बहुपदरी स्त्री शोषणाची कविता: ' हॅपी होमच्या भिंतीआड' | पुस्तक परिचय - डॉ.मारोती कसाब
-----------------------------------------------
- डॉ. मारोती कसाब
संशोधन मार्गदर्शक व सहयोगी प्राध्यापक, मराठी विभाग, महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर जि. लातूर
पिनकोड -४१३५१७
मो. ९८२२६१६८५३
प्रस्तावना :
भारतात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला इ.स.१९९० च्या दशकात प्रारंभ झाला. जागतिक आर्थिक महामंदी, माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट, नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास आणि वाढते औद्योगीकरण या पार्श्वभूमीवर जगात सर्वत्र जागतिकीकरणाचे वातावरण निर्माण झाले. जागतिक महासत्ता बनू पाहणाऱ्या अमेरिकेसारख्या भांडवलदार देशाचे सत्ताकारण हेही त्यात भर टाकणारे होते. एकंदरीत मूल्यात्मक पडझडीच्या या काळात भारतासारख्या विकसनशील देशाने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत समाविष्ट व्हावे किंवा नाही याबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता. कारण जागतिकीकरण ही केवळ एक सुटी संकल्पना नव्हती; तर तिच्या सोबतच खाजगीकरण आणि उदारीकरण या दोन गोष्टीही होत्या.
चीन, जपान, जर्मनी, अमेरिकेसारख्या भांडवलदार राष्ट्रांना भारतासारखी हक्काची बाजारपेठ हवी होती. त्यामुळे जागतिक बँकेच्या दबावाखाली येऊन भारत सरकारने 'डंकेल प्रस्ताव', ' गॅट करार' स्वीकारले. आर्थिक उदारीकरणाच्या नावाखाली भारत सरकारने अगतिक होऊन जागतिकीकरण स्वीकारले. भारतात 'लोक कल्याणकारी राज्य' ही संकल्पना हळूहळू लोप पावून त्या जागी 'भांडवलदारी राष्ट्र' या संकल्पनेचा उदय झाला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख, गवाणकर यांच्या सारख्या लोककलावंतांनी पाहिलेले स्वतंत्र भारताचे गोरगरीब, कष्टकरी रयतेचे राज्य, समाजवादी राष्ट्र हे स्वप्न भंग पावले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारलेल्या भारतीय संविधानाचा प्रभाव कमी होत जाऊन २०१४ नंतरच्या काळात 'धर्मनिरपेक्ष, समाजवादी भारत'च्या ऐवजी 'कट्टर धार्मिक, भांडवलदारी भारत' ही प्रतिमा जगासमोर आली.
जागतिकीकरणाच्या काळात भांडवलदार अधिक श्रीमंत तर गरीब अधिकच गरीब होत गेले. वर्णव्यवस्थेकडून दबले, पिचले गेलेले स्त्रीशुद्रातिशद्र हे वर्ग जागतिकीकरणात अधिकच अगतिक होऊन बसले. लोकशाहीचे हुकूमशाहीमध्ये कधी रूपांतर झाले हे कळालेच नाही. संसद, न्यायव्यवस्था, सरकारवर नियंत्रण ठेवणाऱ्या ' कॅग', 'इडी', ' सीबीआय ' सारख्या संस्था, रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोग, सरकारमधील उच्च पदस्थ अधिकारी आणि प्रसारमाध्यमे हे सर्व भांडवलदारांचे गुलाम बनले. त्यामुळे या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविण्यासाठी साहित्यासारखे दुसरे कोणतेही माध्यम जागतिकीकरणाच्या या काळात उरलेले नाही.
साहित्य आणि स्त्री संवेदनशीलता :
हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या जात, वर्ग आणि धार्मिक शोषणाला नकार देण्याचे काम भारतातील मराठी लेखिकांनी केले आहे. महदंबा, संत जनाबाई, संत सोयराबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई अशा अनेक मध्ययुगीन स्त्री लेखिकांनी तत्कालीन शोषणाविरुद्ध आवाज उठवला आहे. तर आधुनिक काळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, तान्हूबाई बिर्जे अशा लेखिकांनी भारतीय स्त्रीवादाची भक्कम पायाभरणी केली असून त्यावरच आजच्या जागतिकीकरणातील स्त्रीवादी साहित्य उभे आहे. त्यामध्ये प्रिया तेंडुलकर, सानिया, गौरी देशपांडे, मल्लिका अमर शेख, प्रज्ञा दया पवार, कविता महाजन, कल्पना दुधाळ, सुचिता खल्लाळ, छाया बेले अशा काही बोटावर मोजता येणाऱ्या लेखिका भारतीय संवेदना घेऊन लिहीत आहेत.
छाया बेले यांचे साहित्य :
साहित्य हे सामाजिक क्रांतीचे एक हत्यार मानले जाते. जगात जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे साहित्य उफाळून येते. अन्यायाला विरोध करण्याचे कार्य साहित्यिक करीत असतात. साहित्यातून क्रांती झाल्याची अनेक उदाहरणे जगात सापडतात. भारतातील संत साहित्याची चळवळ त्याचे उत्तम उदाहरण आहे.
आजच्या साहित्यातून प्रचलित भांडवली, कट्टर धर्मांध, जात्यांध, पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात आपल्या लेखणीच्या माध्यमातून उठाव करण्याचे कार्य जे बोटावर मोजण्याएवढे साहित्यिक करताहेत, त्यामध्ये छाया बेले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
इ. स. २०१२ साली प्रकाशित झालेल्या ' लढाई अस्तित्वाची ' या पहिल्याच काव्यसंग्रहात छाया बेले यांच्या विद्रोहाच्या खुणा आढळतात. ' चकवा' हा २०१५ साली प्रकाशित झालेला कथासंग्रह, २०१८ साली ' घर याचे हृदयी माझ्या ' हा दुसरा काव्यसंग्रह, त्याच वर्षी प्रकाशित झालेला 'वैशाख वणवा ' हा कथासंग्रह, २०२० साली प्रकाशित झालेली 'फरफट' ही कादंबरी आणि त्यानंतर अलीकडे २०२३ मध्ये आलेला ' हॅपी होमच्या भिंतीआड' हा विद्रोही काव्यसंग्रह. छाया बेले या कुणी शिक्षिका किंवा प्राध्यापिका नाहीत; तर त्या आहेत एक सर्वसामान्य गृहिणी. भवताल उघड्या डोळ्यांनी पाहताना त्यांच्यातला लेखक त्यांना स्वस्त बसू देत नाही. ' स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास' हा संत जनाबाईंचा सल्ला त्यांनी मानलेला दिसतो. ज्याप्रमाणे जनाबाई ' दळिता कांडीता गुण गाईन मी अनंता' असे म्हणत घरकाम करत करत विद्रोही अभंग लेखनही करतात. तशाच प्रकारे छाया बेले या सुद्धा पती, सासू, इतर नातेवाईक आणि मुला बाळांचे करत करत, हातातील घरकामाबरोबरच त्या लेखनही करतात. मात्र टाईमपास म्हणून किंवा वेळ जात म्हणून किंवा प्रसिद्धीसाठीही त्या लिहीत नाहीत तर ' बुडती हे जन देखवेना डोळा । येतो कळवळा म्हणूनिया' या तुकोबांच्या वचनाप्रमाणे समाजाला सत्याचे दर्शन घडविण्यासाठी, सामाजिक परिवर्तनासाठी त्या लिहितात.
लेखन प्रकारातील वैविध्य आणि लेखनाचे सातत्य पाहता त्यांच्या लेखनाचा आवाका खूप मोठा असल्याचे लक्षात येते. २०२४ साली त्यांच्या लेखन कारकिर्दीला एक तप पूर्ण झाले. मागील बारा वर्षांच्या काळात त्यांनी जे लिहिले, त्या पुस्तकांची नावे जरी आपण पाहिली तरी त्यांची लेखनाबद्दलची ठोस भूमिका स्पष्ट होते. छाया बेले या प्रस्थापित धर्मांध, जात्यंध, माणसाचे शोषण करणाऱ्या भांडवली व्यवस्थेच्या छाताडावर उभ्या असलेल्या संत जनाबाईच्या वंशातील विद्रोही कवयित्री आहेत.
' हॅपी होमच्या भिंती आड' मधील स्त्री जाणिवा
---------------------------------------------------
संगमनेरच्या 'साहित्याक्षर प्रकाशन' या नामांकित संस्थेने छाया बेले यांचा 'हॅपी होमच्या भिंतीआड' हा काव्यसंग्रह १४ जुलै २०२३ रोजी प्रकाशित केला आहे. १०४ पानांच्या या देखण्या संग्रहात ६२ कवितांचा समावेश असून, या संग्रहाला डॉ. संजय बोरुडे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. लोणार येथील दिवंगत कवी विशाल इंगोले यांच्या अभिप्रायाने आणि ज्येष्ठ लेखक डॉ. जगदीश कदम यांच्या पाठराखणीमुळे हा संग्रह अधिकच उठावदार झाला आहे.
भारतात स्त्रीला माणूस म्हणून जगताना वाट्याला येणारे दुःख भोग भोगावेच लागतात. इथल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेने प्रत्येक ठिकाणी तिला दुय्यमत्व दिले आहे. ही जाणीव व्यक्त करताना पहिल्याच कवितेत कवयित्री लिहिते-
" तू दिसतेस मला मंदिराबाहेरच नेहमी/ तुझ्या वाटेला आलेला दिवस अंगावर घेऊन जगत असतेस /तुझ्यावर लादलेल्या सक्त मजुरीची शिक्षा भोगत " इथले सगळे धर्म पुरुषांनीच निर्माण केलेले असल्यामुळे त्यांचीच त्यावर सत्ता आहे. त्यामुळे ती सततच सत्ता केंद्राच्या बाहेर राहते. मनुस्मृतीने सांगून ठेवलेले प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. मनू म्हणतो " न स्त्री स्वातंत्र्यं अर्हती " म्हणजे स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व नाही. ती स्वातंत्र्य देण्याच्या लायकीची नाही. तिला सतत कोणाच्यातरी दबावाखाली राहावे लागते. अर्थातच तो पुरुष असतो. पिता, पती, मुलगा, भाऊ अशा कोणत्याही रूपाने तो तिच्यावर मालकी गाजवत असतो. " बाईनं कसं /नाजूक दिसावं /नाजूक हसावं /दिसेल अंग/ असं काहीतरी नेसावं " अशी अपेक्षा इथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेची असते. पण तुमच्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी "ती आता पहिल्यासारखी 'तमिजखोर ' राहिली नाही; तर तिने छेडलाय संघर्ष /अस्तित्वाच्या नवनिर्मितीचा" असा विद्रोही नारा छाया बेले यांची कविता देते.
इथे प्रत्येकाच्या नसानसात कट्टरतेचा धर्म भिनलाय. जो धर्म स्त्रीला माणूस मानत नाही तो कसला धर्म..? धर्माच्या नावाखाली माणसाचं शोषण होत आहे. हे थांबलं पाहिजे. धर्मासाठी माणूस नाही; तर माणसासाठी धर्म आहे, ही जाणीव कवयत्रीला आहे. म्हणून ती म्हणते- "माणसांनीच लावायला हवा आता कर्फ्यू/ त्याच्या विघातक कृत्यांवर/ ठोकायला हवेत टाळे /त्याच्या सगळ्याच घरांना/ तेव्हाच उगवून येईल माणसात/ धर्म गौतमाचा/ धर्म बसवण्णांचा /धर्म कबीराचा /धर्म तुकोबाचा/ धर्म मानवतेचा..!"
इथल्या जात, धर्म आणि संस्कृतीने स्त्रीला नेहमीच पायदळी तुडविले आहे. फक्त आज्ञा पाळणे एवढाच तिचा धर्म..? तिच्या डोक्यावर लादलेले जातीचे, धर्म आणि संस्कृतीचे गाठोडे तिने आता फेकून दिले पाहिजे. कवयित्री लिहिते- " धरणीमध्येही होतात कंप /हालते आतून तीही / धसतात उत्तुंग पर्वत/ जातात तळाला /तळातून येतात वर नवी शिखरं /तू ही गाड आता ओझं डोक्यावरचं /होऊन जाऊ दे एकदा उलथापालथ /दिसू दे तुझ्या अस्तित्वाचं उंच शिखर/ जगाला"
छाया बेले यांची कविता ही क्रांतीला रसद पुरविणारी कविता आहे. आपल्या उद्धारासाठी कोणीही येणार नाही, तर आपला उद्धार आपणच केला पाहिजे हे सांगणारी ही बंडखोर कविता आहे. स्त्रियांनी केवळ शिकून आणि नोकरी, व्यवसाय करून भागणार नाही तर आपल्या जगण्यातील जीर्ण रुढी, प्रथा, परंपरांना नकार देत विवेकशील विज्ञानवाद स्वीकारला पाहिजे यासाठी कवयित्री आग्रही आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात भारतात स्त्रियांवर अत्याचार अन्याय होत असले तरी या अन्यायाविरुद्ध कुठेतरी आवाज उठवला जातोय ही समाधानाची गोष्ट आहे. मुक्तीच्या दिशेने स्त्रियांचा काफिला निघाला असल्याचे चित्र कवयित्रीला सुखावणारे आहे. अजून बऱ्याच अडकून असल्या तरी काही जणींनी मुक्तीचे आभाळ गाठले आहे, याबद्दलचा आनंदही कवयित्री व्यक्त करते. " काळोखात डोळ्यांच्या वाती पेटवून/ स्वप्न पाहतात त्या/ परिघाबाहेर असलेल्यांसाठी नसतात कधीच कवच कुंडले /तरीही लावताहेत सुरुंग परिघालाच/ होतील त्या सूर्य एक दिवस /यात शंका नाही" असा पराकोटीचा आशावाद ही कविता व्यक्त करते.
निष्कर्ष व समारोप :
छाया बेले यांच्या 'हॅप्पी होमच्या भिंतीआड' या काव्यसंग्रहातून निखळ भारतीय स्त्रीवादी जाणिवा व्यक्त होतात. भारतीय स्त्रियांच्या दुःखाचे कारण कवयित्रीला समजलेले आहे. इथली धर्म व्यवस्था, पोथ्या पुराणे आणि मनुस्मृती सारखे द्वेष पसरविणारे ग्रंथ हेच या दुःखाचे मूळ असून स्त्रियांनी यापासून स्वतःला वाचवले पाहिजे, एवढेच नव्हे तर भारतातील जातीव्यवस्था आणि धर्मांधता संपविण्यासाठी स्त्रियांनी पुढे आले पाहिजे असा आशावादही ही कवयित्री व्यक्त करते. या कवितेची मूळं घट्ट मातीत रुजलेली आहेत. ही वरवरची अभिव्यक्ती नाही. या कवितेला आपल्या मातृसत्ताक कुटुंब पद्धतीची ओढ आहे. ही कविता समतेची मागणी करणारी आहे.
छाया बेले या एक स्त्री असल्यामुळे सहाजिकच त्यांच्या अभिव्यक्तीत स्त्रियांची दुःखं अधिक असली तरी त्या एक माणूस आहेत हेही त्या स्वतः विसरत नाहीत. त्यामुळे या काव्यसंग्रहात सर्वहारा माणसाची दुःखं त्यांनी प्रामुख्याने मांडली आहेत. जागतिकीकरणातील नैतिकतेची पडझड, वाढती जातीयता, भांडवलदारी व्यवस्थेने लादलेले शोषण, लोकशाहीच्या नावाखाली चालणारी हुकूमशाही, वाढती बेरोजगारी महागाई हेही त्यांच्या चिंतेचे विषय आहेत. एकंदरीत भारतीय संवेदनेची आजची प्रभावी मांडणी 'हॅपी होमच्या भिंतीआड' या काव्यसंग्रहातून छाया बेले यांनी केली आहे. समकाळाचा उभा आडवा छेद त्यांनी या कवितेतून घेतला आहे. ही कविता उर्ध्वगामी असून, तिला महामानवांच्या विचारांची धार आहे. सर्व प्रकारच्या शोषणाच्या विरोधात एल्गार पुकारणारी आणि माणसाच्या मुक्तीचे गीत गाणारी ही कविता आजच्या जागतिकीकरणाच्या काळात विशेष महत्त्वाची ठरते.
संदर्भ सूची:
१. बेले छाया, ' हॅपी होमच्या भिंतीआड', साहित्याक्षर प्रकाशन, जनता नगर, संगमनेर जि. अहमदनगर, पहिली आवृत्ती -१४ जुलै २०२३
२. कसाब मारोती ( संपा.), 'साठोत्तरी मराठी साहित्यातील महिलांचे योगदान', सिद्धी पब्लिकेशन हाऊस नांदेड, प्रथम आवृत्ती- २६ सप्टेंबर २०२३
३. लिंबाळे डॉ. शरणकुमार, ' साठोत्तरी मराठी वाङ्मयातील प्रवाह', दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. पुणे, प्रथम आवृत्ती-२००७.
४. भागवत विद्युत, ' स्त्री प्रश्नांची वाटचाल: परिवर्तनाच्या दिशेने', प्रतिमा प्रकाशन, पुणे, द्वितीय आवृत्ती २००९.
५. महाजन वंदना, ' स्त्रीवाद आणि मराठी साहित्य', विजय प्रकाशन, नागपूर, प्रथम आवृत्ती -२००१.
६. खिंवसरा मंगल, ' स्त्रीमुक्ती चळवळ आणि वृत्तपत्रांचा सहभाग ' , स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद, पहिली आवृत्ती -२००५.
७. साळुंखे आ.ह. , ' हिंदू संस्कृती आणि स्त्री', लोक वाङ्मय गृह, मुंबई, चौदावी आवृत्ती-२००१.
हेही वाचा 👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा