जगा स्वतःसाठी | निसर्ग आणि माणूस परस्परावलंबी जीवनाचा विचार - छाया बेले



// जगा स्वतःसाठी //


निसर्गाने माणसाला अफाट अशी बौद्धिक ताकद बहाल केली आहे. गुहेपासून आजच्या आधुनिक युगापर्यंतचा प्रवास या बौद्धिक ताकदीमुळेच शक्य झाला आहे.

माणसाने जर ठरवले तर कुठलीही गोष्ट सहज साध्य करू शकतो. विवेक जागृत ठेवून कार्य केले तर आपल्या व इतरांच्या जीवनाचे नंदनवन करू शकतो. नाही तर क्षणात सृष्टीचाही विध्वंस घडवून आणू शकतो. चांगल्या किंवा वाईटाची निवडही तो करू शकतो. काय निवडायचे हे सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहे. आणि ही फार मोठी जबाबदारी माणसावर आहे.

आजकाल "जगा स्वतःसाठी" या विचाराने सगळीकडे अगदी धुमाकूळ घातला आहे. आणि प्रत्येकजण या शब्दाचा अर्थ आपल्याला हवा तसा लावून स्वार्थामागे धावत सुटला आहे. माणसाने जगणे या संकल्पनेचा किती संकोच करून ठेवला आहे. कुठून आली ही मानसिकता?

निसर्गाने निर्माण केलेल्या या जीवसृष्टीत स्वतःसाठी जगणे म्हणजे जगणे असू शकते का? याचा आपण थोडा जरी गांभीर्याने, विवेकबुद्धीने विचार केला तर "जगणे" या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे हे आपल्या लक्षात येते.
जीवसृष्टी ही परस्परावलंबी व परस्परपूरक आहे. एका जीवाचे दुसऱ्या जीवाच्या जगण्याला सहाय्य होईल अशीच या सृष्टीची रचना आहे. इथली झाडे, पशू-पक्षी, निसर्गाकडून त्यांना जगण्यासाठी आवश्यक तेवढेच घेतात. बदल्यात इतर जीवांना जगण्यास सहाय्य करतात. माणूस सुद्धा याच निसर्गाचा छोटासा अंश आहे. मात्र सगळ्या सृष्टीचा स्वामी असल्यासारखे निसर्गाला ओरबाडून स्वतःसह माणसाने सगळी सजीवसृष्टीच धोक्यात आणली आहे. बुद्धिमान मानवाची हीच का बुद्धिमानी?

माणसाच्या स्वार्थाने समृद्ध निसर्गाला ओरबाडून त्याला कंगाल, असंतुलित, प्रदूषित करून सोडले आहे.

मातृसत्ताक संस्कृतीत म्हणजेच सिंधू संस्कृतीत प्रत्येक कृती केवळ सृष्टीच्या, विश्वाच्या कल्याणासाठी केली जायची. त्यात कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यक्तिगत स्वार्थाचा लवलेश नव्हता. त्या वैश्विक विचाराचा समृद्ध वारसा असूनही आपला भारतीय समाज अधोगतीला जाणे हे अतिशय खेदाचे आहे.

"स्वतःसाठी जगणे" म्हणजे इतरांचे जगणे पायदळी तुडवीत जाणे अशी चुकीची संकल्पना रूढ झाली आहे. आपल्या जगण्याचा उत्सव साजरा करीत असताना, आपल्या आत्मसन्मानाची जपणूक करीत असताना, आपले अधिकार, आपले हक्क यांचा उपभोग घेत असताना इतरांच्या जगण्याचा, त्यांच्या हक्काचा, अधिकाराचा आदर करणे हे विकसित मानसिकतेचे लक्षण आहे. माणूस म्हणून ही आपली नैतिक जबाबदारी आहे.

जीवन जगत असताना माणूस अनेक भूमिका पार पाडत असतो. कौटुंबिक, सामाजिक, देशाचा नागरिक म्हणून त्याची वेगळी भूमिका असते. कौटुंबिक पातळीवर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे अधिकार व हक्क स्वीकारून त्यांना विकासाची संधी देणे, मानसिक, भावनिक आधार, सुरक्षा, पाठबळ देत प्रोत्साहित करणे, त्यांच्या गरजांची पूर्तता करणे, एकमेकांना आधार देत जगणे सोपे करणे. प्रत्येकाने एवढा विचार जरी केला तरी अवघ्या मानवसमूहाचे जीवन आनंदी होईल.

मात्र माणूस फक्त ओरबाडून घ्यायच्या मागे आहे. आपल्या सुखापुढे दुसऱ्या कुणाचाही विचार न करता शोषण करीत राहणे हे निसर्गाच्या नियमाविरुद्ध आहे. माणसाने माणसाच्या विकासाआड बाधा आणणे हे माणसातील माणूसपणाची झालेली पडझड आहे. या पडझडीतूनच समाजविघातक गोष्टी वाढत आहेत. यातून माणूस मानसिक शांती गमावून बसला आहे. या कारणाने समाजात अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा परिणाम सामाजिक स्वास्थ्य बिघडण्यात होत आहे.

मानवसमाजाची अधोगती थांबवायची असेल तर माणसाला स्वतःच्या पुढे जाऊन विचार करावा लागेल. त्याला त्याचे माणूसपण अजून विस्तृत करावे लागेल. स्वार्थापोटी येणारे हापापलेपण सोडून या जगाला सुंदर असे काही देता येईल का, हा विचार करून तो कृतीत उतरवायला हवा. यातच मानवसमूहाचे कल्याण आहे.

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो 
जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ।।

माणसाचे जगणेच पसायदान होवो!!

@ छाया बेले


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .