स्त्रीवादी जाणिवा आणि काव्य जाणिवांचा नितळ स्वर : हॅपी होमच्या भिंतीआड -डॉ. फुला बागूल
स्त्रीवादी जाणिवा आणि काव्य जाणिवांचा नितळ स्वर : हॅपी होमच्या भिंतीआड
कवयित्री छाया बेले यांचा हॅपी होमच्या भिंतीआड हा देखणा काव्यसंग्रह साहित्याक्षर प्रकाशनाने जुलै 23 मध्ये प्रकाशित केला .
पूर्वाधात हॅप्पी होमच्या भिंती आड तर उत्तरार्धामध्ये भवताल जळत असताना अशी रचना या काव्यसंग्रहाची आहे . यातील कविता विलक्षण असे प्रश्नांकित विश्व आपल्यासमोर उभे करते . व्यवस्थेला छेदणारे , व्यवस्थेला अंतर्मुख होण्यास भाग पाडणारे मार्मिक असे प्रश्न कवयित्री उपस्थित करते . ती लिहिते ,
"गणित आणि विज्ञानाचे अनेक प्रॉब्लेम /सहजपणे सोडविले असतील तिनं / मग असं कोणतं कोडं होतं ?/ जे सोडवू शकली नाही "( पृ .३) उच्चशिक्षित महिलांच्या आत्महत्या संदर्भातील हा प्रश्न अतिशय भेदक आहे .
असाच एक प्रश्न तीआपल्या आईला देखील विचारते
"माय म्हणाली स्वतःला रांध / त्यात पूर्णपणे / मी पणाचा एकही खडा / राहू देऊ नको / मग घडेल मनासारखं .
तिला विचारायचं राहून गेलं / तुझं घडलं ? "( पृ .४४)मायनं संसारात समर्पणाची परिसीमा गाठली . स्वतःचे अस्तित्व शून्य करून टाकले .तरीही तिचं काहीही मनाप्रमाणे घडलं नाही . तेव्हा आई हाच समर्पणाचा सरधोपट आणि परिणामशून्य असा मार्ग आपल्या मुलीला सांगते . पुढच्या पिढीला समर्पणाचा दुबळा वारसा पोहोचवते . हे कवयित्रीला मान्य नाही . येथे ही कविता वेगळी होते . फॅशनेबल स्त्रीवादाच्या पुढे ही कविता पोहोचते .
कवयित्री आपल्या घरात राबणाऱ्या मोलकरणीच्या संसाराची आपल्या संसारा शी तुलना करते . ही तुलना सुद्धा अखंड स्त्री विश्वाला हादरवून टाकणारी आहे .
"काय नाय वं बाई , घरी गेल्याबरूबर /नवऱ्याच्या हातचा गरम च्या अस्तू / शीण उतरायला ,/ सैपाकबी त्यानंच केलेला अस्तू /
खाऊन झोपी जायचं /
तिचं हे वैभव बघून मलाच माझी / दया आली क्षणभर "( पृ .६)आपल्यापेक्षा कितीतरी कमी शिकलेली , कितीतरी अभावात जगणारी स्त्री खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे .खऱ्या अर्थाने सुखी आहे .हे जळजळीत वास्तव तिच्यासमोर आल्यानंतर तिच्या पायाखालची खरे तर जमीनच हादरते .आपल्या मुक्तीच्या कल्पनांची पुनर्चिकित्सा करायला हवी हे तिला आत कुठेतरी कळून येते .
विद्रोहाची भावना बऱ्याच कवितेतून व्यक्त झाली आहे .
"घडवून आण प्रलय स्वतः त / पुन्हा निर्माण हो नव्याने स्वतःतून "( पृ .४)
"माणसांनीच लावायला हवा आहे आता कर्फ्यू "( पृ .८)
"तिने छेडलाय /संघर्ष / अस्तित्वाच्या नवनिर्मितीचा" ( पृ .१३)
" तू ही गाड आता / ओझं डोक्यावरचं /होऊन जाऊ दे एकदा उलथा पालथ / दिसू दे तुझ्या अस्तित्वाचं उंच शिखर जगाला "( पृ .२०) अशी काही बंडखोरीची स्थळे या संग्रहात आहेत .
कवितेच्या शेवटच्या दोन-चार ओळीत क्लायमॅक्स असाही रचना विशेष काही कवितांचा आहे .
काटे सावरीच्या बियाप्रमाणे यांसारख्या उपमा या संग्रहात आहेत .
"दिसेल अंग / असं काहीतरी / नेसावं .
हसून द्यावा प्रतिसाद / अनैतिक इच्छांना / लिहिलंच तर लिहावं / प्रेम /
विरह /
मिलनावर "( पृ .१२) या पारंपरिक चौकटींची ती खिल्ली उडवते तेव्हा ती विद्रोही होते .
पुरुष शेवटी पुरुष असतो मग तो तरूण झालेला पोटचा गोळा असला तरी .
हा उद्ध्वस्त करणारा व्याकूळ जीवनानुभव ती असा मांडते -
"एक दिवस बाहेर जाताना / दरारलेल्या डोळ्यांनी बघत म्हणतो /आई पदर नीट घे ना /तेव्हा मात्र तो पुरुष असतो /आणि ती बाई असते "( पृ .२१)
स्त्री मुक्ती म्हणजे पुरुषांपासून मुक्ती असे नव्हे . त्याच्याशिवाय आपले जगणे पूर्ण नाही ही विशुद्ध आत्मभानाची जाणीव कवयित्रीला आहे . त्याच्या आठवणींपासून तिला कधीही अलिप्त होता येत नाही ही आपल्या मनाची असहाय्यता ती अशी व्यक्त करते -
"रिकाम्या वेळात / बऱ्याच दिवसापासून / अडगळीत पडलेलं काळीज / घासून पुसून लख्ख / करायला घेतलं / तर चौफेर विखुरलेल्या / तुझ्याच आठवणी "( पृ .३७)स्त्रीवादाची ही स्थळे स्त्रीवादाचा विकासच तर दर्शवितात .
काव्य निर्मिती प्रक्रियेच्या अंगाने कवयित्रीच्या मनात सुरू असलेले चिंतन लक्षणीय आहे .
"समृद्ध आणि मुक्त / जगाचं सृजन / होत राहतं तुझ्यात / मी ही सुखावून जाते / अन् आश्वस्त होते / कविते , हे स्वप्न तुझ्या शब्दांना सोपवून "( पृ .९) कविता हेच ते स्थळ जेथे मनाची आश्वस्तता अनुभवते .तिच्या भावनांना उबदार पांघरून कविताच तर घालते .कवीची तडफड , त्याची अस्वस्थता , त्याची असाहयता रक्त ठिबकावे त्याप्रमाणे वहीच्या पानापानावर शब्द रूप घेऊन अवतरत असते .कवितेची व्याख्या करताना ती स्वतःच्या मनातील आंदोलने तपासून पाहते -
" अस्वस्थता मात्र कायम राहते /काहीतरी विध्वंसक फिरत राहतं / आत मध्ये अणुरेणूत व्यापून . . . /
तीच तर कविता नसेल ?"( पृ .२३) अस्वस्थता , विकार यांनीच तर कवितेला प्रसवले असते ही कवितेची प्रेरणा ती येथे अधोरेखित करते .
आपल्या कवितेचे कुळ सांगताना ती थेट तुकारामाशी आपले नाते सांगते .ती लिहिते -
"मिळालेल्या पोरकेपणाची / सल न बाळगता / स्वतः च उन्हात बांधून घेतलेल्या / घरात बसून गाते /तुकोबांच्या सुरात / माणसाचे गाणे / माझी कविता "( पृ .५०)
कवितेने कसे वागावे याची आचार संहिता आखतांना ती लिहिते -
"कवितेने विसावू नये / कोणत्याही वळणावर / सुखाचे असो की दुःखाचे "( पृ .५१)
स्त्री धर्माच्या सनातन वेदना अतिशय मार्मिक शब्दात ती मांडते -
"मध्येच येतो / काहीतरी विटल्यासारखा / आंबट वास / जीवन ?/
गाभूळल्या चिंचा समजून / चाखत राहते /डोळे मिटून "( पृ .१७) कडू आयुष्य गोड मानून जगण्याची अपरिहार्यता येथे मन विषण्ण करते .
"तटबंदी , पायऱ्या नसलेली विहीर /उगवण्याच्या वाटेवर असलेली चंदेरी स्वप्न . . /दिली टाकून त्या विहिरीत / अन / त्यावर पहारेकरी बसवलेले / रात्रीच्या अंधारात चाचपडत /येऊ नये ती बाहेर म्हणून "( पृ .४५) तिला असे कायमच गाडून टाकले गेले . वर येण्याचे मार्गच निर्माण होऊ दिले नाहीत व्यवस्थेने .
अशा विपरीत वर्तमानातही तिचा आशावाद कायम आहे परिस्थिती सर्वार्थाने सर्वांना प्रतिकूल आहे असे तिला वाटत नाही . ती लिहिते ,
" सर्व रंगाचा एकच इंद्रधनू / उगवून येईल /आभाळाच्या मधोमध / पुन्हा जगणं नैसर्गिक होईल "( पृ .२६) पुन्हा बुद्ध प्रणित मानवता धर्म अस्तित्वात येईल . करूणा प्रज्ञा शील ही तत्त्वत्रयी आकारास येईल . वंचित शोषित स्त्रिया जोतिबा साऊ बसवण्णा आण्णाभाऊ मुक्ता आणि डॉ बाबासाहेब यांच्या अनुसरणाने " होतील त्या / सूर्य एक दिवस / यात शंका नाही "( पृ .३१) हा तिचा आशावाद कायम आहे .
तिची हतबलता ती अशी व्यक्त करते -
"तेव्हा लक्षात येतं / तुकड्यांनी माझी कधीच / शिकार करून /आपल्या वेगवेगळ्या / अस्तित्वाचे झेंडे / रोवलेत / माझ्या अखंडतेवर "( पृ .२७) जगण्याच्या थारोळ्यात स्वअस्तित्वाचे शत तुकडे झाले . त्यांना जोडण्याचे स्वप्न तर दूरच या तुकड्यांनी आता माझी अखंडताच नष्ट केली . तुकड्यांनी अखंडतेवर जय मिळविला ही ती हतबलता होय .
तरल प्रेमसंवेदना अशी अभिव्यक्त झाली आहे -
"दुधाळ चांदण्यासह / माझी एखादी आठवण / नक्कीच उतरत असेल / तुझ्या काळजाच्या /तळघरात / त्या क्षणात तुझ्या ओठावर तरळलेल स्मित / हे फक्त माझ्या / नावावर आहे "( पृ .३६) स्वामित्वाची जाणिव ही अशी प्रेमाच्या तळाशी असतेच असते .
प्रेम कविता ही उसनी असू शकत नाही किंवा परपुष्ठ अशा कोणत्याही बाह्य प्रेरणेने ती निर्मित होत नाही . खऱ्या जगण्याचीच प्रेम कविता होते .कवयित्री लिहिते -
" कविता बिविता राहू दे बाजूला / आपण आपल्या भोवतीचा / काचेचा साचा फोडून /बाहेर पडायचं का ? / गळ्यात गळा घालून / मनसोक्त रडायचं का?/ त्यानंतर कदाचित / जमेल प्रेम कविता "( पृ .४९) स्वाभाविकता ही प्रेमाची आणि प्रेमकवितेचीही एक अट आहे .
अधिवास जाणिवेची एक दोन स्थळे या संग्रहात आढळतात कवयित्री लिहिते -
"पण /माझ्या फांद्यांवरील घरट्यातील पाखरं / होऊ नये बेघर /आणि बुंध्याशी असलेल्या वारुळातील /मुंग्या निर्वासित / म्हणून धरून ठेवलीत मी माझी मुळं "( पृ .५५)या पृथ्वीवर जगण्याचा माझ्या इतकाच अधिकार पशुपक्षी आणि प्राणी यांचाही आहे ही ती अधिवास जाणीव होय
वर्तमानातील विसंगतीची स्थळे किंबहुना टोकदार असे वास्तव या संग्रहातून प्रकट होते .
"अश्रू भरीत इमोजी /लावून / ऑनलाईन श्रद्धांजली /वाहून /घालतो शिव्या जातीला / भर चौकात / आणि स्व जातीय वधू वरांची /पेपरात शोधतो जाहिरात "( पृ .५६/५७) स्वार्थकेंद्री जगण्याच्या या मूलभूत वृत्ती पायी अनेक विचारवंत आले आणि गेले मानवाच्या वर्तनात फरक पडला नाही . बेगडीपणा मानवाच्या रक्तातून वाहत असा आता कैक शतकी झाला आहे .
एक दोन दोष स्थळेही या संग्रहात आढळतात .
काही कवितांचा शेवट रूढ शैलीचा ,पारंपरिक अशा साच्याचा झाला आहे .
"घडवून आण प्रलय स्वतः त / पुन्हा निर्माण हो नव्याने स्वतःतून ."( पृ .४) कवितेच्या शेवटी विद्रोहोद्गार हा तसा जुनाच साचा होय . ठोकायला हवेत टाळे ( पृ .८) तिने छेडलाय संघर्ष ( पृ .१३)होऊन जाऊ दे एकदा उलथा पालथ ( पृ .२०) विद्रोह पूर्ण उदगारांनी कवितेचा शेवट ही शैली पारंपरिक होय .
सातव्या क्रमांकाच्या कवितेतील पृ .१२ वरील पूर्वार्ध जेवढा ताकदीचा तेवढा पृ .१३ वरील उत्तरार्ध नाही . पूर्वार्धाला उत्तरार्ध पेलू शकलेला नाही .
ही किरकोळ तूटी वगळता संग्रह लक्षणीय आहे यात संदेह नाही .
डॉ फुला बागूल
शिरपूर जि धुळे
संपर्क ९४२०६०५२०८/९८२२९३४८७४
Read more 👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा