अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्रीवाद व इतर गुण विषेश

अण्णा भाऊंच्या साहित्यातील स्त्री वाद व इतर विषेश गुण !!



थोर विचारवंत, साहित्य सम्राट, अण्णा भाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील  वाटेगाव येथे झाला.
ब्रिटिश राज्यकर्त्यांनी गुन्हेगार जमात म्हणून घोषित केलेल्या मांतग समाजात या महामानवाचा जन्म झाला.
खरंतर महामानवाला कुठलीच जात नसते. मात्र त्यांच्या जातीचा उल्लेख एवढ्या साठीच की
आधीच हिंदू धर्माने शुद्रत्व लादून माणूसपण नाकारलेलं वरून ब्रिटिश सरकारचा गुन्हेगार जमात ठरवून केलेला कहर. या काळात मातंग समाजातील लोक  अतिशय खडतर जीवन जगत होते. दारिद्रय , अज्ञान, अंधश्रद्धा,
उपासमार, रोगराई, यात हा समाज खितपत होता.

      मात्र मातंग समाजातील लोक शुर होते. म्हणूनच व्यवस्थेनं त्यांच्यावर गुलामी लादून त्यांच जीवन बस्तर केलं होतं.
  तरीही या लोकात स्वाभिमान होता.
विरासारखं जगणं विरासारखं मरणं हे त्यांच्या रक्तात होतं.
   हा क्रांतीचा वारसा घेऊन हा थोर विचारवंत जन्माला आला होता.

    वयाच्या दहाव्या वर्षी अण्णा शाळेत गेले. मात्र मास्तराच्या अमानुष मारहाणी मुळे त्यांनी पुन्हा शाळेचं तोंड पाहिलं नाही.
दिड दिवसाचं प्राथमिक शिक्षण घेऊन अण्णा जगाच्या विद्यापिठात दाखल झाले.
       निसर्गाच्या शाळेत  या साहित्य सम्राटाचं शिक्षण सुरू झालं.
   डोंगरदऱ्यांतून फिरून  प्राणी पक्षी यांच जवळून निरिक्षण करीत त्यांच्याशी मैत्री करीत, त्यांचे हुबेहूब आवाज काढत  जीवनाचा अस्सल अनुभव ते गोळा करीत होते.
त्यांच्या साहित्य निर्मितीत हा अनुभव महत्त्वाचा ठरला.

      पुढे अण्णा भाऊंच्या कुटुंबाचा भाकरीच्या शोधत वाटेगाव ते मुंबई असा प्रवास .
त्या प्रवासात आपल्या वडिलांसोबत अनेक प्रकारची कामं अण्णा भाऊंना करावी लागली.
       मुंबईत पोहचल्यावर  बिगारी काम, गिरणीत  काम , अशी अनेक कामे अण्णा भाऊंना करावी लागली.
  सगळीच कामं अतिशय निष्ठेने करून अण्णा भाऊ श्रमप्रतिष्ठा जपत असत .
     जगाच्या विद्यापीठात  त्यांच  ज्ञान संपादन सुरू होतं .
खेड्यात गावकुसाबाहेर राहणाऱ्या वस्ती सारखं शहरातही उपेक्षितांच एक वेगळं जग होतं. त्या झोपडपट्टीतील कामगाराचं दुःख, दारिद्र्य,  दैन्य, अण्णा भाऊ जवळून पाहात होते स्वतः अनुभवत होते.
आणि तेच अनुभव त्यांनी  साहित्यातून मांडले आहेत.
     साहित्यिकाच्या व्यक्त होण्यामागे काही तरी कारण असतं.
आत काही तरी ठसठसणारं बाहेर काढायचं असतं. ही ठसठस जेव्हा काही तरी उद्देश घेऊन बाहेर पडते तेव्हा ती लोककल्याणकारी ठरते. संतसाहित्या हाच उद्देश होता. तोच वारसा महामानव महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांनी चालवला.
     साहित्य सम्राट  अण्णा भाऊ साठेंच साहित्य माणसाला जोडणारं साहित्य आहे.
समाजातील खल प्रवृत्ती दाखवताना कुठल्याही एखाद्या घटकाविषयी कुठेही आकस ठेवून लिहीलेलं  नाही.

     समाजात न्याय व समता स्थापित करायची असेल तर शोषित घटकांने अन्याय अत्याचारा विरोधात लढा द्यायलाच हवा अशी अण्णा भाऊंची ठाम भूमिका होती.
  हे त्यांच्या साहित्यातून व त्यांच्या जीवनातून आपल्याला दिसून येते.
     अण्णा भाऊंना  श्रमीकां  विषयी अपार कळवळा होता. त्यांच्या श्रमाविषयी नितांत आदरभाव होता. श्रद्धा होती.
  
म्हणूनच अण्णाभाऊ श्रमिक दलित यांच्या हक्कासाठी न्यायासाठी लेखणी चालवित राहिले.
   व प्रत्यक्ष जीवनातही संघर्ष करीत राहिले.
अण्णा भाऊंच साहित्य खरंतर  कोणत्याही साच्यात किंवा अमूक एखाद्या वादात कैद करता येणं शक्य नाही. त्यात कोणता वाद असेल तर तो मानवतावाद आहे.
विश्वातील शोषित, पिडीत, जगण्यासाठी धडपडणाऱ्या तसेच न्याय व समतेच्या स्थापनेसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्यांच प्रतिनिधित्व अण्णांच साहित्य करते.
म्हणून त्यांच साहित्य वैश्विक साहित्य आहे. यामधून ते विश्व कल्याणाचा, मानवमुक्तीचा, विश्व बंधुत्वाचा संदेश देतात.

  अण्णा भाऊ च्या साहित्यात जीवनाचा अस्सल अर्क, जीवनाचा सार चाखायला मिळतो.

कारण ते वास्तव जीवनानुभव आहे.
अण्णा भाऊ सोबत परिस्थिती कायम क्रुरतेनेच वागत आली मात्र या महामानवाने तिच्या समोर कधीच हार मानली नाही.
ह्रदयात दुःखाचा महासागर सांभाळून साहित्याच्या सर्वोच्च शिखर गाठले.
हे फक्त अण्णाच करू जाणे.

      माणसाच्या माणूसपणावर, जगण्यावर , अण्णाभाऊंच नितांत प्रेम होतं.
म्हणूनच त्यांनी माणूस कधी विद्रूप केला नाही.
   आपल्या सगळ्याच पात्रांसोबत योग्य  न्याय केला. चुकीचं काम करणाऱ्या पात्रांसोबत सुद्धा.
त्या पात्राचं मनोविश्लेषणात्मक भुमिकेतून त्याचं मुल्यमापन करून ते असे का वागले ही बाजू सुद्धा मांडली. ही माणसं त्यांची आपली माणसं होती.

प्रत्येक पात्र अण्णा भाऊंना प्रत्यक्ष भेटलेलं होतं.
म्हणून अण्णा भाऊंनी कुणावरही अन्याय होवू दिला नाही.
हीच त्यांच्या साहित्याची खरी ताकद व सौंदर्य आहे .

    " जो कलावंत जनतेची कदर करतो.त्याचीच कदर जनता करते हे मी प्रथम शिकूनच मग लेखन करीत असतो.माझा देशावर, जनतेवर आणि तिच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. देश सुखी व्हावा ,समृद्ध व्हावा, नि  सभ्य व्हावा , इथे समता नांदावी ,महाराष्ट्र भुमीचे नंदनवन व्हावे ,
अशी मला रोज स्वप्ने पडतात.
ती मंगल स्वप्ने पहात पहात मी लिहीत असतो. केवळ कल्पनेचे कृत्रीम डोळे लावून जीवनातील सत्य दिसत नसते. ते सत्य ह्रदयाने मिळवावे लागते. डोळ्यान सर्वच दिसतं पण ते साहित्यिकाला हात देत नाही. उलट दगा मात्र देतं.
माझा दावा आहे की पृथ्वी  शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे. त्या दलितांचे जीवन तितक्याच प्रमाणिक हेतूने निष्ठेने  मी चित्रित करणार आहे. नि करीत आहे."

अण्णाभाऊंच्या  वरील विचारातून त्यांच्या साहित्य निर्मितीचा उद्देश लक्षात येतो.

अण्णा भाऊ फक्त लोककल्याणाचा उदात्त हेतू घेऊन लेखन करीत होते.
जे कार्य संत तुकारामांनी केलं , संत कबीरांनी केलं, महात्मा फुल्यांनी केलं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्याच विचाराचा वारसा अण्णा भाऊंनी
आपल्या साहित्यातून चालवला.
म्हणूनच अण्णाभाऊंच साहित्य समाजाला दिशा दाखवण्याचं , उर्जा पुरविण्याचं काम करीत आहे.
मानवी जीवन प्रकाशमय करण्याचं सामर्थ्य अण्णाभाऊंच्या साहित्यात आहे.

      अण्णा भाऊंच्या साहित्यातील दुसरा एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांच्या साहित्यातील स्त्रीवाद !
त्या विषयी  सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की अण्णा भाऊंनी जो सन्मान स्त्री पात्राला दिला तो प्रस्थापित साहित्यात कुठेच पहायला मिळत नाही.

   अण्णाभाऊंच साहित्य हे विद्रोही ,मानवतावादी आहे.
मानववतावाद म्हटले की समान न्याय, समान अधिकार , ही मुल्ये येणारच. याच मुल्यांवर आधारित त्यांनी स्त्री पात्रे साकारली आहेत.

प्रस्थापित साहित्यात स्त्रीची रुपे  श्रंगारीक, भोगवस्तू , म्हणून दाखवली गेली आहे. नाहीतर जे आहे ते नियती म्हणून स्विकारून जगत जाणारी आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात 'ब्र' ही न काढणारी सगळ्या चालत आलेल्या परंपरांच पालन डोळे झाकून करणारी, समाजाला जशी गुलाम स्त्री  हवी असते तशी रंगवली जायची. तिच्या गुलामीच उदात्तीकरण असायचं. साहित्यात स्त्रीचं रूप हे मनुवादी मानसिकतेतून यायचं.

      मात्र अण्णांनी कणखर, तत्वनिष्ठ, बंडखोर नायिका आपल्या साहित्यातून साकारली.        तीला अन्यायाची चिड येते. त्या विरोधात ती बंड करते.सत्य व न्यायासाठी प्राणाची बाजी लावून लढण्यासाठी ती नेहमीच तत्पर असते.तिला आपले स्वतःचे विचार आहेत. तिची तत्व आहेत. त्याची ती जिवापाड जपणूक करते.तिला तिच्या मुल्यांसोबत तडजोड करायची पाळी येताच ती लोकनिंदेची पर्वा न करता प्रवाह विरुद्ध वाटचाल करण्याची हिंमत दाखवते.अण्णा भाऊच्या नायिकामधे स्वबळावर आपलं जग निर्माण करण्याची हिंमत आहे. 
याची उदाहरणंच द्यायची तर आवडी, संघर्ष, चित्रा, चंदन , मुर्ती या कादंबऱ्यांची देता येतील.
अण्णा भाऊच्या सर्वच नायिका विद्रोही, बंडखोर, व मानवतावादी आहेत. आपल्या विचाराशी प्रमाणीक असणाऱ्या नेहमी सत्य व न्यायाची कास धरणाऱ्या सत्वशील आहेत.
अण्णा भाऊनी या पात्राद्वारे समस्त स्त्री जातीचं आत्मभान जागृत केलं.व अन्याया विरुद्ध आवाज उठवण्याचा.संदेश दिला लढण्याचं बळ दिलं.
अण्णा भाऊंच्या स्वप्नातील सभ्य, संपन्न, शोषण विरहित समाज निर्मिती करायची असेल तर सगळे भेद अगोदर मिटायला हवेत.
या साठी संघर्ष हा करावाच लागतो .
एकंदर हाच अण्णाभाऊच्या जिवनाचा व साहित्याचा सार आहे.

मानवतेची शिकवण देणारे महामानव अण्णा भाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम !!

      
             छाया बेले, नांदेड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .