बाईपणाच्या बंदिस्त कवाडांना मोकळं करण्याचं पसायदान मागणारी छाया बेले यांची कविता - - - -कवी श्रीनिवास मस्के

बाईपणाच्या बंदिस्त कवाडांना मोकळं करण्याचं पसायदान मागणारी छाया बेले यांची कविता -कवी श्रीनिवास मस्के 
******************************

       हरवत चाललेला माणसाचा हृदयसंवाद  .हाती शून्य घेऊन नाकात वारं शिरलेल्या गोऱ्यागत उर्फुटोस्तोर धावणारी माणसं . चेहऱ्यावरचे कारूण्य अबाधित  ठेवत चेहऱ्याच्या, बिनचेहऱ्याच्या काबाडकष्ट करत जगणाऱ्या बायका रूढीपरंपरेच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी फडफडणाऱ्या  द्रौपदीचे वस्त्र , सीतेचं जळणं इतिहासाला कोरत अस्वस्थपणे पाहत असलेल्या . करपत जाणारं बालपण सावरून घेत तारूण्याचा विस्तव जपत दहाघरचं काम करून शिणून घरी जाणाऱ्या बाईचा नवरा हातात चहाचा कप देतो तेव्हा तिला येणारं बळ आणि पांढरपेशी जगण्याचा बडेजाव करणाऱ्या बायकांचं बेगडी वैभव शुन्य ठरतं, गळून पडलेला श्रींमंतीचा रौप दोन संस्कृतीतील बाईच्या जगण्यातलं अंतर किती सहज सुक्ष्म टिपलेलं दिसतं. .   
    छाया बेले यांची कविता  बाई ही आई,पत्नी ,नर्स, सेविका रूपात दिसते . ती 'माणूस' या रूपात का सापडत नाही ही सल व्यक्त करतांना दिसते . तशी ती धर्माचा विषाक्त वारा पिऊन झिंगलेल्यांना  गौतम,कबीर,तुकोबाचा धर्म का सापडत नाही असा खडा सवाल ही करते .
बेले यांची कविता पत्ता शोधायला निघालीय भरकटलेल्या या परिघात ती जून्या पत्यावर ती कशी सापडेल . ती सगळे परिघ ओलांडून मेंदुला झिंझाडुन सोडते.जेव्हा मन बुध्द झालंय की दगड हे उमलत नाही आणि अस्वस्थ भवताल पाहून तिचं काळीज हरीण होते. ,आत्मभान बुड धरत नाही,शोधात भटकत राहते अशी ही कविता परिस्थिती पुढे हातपाय गाळून केवळ ती बसत नाही तर , बाईपणाच्या बंदिस्त जन्मातून उद्या तिच्याच उदरातून उगवून येईल एखादं पिंपळवृक्ष ..हे आश्वासक चित्र रेखाटते. म्हणून ही कविता बाईपणाच्या आतला अस्वस्थ हुंकार व्यक्त करतांना ती अकारण तांडव करत नाही . एक पोक्त,सशक्त, प्रौढत्व तिच्यात आलेलं दिसून येतं.ती केवळ दुःखाची भळभळ मांडत नाही तर त्यावर मलमपट्टी ही करते. 

छाया बेले यांची कविता अस्वस्थ काळाच्या तुकड्यावर गौतमाच्या आतील शांतीचा शोध  घेऊ पाहणारी आहे . कधी ती गौतमाच्या निर्वाणासारखी कधी शापित अस्वस्थाम्यासारखी तर कधी जातीयतेच्या विषवृक्षाला उकडून मानवतेचा वंश उगवू पाहणारी. ती बोधी वृक्षा खालून बुद्धाच्या पाऊलवाटेने अंधाराला चिरत जाते. त्यांच्या कवितेतील बाई अस्तित्वासाठी संघर्ष करणारी  पण धसमुसळेपणा नाही . कितीही संकट आली रानात विषारी गवत वाढलं तरी ती कडेला  पात लावते.  हिरवळ पेरणारी ही बाईची कविता आहे. संवेदना विरहित युजलेस झालेला माणूस ,'उसवण आणि फसवण' खेळणे झाल्याची गोष्ट जशी ती सांगते तशी ती जुन्या मळलेल्या वाटा पुसून समानतेच सृजन घालायला नांगर घालून उलटापालथ करावीच लागते , नवसृजनाचे पीक यायला ,  हे ही सांगायला विसरत नाही.
पोरींना वासनांध मुखवट्यात सजग राहण्याचा सल्ला जशी  देते तशी  पोरींनी बापाच्या खांद्यावर ओझं न टाकता स्वतःच्या खांद्यावर ओझं घ्यायलाही शिकवते. ही कविता जशी अस्वस्थ हुंकार उजागर करण्याची परवानगी देते तसेच एखाद्या समाधीस्थ डोहात दगड टाकू नये असा सल्लाही देते. कविता सोपी गोष्ट नाही तिच्या येण्याची अपरिहार्यता टिपताना कवयित्री म्हणते," कवीला नसतेच निवांत झोप ,त्यांच्यात जाणीवा नांगर घालत असतात ,त्याच्या निवांत क्षणावर . अण्.वाहून घेऊन जातात सृष्टीतील वेदनांची ओहळ ..तो तडफडत राहतो आणि रक्त ठिबकत राहते वहीच्या पानापानावर..." ऐवढी आर्तता कवितेत उतरल्यावर ती वैष्वीक पातळीवर पोहचते. स्त्रीच्या मनाची पडझड हळुवार उतरत जाते कवितेत 
अलिकडील काळात स्त्री मुक्तीच्या नावाखाली पोकळ ,कृत्रिम ,वाझांट कवितेचं पिक वरून बहरून आलेलं दिसतं. छाया बेले यांच्या कविता वाचल्या नंतर मात्र  लक्षात येतं संथ नदीसारखं वाहत ही स्त्री वेदनेचा तळ गाठता येतो .तिच्या आतल्या कप्प्यातली भळभळ संथ , संयमाने उजागर करत पुरूषी व्यवस्थेला प्रश्न दालनात उभं करता येतं. वेदनेचा तळ शोधतांना खुप आतून उमटत गेलेल्या या कविता आहेत . आजच्या कवितेच्या भोवतालात ही कविता नक्कीच उठून दिसणारी ठरेल. ही कविता म्हणजे बाईपणाच्या बंदिस्त कवाडांना मोकळं करण्याचं पसायदान मागणारी आहे. 

@श्रीनिवास मस्के

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .