भाग- ५ : लोकदेवतांमध्ये जिवंत असलेली आदिमाता निऋती - शरद पाटील यांच्या अनुषंगाने.

लोकदेवतांमध्ये जिवंत असलेली निर्ऋती : 
शरद पाटील यांच्या अनुषंगाने 





  लोकदेवतांमध्ये जिवंत असलेली निर्ऋती : शरद पाटील यांच्या अनुषंगाने

“वैदिक देवता अमर आहेत असे सांगितले जाते, कारण त्यांना मंदिरात सुरक्षित ठेवल्या आहेत. मंदिरं त्यांना जिवंत ठेवण्यासाठी तयार केली गेली आहेत.
आणि लोकदेवता लोकमनात, लोकजीवनात, शेतात, बांधावर, माणसांच्या घामात जिवंत आहेत.” — शरद पाटील

वेदात एक मंत्र येतो, “निर्ऋतिं अहं परावहामि” — मी निर्ऋतीला दूर घालवतो. पुरूष सत्तेला वाटले मंत्र म्हटला की निर्ऋती संपेल. पण ती आदिमाता मंत्राने मरत नाही. तिला सत्तेने मारण्याचा प्रयत्न केला, मात्र ती लोकांच्या जगण्यात व्यापून आहे.
कारण ती बहुजनांचं मूळ अस्तित्व आहे.

ब्राह्मणी व्यवस्थेने निर्ऋतीला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. तिला अशुभ, काळी, राक्षसी ठरवले. दक्षिण दिशेच्या कोपऱ्यात, स्मशानात ढकलले. तिला वेदातून हद्दपार केले. पण ती मेली नाही. ती जिथे वेद पोहोचत नाहीत तिथे पोहोचली. आज तीच प्रत्येक गावाच्या वेशीवर उभी आहे. शेताच्या बांधावर उभी आहे. 
ती यल्लमा, मरीआई, सटवाई, एकविरा, म्हसोबा अशी नावं धारण करून आजही कृषक समूहाच्या केंद्रस्थानी आहे.

शरद पाटील यांनी लोकदेवतेची व्याख्या अगदी सोपी केली आहे. वैदिक देवता स्वर्गात राहते, संस्कृत बोलते, तूप खाते.
लोकदेवता भुईवर राहते, तिला लोखंडाच्या भांड्यात काळे तीळ आणि कोंबडा लागतो असे अथर्ववेदातच आहे. बोलीभाषा बोलते, भाकरी-मांस खाते. मंदिर गावाच्या मध्यभागी असते, मात्र मरीआई, म्हसोबा, वेतोबा नदीपलीकडे, स्मशानाजवळ, डोंगरावर असतो. कारण निर्ऋतीला वैदिक साहित्यातच ‘बहिर्धा’ म्हणजे बाहेर घालवलेली म्हटले आहे.
जो समाज सत्तेतून बाहेर फेकला गेला, त्यांच्या देवताही गावाबाहेर फेकल्या.

लक्ष्मीला दूध-साखर लागते, आजही यल्लमेला, मरीआईला, म्हसोबाला कोंबडा, बकरा, सुकट-भाकरी दिली जाते. हा हिंसाचार नाही, हा उत्पादन उत्सव आहे. शेतात पिकलेले धान्य आणि कष्टाने वाढवलेला पशू याचा पहिला वाटा आपल्या रक्षणकर्त्या आईला देणे ही मातृसत्तेतील कृतज्ञता आहे.

तिला गुरव, महार, मांग, वडर, कोळी, धनगर, भोई पूजतो. कारण ती त्यांची आई आहे. महाराष्ट्रातील बहुतांश लोकदेवतांचे पुजारी ब्राह्मणेतरच आहेत.

काल्पनिक देवता सुंदर, गोरी, चार हातांची आहे तर
निर्ऋती काळी, केस मोकळे सोडलेली, जीभ बाहेर आलेली, डोळे मोठे, हातात सूप किंवा झाडू. ती भीती वाटावी अशीच रंगवली आहे कारण सत्तेला तिची भीती वाटते.

महाराष्ट्रात ती अनेक रूपात जिवंत आहे. मरीआई म्हणजे साथीची आई. मरी म्हणजे पटकी, कॉलरा. वैदिक ग्रंथात निर्ऋतीला क्षय आणि रोगाची देवता म्हटले आहे. गावात साथ आली की लोक म्हणतात मरी आली. तिला गावाबाहेर नेऊन कोंबडा देऊन सांगतात, आई तू परत जा, लेकरांना सोड.

ही पूजा नाही, हा गण-मातेशी केलेला करार आहे.

यल्लमा अर्थात रेणुका हे गण-मातेचे मोठे आणि सर्वात वेदनादायी रूप आहे. ही कथा मातृसत्तेचा, निर्ऋतीच्या वारसाच्या हत्येचा इतिहास सांगते. रेणुका ही जमदग्नीची पत्नी.

माता रेणुका आपल्या प्रचंड तपःशक्तीने आणि पतीनिष्ठेमुळे रोज सकाळी नदीवरून ओल्या वाळूचा कलश तयार करून त्यात पाणी भरत असे आणि तो कलश डोक्यावर असलेल्या सापाच्या वेटोळ्यावर ठेवून आश्रमात आणत असे.

एकदा नदीवर पाणी भरत असताना तिचे लक्ष काही क्षणांसाठी पाण्यातून जाणाऱ्या गंधर्व चित्ररथाकडे गेले. जमदग्नीने दिव्य दृष्टीने हे पाहिले आणि आपल्या चार मुलांना सांगितले, तुमच्या आईचे डोके छाटा. चारही मोठ्या मुलांनी नकार दिला. त्यांच्याठायी अजूनही मातृसत्तेची नैतिकता होती. जिथे आई ही आदिमाता असते, तिला मारता येत नाही असा कृतज्ञभाव होता. जमदग्नीने या चारही मुलांना शापाने भस्म केले.

मात्र पाचवा मुलगा परशुराम याने कुऱ्हाडीने आईचे डोके उडवले. परशुराम कोण आहे? तो एक व्यक्ती नाही, तो पुरुषसत्तेचा प्रतिनिधी आहे. हातात परशू म्हणजे कुऱ्हाड असलेला, जंगल तोडून जमीन साफ करणारा, क्षत्रिय गणांचा नाश करून भूमी  ताब्यात घेणारा  जमीनदार वर्ग. आईला मारल्याशिवाय पित्याची सत्ता येत नाही. भारतीय इतिहासातील ही पहिली ऑनर किलिंग आहे.

या लोककथेत रेणुका माता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत एका मांग समाजाच्या  वस्तीत गेली. तिथे एका मातंग स्त्रीने रेणुका मातेला वाचवण्याचा प्रयत्न केला. पित्याच्या आज्ञेचे पालन करताना परशुरामाने माता रेणुका आणि  वाचवायला आलेल्या मातंगी या दोघींचेही शीर धडावेगळे केले.

परशुरामाच्या पितृभक्तीवर प्रसन्न होऊन जमदग्नी ऋषींनी वर मागण्यास सांगितले. तेव्हा परशुरामाने आपल्या आईला व भावंडांना जिवंत करण्याची मागणी केली. मात्र जमदग्नीने रेणुकेला जशीच्या तशी जिवंत न करता तिचे डोके एका मातंग समाजाच्या स्त्रीच्या धडाला लावले व रेणुकेला मातंग स्त्रीचं डोकं लावलं. ती झाली यल्लमा. दोन जातींची, दोन डोक्यांची आई. पतित ठरलेल्या स्त्रीला  शूद्रत्वाचा अभिशाप दिला जातो. हा पुरुषसत्तेचा न्याय आहे. सौंदत्तीला दोन यल्लमा दिसतात. वरच्या मंदिरातली गोरीपान, साडी नेसलेली रेणुका जिला ब्राह्मण पूजतो. आणि खालच्या वस्तीतली काळी, केस मोकळे सोडलेली, गळ्यात लिंबाची माळ असलेली यल्लमा जी जोगतिणींच्या झोपडीत राहते.

इंद्र रूप बदलून अहिल्या, वृंदा यांचे शीलहरण करतो. त्याला कोणी कसलीही शिक्षा करत नाही. या स्त्रियांना चूक नसतानाही जीवाचं द्यावं लागलं.
रेणुकेच्या मनात निसर्गदत्त भावना क्षणभर उंचबळून आली म्हणून तिचं डोकं आपल्याच मुलाच्या हाताने धडावेगळं केलं जातं. यावरून या व्यवस्थेचं टोकाचं हिसंक रूप लक्षात येतं. ही व्यवस्था हिंसेच्या बळावर प्रस्थापित केली गेली आहे. तिला वाचवण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला संपवलं गेलं आहे. जमदग्नीने एवढी महान विद्या, दिव्य दृष्टीचा पत्नीवर नजर ठेवण्यासाठी वापर केला हा या पुरुषसत्तेचा कोतेपणा दर्शवतो.

सत्ताधारी स्त्रीची हत्या करून तिच्या प्रजेला असहाय अवस्थेत बाहेर फेकण्यात आलं. तिच्या पराजित वारसांना आजही जगण्याचा संघर्ष करावा लागतो. याचं उदाहरण म्हणजे जोगतिणी. ज्या मुली देवाच्या सेवेसाठी देवाला वाहिल्या जातात. आजही कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर हजारो जोगतिणी देवाच्या नावावर शोषित आहेत. याच मुली जिवंत निर्ऋती आहेत, पूजनीयही आणि त्याज्यही.

सटवाई हे निर्ऋतीचेच दुसरे रूप आहे. मूल जन्मल्यावर पाचव्या दिवशी ती टोपलीत धान्यावर नशीब लिहायला येते. निर्ऋतीला विधात्री म्हणजेच नशीब लिहिणारी म्हटले आहे. नंतर पितृसत्तेने हा अधिकार ब्रह्मदेवाला दिला, पण गावात आजही ब्रह्मदेव येत नाही, सटवाईच येते. कारण तिलाच तो अधिकार आहे अशी भावना लोकमनाच्या नेणीवेत तळाशी जिवंत आहे. हीच भावना मातृदेवतांना जिवंत ठेवते.

एकविरा, जाखाई-जोखाई, जानाई या डोंगरावर एकट्या राहणाऱ्या माता आहेत. त्यांना नवरा नाही. त्या एकविरा आहेत, एकट्या वीरांगना. पुरुषसत्तेने अशा स्वतंत्र स्त्रियांना स्वैरिणी म्हटले, मात्र गण-समाजात तीच खरी राणी होती जिच्यावर पुरुषाचा अधिकार नाही.

शेताच्या बांधावरचा शेंदूर लावलेला दगड म्हणजे म्हसोबा, म्हस्कोबा, वेतोबा. ऋग्वेदात निर्ऋतीला ‘क्षेत्रस्य पत्नी’ म्हणजे शेताची मालकीण म्हटले आहे. अनेक ठिकाणी सापडणारी पाय पसरलेली, योनी दिसणारी लज्जागौरी, हीसुद्धा तीच आदिमाता आहे जी सृजनाचे प्रतीक आहे. शरद पाटील म्हणतात, ही लज्जा नाही, ही आदिमाता आहे.

आजची निर्ऋती सकाळी शेताच्या बांधावर जाणारी, लेकराला सांभाळणारी, बाजारात भाजी विकणारी, तरीही नावावर घर, जमीन नसलेली स्त्री तीच निर्ऋती आहे. अंगणवाडीत प्रत्येक बाळंतपण आणि मृत्यू नोंदवणारी पाच-सहा हजारांवर राबणारी आशा वर्कर तीच जीवन-मृत्यूची विधात्री सटवाई आहे. कोर्टाच्या दारात घटस्फोट, पोटगी आणि आपल्या शरीरावर हक्क मागणारी आणि कुटुंब तोडणारी ठरवली जाणारी स्त्री तीच ऋताला प्रश्न विचारणारी निर्ऋती आहे.

आणि समाज आजही जमदग्नी आहे. पत्नीचा छळ करणारा पती, मुलीला परक्याचं धन समजून वाढवणारा व लग्न करून देऊन उरावरचा धोंडा उतरला असं समजणारा  पिता, तिची शारीरिक मानसिक छळवणूक करणारा कोणताही पुरुष-स्त्री, प्रेमाच्या नावाखाली तिची भावनिक फसवणूक करणारा प्रेमी ही सगळी जमदग्नीचीच रूपं आहेत.

म्हणूनच शरद पाटील म्हणतात, निर्ऋतीची मुक्ती म्हणजे स्त्रीची मुक्ती आणि स्त्रीची मुक्ती म्हणजे मानवमुक्ती. परशुरामाने रेणुकेचे डोके तोडले, आपले काम ते डोके पुन्हा तिच्याच धडावर बसवण्याचे आहे. स्त्रीला तिच्या भूमीशी, तिला तिची प्रतिष्ठा मिळवून देणे हे आपले म्हणजेच तिच्या वारसाचे, बहुजनाचे काम आहे.
तेव्हाच आदिमाता पुन्हा आद्यराणी होईल. तेव्हाच शोषणमुक्त समाज निर्माण होईल.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .