स्त्री सक्षमीकरणाची हमी देणारी छाया बेले यांची कविता - डॉ. मारोती कसाब| पुस्तक परिचय
स्त्री सक्षमीकरणाची हमी देणारी छाया बेले यांची कविता - डॉ. मारोती कसाब | पुस्तक परिचय
----------------------------------------------------------
सध्या मराठी साहित्यात कवितेचे पीक अमाप आणि उदंड झाले असले तरी त्यामध्ये स्त्रियांच्या कविता फार तुरळक प्रमाणात आढळतात. हजारो वर्षांपासून स्त्रियांवर अनेक बंधने येथील पारंपरिक समाजव्यवस्थेने लादलेली आहेत. वाचा असूनही तिला बोलू दिले नाही. इच्छा असूनही अभिव्यक्त होऊ दिले नाही. एकंदरीत सर्वत्र क्षेत्रात ती पुरुषाच्या मागे कशी राहील हेच या व्यवस्थेचे धोरण होते. त्यामुळे आज स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही मराठी सारख्या लोकभाषेत लिहिणार्या स्त्रियांची संख्या कमीच आहे. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या आणि सक्षमपणे लिहिणाऱ्या स्त्रियांची या व्यवस्थेकडून आवश्यक ती दखल घेतली जात नाही. तरीही काही स्त्री लेखिका अनेक अडथळ्यांवर मात करून लिहीत आहेत. त्या चिवटपणे साहित्य क्षेत्रामध्ये येण्यासाठी लढताहेत धडपडत आहेत. आशा स्त्री लेखिकांना समाजात मानापानाचे स्थान मिळत नाही. तर उलट त्यांची उपेक्षाच केली जाते. त्यामुळे अनेक नव लेखिका एका पुस्तकातच गारद होताना दिसतात. केवळ हौस म्हणून लिहिणाऱ्या अशा नव लेखिकांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ थाटामाटात साजरा होतात. मात्र त्यांचे पुढे काय होते हे आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. मात्र ज्या काही मोजक्या स्त्रिया भूमिका घेऊन लिहीत असतात, त्यांना ही व्यवस्था रोखू शकत नाही हेही तेवढेच सत्य आहे. छाया बेले ही अशीच काळाच्या आव्हानांना तोंड देत, काळावर स्वार होऊन परिवर्तनाच्या दिशेने निघालेली एक कवयत्री आहे.
इ.स. २०१२ मध्ये छाया बेले यांचा ' लढाई अस्तित्वाची ' हा अत्यंत देखणा आणि आशयसंपन्न कवितासंग्रह औरंगाबादच्या साद प्रकाशनाने प्रकाशित केला. स्त्री सक्षमीकरणाची बीजे या कवितासंग्रहात ठासून भरलेली असली तरी त्याची दखल मराठी सारस्वतांनी मात्र नेहमीप्रमाणेच घेतली नाही. ज्या समूहातून कवयत्री येते त्या दलित वर्तुळात ही या संग्रहाची पुरेशी दखल घेतली नाही. त्यातील तूप वर्तुळात मात्र थोडीशी चलबिचल होताना दिसली. एवढेच काय ते.
कवयित्री छायाताई बेले या इतर चारचौघींसारखी या स्वतःचं 'कविपण' मिरविणाऱ्या कवयत्री नाहीत. त्यांचा पिंड मुळातच शांत आणि धीरगंभीर आहे. त्यांची प्रवृत्ती कमालीची संयमी आहे. त्यामुळे कुणी आपली दखल घेतली किंवा नाही घेतली याचा त्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांनी मुळातच लेखणी हाती धरलेली आहे ती स्वयंप्रेरणेनेच. वास्तविक पाहता लिखाणाचा त्यांना कोणताही कौटुंबिक वारसा नाही. त्यांची कविता ही मुळातून, खूप खूप आतून स्फुरलेली असल्याचे वाचताना जाणवल्याशिवाय राहत नाही. प्रत्यक्ष जीवनाचं गाणं होऊनच त्यांची कविता अवतरते. दरम्यानच्या काळात 'अक्षर गाथा ' सारख्या नामांकित नियतकालिकाने छाया ताईंच्या कवितांना मोठी प्रसिद्धी दिली. 'अक्षर गाथा ' तून आलेल्या त्यांच्या कवितांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळेच जानेवारी २०१८ मध्ये ' घर याचे हृदयी माझ्या' हा छाया बेले यांचा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला.
'घर याचे हृदयी माझ्या ' हा काव्यसंग्रह लातूरच्या मुक्तरंग प्रकाशनाने प्रसिद्ध केला असून, त्याचे आशयघन मुखपृष्ठ छायाताई बेले यांची धाकटी कन्या डॉ. दीपाली बेले हिने रेखाटले आहे. तसं पाहता बेले कुटुंब म्हणजे कलावंतांची खाणच आहे. छाया ताईंचे पती पोलीस अधिकारी असूनही उत्तम दर्जाचे कवी आहेत. त्यांचे चुलत सासरे कालकथित श्याम बेले हे अहमदपूर परिसरातील नामांकित कवी होते. त्याच परंपरेतील डॉ. दीपाली बेले यांनी या संग्रहाचे मुखपृष्ठ चितारले आहे. या संग्रहाला ज्येष्ठ संपादक डॉ. गंगाधर पानतावणे यांची प्रस्तावना लाभली असून, त्यात ते लिहितात, ' गेल्या काही दशकात नवी सामाजिक जाणीव घेऊन काव्यलेखन करणार्यांमध्ये छाया या बेले यांचे नाव आवर्जून उल्लेखायला हवे.आंबेडकरी जाणिवांची कविता क्षीण झाली, ती आता फारशी प्रभावी राहिली नाही, असा सूर काही मराठी समीक्षकांनी आळवला आहे; परंतु हे अर्धसत्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीगर्भ तत्त्वज्ञानातून जे साहित्य उदयाला आले ते आपल्या समवेत नव्या वाङ्मयीन जाणीवा आणि प्रवृत्ती घेऊन आले असून त्याचाच एक आविष्कार म्हणजे छाया बेले यांची कविता होय.'
छाया बेले यांची कविता उठाव करणारी आहे. व्यवस्थेच्या विरोधात बंडाची भाषा बोलणारी आहे. त्यासाठी कवयत्री क्रांतिभूमी तयार करीत आहे. समस्त स्त्रियांना जागविण्याची कृती करीत आहे. आपल्या दुःखाला इतर कोणीही कारणीभूत नाही तर आपणच आहोत. कारण डॉ.
बाबासाहेब आंबेडकर म्हणतात , 'अन्याय करणाऱ्या पेक्षाही अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो.' कवयत्री आपल्या वरील नव्हे तर समस्त स्त्री जातीवरील अन्यायाचा शोध घेते. तेव्हा तिला बाबासाहेबांची आठवण येते. आपल्यावरील अन्याय सहन करणाऱ्या स्त्रियांना ती सजग करते. कवयित्री लिहिते-
'मोल चुकते केले मी माझ्या चांगुलपणाचे
सावलीने पोळले मी काय चुकले उन्हाचे..?
भासला वसंत मला तो ऋतू शिशिर होता
वाट संपली इथे , गाव अजून दूर होता..!
क्षण आले किती गेले वाऱ्यावर स्वार होते
केला भरोसा जयावर ते श्वास क्रूर होते '
अंगावर शहारे आणणारी कविता छायाताई लिहितात. दुसऱ्यावर विसंबून राहणे हेच आपल्या अंगलट आले. म्हणून त्या स्त्रियांना 'स्वयंसिद्धा' होण्याचे आवाहन करतात. ही कवयत्री शोषणाच्या विरोधात एल्गार पुकारते. स्वातंत्र्यानंतर सर्व काही आलबेल होईल, ही आशा लवकरच धुळीला मिळाली, याचे कारण म्हणजे लोकशाहीतही जिवंत असलेला मनुवाद. कवयत्री लिहिते -
' मनू अजून जिवंत आहे
इथल्या हवेत पाण्यात मनात
रक्ताच्या कणाकणात
म्हणूनच द्वेष, हिंसा यांची
काटेरी जंगलं बहरत आहेत
माणसं हरवताहेत जंगलात
आणि फिरताहेत तिथंच
चकवा होऊन '
कवयित्रीला आपल्या वर्तमान दुःखाचं कारण इतिहासात आहे, हे नीट माहीत आहे. वेदा -पुराणांनी इथली मानसिकता बिघडवलेली आहे. मनूने लिहून ठेवल्यामुळे आमच्या छळाची परंपरा अपरंपार सुरू आहे, याची सल व्यक्त करताना कवयत्री म्हणते-
' तीच जुनी वेदना रोज नव्याने जगते
सीता द्रोपदी अहिल्या मी माझ्यातच बघते छळवादी विकृतीला संस्कृती हे नाव येथे
लेवून साज बंधनांचा
नववधू थडग्यात सजते'
जिला ' संस्कृती' हे गोंडस नाव इथल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेने दिलेले आहे; ती संस्कृती नसून विकृती आहे, याचे भान या कवितेतून व्यक्त होते. कवयत्री नानापरीने स्त्रियांना आपल्या दुःखाचे मूळ समजावून सांगत आहे. नटण्या थटण्याचा , सजण्या धजण्याचा छंद जरी स्त्रियांना असला तरी तो आता सोडला पाहिजे. कारण त्यामुळेच आपले शोषण होते ही जाणीव करून देताना कवयत्री लिहिते -
' कड्या तोड्यांनी नथ बुगड्यांनी
स्वतःलाच जखडून घेतेस
तनामनावर स्वामित्व देऊन
स्वतःला त्याच्यात हरवून बसतेस
त्याच्यासाठी मात्र तू फक्त मादी असतेस'
पुरुषाच्या स्वार्थी वृत्तीवर येथे कवयत्री ने करारा प्रहार केला आहे. नटण्याची मुरडण्यापेक्षा शिकण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे. छाया बिले यांची कविता थेट प्रहार करते. ती लपून-छपून वार करीत नाही. समस्त स्त्रियांसाठीच तिने हाती शब्दांचे शस्त्र धरलेले आहे.
' डोईचा पदर आला खांद्यावरी
भरल्या बाजारी जाईन मी
पंढरीच्या पेठे मांडीयले पाल
मनगटावर तेल घाला तुम्ही'
अशाप्रकारे मध्ययुगीन काळात व्यक्त होऊ पाहणाऱ्या स्त्रियांना विरोध करणाऱ्या पुरुषी व्यवस्थेला जनाबाईंनी फटकारले होते. छाया बेले या जनाबाईंच्या वारसदार आहेत. आपला वारसा त्या नीटपणे चालवत आहेत. 'घर याचे हृदयी माझ्या' या काव्यसंग्रहातून त्यांनी स्त्रियांचे सक्षमीकरण केले असून, स्त्रियांच्या दुःखाला केवळ वाचा फोडली नाही ; तर स्त्रियांना लढण्याचे बळ दिले आहे. ही व्यवस्था आपल्याला छळणार आहे, ही कवयत्रीने गृहीत धरलेले आहे. मात्र ती आपला वसा आणि वारसा सोडायला तयार नाही. उलट अधिक प्राणपणाने लढण्यासाठी तिने हिंमत बांधली आहे. कवयित्री लिहिते-
' छळता छळविता बलशाली सत्ताधीश तू
करून सवरून गोंदवतोस
कलंक माझ्या जन्मावर तुझ्या गुन्ह्याचा
कुठवर करावा केविलवाणा प्रयत्न
तुझ्यापासून वाचण्याचा
केला आहे मी निर्धार
दडून दडून स्वतःला गाडून घेण्यापेक्षा
लढून झगडून शहीद होण्याचा
लढून झगडून शहीद होण्याचा..!'
अशाप्रकारे लढण्याचा नवा आशावाद समस्त स्त्री जातीमध्ये नवा विश्वास निर्माण करतो. स्त्रिया या दुबळ्या नाहीत; तर त्या लढावू वृत्तीच्या आहेत हे कवयत्री छाया बेले यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या सक्षम लढावू बाण्याला सलाम..!
संदर्भ - १. बेले छाया अशोक, ' घर याचे हृदयी माझ्या ' , मुक्तरंग प्रकाशन , यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल मेन रोड, लातूर. पहिली आवृत्ती - १ जानेवारी २०१८.
- डॉ. मारोती कसाब,
मराठी विभाग,
महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर
जि. लातूर.
भ्रमणध्वनी- ९८२२६१६८५३
ई-मेल- kasabmaroti@gmail.com
धन्यवाद...!
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवा