारण इथे मुलींच्या वेदनांनाही पक्ष, जात, मतं आणि सत्तेच्या चष्म्यातून पाहिलं जातं. एखादी घटना घडली की लगेच तिचं राजकीय गणित सुरू होतं. पण त्या मुलीच्या गमावलेल्या जीवाचं  काय? 

मुलींचा कैवारी कोण? मग मुलगी वाचवायची कुणी? हा प्रश्न प्रत्येक आईने, प्रत्येक वडिलांनी, प्रत्येक समाजाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.
ही परिस्थिती बदलायची असेल, तर फक्त कायदे पुरेसे नाहीत. फक्त शिक्षा पुरेशा नाहीत. यावर उपाय म्हणजे समाजाने पूर्ण जबाबदारी घ्यायला हवी. जबाबदारी घेणं म्हणजे तिला जपणं नाही, तर सर्वच स्तरावर पुरुषांच्या जगात ती जगू शकेल एवढं सक्षम करणं.
शारीरिक, मानसिक स्तरावर ताकदवान बनविणं आवश्यक आहे. 
   मुलीला सतत भीतीत जगायला शिकविणं थांबवायला हवं. “हे करू नको”, “तिथे जाऊ नको”, “असं बोलू नको”, “असं हसू नको” या मर्यादांमध्ये तिला अडकवून आपण तिचं संरक्षण करत नाही, तर तिला कमकुवत बनवत असतो.
जसा “मुलगा” या शब्दाची प्रतिष्ठा आहे, ती “मुलगी” या शब्दास प्राप्त करून देणं ही जबाबदारी मुलीला जन्म देणाऱ्या आईने आणि मुलगी म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक बाईने व समाजानं घेणं आवश्यक आहे. मुलगी ही दयेस पात्र असलेली व्यक्ती नाही, तर समान क्षमतेची माणूस आहे, ही जाणीव समाजात निर्माण झाली पाहिजे.

     मानवी समाजाची प्रतिष्ठा लिंगाधारित न राहता ती समान पातळीवर येणं आवश्यक आहे. तरच मुलगी म्हणून तिचं अस्तित्व टिकून राहील. कारण ही अत्याचाराची समस्या चार दिवस हळहळ करून विसरून जाण्याची गोष्ट नाही. ती मुलींच्या जीवनाशी संबंधित आहे. जी पुढे जाऊन  कुटुंब, समाज यात आपलं योगदान देणार असते. मानववंश टिकून राहण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणार असते.

मुलगी या मानवी घटकांच्या बाबतीत एवढं क्रौर्य घटित होतं, तरीही  वरवरचे सोपस्कार पार पाडून आहे तसं सुरू राहतं. आपल्या आत खोलवर काहीच हलत नाही. नंतर अशी घटना घडू नये यासाठी कोणताही कृती कार्यक्रम हाती घेतला जात नाही. कारण अजूनही तिचं अस्तित्व कवडीमोल समजलं जातं.
बायांनो जाग्या व्हा. “तू मुलगी आहेस, तू असंच रहा” असं शिकवून आपल्या मुलीला पांगळं न करता तिला एक सक्षम व्यक्ती म्हणून घडवणं आवश्यक आहे. तिची माणूस म्हणून प्रतिष्ठा निर्माण होणं, आत्मभान जागृत होणं आवश्यक आहे.
मुलींवर बंधने घालून समाज सभ्य किंवा सुसंस्कृत होत नाही. सभ्यता आणि सुसंस्कृत असणं हे विवेकाशी संबंधित आहे. आपण मात्र  मुलीला कमकुवत करीत राहतो. हे असं आहे की, “चोर सोडून संन्याशाला फाशी.”
मुलींना सक्षम करणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांना निर्भय आणि स्वाभिमानी बनवणं — अत्याचारावर आळा घालण्यासाठी हाच एक खरा मार्ग आहे.
श्रद्धांजली वाहून आपली जबाबदारी संपली असं मानणं, हे त्या गुन्ह्यात सहभागी असल्यासारखंच आहे.
मुलींवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार करण्याचा विचारही दुष्टाच्या मनात येणार नाही,असा सक्षम काळ येवो.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .