अमृता प्रीतम व इमरोज यांच्या प्रेमाची अमर कहाणी ‘ती आहेच’ | पुस्तक परिचय – छाया बेले
अमृता प्रीतम व इमरोज यांच्या प्रेमाची अमर कहाणी ‘ती आहेच’ - पुस्तक परिचय -छाया बेले
उमा त्रिलोक यांच्या ‘अमृता इमरोज : ए लव्ह स्टोरी’ या पुस्तकाचा ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी केलेला अनुवाद, ‘ती आहेच’ (अमृता प्रीतमच्या नंतरचे इमरोज) हे पुस्तक अलिकडेच वाचनात आले.
निखळ निर्मितीक्षम आणि उत्साहाचे, आनंदाचे सहजीवन व्यतीत करणे, हा खरा पुरुषार्थ. हे खरं प्रेम. एकमेकांवर मालकी हक्क न गाजवता, आपापल्या कामात गढून जात, एकमेकांची मनं सांभाळत उत्तम जगता येतं हेच इमरोज सांगून गेले आहेत. आजच्या स्त्री-पुरुषांना हे कळावं, अशी माझी आंतरिक तळमळ. 'प्रेम' या अडीच अक्षरांचा खरा अर्थ प्रत्येक माणसाला कळत गेला, तर जीवन सहज सुंदर होईल. ते तसे व्हावे, ही इच्छा. म्हणून हे लेखन.- वृषाली किन्हाळकर
(मनोगतातून)
अमृता प्रीतम - इमरोज हे कायम सर्वांच्या आकर्षणाचा विषय आहेत. याचं कारण त्यांचं एकमेकांवरील प्रेम तर आहेच, त्यापेक्षाही शंभर वर्षांपूर्वी त्यांनी व्यवस्थेची हुकुमशाही धुडकावून लावत प्रेमासाठी केलेला विद्रोह हेही एक कारण आहे!
अमृता प्रीतम - इमरोज यांची प्रेमकहाणी म्हणजे प्रेमाची एक अमर कहाणी. तिच्याविषयी अनेकदा वाचलं आहे, ऐकलं आहे. मात्र ‘ती आहेच’ हे पुस्तक या नात्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायला लावतं. इमरोजच्या अमृतावरील प्रेमाचा ठळकपणे उलगडा करतं. अमृता गेल्यानंतरही इमरोजच्या मनात, स्मृतीत आणि जगण्यात ती कशी जिवंत राहिली, याचा शोध घेतं.
खरं तर प्रेम या शब्दाची व्याख्या ‘इमरोज’ या नावाने पूर्ण होते.
एका आदर्श जोडीदाराचं दिवास्वप्न प्रत्येक स्त्री कधी ना कधी पाहते. ते स्वप्न अमृता प्रीतम यांच्या आयुष्यात इमरोजच्या रूपाने प्रत्यक्ष अस्तित्वात आलं. प्रेम म्हणजे केवळ एखाद्या व्यक्तीला मिळवणं नव्हे, तर तिच्या संपूर्ण अस्तित्वाचा स्वीकार करणं असतं, हे इमरोजने आपल्या जगण्यातून सिद्ध केलं.
अमृता प्रीतम एक विलक्षण प्रतिभावान, बंडखोर आणि स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणारी कवयित्री, लेखिका. स्त्री म्हणून समाजाने घालून दिलेल्या चौकटींना नाकारणारी आणि स्वतःच्या भावनांना शब्द देण्याची हिंमत असणारी बंडखोर लेखिका. तिच्या आयुष्यात वैवाहिक संघर्ष, विभाजनाची वेदना, प्रेमाची तगमग होती, तरीही तिने स्वतःचा शोध सोडला नाही.
एका वळणावर तिच्या आयुष्यात आला इमरोज.
इमरोजने अमृताच्या केवळ सौंदर्यावर किंवा तिच्या प्रसिद्धीवर प्रेम केलं नाही. तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या सुंदर पापुद्र्याआड दडलेली पडझडही त्याने पाहिली. तिचा उजेड आणि तिचा काळोख सगळंच त्याने आपलंसं केलं.
अमृता प्रीतमच्या प्रेमाकडे केवळ भावनिक बाब म्हणून पाहता येत नाही, तर तिला माणूस म्हणून असलेला प्रेम करण्याचा, प्रेम
निसर्गदत्त अधिकार ती जगली.
म्हणूनच अमृता आणि इमरोज यांचं नातं पारंपरिक चौकटीत बसत नाही. त्यांचं प्रेम ‘माझी व्यक्ती’ या मालकीच्या भावनेवर उभं नव्हतं. ते ‘तू आहेस तशीच विस्तारत राहा’ या स्वीकारावर उभं होतं. प्रेमात असूनही दुसऱ्याच्या अस्तित्वावर अतिक्रमण न करणं, ही त्यांच्या नात्याची सर्वात सुंदर बाजू आहे.
अमृताच्या आयुष्यात साहिर लुधियानवीच्या प्रेमाची सावली होती. मात्र इमरोजचं प्रेम वेगळं होतं. द्वेष, मत्सर रहीत. अमृताच्या हृदयात असलेल्या साहिरसह तिचा स्वीकार केला होता.
साहिर तिच्या कवितेत कायम राहिला, तर इमरोज तिच्या आयुष्यात राहिला.
साहिर तिच्या मनातली हुरहूर बनला; इमरोज तिच्या आयुष्याचा सहप्रवासी झाला.
इमरोजने अमृताला बदलण्याचा प्रयत्न केला नाही. तिच्या भूतकाळाशी स्पर्धा केली नाही. त्याने तिच्या शब्दांशी, तिच्या शांततेशी, तिच्या एकटेपणाशीही नातं जोडलं.
म्हणूनच इमरोज हे केवळ एक व्यक्तिमत्त्व राहात नाहीत. ते एका अशा प्रेमाचं प्रतीक बनतात, ज्यात अधिकारापेक्षा स्वातंत्र्य अधिक आहे. एखाद्याला मुक्त जगू देणं, त्याच्या मुक्तीला बळ देणं, प्रेम असंच असायला हवं. इमरोजने तेच केलं. म्हणूनच ते सिंबॉल ऑफ लव्ह ठरतात.
‘ती आहेच’ या पुस्तकाची खरी जादू इथेच जाणवते. हे पुस्तक केवळ पुनर्कथन करत नाही. अमृता गेल्यानंतरही इमरोजच्या मनात ती कशी जगत राहिली, याचा भावस्पर्शी मागोवा या पुस्तकात आहे. उमा त्रिलोक यांनी इमरोजला अगदी मोकळेपणाने बोलतं केलं आहे. आणि डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी केलेला अनुवाद मूळ भावनेला जपणारा, अतिशय तरल आणि मराठी वाचकाला सहज भिडणारा आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना अनुवाद वाटत नाही.
हे पुस्तक पूर्णपणे इमरोजच्या आठवणी आणि दृष्टीकोनातून मांडलेलं असल्यामुळे, अमृताच्या आंतरिक संघर्षाची दुसरी बाजू (रसिदी तिकीट) न वाचलेल्या वाचकाला कल्पनेनेच भरून काढावी लागते,
हीच कदाचित या पुस्तकाची मर्यादा आणि त्याची ताकदही आहे.
अमृता शरीर रूपाने नसली तरी इमरोजच्या जगण्यात ती आहेच. त्याच्या आठवणीत आहे. त्याच्या शब्दांत आहे. त्याच्या शांततेत आहे. म्हणून ‘ती आहेच’ हे शीर्षकच या नात्याचा सर्वात सुंदर अर्थ सांगून जातं.
आजच्या काळात प्रेमाच्या नावाखाली मालकी हक्क, संशय, नियंत्रण वाढताना दिसतं. अशा वेळी हे नातं आपल्याला शिकवतं ज्याच्यावर प्रेम करतो, त्याला स्वतःसारखं बनवणं म्हणजे प्रेम नाही; त्याला त्याच्या संपूर्ण अस्तित्वासह स्वीकारणं म्हणजे प्रेम.
अमृता गेली, पण इमरोजसाठी ‘ती आहेच.’ ही दोन शब्दांची जाणीवच त्यांच्या संपूर्ण प्रेमकहाणीचं सार बनते.
अमृता-इमरोज यांच्यातील प्रेमाची खोली व्यक्त करणारा हा पुस्तकाचा शेवट इथे देण्याचा मोह आवरत नाही -
' प्यार नाल जिंदगी जिओँ इबादत आपे हो जांदीए
ना किसी शब्द दी पावर, ना किसे वेले दी पाबंद ते ना कोई मजबूरी किसे नूं सिर निवां दी
जेव्हा तुम्ही अत्यंत मनापासून प्रेम करता, तेव्हा वेगळ्या ध्यानधारणेची गरज उरत नाही. कुठला प्रयास न करता, शब्दाचा उच्चार न करता, कुठल्या उत्तराची अपेक्षा न धरता तुम्ही जगन्मुक्तीचा अनुभव घेता. कशावर अवलंबून राहावं लागत नाही आणि कुठलं बंधन उरत नाही, असं एका परम मुक्तीचं राज्य म्हणजे प्रेम!
बस यार दा हत्थ फड लौओ, ते रब्ब नाल गल्ला कर लौओ
किस दिखावे दी लोड नई, बस प्यार विच पैए रहो, खुशी अपने आप चलके आ जांदी है
फक्त तुमचा जोडीदार सोबत असावा, त्याचा हात हाती घ्यावा अन् ईश्वराशी संवाद करावा, आनंद आपोआप तुमच्यापर्यंत पोचतो.
मेरी अमृता ताँ अज वी मेरे नाल ए, मैं ताँ अज वी अमृता लई फूल लिआंदा हाँ, ओस दे कमरे नूं सजांदा हाँ, प्यार भरियाँ गल्ला वी उस नाल करदा हाँ। फिर क्यों ना मेरे चेहरे ते ओहदी महोबत दी झलक होवे? मेरे प्यार दा प्याला क्यों ना छलकदा दिखे?
अगदी आज देखील अमृता माझ्यासोबत असते, आजच मी तिच्यासाठी सुंदरशी फुलं घेऊन आलो. तिची खोली सजवली. आम्ही प्रेमभराने जिव्हाळ्याच्या गप्पा मारत बसलो. आणि त्यामुळेच माझ्या चेहऱ्यावर एक हास्य दिसतंय तुला. मी आनंदात आहे, तर मग तो आनंद इतरांना जाणवणारच ना!
आज आत्ता इथं, तुझं अस्तित्व मला स्पष्ट जाणवत आहे. पण तू इतरांना दिसत नाहीस. आयुष्य तमाम रंग घेऊन तुझी वाट पाहतंय. तू म्हणजे एक शब्दसम्राज्ञी, तू आयुष्य लिहिलंस, तू कविता जगलीस...
मी सद्गदित होऊन इमरोजला पाहत होते. अमृताच्या अस्तित्वात ते संपूर्ण बुडालेले होते. अमृताने त्यांना चहूबाजूने कवेत घेतलं होतं. बाकीचा पूर्ण वेळ... मग मी... केवळ अनिमिष नेत्रांनी बघत राहिले.
एक मूक साक्षीदार होते मी त्या अभिनव दृश्याची. दिसणारे इमरोज आणि न दिसणारी अमृता...
हस्ती-ए-मोहब्बत की जरा तासीर तो देख
सारे जहाँ में बस वही हैं, कोई दूसरा नहीं
प्रेमाची ही अचाट ताकद तर पहा, की सारं विश्व व्यापून केवळ तीच आहे.. बाकी दुसरं कुणीही नाही...'
जीवनात प्रेमाची अपरिहार्यता अमृता इमरोज याना कळली होती. म्हणून ते प्रेम जगले. हाच संदेश त्यांच्या जगण्यातून त्यांनी जगाला दिला.
ही सुंदर साहित्यकृतीचा अनुवाद करून डॉ.वृषाली किन्हाळकर यांनी मराठी रसिकांसाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
आभाळभर शुभेच्छा.
तर्काला कारण लागतं,
प्रेमाला नाही,
प्रेम स्वतःच कारण असतं.
@ छाया बेले
पुस्तक:
ती आहेच (अमृता इमरोज: ए लव्ह स्टोरी - चा अनुवाद)
मूळ लेखिका: उमा त्रिलोक
अनुवाद: डॉ. वृषाली किन्हाळकर
प्रकाशक: अ. अ. कुलकर्णी, अनुबंध प्रकाशन, पुणे
किंमत: २२५ रु.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा