मी घडत जाताना
//मी घडत जाताना//
माझ जन्मगाव मराठवाड्यातील नांदेड शहरापासून बसने दोन ते अडीच तासाच्या अंतरावर मुखेड तालुक्यात 'माकणी' हे छोटासं गाव आहे.
आज घडीला या गावची लोकसंख्या पंधराशे आहे.
डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावात सगळीकडून कोणत्याही मार्गाने गेले तरी गावाच्या जवळ गेल्याशिवाय गाव दिसत नाही.
वेशीबाहेर दलित वस्ती, यात गावाच्या आत शिरण्याआधी सुरवातीला एक छोटा मांगवाडा लागतो. त्यानंतर मारुतीचा पार , पाराच्या नंतर त्या काळचा महारवाडा , त्यानंतर दुसरा मांगवाडा.
गावात वेशीच्या आत मराठा, हटकर या दोन जाती बहुसंख्यांक आहेत .
जास्त लोकसंख्या या दोन जातीची आहे.
बाकी एक मुसलमानाचे घर हे छोट्या मांगवाड्याशेजारी मात्र गावाच्या आत आहे. याव्यतिरिक्त कोमट्याची दोन घरं. सुताराचे एक घर, लोहाराचे एक घर.
गावातील सगळ्या लोकांकडे शेती होती.
कुणाकडे कमी- जास्त हलकी, भारी असेल पण सगळे शेतकरीच होते.
छोट्या मांग वाड्यातील तसेच महारवाड्यातील लोकांकडेही शेती होती त्यात कष्ट करून ते आपल्या उपजीविकेची पूर्तता होईल इतपत उत्पादन काढत होते.
कुटुंब मोठं असेल तर दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून संसाराचा गाडा चालवत असायचे.मांगाचंही असंच चालत असे.
सगळ्याच सणाला गावातील प्रत्येक घरातून गाव देवांची पूजा होत असायची. दलित समाज तेवढा मारुतीच्या पारावर जात नव्हता. कारण पारावर जाण्याची मान्यता त्यांना नव्हती.
मांग, महार या दोन जाती सोडल्या तर इतर सर्वांना मारुतीच्या मंदिरात प्रवेश होता.
72 ते 89 माझ्या जीवनातील इतकी वर्ष माकणीत गेली. सगळे सणवार मिळून साजरे करण्याची परंपरा होती. मोहरमच्या रात्री गावातील सगळी लोक रात्रभर नाचत. सोंगे आणत रात्र जागून काढत असत.
अभंग, कीर्तनाच्या गायन वादनाच्या कार्यक्रमात मुस्लिम पुरुष सहभागी असत. आणि गावचा पाणवठाही एकच होता. गावात जात ही फार टोकदार स्वरूपाची नसली तरी प्रत्येकजण आपल्याला नेमून दिलेल्या नियमात बांधलेला होता. तो नियम मोडण्याचा प्रयत्न कोणी करत नसे.
माझ्या वडिलांकडे वडिलोपार्जित दहा एकर शेती होती. बैल, गाई, म्हशी असं जे शेतकरी कुटुंबात असायचं ते सगळं होतं. आजोबांना, वडिलांना गावात मान होता कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात या दोघांचं मत महत्त्वाचं ठरत होतं. घरात आई-वडील, आजोबा व मी असं चौकोनी कुटुंब होतं आमचं.
आई उदगीर या ऐतिहासिक महत्व असलेल्या शहरातली.
4 इयत्ता शिकलेली त्यामुळे , वाचनाची आवड असलेली.शिक्षणाविषयी फार आस्था होती. स्वभाव शांत, समंजस आणि कणखर होता.
घरातल्या सगळा आर्थिक कारभार वडील व आजोबा यांच्या हाती होता.
आई-वडिलांचं कधी भांडण होत नसायचं मात्र वर्ष-सहा महिन्यांनी वडील छोट्याशा कारणावरून आईला बेदम मारहाण करायचे. आईने मात्र कधी प्रतिकार केला नाही.
आमच्या गावात तेव्हा चौथीपर्यंत शाळा होती.आई शिकलेली असल्यानं मी सुद्धा शिकावं अशी तिची मनोमन इच्छा होती.
त्यामुळे तिने माझं चौथ्या वर्षातच शाळेत नाव टाकलं. शाळेच्या नियमात बसत नसल्याने मास्तरांना विनंती करून तिने माझं वय दोन वर्षे वाढवून घेतलं.
आई-वडील हिंदू धर्माला मानणारे. मात्र घरात देव्हारा वगैरे नव्हता.आई ,सणावाराला न चुकता नैवेद्य करून गावातील सगळे देव पुजून घ्यायची. वडीलही देवभोळे नव्हते. आईही तशीच होती.
पाळी सुरू झाल्यावर विटाळ वगैरे ती पाळत नसे. व मलाही कधी तसे करायला सांगितले नाही. ती मला रामायण-महाभारतातील स्त्रियांच्या गोष्टी सांगून ' बाईने तसंअसावं' या वाक्याने कथेचा शेवट करी . स्त्रिया पुराणातील स्त्रियांसारख्या असाव्यात असं तिचं ठाम मत होतं.
दैनंदिन जीवनातील चुकीच्या परंपरा ती पाळत नसे. गावात चप्पल न घालणे, दलित स्त्रियांसारखा काष्टा घालने, याला फाटा देऊन ती गावातून चप्पल घालून जायची व गावातील बायका सारखीच लुगडे नेसायची.
तिचे काका विठ्ठलराव खादिवाले हे आमदार असल्याने त्या संस्कारात वाढल्यामुळे आईला सामाजिक, राजकीय बाबींची बरीच जाण होती. माय सावित्री व क्रांतिबा विषयी भरभरून बोलायची.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयीही तिला आस्था होती.जेव्हा लोकांत बाबासाहेब फक्त एका समुहाचे आहेत असा समज होता.मात्र बाबासाहेबांनी सर्व बहुजन समाजासाठी कार्य केले आहे याची तिला जाणीव होती.
तरीही हिंदू धर्माविषयी तिला फार अभिमान होता. अशा संस्कारांनी माझे बालपण प्रभावित झाले होते.
दहावी पर्यंत शिकण्यासाठी मला तीन गावातून शिक्षण घ्यावं लागलं.गावात चौथी झाली पाचवी साठी कोळनूर या गावी ऍडमिशन घेतलं. हे गाव चार किलोमीटरवर होते.
गावातून आम्ही तीन मुली जात असू. एक मराठा, एक हटकर,व मी मांग.
त्यांच्याजवळ डबे असायचे, म्हणून त्या माझ्यापासून अंतर ठेवून चालत असायच्या.
या गावामध्ये लिंगायत आणि देशमुख हे बहुसंख्य असल्यामुळे कडक अस्पृश्यता पाळली जात होती. खरं तर महात्मा बसवेश्र्वरांनी माणसाचं माणूसपण नाकारणाऱ्या धर्माविरोधात बंड करून लोकशाही तत्त्वावर सर्व मानवसमुहाला भेदमुक्त करण्यासाठी लिंगायत धर्म स्थापन केला. मात्र स्वत:ला लिंगायत धर्माचेअनुयायी समजणारे लोकही अस्पृश्यता पाळत असत.
त्या गावात विहिरीवर पिण्यासाठी पाणी कोणीतरी काढून द्यायची वाट बघत थांबावं लागायचं. सातवी ते दहावी पर्यंत शिकण्यासाठी आंबुलगा या माझ्या आत्याच्या गावी गेले.दहाकिलोमिटरवर हे गाव असल्याने पायी ये जा करणं कठीण होतं. मी सातवी ते दहावी हे तीन वर्ष आत्याच्या घरी राहिले. या गावात मांग महार समाज मिळून मिसळून रहात होते. तिथे संजिवनी नावाची माझी एकमेव मैत्रिण बौद्ध होती. तिच्यामुळेही बाबासाहेबांविषयी बरंच कळत गेलं.
दहावीत असताना माझं जातीतील मुलाशी ठरवून लग्न झालं.
माझ्या सासरकडील सगळी माणसं सुशिक्षित व आंबेडकरी विचाराने भारलेली होती. माझे मिस्टर अशोक बेले हे सुद्धा आंबेडकरी विचारांचे आहेत.
या विचारात माझ्या मनाची नव्याने जडणघडण होत होती.आंबेडकरी विचारांच्या वातावरणात मी प्रत्येक गोष्ट तपासून पहायला लागले. जेव्हा कविता लिहायला लागले तेव्हापासून अनेक पुरोगामी विचारांची माणसं भेटत गेली.या मधे माझ्या नवऱ्याचे काका, कवी शामराव बेले, पुरोगामी विचारवंत साहित्यिक डॉ. मारोती कसाब, यांच्याकडूनही बरंच शिकता आलं. विचार समृद्ध होत गेले.
वयाच्या पंचेचाळिशी ओलांडल्यावर मी अर्धवट सुटलेले शिक्षण पुर्ण केले.
स्त्री म्हणून अनेक अंगांनी जेव्हा विचार करायला लागले तेव्हा अनेक विरोधाभास दिसून येत होते. स्त्री आणि पुरुष यांच्या जगण्यातील फरक,
दोघेही मानव असून एकाचं माणूसपणच नाकालेलं.
जगण्यात एवढा विरोधाभास का? एक श्रेष्ठ, एक कनिष्ठ कसे काय असू शकतात? हे भेद कुठून निर्माण झाले असा विचार करायला लागले.याचा शोध घेताना असं लक्षात आलं की हे धर्माच्या नावावर त्यांना गुलाम करून वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी स्त्रियांवर अन्याय कारक नियम लादले गेले आहेत.
या सगळ्याच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज या महामानवांची चरित्रे वाचली. महात्मा बसवेश्र्वरांचं चरित्र व इतर अनेक ग्रंथ वाचले . .आ. ह. साळुंखे सरांचे ग्रंथ वाचले. मुक्ता साळवेचा निबंध वाचला. अण्णाभाऊचं समग्र साहित्य वाचलं विचारांना एक दिशा मिळत गेली.
या सगळ्या विचारांचा सार हा बौद्ध तत्त्वज्ञानाकडे घेऊन जाणारा आहे.
या सगळ्याचा शोध घेण्यास माझ्या जीवनातील एक घटना महत्त्वाची ठरते.
ती म्हणजे माझ्या आईला मुलगी जन्मली म्हणून जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात वडिलांनी आमचं दोघींच अस्तित्व नाकारून मुलासाठी केलेला दुसरा विवाह.
हे त्यांचं वर्तन, मनातली विषमता मूलक मानसिकता, मुलासाठीचा अट्टाहास, परंपरेला धरून होत्या. या सगळ्या गोष्टी, परंपरा,
धर्मग्रंथातून समाज मनावर बिंबवलेल्या आहेत.
या सगळ्यावर उपाय, समता, न्याय, बंधुता जर आपल्याला शोधायची असेल तर बुद्ध विचारच याची पूर्तता करणारा ठरू शकतो. असं प्रकर्षानं जाणवतं.
नवऱ्याच्या नोकरीनिमित्त अनेक गावात शहरात फिरस्ती झाली त्यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जातीवादी हिणकस मानसिकतेला त्याला सामोरं जावं लागलं. अनेक ठिकाणी नाव विचारून जात जाणून घेण्याचा प्रयत्न केला जायचा.
जात समजताच घर नाकारणे असं तर सर्रास प्रत्येक ठिकाणी अनुभव आला. असाच एक अनुभव अहमदपूर येथे आला.
अहमदपूर येथे बदली झाली तेव्हा आम्ही घर शोधत एका वाण्याच्या घरी गेलो तिथे घरमालकाने घर दाखवलं घर छान प्रशस्त होतं.आम्हाला पसंत होतं.घर बघून झाल्यावर त्या घरमालकाने सरळ सरळ जात विचारली. मांग असं सांगताच घर भाड्याने द्यायचं नाही असं म्हणाला. एका पोलिस अधिका-याला हा अनुभव येतो तर सामान्यांची काय अवस्था असेल याची कल्पना न केलेली बरी.
जातियतेवर आधारित समाजात माणसाचं माणूस पण स्वीकारल्या जात नाही. तर तो कोणत्या जातीचा यावरून श्रेष्ठ-कनिष्ठ ठरतो.
स्त्रीची अवस्था तर अजूनच वाईट आहे.दलित स्त्रियांना दुहेरी गुलामगिरीतून जावं लागतं. ती खालच्या जातीतील आहे म्हणून तिचं दुहेरी शोषण होते.
माझ्या लहानपणीची अशीच एक घटना मनावर एक ओरखडा ओढून गेली. मी सहावीत असताना विज्ञानाच्या मास्तरने एका मुलाला उद्देशून एक म्हण वापरली होती. ती म्हण अशी होती- " म्हाराच्या पोरीला थानं आल्यावानी का करलालास बे.. " तेव्हा सगळा वर्ग माझ्या कडे बघत होता. मला त्या लहान वयातही मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. तेव्हा त्याच मास्तरने ती मांग आहे असं स्पष्टिकरणही दिलं होतं. खरं तर हे मास्तर माझ्या आवडत्या विषयाचे असल्याने त्यांच्या विषयी इतरांपेक्षा जास्त आदर होता. मात्र ते त्या घटनेनंतर मनातून कायमचे उतरले.
दलित स्त्रियांना अशा प्रकारे दुहेरी शोषणला तोंड द्यावं लागतं.
या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर धम्मविचार हा सर्वश्रेष्ठ मानव मुक्तीचा विचार आहे.
स्त्री असो की पुरुष प्रत्येकाला आत्मोन्नतीची सर्वांना समान संधी देतो. सत्याचा, समतेचा, न्यायाचा बंधुतेचा मार्ग दाखवतो.कोणतीही नवीन गोष्ट तयार होण्यासाठी आधीची ध्वस्त करणे किंवा होणे आवश्यक असते. तरच शुद्ध नवनिर्मिती होवू शकते. मग एखादी वास्तू असो की विचार. बुद्धविचार तेव्हाच आत्मसात करू शकतो जेव्हा पारंपरिक विचारधारा मनातून मेंदुतून नष्ट होईल.
नाहीतर तो केवळ दिखावा ठरू शकतो, आपण त्या विचाराच्या गाभ्यापर्यंत आपण पोहचू शकणार नाही. न्याय समतेचा विचार हा सृष्टीच्या कल्याणाचा विचार आहे. मात्र तो पुर्णपणे समजून घ्यायला हवा.
बुद्धाचा विचार हा फक्त दीक्षा नव्हे तर तो आत्मसात करून जगण्याचा भाग व्हायला हवा. सृष्टीतील मानवाचा कल्याण करणारा हा विचार रुजायला हवा. मनामनत बहरायला हवा.माझ्या जीवनात हा विचार रुजवला आहे आहे त्यानुसारच माझं जीवन व्यतीत करते.मनाला न पटणाऱ्या कुठल्याही रुढीपरंपरा मी पाळत नाही.
सर्वच स्त्रियांनी तर्कावर आधारित विचाराचं अनुसरण करायला हवं. औपचारिकता म्हणून दीक्षा घेणे असं होता कामा नये . मी माझ्या लेखनातून हाच विचार मांडत आले आहे. माझी चार पुस्तकं प्रकाशित आहेत.
* लढाई अस्तित्वाची ( कवितासंग्रह )
*चकवा( कथासंग्रह)
* घर याचे हृदयी माझ्या ( कवितासंग्रह)
* वैशाख वणवा ( कथासंग्रह )
* फरफट (कादंबरी)
या वर्षात प्रकाशनाच्या मार्गावर असलेली अजून दोन येतील.
अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
सर्व महामानवांच्या नावाचे आहेत. याचा मला आनंदही आहे, व अभिमानही आहे.
एका पारंपारिक संस्कारात वाढलेल्या सामान्य बाईचा प्रवास परिवर्तनच्या वाटेवर वळला. याला मुक्ता साळवे , माय सावित्री , म. फुले , अण्णा भाऊ साठे , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा विचारांचा परिणाम आहे. त्याच्यातील सत्य, न्याय, समता, या मुल्यांचा परिणाम आहे . जी मानवाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करते.!!
छाया बेले, नांदेड.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा