साम्राज्ञी ते गुलाम: स्त्रीच्या अधोगतीचा प्रवास| भाग दोन | मराठी लेख
पुढे स्त्रीचे जीवन अतिशय कठीण होत गेले.
तिला वर निवडीचा अधिकार राहिला नाही. बालविवाह, लहान मुलींचे वयस्कर पुरुषांशी लग्न करून देण्यात येऊ लागले. त्यामुळे तरुण वयात मुली विधवा होत. त्यांना सांभाळण्याची तयारी माहेरच्यांची किंवा सासरच्या मंडळीचीही नसायची. स्त्रीचा पुनर्विवाह ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती.
या कारणांमुळे सतीप्रथा सुरू झाली. पतीच्या निधनानंतर तिची इच्छा नसतानाही जबरदस्तीने सरणावर बसवून हत्या करण्यात येत होती. त्या प्रथेचे उदात्तीकरण करण्यात आले व तिची मरणानंतर सती म्हणून पूजा करण्यात येऊ लागली. आजन्म अपमान सहन करीत जगण्यापेक्षा मेल्यावर तरी मान मिळावा, या इच्छेखातर काही बायका सतीच्या नावाने आत्महत्या करायला तयार होत असाव्यात.
समाजात हुंडापद्धती रूढ झाली. तिला प्रतिष्ठा देऊन समाजमनावर रुजवले गेले. ही अनिष्ट प्रथा आजही भारतीय समाजात एक मोठी समस्या बनून राहिली आहे.
लहानपणी पित्याच्या अधिकारात, तरुणपणी नवऱ्याच्या अखत्यारीत, म्हातारपणी मुलाच्या धाकात जिणे जगावे लागे व आजही ही परंपरा कायम आहे.
मुलांवर पित्याचा अधिकार असल्याने मुलगी अर्भकाला जिवंत ठेवायचे की नाही, हे पिता ठरवत असे. जास्तीत जास्त तर मुलगी जन्माला येताच तिची हत्या केली जाऊ लागली.
स्त्री बंदिस्त व गुलाम झाली असल्याने याला विरोध करणारं कोणीही उरलं नाही. पुरुषसत्तेचे नुकसान पुरुष कसे काय करणार? हीच परंपरा वर्षानुवर्षे सुरू राहिली. त्यात अजून बऱ्याच अनिष्ट प्रथांची भर पडत गेली.
तिच्यावर अनेक निर्बंध घातले गेले. तिने आपल्या पालक व मालकाच्या मर्जीविरुद्ध कुठलेही काम करू नये. म्हणजेच लग्नाआधी वडील व लग्नानंतर नवरा जे म्हणेल तेच करावं. म्हणूनच पुराणात स्त्रीला निरिन्द्रिय असेही म्हटले आहे. याचाच अर्थ ती आपल्या कोणत्याच अवयवाचा वापर स्वतःच्या मर्जीने करीत नाही. दुसऱ्याच्या आदेशानुसार ती सगळं करते.
कोणत्या स्त्रीने परंपरा मोडण्याचा प्रयत्न केलाच, तर तिच्यासहित तिच्या कुटुंबाला सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागे. अशा प्रकारे कोंडीत पूर्णपणे पराजित करून तिला शक्तिहीन, असहाय्य, लाचार बनवले गेले.
तिच्या दैनंदिन जीवनातही अनेक जाचक नियम बनवले गेले. तिने मोठ्याने बोलायचं नाही, मोठ्याने हसायचं नाही, तोंडावर पदर किंवा हात ठेवूनच हसायला हवं, लोकांसमोर हसू नये. हसणं घरंदाज स्त्रियांसाठी दूषण आहे. या अशा गोष्टींचं, म्हणजेच तिला आनंदाला पारखं करणाऱ्या गोष्टींचं उदात्तीकरण केलं गेलं.
कोणत्या स्त्रीने जर हे नियम मोडायचा प्रयत्न केला, तर तिला लोकनिंदेला सामोरं जावं लागायचं. वर्षानुवर्षे या गोष्टीचे पालन करता करता हे सगळं तिच्या एवढं अंगवळणी पडलं आहे की आज कितीही शिक्षण घेतले असले, तरी ती यातून बाहेर पडायला तयार नाही.
सद्यस्थिती
हे जरी खरं असलं, तरी स्त्रिया जोपर्यंत गुलाम मानसिकतेतून बाहेर पडलेल्या नाहीत, याची उदाहरणे पावलोपावली बघायला मिळतात. उपास-तापास, नवस-सायास स्त्रियाच करताना दिसतात. नवरात्रीत दररोज एका नव्या रंगाची साडी नेसून त्यावर मॅचिंग दागिने घालायला मिळाले पाहिजेत, एवढंच ध्येय असतं. साडी, दागिने, खाणं, पिणं मिळालं म्हणजे झालं. जन्मभर सेवा करायची, अपमान सहन करायचा, मार खायचा. हे सगळं सहन करणारीला मग चांगली म्हटलं जातं.
माहेरातूनही सांगितलेलं असतं की, “नांदून नाव कर नाहीतर मरून नाव कर; मात्र परत फिरून येऊ नकोस. बापाच्या पागोट्याची शान राख.” ही सद्यस्थिती आहे. मग तिच्या पुढे दोन पर्याय असतात, एक सहन करणं, दुसरं जीव देणं.
नवरा म्हणजे देव, त्याच्या आधी जेवायचं नाही. गळ्यात मंगळसूत्र नसेल तर पाणी सुद्धा प्यायचं नाही. नवऱ्याला अहो-जाहो म्हणायचं, नाव घ्यायचं नाही, उलटं बोलायचं नाही, प्रश्न विचारायचे नाहीत, पैशाचा हिशेब विचारायचा नाही. हुंडा कमी म्हणून छळ, दररोज माहेरच्यांचा पाणउतारा. हे सगळं तिला निमूटपणे ऐकून घ्यावंच लागतं, कारण आता माहेर परकं झालेलं असतं.
ग्रामीण भागातच नाही, तर नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय सुशिक्षितांच्या घरातही उच्चशिक्षित स्त्रियांची हीच अवस्था आहे. लहानपणापासून होणाऱ्या संस्कारांनी त्यांना आधीच व्यवस्थेपुढे शरणागती पत्करायला लावलेली असते.
आई पुढे मोठ्या अभिमानाने आपण कसा त्रास काढला, यातून इथवर आलो, आज सगळे आपला आदर करतात, हे आपल्या मुलीला सांगते व “तू माझं नाव कर,” असं भावनिक आवाहन करते. असा हा वारसा पिढी दर पिढी चालत राहतो.
वरून सगळे कायदे महिलांच्या बाजूने आहेत म्हणून ओरड केली जाते; मात्र या कायद्यांचा लाभ किती महिला घेतात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सामाजिक दडपणामुळे या महिला कायद्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.
घराबाहेर पडून नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही या पुरुषसत्ताक मानसिकतेला सामोरं जावं लागतं. सहकारी किंवा वरिष्ठांकडून सन्मानाची वागणूक मिळेलच असे नाही. काही वेळा त्यांच्या नैतिक-अनैतिक इच्छा थोपण्याचाही प्रयत्न केला जातो. तिने ते धुडकावून लावले, तर मग अडवणूक करणे, इतर कारणांसाठी त्रास देणे, छळ करणे, ब्लॅकमेल करणे, टिंगल-टवाळी करणे, चुकीच्या गोष्टी पसरवणे अशा गोष्टी केल्या जातात.
हे सगळं का होतं, तर याच्या मुळाशी तिला भोगवस्तू समजणारी पारंपरिक मानसिकता कारणीभूत आहे. तिचं कर्तृत्व, तिची बुद्धिमत्ता, विद्वत्ता यांच्याशी काही देणंघेणं नसतं. ती माणूस आहे, याच्याशी तर दूरदूरपर्यंत संबंध नसतो. इथे फक्त तिचं शरीर हीच तिची ओळख असते. एकविसाव्या शतकात माणूस ही मानसिकता घेऊन जगतो, ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे.
संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले असले, तरी महिलांना वारसाहक्क मिळत नाही. त्याकरिता त्या आश्रितासम जीवन जगतात.
काही दिवसांपूर्वी #MeToo या चळवळीच्या माध्यमातून अनेक महिला आपल्यावर झालेल्या शोषणाविषयी, अन्यायाविषयी बोलत्या झाल्या. अनेकींच्या मनात बराच काळ आत घुसमटत राहिलेलं यामुळे बाहेर पडलं. हे सुरू असताना समाजमाध्यमातून त्यावर येणारी मतं, चर्चा या आजही स्त्रीच्या बाबतीत पुरुषसत्ताक मानसिकतेत तसूभरही बदल न झाल्याच्या निर्देशक होत्या.
“ती आधी कशी काय तयार होते?” किंवा “चांगल्या माणसाला बदनाम करतात या, दोघांच्या मर्जीने झालेलं असतं.” याहीपेक्षा अजून खालच्या दर्जाची भाषा असायची. काम मागायला गेलं म्हणजे तिच्या जवळ फक्त शरीराचीच मागणी करायची असते का? इतर कोणत्याही क्षमता तिच्यात नसतात? तिचं काम बघून निवड का केली जाऊ नये?
चित्रपट किंवा मालिकांमधून हेच विचार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत. सहन करीत जाणारी, निर्णय न घेणारी, दुसऱ्याच्या विचारांवर चालणारी आदर्श सून, शिकलेली स्त्री वाईट, चारित्र्यहीन दाखवली जाते. हे सगळं नवीन स्वरूपात समाजमनावर बिंबविलं जात आहे. 'खानदान की इज्जत' या व अशा संकल्पना अजून मजबूत करून तिच्या पायातील बेड्या मजबूत केल्या जात आहेत. या संकुचित विचारांतून आपल्या समाजात आजही ऑनर किलिंगच्या घटना घडून येतात.
माणूस म्हणून आपण नेमके कुठे चाललोय, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. स्त्री-पुरुष हे एकमेकांना पूरक आहेत. शरीररचना ही वेगळी असणं हे सर्वच प्राणीमात्रांना प्रजननासाठी निसर्गानेच निर्माण केली आहे. त्यावरून कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरू शकत नाही.
या वेगळेपणाच्या विचारामुळे स्त्री-पुरुष दोघेही एकमेकांपासून दुरावले गेले आहेत. एकाकीपणाचे शिकार झाले आहेत. यावर मात करण्यासाठी विवेकशील पुरुष मंडळींनी समतेवर आधारित समाजरचनेकरिता पुढाकार घ्यायला हवा. ही काळाची गरज आहे.
ही दास्यत्वाची-स्वामित्वाची भावना नष्ट होऊन पुरुष जेव्हा तिचं माणूसपण मोकळ्या मनाने स्वीकारेल, तेव्हा समाजात अस्वस्थता उरणार नाही. तोपर्यंत स्त्रीदास्य टिकून राहील, सोबत सगळ्या शोषक संस्थाही!
'स्त्री ही जन्मत नाही, तर घडविली जाते,' हे सिमोन द बोहुआर या लेखिकेचं वाक्य समस्त स्त्रीजीवनाचा सार आहे.
“स्त्रीवर लादलेले निकृष्ट जीवन हे एकूण भारतीय समाजाच्या निकृष्टतेचे व दुरावस्थेचे एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. आजही हे चित्र पालटलेले नाही. ही बाबच खरी क्लेशकारक आहे.” — आ. ह. साळुंखे
यावरून स्त्रियांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अपमान, उपेक्षा, शोषण यांची सवय झाली. हा अन्याय आहे, असंही वाटत नाही. कारण वर्षानुवर्षे मनावर हेच बिंबविलं गेलंय. हजारो वर्षांपासून अंगवळणी पडलेल्या गोष्टी जीवनातून वगळणं सोपं नाही. त्याकरिता “भारतीय नारी” हे गुलामगिरीचं सोनेरी कवच फोडून बाहेर पडावं लागेल.
पंडिता रमाबाईंनी एकटीने या व्यवस्थेच्या विरोधात बंड करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केले. माय सावित्रीलाही या विकृत मानसिकतेने छळलं. मात्र त्यांचं उद्दिष्ट हे स्त्रीला मुक्त करण्याचं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला माणूस म्हणून जगता यावे यासाठी आजीवन प्रयत्न केले. स्त्रियांच्या हितासाठी अनेक कायदे केले.
आपल्यात स्वतंत्र विचारक्षमता विकसित झाली आहे का? आपण स्वतःला एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व समजतो का? की एखाद्या जात-धर्मातील “स्त्री” समजतो? जाती-धर्म स्त्रियांनी निर्माण केले नाहीत. या संस्थांनी स्त्रियांना गुलामच केले, मग या गोष्टीचा एवढा दुराभिमान का बाळगावा? याचा स्त्रियांनी विचार करायला हवा. वैचारिक प्रगल्भता, निर्णयक्षमता विकसित करीत आत्मोन्नतीवर लक्ष केंद्रित करायला हवे. आर्थिक परावलंबन हे गुलामीचे एक महत्त्वाचे कारण आहे. स्वावलंबी होत महिलांनी आत्मसन्मानाच्या जगण्याचा पुरस्कार करायला हवा.
धर्मकारण, राजकारण, समाजकारण यांचा ताबा फक्त एकाच समूहाकडे रहावा, या हव्यासापोटी स्त्रीला गुलाम केले गेले आणि स्त्री-पुरुषांच्या नैसर्गिक सहजीवनाचे विकृतीकरण घडवून आणले गेले. हे सगळं कोणत्याही देवाने केलेले नाही, तर माणसाने तयार केलेले नियम आहेत आणि हे माणसानेच ध्वस्त करायला हवेत. स्त्रियांनी आपल्या जीवनात काही स्वतंत्र उद्दिष्ट ठेवून आत्मशोध घ्यायला हवा.
— छाया बेले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा