नामांतराच्या इतिहासातील उपेक्षित शौर्याचा इतिहास : नामांतर शहीद पोचिराम कांबळे

नामांतराच्या इतिहासातील उपेक्षित शौर्याचा इतिहास : नामांतर शहीद पोचिराम कांबळे
नामांतर लढ्यातील उपेक्षित शौर्याचा इतिहास : ' नामांतरशहीद पोचिराम कांबळे '
------------------------------------------------




' सत्य कहाणी पोचीरामजींची 
मरणाला नाही भिणार 
तोडा अथवा जाळा मजला 
जयभीम नाही सोडणार..! '

        नामांतर लढ्यातील शहीद पोचीराम कांबळे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवाप्रती असलेली निष्ठा वरील ओळीतून प्रकट होते. ' जय भीम ' हे दोन शब्द नाहीत तर न्याय, समता, मानवता, यांचं प्रतिक आहे. पोचीराम कांबळे  यांचं बलिदान 
याच दोन शब्दांच्या समर्थनार्थ होते . 
      इतिहासातील काही घटितं हे केवळ घटनांची नोंद नसतात. त्यामागील दोन्ही बाजूच्या विचारधारा, निष्ठा, उद्देश याचा उलगडा करतात. 
       मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन हा असाच एक धगधगता  इतिहास आहे. डॉ. मारोती कसाब यांनी लिहिलेला समाजमनातील आंबेडकरी जाणीवांचा वेध घेणारा, ' नामांतर शहीद पोचिराम कांबळे ’ हा ग्रंथ या आंदोलनाकडे नव्या नजरेने पाहायला लावतो.  या आंदोलनाकडे सर्वसाधारणपणे दलित विरुद्ध सवर्ण या नजरेतून पाहिलं जातं. मात्र या ग्रंथातून लेखकाने नामांतर  लढ्यामागील व्यापक अर्थ उलगडून दाखवला आहे, यासाठीच हा ग्रंथ ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा ठरतो. मराठवाड्यात आणि मराठवाड्यााबाहेरही संपूर्ण महाराष्ट्रात  नामांतराचा लढा सतरा वर्षे एवढा  प्रदीर्घकाळ सुरू होता. त्यात सहभागी झालेल्या अनेकांच्या झाकल्या गेलेल्या अदृश्य योगदानाची नोंद या ग्रंथात  डॉ. कसाब यांनी  घेतली आहे. 
      तत्कालीन औरंगाबाद आणि आताच्या संभाजीनगर मधील  मराठवाडा  विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या,  ही मागणी केवळ कमानीवर नाव कोरण्याची मागणी नव्हती. तर बाबासाहेबांच्या मराठवाड्यातील शैक्षणिक  कार्याला, इतिहासाला न्याय मिळावा, वंचितांना आत्मसन्मान मिळावा  यासाठीचा तो लढा होता.
          भारतीय संविधान लिहून देशासाठी अनमोल योगदान देणाऱ्या  एका महामानवाचे नाव विद्यापीठाला देण्यात यावे यासाठी जनतेला सरकार विरुद्ध लढा द्यावा लागला. त्या लढ्यात अनेकांना प्राण गमवावे लागले.
याला एवढा हिंसक विरोध का झाला? 
 शिक्षणासारख्या परिवर्तनाच्या क्षेत्रातही समतेचा विचार स्वीकारणे आपल्या समाजाला इतके कठीण का गेले? हा प्रश्न हा ग्रंथ वाचताना सतत मनात येतो. हा विरोध केवळ एका निर्णयाला नव्हता, तर खोलवर रुजलेल्या जातीय मानसिकतेला होता, हे लेखक भावनिक आवेश न आणता, सामाजिक विश्लेषणातून दाखवून देतात. 

पोचिराम कांबळे म्हणजे जात ओलांडणारी निष्ठा होय.

        या ग्रंथाच्या केंद्रस्थानी
पोचीराम कांबळे आहेत. मातंग समाजातील एका माणसाने आंबेडकरी विचारांसाठी आपले प्राण देणे, ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे. ती एक गोष्ट स्पष्ट करते - आंबेडकरी चळवळ ही कोणत्याही एका जातीची मक्तेदारी नाही. ती अन्यायाविरुद्ध, न्याय आणि समतेच्या बाजूने 
उभे राहणाऱ्या प्रत्येक माणसाला जोडणारा धागा आहे.
      सामाजिक चळवळींचे मूल्यमापन करताना आपण नेहमी माणसाची जात पाहतो आणि त्याच्या योगदानाची किंमत ठरवतो. पोचिराम कांबळे यांचे जीवनचरित्र या मानसिकतेला दिलेले सणसणीत उत्तर आहे. एखाद्या व्यक्तीची निष्ठा आणि त्याग त्याच्या जातीपेक्षा मोठा असतो, हाच खरा आंबेडकरी विचार त्यांच्या बलिदानातून समोर येतो. त्यांना केवळ ‘ मातंग समाजाचे शहीद ’ म्हणून नाही, तर ‘ समतेच्या लढ्यातले शहीद ’ म्हणून पाहिले पाहिजे, हाच या ग्रंथाचा आग्रह आहे.

    आंदोलनाचा सगळ्यात वेदनादायी भाग म्हणजे शहादतीनंतर त्या कुटुंबांचे काय होते ?

       शहीद  पोचिराम कांबळे यांच्या पत्नी धोंडामाय आणि मुलगा चंदर  यांच्या आयुष्याची कहाणी वाचताना ही जाणीव अधिक तीव्र होते. एका संघर्षाने एक संपूर्ण कुटुंब कसे उद्ध्वस्त होते, कायम असुरक्षिततेच्या आणि चिरंतन दुःखाच्या खाईत कसे लोटले जाते, याचे चित्रण लेखकाने अत्यंत संवेदनशीलतेने केले आहे. चंदरच्या   आयुष्याशी जोडली गेलेली सूडभावनेची शोकांतिका ही केवळ एका कुटुंबाची नाही, तर ही  हिंसा मानवी जीवनाच्या अनेक पिढ्यांना दुःखाच्या खाईत लोटते, 
याचीही कहाणी आहे. अशा घटनांकडे केवळ त्याग बलिदान आणि निष्ठा,  शौर्य म्हणून पाहून चालणार नाही, तर त्यामागची मानवी किंमतही समजून घेतली पाहिजे.
       या ग्रंथाचे आणखी एक महत्त्वाचे योगदान म्हणजे, त्यात अनेक मानवतावादी,  निष्ठावंत  तरुणांची नोंद आहे. नामांतराच्या लढ्यात रस्त्यावर उतरलेले, लाठ्या खाल्लेले, तुरुंगात गेलेले अनेक तरुण होते. त्यात दलितच नव्हे, तर इतर समाजातीलही तरुण होते, जे बाबासाहेबांच्या विचारांनी भारावले होते. पुढे याच तरुणांनी शिक्षण, साहित्य, सामाजिक कार्यात आपले स्थान निर्माण केले. नेहमी मोठ्यांची नावं लक्षात ठेवली जातात. नोंद घेतली जाते . प्रत्यक्ष लढणारे अनुल्लेखीत राहतात, मात्र डॉ . मारोती कसाब  हा इतिहास दुरुस्त करतात. मोठ्या नेत्यांबरोबरच पडद्यामागे राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नोंद घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही, हे ते आपल्या लेखनातून  आवर्जून दाखवतात. 
      कोणत्याही चळवळीचा इतिहास केवळ भावनिक स्मरणापुरता मर्यादित राहू नये. शहिदांचे पुतळे आणि स्मारके उभारणे आवश्यक आहेच, पण तेवढ्याने त्यांचा संघर्ष संपत नाही. त्या स्मृतींचे खरे सार्थक तेव्हाच होते, जेव्हा समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये आपण आपल्या घरात, समाजात देशात सर्वत्र आचरणात आणतो. 
   हा ग्रंथाच्या निमित्ताने अजून एक प्रश्न उभा राहतो, एखाद्या प्रदीर्घ लढ्यातील  कोणाचे योगदान लक्षात ठेवायचे आणि कोणाला विसरायचे, हे कोण ठरवते ? सामाजिक स्मृतीही निवडक असते का? पोचिराम कांबळे यांच्यासारखी अनेक नावे आपण का विसरलो ?
दोन पिढ्या या लढ्यासाठी 
       नांदेड जिल्ह्यातील टेंभुर्णी गावचा पोचिराम  कांबळे हा गावचा उपसरपंच होता. तरणाबांड  नेता होता. त्याचा गुन्हा एवढाच की तो मातंग असूनही आंबेडकरी विचारांनी प्रेरित झालेला होता. तू जय भीम म्हणणे सोड, आम्ही तुला सोडून देतो. जीवदान देतो.  एवढीच त्या गावकऱ्यांची मागणी होती. मात्र आंबेडकरी विचारांनी पेटलेला पोचीराम हा दलित नेता होता. दरवर्षी तो गावात भीम जयंती काढत होता. नामांतराच्या लढ्यात तोही विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मागत होता. म्हणून गावगुंडांनी त्याला एकटे गाठून त्याचा अनन्वित छळ केला. शेवटी त्याला जिवंत फासावर टाकण्यात आले.  आपल्या निष्पाप बापाला जातीय वाद्यांनी क्रूरपणे  मारले,   या अन्यायाचा बदला पोचिरामचा मुलगा चंदर   कांबळे यांनी घेतला. आणि त्याचाही पुढे घात झाला. संपूर्ण कुटुंब पुन्हा उघडे पडले. या लढ्यात पोचिरामच्या दोन पिढ्या गारद झाल्या. या कुटुंबाने   समतेसाठी दिलेल्या बलिदानाची नोंद या ग्रंथात लेखकाने केली आहे.   

      आजच्या तरुण पिढीने हा ग्रंथ जरूर वाचावा. कारण इतिहास समजून घेणे  म्हणजे केवळ जुन्या गोष्टी कळणे नाही, तर त्या इतिहासाने वर्तमानात आपल्यासमोर कोणते प्रश्न उभे केले आहेत, हे ओळखणे आहे. बाबासाहेबांच्या समतेचा विचार आपण आपल्या रोजच्या वागण्यात किती उतरवला आहे, हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आता आली आहे.

विस्मृतीत गेलेल्या माणसांना पुन्हा समाजाच्या जाणिवांच्या केंद्रस्थानी आणण्याचे आणि परिवर्तनाचा इतिहास अधिक मानवी, समावेशक आणि चिकित्सक नजरेने वाचायला शिकवण्याचे काम हा ग्रंथ करतो. हाच या ग्रंथाचा खरा वैचारिक ठेवा आहे.

' मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात शहीद झालेल्या 
आणि 
नामांतरासाठी लढलेल्या ज्ञात-अज्ञात सर्वांना...! '

ही अर्पणपत्रिका लेखकाचा या ग्रंथ निर्मिती मागचा हेतू स्पष्ट करते.
या ग्रंथात नामांतर शहीद पोचीराम कांबळे यांच्यावर लिहिलेली काही कवनंही वाचायला मिळतात. 
लेखक डॉ. मारोती कसाब यांनी तो काळ, त्याचा इतिहास अतिशय तळमळीने मांडला आहे. पोचीराम कांबळे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मुलाखतीसह इतर अनेक संदर्भ या ग्रंथात पहायला मिळतात.. 
हा ग्रंथ एका उदात्ततेच्या निष्ठेची बखर आहे. माणुसकीची जाण असणाऱ्या प्रत्येकाने  तो वाचायला हवा आणि उद्याच्या पिढीसाठी इतिहास समजून घेण्यासाठी संग्रही ठेवावा  !

या निमित्ताने लेखक डॉ. मारोती कसाब यांचे हार्दिक अभिनंदन. 
खूप खूप शुभेच्छा !!
                     - छाया बेले, नांदेड.

टिप्पण्या

  1. ' नामांतर शहीद पोचिराम कांबळे ' या ग्रंथाचा अत्यंत सुंदर शब्दात परिचय करून दिला आहे ... थोडक्यात ग्रंथाचे सार आणि महत्त्व सांगितले आहे ...मनःपूर्वक आभार..! आपल्या मूल्य दृष्टीला सलाम..!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .