श्रीनिवास मस्के यांची कविता.

      

बाईचा दस्तऐवज या कविता संग्रहाच्या निमित्ताने लिहिलेला अभिप्राय  श्रीनिवास मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा पोस्ट करीत आहे.

        बरडशेवाळा ता.हदगाव या छोट्याशा गावात जन्मलेले कवी
श्रीनिवास मस्के हे नव्या पिढीतील महत्वाचे व ग्रामीण कवीता दमदारपणे लिहिणारे कवी आहेत . एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व , सुप्रसिद्ध कवी,  व्याख्याते म्हणून सगळा महाराष्ट्र त्यांना ओळखतो . त्यांच्या मंचीय कविता श्रोत्यांच्या मनावर गारूड करतात .
कवी , वक्ते , विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षक. अशा अनेक भुमीका पार पाडत समाजासाठी आपलं योगदान देत आहेत . त्याचबरोबर त्यांच्या ठायी एक निखळ माणूसपण वास करते.
श्रीनिवास मस्के यांनी आपल्या कवितेतून गावभुईचं समग्र जीवन , तिथलं जगणं , तिथली हिरवळ , उन्हं, पाऊस सगळंच उगवून आणतात .
त्याच बरोबर खेड्यातील कष्टकरी बाईचं जगणं जेवढं आत्मियतेने मांडतात. त्यांच्या शब्दात समग्र समष्टीविषयीचा जिव्हाळा दिसून येतो.

         तो कासऱ्याचा दोर करतो
               झाडाला लटकतो, 
           ती कासऱ्याची धांद करते ,
        खरडणी लागलेल्या विहिरीतून 
                पाणी शेंदते....

    ग्रामीण स्त्रीच्या जगण्याचं सारच वरील ओळीतून कवीने अगदी नेमकेपणाने टिपून घेतलं आहे . 
या ओळी श्रीनिवास मस्के यांच्या 
'बाईचा दस्तऐवज ' या कविता संग्रहातील आहेत.
    सध्याच्या काळात कवितेचा पसारा जास्तच वाढला आहे. 
मात्र या पसाऱ्यात देवकणासारखी अस्सल कविता अगदी चिमुटभर सापडेल. याच अस्सल कवितेच्या पशात श्रीनिवास मस्के यांची कविता येते . 
  कालच हा संग्रह हाती आला आणि लगेच वाचायला घेतला. 
या संग्रहातील कविता वाचताना आपण अनेकदा निशब्द होतो .
परकाया प्रवेश करून बाईच्या जगण्याचे वेगवेगळे संदर्भ देत, संवेदनेच्या अंतिम टोकावरून अवतरलेली ही कविता आहे . 
       
         चूल आणि मूल यातून नुकतच उंबरठ्याबाहेर पडू लागलेल्या स्त्रीच्या जगण्या भोगण्याचे उसासे शब्दरूप घेऊन बाहेर पडत आहेत . 
खरं तर शोषण व्यवस्थेविरुद्ध 
डोईचा पदर / आला खांद्यावरी /
भरल्या बाजारी / जाईन मी //
असं म्हणत संत स्त्रियांनी खूप आधी बंड पुकारले आहे. तोच वारसा घेऊन स्त्रिया लिहीत आहेत. अति शोषण यामुळे स्त्रियांची कविता काहीवेळा आक्रमक आक्रस्ताळी झालेली पहायला मिळते. 
मात्र स्त्रीचं दुःख एखाद्या पुरुषाने एवढ्या सखोलपणे तेवढ्याच संयमाने मांडले आहे हे खरोखरच खूप कौतुकास्पद आहे . 

किती खुणा शोधाव्यात 
मातीशी भिडलेल्या 
बाई माणसांच्या 
शब्द पेरताना..
पाऊलवाटेतील काटे
बाजूला सारलीत त्यांनी 
खुरपं गोंदून पायांना..

कवितेतील अशा ओळी वाचत असताना ओठातून बाहेर पडणारा 'वाह...!!' आधीच त्या ओळींनी आपल्यात सामावून घेतलेला असतो. आपण फक्त शब्दांकडे एकटक पहात राहतो . 
खेड्यातील कष्टकरी बाईचं जगणं या कवितेतून जेवढं उत्कटतपणे तेवढं कोणी मांडलं असेल असं वाटत नाही . मस्के यांची कविता सिमेंटच्या भिंतीवररून वाहून जाणाऱ्या पावसा सारखी नाही , 
तर ती मनाच्या तळापर्यंत उतरत जाते .
मस्के यांची
 कविता मातीत ओल झिरपत जावी तशी  झिरपत जाते . कविता कोणत्याही रसातील असो ती मातीशी एकरूप झालेली दिसते. नुकत्याच उगवून आलेल्या कोवळ्या कोबांसारखी अलवार शब्दरचना हे या कवितेचं वैशिष्ट्य आहे . श्रीनिवास मस्के यांची कविता आपल्या स्वतंत्र शैलीत व्यक्त होते . कुणाचीही सावली तिच्यावर दिसून येत नाही.

   कविता ही कवीच्या अनुभवाचे संचित असते . कविता जन्माला येण्याआधी खूप काही घडून गेलेलं असतं . आतली पडझड , मोडणं , घडणं ध्वस्त होणं ,निर्माण होणं याला आतून मिळालेला प्रतिसाद म्हणजे कविता असते . 
हे सगळं त्या कवीचं व्यक्तीगत जगणं असेल असंही नाही . भवतालात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे पडसाद कवीमनावर आदळत असतात . त्याला पार करूनच पुढे जातात . कितीही प्रयत्न केला तरी त्याची यातून सुटका होणे नाही . लोहचुंबकाकडे लोहकण आकर्षित व्हावे तसेच समष्ठीच्या सुख-दुःखाचे झरे कवीच्या दिशेने वाहत येतात . तो कधी घायाळ होतो तर कधी फुलारून येतो , तर कधी कोमेजून जातो . त्याच्या शब्दातून त्याचा भवताल उमटत जातो . कविता ही साधी गोष्ट नाही.अभिव्यक्तीचं सर्वात प्रभावी व सुंदर माध्यम आहे . या माध्यमाचा वापर करण्यात कवीच्या प्रतिभेचा कस लागतो . कविता अजरामर आहे . इतिहासात डोकावून पाहिले तर आतापर्यंत काळाच्या पटलावर कविताच टिकून राहिलेली आहे . तुकोबांची गाथा असो की कबिराचे दोहे असो . कवितेने अनेक सामाजिक , राजकीय क्रांत्या घडवून आणल्या. सत्ता पालट केले . आपल्याकडे सामाजिक क्रांती घडवून आणणारे संत साहित्य याचा उत्कृष्ट नमुना आहे . कवितेचा परिणाम हा मानवीमनावर खूप खोलपर्यंत होत असतो . त्या कवितेत तेवढी ताकद असावी लागते .
म्हणून काहीच कविता काळजाला हात घालणाऱ्या असतात . 
अशीच ताकदीने लिहिली गेलेली कविता म्हणजे हा श्रीनिवास मस्के यांचा ' बाईचा दस्तऐवज ' हा कविता संग्रह होय . 
खेड्यात जन्मलेलल्या या कवीचं मातीशी खूप जवळचं नातं आहे हे प्रत्येक कविता वाचताना जाणवत राहतं. कवी आपल्या कवितेबद्दल मनोगतात


अशा नेमक्या शब्दात कवितेचा सार सांगून जातात .
तर ना . धो . महानोर यांनी संग्रहाच्या पाठराखणमधे कवितेवर समर्पक भाष्य करताना म्हणतात -
" डोळ्यातून न निसटणारा , दरवळणारा परिसर ती खेडी शुद्ध माणसं एकत्र नांदणारा अठरापगड जातीचा समाज हे ग्राम संस्कृतीची श्रेष्ठ परंपरा विसरता येत नाही . या हरवत चाललेल्या खेड्याच्या पडझड होत जाणाऱ्या जीवनाचे दुःख घेऊन येणारी , ती व्यथा मांडणारी ही कविता
आहे "
   
पाठीवरून सरपटत गेलेला भूतकाळ
वावटळ बनून घोंगावत येतो
गोळा झालेला पालापाचोळा
घेऊन उठतो तेव्हा
दिसतो बरडावरचा गाव ..

ही आर्तता व्यक्त करतानाही मातीतून उगवून आलेल्या अस्सल प्रतिमा प्रतिकांचा साज चढवून ही कविता बहरत जाते आणि मग वेदनाही रानफुलासारखी सुंदर होते .
ही  कविता बाईच्या जगण्याचे संदर्भ देत, वाचकाच्या मनात धूसर होत चाललेला गावही  गडद कर जाते . 
ग्रामीण कवितेची गढी कधीही कोसळणार नाही एवढी आश्वासकता श्रीनिवास मस्केची कविता देते . बाईचं दुःख, तिचं जगणं भोगणं " बाईपणाचं जगणं विस्तवाशी सोईरपण " ही कविता दर्शवते या सोबतच तिच्या मनाचा हळवा कोपरा
" सजनाची मिठी बाई " ही कविता उलगडून दाखवते .
जगण्यात माझ्या
ही गझलसदृश्य मनाला भावणारी आशयसंपन्न कविता संग्रहात उठून दिसते .
   आज या संवेदनशील कवीचा वाढदिवस त्या निमित्तं आभाळभर शुभेच्छा!!

@छाया

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .