युवक : सत्याग्रह, संघर्ष व देशाचे भविष्य


युवक : कॉकरोज सत्याग्रह, संघर्ष व देशाचे भविष्य
यह देश वीर कॉकरोजो का 
अलबेलों का मस्तानों का...!!

काही दिवसांपासून जंतर मंतर वरील या लेकरांकडे बघून या ओळी आपोआप मनात घोळत आहेत. 
मागील अनेक दिवस चाललेल्या या युवक आंदोलनाने अनेक भ्रम मोडून काढले. 
देशातील युवक हेच त्या देशाची खरी शक्ती आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. 

       कोणत्याही राष्ट्राची खरी ओळख त्याच्या
 नैसर्गिक संपत्तीने, तंत्रज्ञानाने किंवा आर्थिक प्रगतीने ठरत नाही; ती ठरते त्या देशातील युवकांच्या विचारांनी. कारण प्रत्येक पिढी आपल्या काळाचा इतिहास वारशाने स्वीकारते; पण भविष्य ती स्वतःच्या विचारांतून , कृतीतून घडविते. म्हणूनच युवक हा केवळ एका विशिष्ट वयोगटाचा उल्लेख नसून तो परिवर्तनाचा व  नव्या मूल्यांच्या निर्मितीचा जिवंत प्रवाह आहे.
इतिहासात जेव्हा जेव्हा समाजाने अन्यायाला नकार दिला, तेव्हा त्या नकारामागे युवक  होता. जेव्हा जुलूमशाहीने माणसाचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला सर्वप्रथम आव्हान देणारे हात तरुणांचेच होते. जेव्हा समाजात नवी मूल्ये रुजली, तेव्हा ती प्रथम तरुण मनांत अंकुरली. त्यामुळे युवक हा समाजाचा 'भविष्य' आहे, असे म्हणणे अपुरे आहे; युवक हा वर्तमानाला प्रश्न विचारणारा व भविष्याला आकार देणारा सर्वांत महत्त्वाचा सामाजिक घटक आहे.
फ्रेंच राज्यक्रांतीने 'स्वातंत्र्य, समता आणि बंधुता' ही मूल्ये जगाला दिली. क्युबन क्रांतीने सामर्थ्यवान सत्तेलाही लोकशक्तीसमोर झुकावे लागते, हे दाखवून दिले. अरब देशांतील जनआंदोलनांनी डिजिटल युगातील युवकांची संघटनशक्ती जगासमोर आणली. अलीकडे नेपाळमधील युवकांनी भ्रष्टाचार आणि राजकीय अपयशाविरुद्ध आंदोलन केले व पुन्हा एकदा युवकांची शक्ती अधोरेखित केली.
      भारतीय समाजाचा इतिहासही याला अपवाद नाही. सिद्धार्थ गौतमांनी तरुणपणी राजवैभवाचा त्याग करून दुःखमुक्त मानवतेचा शोध घेतला. महात्मा बसवेश्वरांनी जातिभेदाविरुद्ध विचारांचा लढा उभारला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाला सामाजिक मुक्तीचे शस्त्र बनविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञान, संघर्ष , संघटन यांच्या बळावर विषम व्यवस्थेला वैचारिक आव्हान दिले.
    भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी तरुण वयातच स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य अर्पण केले. या लढ्याची  सुरुवात युवकांनीच केली व तरुणाईनेच अंजाम दिला. मग ते जहाल गटातील असोत की गांधीजींच्या सत्याग्रहातील असोत. 
युवकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जे चुकीचे आहे ते बदलण्यासाठीची
अस्वस्थता. सगळं बघूनही युवक अस्वस्थ नाही झाला तर तो समाज ते राष्ट्र रसातळाला जाण्याची शक्यता असते.
 ही अस्वस्थता नकारात्मकच असते असे नाही. ; ती अन्यायाविरुद्धची नैतिक अस्वस्थता असते. अन्यायाशी तडजोड करण्यास नकार देणारे मन म्हणजे युवक. प्रश्न विचारण्याचे धैर्य म्हणजे युवक. प्रस्थापित व्यवस्थेला आरसा दाखविण्याची तयारी म्हणजे युवक. म्हणूनच प्रत्येक सत्तेला विचार करणारा युवक अस्वस्थ असतो .व तो सत्तेलाही अस्वस्थ करतो; कारण युवक व जनता  कोणत्याही सत्तेपेक्षा अधिक सामर्थ्यवान असतात.
हे सामर्थ्य कॉकरोज आंदोलनाने दाखवून दिले आहे. 

युलकांशी संबंधित  एका वादग्रस्त 
 वक्तव्यावर 
तरूणांच्या सोशल मीडियावर सुरू झालेल्या विडंबनात्मक प्रतिक्रियेतून  एवढं मोठं देशव्यापी आंदोलन निर्माण होईल असं कोणी विचारही केला नसेल. या युवकांना बळ देण्यासाठी 
   लडाखचे शिक्षणतज्ज्ञ , वैज्ञानिक ,पर्यावरणवादी सोनम वांगचूक हे पुढे येऊन आमरण उपोषण केले. त्यांना जाणीव होती की हे युवक या देशाची खरी शक्ती व संपत्ती आहेत. 

सोनम यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या सत्याग्रही आंदोलनाने युवकांच्या  अनेक मूलभूत प्रश्नांना पुन्हा ऐरणीवर आणले.
या आंदोलनाच्या मागे पेपरफुटी हे एक कारण असले तरी , या आक्रोशामागे अनेक दिवसांपासूनची घुसमट आहे. शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार, त्यामुळे विद्यार्थ्यांचा गेलेला बळी या संवेदनशील घटनेच्या निमित्ताने आतली घुसमट आंदोलनाच्या माध्यमातून बाहेर आली असं म्हणता येईल. 

      सोनम वांगचूक हे आधी पासूनच हिमालयाचे पर्यावरण रक्षण, स्थानिक लोकांचे हक्क यासाठी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. 
   यावेळी सोनम वांगचूक युवक आंदोलनात सहभागी झाले होते. त्याचबरोबर देशभरातील युवा तर होतेच सोबतच सर्व वयोगटातील जात, धर्म, पंथ, लिंग , प्रांत,पक्ष या सगळ्याच्या पुढे जाऊन केवळ भारतीय नागरिक 
याच जाणिवेतून सर्व जोडले गेले होते. (जे तिथे जाऊ शकले नाहीत त्यांनी स्थानिक पातळीवर आंदोलन व उपोषण करून या युवक आंदोलनात सहभागी झाले होते)
ते सर्व देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपस्थित होते. 
व  शांततामय मार्गाने आंदोलन करीत होते. त्यांनी हिंसेला हिंसेने उत्तर न देता, गांधीजींच्या सत्याग्रहाचा मार्ग निवडला हे या आंदोलनाची विशेषता आहे. त्यांच्यावर लाठी हल्ला केला जात असतानाही रक्तबंबाळ अवस्थेत हे तरुण शांतपणे व ठामपणे वाट चालत होते, आजचा तरुण अविवेकी आहे, आळशी आहे,दुर्बल आहे अशा अफवांना युवकांनी आपल्या कृतीतून पुर्णविराम दिला.
केवळ घोषणां देणे , संघर्ष घडवून आणूण लोकांना वेठीस धरणे हा त्यांचा उद्देश नव्हता तर  देशातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी, संवैधानिक अधिकार मिळावेत अशी आंतरिक तळमळ होती, व ती पुर्णपणे न्याय्यं आहे.
या आंदोलनात सहभागी युवकांनी द्वेषापेक्षा लोकशाहीवरील विश्वास यांवर  भर दिला.
मात्र  सत्ता अनेकदा प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते जेव्हा लोकशाहीत शांततामय सत्याग्रह करणाऱ्या युवकांवर लाठीमार होतो, अश्रुधुराचा मारा होतो किंवा त्यांना बळाचा सामना करावा लागतो, तेव्हा जखमी केवळ काही आंदोलक होत नाहीत; लोकशाही जखमी होते. 
आंदोलक लोकशाहीचे शत्रू नसून ते तिच्या सशक्ततेची कसोटी सिद्ध करतात असं एक वाक्य वाचनात आलेलं. सत्तेला या विचाराशी फार देणं घेणं नसतंच. योग्य तिथे जनतेला ते सिद्ध करावं लागतं. 
   खरं तर लोकशाही म्हणजे केवळ पाच वर्षांनी मतदान करण्याचा अधिकार नव्हे. लोकशाही म्हणजे शासनाला प्रश्न विचारण्याचा अधिकार, मतभिन्नता व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आणि अन्यायाविरुद्ध अहिंसक मार्गाने उभे राहण्याचे नैतिक धैर्य. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेले स्वातंत्र्य हे सत्तेची कृपा नसून तो संविधानाने दिलेला अधिकार आहे. म्हणूनच शांततामय आंदोलनांकडे संशयाने नव्हे, तर लोकशाहीच्या नजरेतून पाहिले पाहिजे.

हा प्रश्न आजचा नाही. प्रश्न असा आहे की, आपण आपल्या युवकांना नेमके कसे घडवू इच्छितो? आज्ञाधारक नागरिक म्हणून, की विचार करणारे नागरिक म्हणून? प्रश्न न विचारणारा समाज  परिवर्तनशील असू शकत नाही . इतिहासात कोणतेही मोठे परिवर्तन आज्ञाधारक मनांनी घडविलेले नाही; ते नेहमी विचारशील आणि अस्वस्थ मनांनीच घडविले आहे.
म्हणूनच युवकांकडे पाहताना त्यांच्या हातातील फलकापेक्षा त्यांच्या मनातील प्रश्न समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण घोषणांचा आवाज क्षणिक असतो; पण विचारांचा प्रतिध्वनी इतिहास घडवत असतो.

      सत्याग्रह हा केवळ आंदोलनाचा मार्ग नाही; तो माणसाच्या अंतःकरणावर विश्वास ठेवणारे तत्त्वज्ञान आहे. तो प्रतिस्पर्ध्याचा पराभव करण्याचा नव्हे, तर त्याच्या विवेकाला जागविण्याचा प्रयत्न आहे. महात्मा गांधींनी सत्याग्रहाला नैतिक संघर्षाचे स्वरूप दिले. म्हणूनच सत्याग्रहात शस्त्र नसते मात्र  सामर्थ्य असते. राग नसतो, अन्यायाविरुद्धचा विद्रोह असतो. द्वेष नसतो मात्र सत्याशी तडजोड करण्यास नकार असतो.

आजच्या काळात या तत्त्वज्ञानाचे महत्त्व अधिक वाढले आहे. कारण आज हिंसा केवळ शस्त्रांनी होत नाही; ती भाषेतून, प्रचारातून, अफवांमधून आणि मतभिन्नतेला शत्रुत्व मानणाऱ्या मानसिकतेतूनही होत असते. अशा वेळी सत्याग्रह  म्हणजे माणुसकी, विवेक आणि लोकशाही यांचे संरक्षण करण्याची प्रक्रिया आहे.

भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना केवळ काही शब्दांचा संच नाही. ती भारतीय राष्ट्रजीवनाची नैतिक दिशा आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही चार मूल्ये केवळ न्यायालये किंवा संसद या पुरतीच मर्यादित नाहीत तर,
ती समाजातील जागृत नागरिक आणि विचारशील युवक यांनी जपण्याची जबाबदारी आहे. संविधान हे ग्रंथालयातील ग्रंथ नाही तो जगण्याचा अधिकार आहे. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान स्वीकारताना एक महत्त्वाचा इशारा दिला होता. त्यांनी सांगितले की, राज्यघटना कितीही उत्कृष्ट असली, तरी ती चालविणारी माणसे जर मूल्यनिष्ठ नसतील, तर तिचे यश धोक्यात येते. या विधानात लोकशाहीचे संपूर्ण तत्त्वज्ञान दडलेले आहे. लोकशाही केवळ संस्थांवर टिकत नाही; ती नागरिकांच्या नैतिकतेवर टिकते. म्हणूनच युवकांच्या चारित्र्याचा प्रश्न हा लोकशाहीच्या भवितव्याशी जोडलेला प्रश्न आहे.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी युवकांना शिक्षणाच्या माध्यमातून विचार करायला शिकविले. त्यांनी अंधश्रद्धेपेक्षा विवेकाला, जन्माधिष्ठित श्रेष्ठत्वापेक्षा मानवी समानतेला आणि भीतीपेक्षा प्रश्न विचारण्याला महत्त्व दिले. राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाला शासनाचा केंद्रबिंदू बनविले. डॉ. आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून समान संधींचे स्वप्न मांडले. या सर्वांच्या कार्यात एक समान धागा आहे—समाज बदलण्यापूर्वी विचार बदलला पाहिजे.

आज दुर्दैवाने युवकांविषयीचा सार्वजनिक संवाद अनेकदा रोजगार, स्पर्धा परीक्षा, तंत्रज्ञान किंवा करिअर इतकाच मर्यादित राहतो. हे महत्त्वाचे विषय आहेतच; परंतु युवक केवळ अर्थव्यवस्थेचा घटक नाही. तो लोकशाहीचा वाहक आहे. तो संविधानाचा भावी संरक्षक आहे. तो समाजाच्या नैतिक आरोग्याचा निर्देशक आहे. त्यामुळे युवक घडविणे म्हणजे केवळ कौशल्य विकसित करणे नव्हे; तर विवेक, संवेदनशीलता आणि सामाजिक उत्तरदायित्व जागविणे होय.

आज अनेक युवक पर्यावरण, जल, जंगल, जमीन, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता, संविधान आणि मानवी अधिकार यांसारख्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत. या सर्व मागण्यांशी प्रत्येक जण सहमत असेलच असे नाही. मतभिन्नता असणे हेच लोकशाहीचे सौंदर्य आहे. परंतु मतभिन्नतेला दडपण्यासाठी बळाचा वापर करणे, शांततामय आंदोलनाला संशयाच्या नजरेने पाहणे किंवा प्रश्न विचारणाऱ्या युवकांना शत्रू समजणे ही कोणत्याही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. कारण लोकशाहीचा आत्मा एकमतात नसतो; तो असहमतीचा सन्मान करण्यात असतो.

प्रश्न विचारणारा युवक देशविरोधी नसतो. उलट प्रश्न न विचारणारा समाजच हळूहळू स्वतःचे स्वातंत्र्य गमावतो. इतिहासात ज्या समाजांनी असहमतीचा आवाज दाबला, ते समाज काही काळ बलवान दिसले; पण वैचारिकदृष्ट्या दरिद्री झाले. आणि ज्या समाजांनी प्रश्न विचारणाऱ्या पिढीवर विश्वास ठेवला, त्यांनीच विज्ञान, साहित्य, लोकशाही आणि मानवी मूल्यांमध्ये जगाचे नेतृत्व केले.

आज युवकांसमोर सर्वात मोठे आव्हान बाह्य संघर्षाचे नाही; तर अंतर्मनातील संघर्षाचे आहे. माहितीच्या प्रचंड वेगात सत्य शोधण्याचे, लोकप्रियतेच्या मोहात विवेक जपण्याचे, द्वेषाच्या वातावरणात माणुसकी टिकविण्याचे आणि निराशेच्या काळात आशा जिवंत ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. हा संघर्ष जिंकणारी पिढीच भविष्य घडवेल.

म्हणूनच भारताला आज केवळ अभियंते, डॉक्टर, अधिकारी किंवा उद्योजकांची गरज नाही; तर विचार करणाऱ्या नागरिकांची गरज आहे. अशा युवकांची गरज आहे, जे संविधानाला पुस्तक म्हणून नव्हे तर जीवनमूल्य म्हणून स्वीकारतील; जे राष्ट्रप्रेमाला घोषणांमध्ये नव्हे तर सामाजिक जबाबदारीत व्यक्त करतील; जे संघर्ष करतील, पण सत्याग्रहाचा मार्ग सोडणार नाहीत.

इतिहासाचे एक वैशिष्ट्य असते—तो सत्तेच्या वैभवापेक्षा मूल्यांसाठी उभ्या राहिलेल्या माणसांना अधिक काळ लक्षात ठेवतो. सिंहासनांची नावे बदलतात, सत्ताधारी बदलतात, साम्राज्ये कोसळतात; पण सत्य, न्याय आणि माणुसकीसाठी उभे राहणाऱ्यांच्या पाऊलखुणा इतिहासाच्या कपाळावर कायमस्वरूपी कोरल्या जातात.

आजचा युवक कोणत्या भारताचा शिल्पकार होणार, मानवतावादी राष्ट्राचा की भ्रष्ट व्यवस्थेचा ?
 हा प्रश्न  संपूर्ण समाजाचा व देशाचा आहे . कारण युवक भविष्यातील समाजाचे  प्रतिबिंब स्वतःतून दाखवत असतात. आपण त्यांना विवेक,  संवेदना आणि संवैधानिक मुल्यांची जाण दिली, तर उद्याचा भारत अधिक न्याय्य, अधिक समतामूलक आणि अधिक मानवी असेल. याचे आशादायी पाऊल म्हणजे कालचे शांततेच्या मार्गाने पार पाडलेले आंदोलन होय .

दुष्यंत कुमार यांच्या ओळी आजही लोकशाहीच्या प्रत्येक सजग नागरिकाला अंतर्मुख करतात—

"सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए."

युवकांचे हार्दिक अभिनंदन!!



— छाया बेले


माहितीचे स्रोत: भारतीय राज्यघटना, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य, इतिहासविषयक संदर्भग्रंथ, समकालीन वृत्तपत्रे व विश्वासार्ह वृत्तसंस्था, तसेच लेखकाचे विश्लेषण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .