पेरणी - शेतकऱ्याच्या संघर्षाची कहाणी |मराठी कथा


// पेरणी //


रोहिणी नक्षत्र थोडं झिरपलं. शेतकऱ्याला पेरणीचे वेध 


लागले. सगळीकडे लालबुंद फुलासारखे किडे फिरू लागले. बाया सगळ्या त्यांना मृग घेऊन येणारे किडे म्हणून हळद कुंकू लावून पाऊस पडू दे म्हणून पाया पडू 

लागल्या .

"पाऊस पडतो मिरगा आधी रोहिणीचा 
पाळणा हलतो भावा आधी बहिणीचा"

पहाटे जात्यावर दळताना बाया ओव्या म्हणू लागल्या. सगळे शेतकरी  मृगाचा पाणी पडताच पेरणी करावी म्हणून सगळी तयारी करून बसले होते. सटवा आपली तीन गुंठे जमीन पेरण्यासाठी घरातील डाळ दाना विकून बी -बियाणे  घेऊन आला. तर  नामूनं एकरभराच्या पेरणीसाठी बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून बियाणं आणलं. शेवंता बरेच दिवस आदळआपट करीत राहिली .
मात्र तिलाही कळत होतं दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणून मग काही दिवसांनी शांत झाली .
महादुला पाच एकराची पेरणी करायची होती. म्हणून त्यांन सोयाबीन न वीकता तसंच लावून ठेवलं होतं पेरणीसाठी.
ते सोयाबीन कुंभाराच्या गाढवावर लादून
सावकाराकडं घेऊन गेला सावकारांन वजन काटा केला. आता भाव पडलाय म्हणून अर्ध्या किमतीत सोयाबीन घेतलं. महादुला हळूहळू आपला जीव कोणीतरी काढून घेत आहे असा भास होऊ लागला. त्याचा चेहरा वरचेवर पांढरा फटक पडत होता. गळ्यावर लटकलेल्या दस्तीनं  वरचेवर घाम पुशीत सावकाराच्या गादी पुढं दीनवाण्या चेहऱ्यानं बघत बसला होता. सावकारानं गेल्यावर्षी घेतलेल्या कर्जाची वही काढली तशी महादूच्या जीवाची घालमेल अजून वाढली .
मागचं कर्ज फिटून शिल्लक शिल्लक राहिली तर काही नगदी काही उधार पेरणीची सोय करता येईल असा विचार करून तो स्वतःला धीर देत होता.
जर सावकारानं बियाणं दिलच नाही तर..? असा विचार येताच त्राण गळून जात होतं .नाही नाही सावकार देईलच आपण दरवेळी वेळेवर कर्ज फेडतो .आता हेच सोयाबीन दुसऱ्या दुकानावर विकून घेतलं असतं.
पण तसं केलं नाही. आपल्या इमानदारीचे मोल सावकार करीलच त्याच्या मनाचा तराजू चांगल्या-वाईट विचारावर हेलकावे खात होता. उंचापुरा काळा कुळकुळीत अगडबंब सावकार आधीच जाड असलेला ओठ अजून पुढे वाकडा करून कपाळावर आठ्या आणून हिशेब करण्यात मग्न होता. महादू त्याच्या गळ्यातील भलीमोठी सोन्याची चैन दहाही बोटातील जाड जाड अंगठ्या न्याहाळीत होता. मनातल्या मनात त्याचा हेवा करीत होता .आम्ही वर्षभर कष्ट करून यांचे घर भरतो हे लोक एका जागेवर बसून आमच्या कष्टावर ऐश करतात. काय म्हणावं या भोगाला. असा विचार करून तो वैफल्यग्रस्त होत होता. "महादू.." 
सावकार आपल्या जाड्या बोटात धरलेला पेन नाचवत बोलला .
"जी.." 
पुढं सावकार काय बोलणार याची वाट पाहू लागला. 
"गेल्या सालची थकबाकी पंचवीस हजार आहे. तुझा माल झाला वीस हजाराचा. पाच हजार बाकी राहिले , ते कधी आणून देणार? "
सावकाराचे शब्द कानावर पडताच महादूच्या डोळ्यापुढं अंधार दाटला. सगळं भोवताल गरकन फिरलं. सावकार त्याला यमा सारखा भासू लागला.  "सावकार पुढच्या सुगी ला सगळं कर्ज फेडतो. मला तेवढं 
बी-बियाणे द्या ."
स्वतःला सावरत महादू मनधरणीच्या सुरात म्हणाला. "उद्या पैसे घेऊन ये बियाणे घेऊन जा ."
सावकार हात झटकत बोलला. "सावकार मोठ्या मुश्किलीने एवढाच म्हणाल संभाळून ठेवला होता पेरणीसाठी. घरात दुसरं काही नाही ."
महादू विनवणी करीत म्हणाला "आरं महादू आम्ही काय दानधर्म करायला दुकान काढलय का?"

सावकार म्हणाला
यावर महादू विनवणीच्या सुरात म्हणाला,
" दानधर्म नाही सावकार येत्या सुगीला सगळं कर्ज फेडून टाकतो व्याजासकट." 
"ते काय सांगू नको मला माणसाचा आणि पावसाचा बी काही भरोसा राहिला नाही आम्ही उधार देणं बंद केलय. तू दुसऱ्या कोणाकडे बघ बाबा."
एवढं बोलून सावकार उठला आणि दुकानावर काम करणाऱ्या लोकांवर ओरडत बाहेर पडला. महादुला जागेवरून उठवत नव्हतं.
पेरणी कशानं करू हा प्रश्न त्याच्या डोक्यात नाचत होता. गळ्यावरच्या रुमालानं पुसला. घसा कोरडा पडला होता. बाजूच्या हॉटेल समोरच्या टाकीतले मगभर  पाणी घशात ओतलं थोडं बर  वाटलं.
अंगठा तुटलेली चप्पल ओडत घरचा रस्ता धरला.
दाढीचे वाढलेले खुंट त्याच्या चेहऱ्याचा दिनवानेपण अजून वाढवत होतं. डोक्यात विचारांची घरघर सुरू होती .त्याच घरघरीत रामा सावकाराची आठवण झाली. रामा सावकार बेरकी माणूस .कर्ज देण्यासाठी काहीतरी गहाण ठेवल्याशिवाय कर्ज देत नसे. महादूकडे दुसरा पर्याय नव्हता. तो रामा सावकाराच्या घराकडे निघाला. एका डोळ्यानं अधू रामा सावकार एका डोळ्याने समोरून येणाऱ्या महादू कड  टक लावून बघत म्हणाला.
"ये महादू, कसा काय आलास गडे?" 
"सावकार पेरणीची अडचण आहे पैसे पाहिजे होते."
" किती रं ?" 
"पंधरा हजार."
गहाण काय ठेवणार आहेस? रामा सावकाराच. बोलना एकूण महादूचा चेहरा सरकन उतरला. सकाळपासूनची कहाणी त्यांन संगतवार सांगितली. म्हणाला, "सावकार आता ठेवायला बाकी काहीच  नाही. शेतातला माल आल्याबरोबर व्याजासकट तुमचे पैसे आणून देतो."
" तू देशील बाबा पैसे ,पर म्या  काहीतरी गहाण ठेवल्याशिवाय पैसे देत नाही. तुला तर माहितच आहे की ."
महादू गप्प बसलेला  बघून सावकार स्वतः च म्हणाला, "तुझ्या शेतावर बँकेचं कर्ज आहे. परंतु तुज्या बैलाच्या पावत्या माझ्याकडं ठेवलास तरी मी पैसे देतो."
बैलाच नाव काढताच महादू च्या काळजात चर्र.. झालं.
घरीच जन्मलेले दोन्ही वासरं पोटच्या पोरासारखं जीव लावून महादूनं त्यांना लहानाचं मोठं केलं होतं .अनेक अडचणी आल्या तरी त्यांना विकण्याचा विचारही त्याच्या मनात आला नाही. माझा मोरया, ढवळ्या माझ्या चंदू पेक्षा कमी नाहीत .म्या कसा गहाण ठेवू त्यांना ?माझ्या चंदुला कोणी वर्षभर गहाण ठेवा म्हणलं तर मी ठेवीन का? महादूचा  जीव कासावीस होत होता. 
"बघ विचार कर पेरणीसाठी कोणी ना कोणी सारखे येतंय कोणी पैसे घेऊन गेलं तर तुझी अडचण दुर करता यायची नाही पुन्हा मला ." 
महादू ला दुसरा मार्ग दिसत नव्हता. काळजावर दगड ठेवून उठला. मनाशी काहीतरी ठरवून घराकडे निघाला. रांजनातलं तांब्याभर पाणी घेऊन घशात ओतलं. अवसान नसल्यागत दाराशी बसला .शांता दिवसभर शेतातली धसकटं वेचून नुकतीच आली होती .चुलीजवळ बसून चुलीची राख भरत होती. महादूचा पांढराफटक पडलेल्या चेहरा बघून तिच्या काळजात कालवाकालव झाली. प्रत्येक पेरणीच्यावेळी कर्जासाठी दारोदार भटकणं ही जणू त्याची नियतीच झाली होती. त्याच्याकडे बघून हळहळणं तीची नियती. "कावं काम झालं नाही का ?"
शांता काळजीच्या सुरात म्हणाली तो तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता म्हणाला, त्या चांदईच्या उतरंडीला बुडाच्या गाडग्यात चिंदकात बांधलेले कागद आहेत ते आण इकडं." 
शांता उठली उतरंडीच्या गाडग्यात सोन बांधून ठेवल्यागत ठेवलेली कागदाची पुरचुंडी त्याच्या हातात आणून दिली. त्या कागदाचा मोल ते दोघेही जाणत होते. त्यांना एकदा शांताच्या तोंडाकडे बघितलं आणि उठून चालू लागला. त्याच्या मनाची घालमेल चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती . तीही तशीच जाऊन चुलीजवळ बसली. 
साठ हजाराच्या बैलजोडी वर सावकाराने पंधराहजार कर्ज दिलं. महादू मनात चक्रवाढ व्याजाचा   हिशोब करू लागला. क्षणभर विचार केला, हे कर्ज आपल्याकडून फिटलं नाही तर? पोटच्या पोरासारखी बैलं सावकार घेऊन जाईल. आणि त्याच्या काळजात धस्स झालं. दुसऱ्या क्षणी हिम्मत बांधली .खूप कष्ट घेईल आणि ह्या सावकाराचं कर्जफेड करील. माझ्या मोरया ढवळ्याला मी माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. पैशाचं पुडकं रुमालात गुंडाळून पोटावर घट्ट आवळून गाठ मारली व घराकडे चालू लागला. आशा आणि निराशेचा पाठशिवणीचा खेळ मनभर सुरू होता. त्यावर मात करत तो पुढे जात होता.
   महादूचा बाप  गोविंदला पेरणीचं भारी अप्रूप सत्तर पंच्याहत्तर उन्हाळे-पावसाळे बघितले तरी उन्हाळाभर लहान पोरांनी खेळाचे सामान गोळा करावे तसा हा बिया गोळा करायचा.
सुताराच्या म्हातारीकडून भेंडाराच बी ,लोहाराच्या काशीबाई कडून दोडक्याचे बी, कुणाकडून भोपळ्याचे बी, कुणाकडून काकडीच्या बिया,  तर कुणाकडून चवळीचे दाणे, कारल्याच्याचे बी घेऊन यायचं रानातून येताना कुणाच्या शेतात ढोरांच्या कोंढणावर कोणी हुरड्याची वाळलेली कणस बिया साठी ठेवली असतील तर त्यातले  एक काढून गमच्यात बांधून घेऊन यायचा. ज्याचं आणलं त्याला सांगायला मात्र विसरायचं नाही. त्याच्या ह्या सवयीमुळे त्याला गावात बियावाला गोविंद बाबा असे म्हणायचे. कुणाकडे कोणतं बी नसेल तर गोविन्दकडे हमखास मिळणार याची खात्री असायची. पट्ट्याच्या बियाची तयारी करीत गोविंद शांताला  म्हणाला "वाळकाच  बी  नाही का अवंदा आपल्याकडे." 
"नाही "
सासरा सुनेच बोलणं रस्त्यावर जाताना ऐकून  गुजा माय गोविंदाची भावजय त्याला चिडवून म्हणाली
"  तोंडात एक दात नाही वाळकाचं बी इचारतय म्हतारं."  
गुजामाय आणि शांत एकमेकीच्या तोंडाकडे बघून हसल्या मात्र गोविंदच कुणाकडेही लक्ष नव्हतं. तो आपल्या कामात मग्न होता.           लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना नव्या सृजनाची ओढ लागली होती .नक्षत्राचा राजा मृग अगदी रुबाबात कोसळला. तप्त विरहीणी धरती तृप्त झाली. भूमिपुत्रांनी भूमातेची ओटी भरण्यासाठी बियाण्याच्या ओट्या रिकाम्या केल्या. बळीराजा सुखावला. बिजा मधून कोवळे अंकुर वर येऊन वाऱ्यावर डोलू लागले . वारा शीळ घालीत कोवळ्या अंकुरांना जोजवू लागला .रानात रान भाज्या आल्या. गरिबाच्या हातावर मीठभाकर ऐवजी भाजी-भाकरी दिसू लागली .सगळं आलबेल वाटत असताना अशातच पावसाने उघडीप दिली. पंधरा दिवस उलटून गेले तरीही पावसाचा पत्ता नाही. कोवळे अंकुर सुकून माना टाकत होते. शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. महादूचा जीव टांगणीला लागला होता . त्याला आपल्या बैलांची चिंता लागली होती.
आभाळात तरंगणाऱ्या ढगाकडे निरखून पहात बसायचा. हा ढग तर पांढरा आहे एवढाच जर पाण्याने भरून आला असता अन् बरसला असता तर सगळं शिवारभर पाणीच पाणी झालं असतं. डोळे उघड बाबा आमची दया येऊ दे तुला. महादूचा  जीव तिळतिळ तुटायचा .महादू वाटेने येणाऱ्या-जाणाऱ्या गुराख्यांना विचारायचा , पाणी कधी पडेल रं पांढरेफटक ढग फिरायलेत  आभाळात .
'त्यालाच ठावं' असं म्हणून गुराखी पोरं  पुढे निघून जायचे. त्याच्या जीवाची घालमेल अजून वाढायची .पुन्हा आभाळाकडं बघत बसायचा .
रोजच्याप्रमाणे त्याचा दिनक्रम सुरू झाला .पुन्हा शेताच्या कडेला मोरया ढवळ्याला सोडून हा आभाळाकडे बघत बसला.  खुरट्या गवताच्या काड्या खरडून खाण्यात बैल दंग होते. महादेव कुणाची तरी वाट पाहत होता .कारण त्याला रोजचा  प्रश्न पुन्हा विचारायचा होता. त्याच्या जीवाची घालमेल कमी होईल असं उत्तर त्याला हवं होतं. इतक्यात समोरून सोपान तात्या येताना दिसला .डोक्यावर पाण्याची भरलेली चरवी .एका हातात खुरपं, दुसऱ्या खांद्यावर पहार, चरवीच्या वर धुडक्यात बांधलेली भाकर , गुडघ्याच्यावर खोचलेलं धोतर, समोर बघून चालत होता. त्याला बघून महादू पटकन उठला व रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहिला. तात्या लई तयारी करून निघालास? शेताकडे काय काम काढलस? "त्याला थांबवण्यासाठी महादूनं बोलायला सुरुवात केली. धुऱ्याच्या कडला मोठे धोंडे आहेत दोन-चार, उकरून काढाव म्हणतो .सोपान तात्या चालत चालत उत्तर दिला. व चालू लागला. तात्या थांबायचा आकार दिसत नाही म्हणून महादू थेट आपल्या प्रश्नाकडे वळला. "तात्या आज लई गर्मी हाय, उनबी हाय पाणी येईल का आज? " 
कसलं येतय रं पाणी, दुबार पेरणी कराव लागतय  काय की ,आलेला ढग वार घेऊन चाललंय. "
अजून बरंच काय काय पुटपुटत सोपान तात्या निघून गेला. महादुला त्याचं पुढं काही ऐकावसही वाटलं नाही .का बोललो याच्याशी असंच त्याला  वाटू लागलं. सोपान तात्यांनं त्याच्या मनाची अस्वस्थता वाढवले होती .अंगातलं अवसान गळल्यागत वाटू लागलं होतं. डोळ्यापुढे अंधार दाटू लागला. ग्लानी येऊन तो कोसळला. 
        रामा सावकार धोतराचा सोगा हातात धरून घराकडे येत असताना पाहून माधवच्या काळजात धस झालं. त्याच्या मागेच त्याचे दोन मुनीमही होते. एकाच्या हातात काठी, दुसऱ्याच्या हातात कासरा होता. राम सावकार दारासमोर येऊन थांबला व म्हणाला, "चला कासराल लावा रे, बैल घेऊन चला, आपल्या वाड्यात नेऊन बांधा ."
सावकाराचे शब्द बाहेर पडतात आणि मुनीम  दावणीचे बैल सोडून कासरा बांधून पुढे ओढू लागतात. बैल मागे ओढ घेत होते. एक मुनीम त्यांना काठीने मारत होता. महादू हे सर्व पहात होता. मात्र त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. शरीर जमिनीला खिळून राहिलं होतं. तो पुढे होऊन  सावकाराला त्याच्या मुनिमांना म अडवू पाहत होता. मात्र तो लोळागोळा होऊन जागेवरच पडून होता. जणू त्याचं शरीर  पांगुळ होतं .तो हे सगळं अगतिकपणे पाहत होता.  काहीच करू शकत नव्हता. 
पाण्याचे थेंब अंगावर पडल्याने महादू भानावर आला. जोराचा पाऊस सुरू झाला होता.दोन्ही बैल डोक्याला आळीपाळीने चाटत त्याच्याजवळ थांबले होते. पाऊस पाहण्यासाठी जणू मालकाला उठवत होते. महादूने उठून आधी त्या दोघांना गळ्याला लावून घेतले .त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पावसाच्या पाण्यात मिसळून वाहून जात होते .दुष्ट स्वप्नातून तो भानावर आला अंकुरलेल्या रोपांना जीवदान मिळालं होतं

छाया बेले, नांदेड .


ईस्कोट - मराठी कथा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .