अन्वयांची अक्षरलीपी | पुस्तक परिचय
अन्वयांची अक्षरलिपी - जाणिवेचं गॉड पार्टिकल पकडणारी कविता
छाया बेले, नांदेड
खरं तर कविता समीक्षेसाठी नसतेच. कवितेवर प्रेम करावं, कविता अनुभवावी, कविता जगावी. कविता म्हणजे जगण्याची अनुभूती असते. मग ती सुखद असो किंवा दुःखद. घेतलेल्या आणि सोडलेल्या श्वासानंतरची तृप्ती ही कविताच असते. निसर्गाचे सुंदर रूप बघून जी सुखद जाणीव होते ती कविता असते. एखाद्या दुःखाने आतून तुटणंही कविताच असते. अन्यायाविरुद्ध पेटून उठणंही कविताच असते.
प्रत्येक वेळी ही कविता शब्दाचे रूप धरून कागदावर उतरेलच असे नाही. अनुभूतीचे अंतिम टोक, जिथे शब्द निःशब्द होतात, ती कविता असते, असं मला वाटतं. ते टोक शब्दांच्या चिमटीत पकडणं शक्य नाही. पण जे चिमटीत सापडेल ते त्या टोकाच्या गॉड पार्टिकल्सने भारित असायला हवं. तेव्हाच ती शब्दांची चिमूट जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत जाणिवेशी एकरूप होऊन भारित करून टाकते. कारण जाणीव ही वैश्विक स्तरावर अद्वैत आहे. प्रत्येकजण जीवनात प्रत्येक अनुभूतीला सामोरे गेलेला असतो. स्थळ, काळ, वेळ जरी वेगळे असले तरी जाणीव एकच असते. ही चिमटीत पकडणारी बोटं केवळ भारवाही असतात. जाणिवेचं हे टोक नेमकेपणाने पकडले आहे डॉक्टर राजश्री देशपांडे यांनी.
साहित्याक्षर प्रकाशनाकडून प्रकाशित, अंतर-बाह्य सुंदर असा हा कवितासंग्रह वाचत असताना जाणिवेची ही एकरूपता प्रत्ययास येते. मुखपृष्ठापासून ते आतील रेखाटनांपर्यंत सगळंच आशयाला साजेसं आहे.
व्यवसायाने मनोविकारतज्ज्ञ असलेल्या राजश्री देशपांडे यांची कविता मनाच्या तळापर्यंत उतरत जाते. मनोगतात कवयित्री म्हणते, मला कधीही वाटलं नव्हतं ह्या माझ्या कविता सगळ्यांसमोर याव्यात, येतील. त्या एकाच कारणासाठी लिहिल्या जायच्या, ते कारण म्हणजे सतत स्वतःशी संवाद करत राहण्याची माझी सवय आणि गरज.
खरं तर आपल्या स्वतःच्या गरजेतून साकार झालेली कलाकृतीच अस्सल घडते. जसं उन्हाळ्यात उन्हं झेलून पावसाच्या सरी बरसताच गर्भातील बीज रुजवून आणणं किंवा त्या बियाचं तरारून वर येणं, तशीच काहीशी रीत कलेच्या अभिव्यक्तीची असते. जाणीवपूर्वक, वाचकांसाठी म्हणून निर्माण केलेल्या कलाकृतीत कितीही कलात्मकता, सुंदरता असली तरी त्यात तो जिवंतपणा नसतो. राजश्री देशपांडे यांची कविता ही अशीच आतून उमललेली कविता आहे.
राजश्री देशपांडे यांची कविता वाचत असताना कवयित्रीचं जीवनाविषयीचं सखोल चिंतन उलगडत जातं.
बाहेरचे अघोषित तुरुंग
मर्यादित करू लागले अवकाश
घुसमटून टाकू लागले श्वास
म्हणून मी कैद नाकारत
वळू लागले स्वतःत
या ओळींमधून हे चिंतन अधोरेखित होतं. बाहेरच्या जगाने घातलेल्या अदृश्य मर्यादा जेव्हा श्वास गुदमरायला लावतात, तेव्हा स्वतःकडे वळणं ही पलायनवृत्ती नसते, तर ती आत्मशोधाची पहिली पायरी असते. हे वळण आतल्या आत कुढण्याचे नाही, तर स्वतःला सावरण्याचे आहे.
तुटत चाललाय माणूस जितका माणसापासून
पोखरत जातोय तितकाच स्वतःच्याही आतून
माणसाच्या माणूसपणाचं खिंडार पडत चालल्याची सल कवयित्री नेमकेपणाने टिपते. ही केवळ कवयित्री म्हणून केलेली टिप्पणी नाही, तर एक मानसोपचारतज्ज्ञ म्हणून माणसाच्या आतल्या पोकळीचं तिने केलेलं अचूक निदान आहे. बाहेरच्या नात्यांची पडझड आतल्याही अस्तित्वाला पोखरते, हे ती दाखवून देते.
विचारांची मजबूत बैठक, जीवनाविषयीचं जागृत आत्मभान आणि समृद्ध शब्दसंग्रह या कारणांनी राजश्री देशपांडे यांची कविता उंची गाठते. त्यांची कविता बाईपणाचं दु:ख रडून सांगत नाही, तर त्याची चिकित्सा करते.
तिनं रोमान्सची स्वप्नं पहावीत खूप
लाडाकोडाची मौजमस्तीचीही
साथ सोबतीची चालतील फार तर
पण कधीच पाहू नयेत स्वप्नं
लखलखित बाईपण
अभिमानाने मिठीत
घेणाऱ्या पुरुषाची!
हे टोकदार वास्तव कवयित्री निर्भीडपणे मांडून जाते. बाईने प्रेमाची, संसाराची स्वप्नं जरूर पहावीत, पण तिला माणूस म्हणून, बाई म्हणून अभिमानाने स्वीकारणाऱ्या पुरुषाचं स्वप्न पाहणं आजही समाजाला मान्य नाही, यावर ती थेट बोट ठेवते. इथे कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, पण एक शांत, बोचरा टोला आहे.
स्त्रीच्या मनाचा गुंता, नात्यांची पडझड, त्यातून आलेली अस्वस्थता, डोळ्यापुढचं धुकं हटल्यावर स्वतःची स्वतःशी झालेली ओळख, स्व च्या अस्तित्वाच्या ठिपक्याचं गडद होत जाणं, जागृत झालेलं आत्मभान, या प्रक्रियेत येणाऱ्या प्रत्येक वळणाची कवयित्री अचूकपणे नोंद घेते. म्हणूनच अन्वयांची अक्षरलिपी हा केवळ कवितासंग्रह वाटत नाही, तर स्वतःचा शोध घेणाऱ्या एका स्त्रीची डायरी वाटतो. प्रत्येक कविता ही एका अन्वयाची लिपी आहे, जी मागच्या अनुभवाला पुढच्या अनुभवाशी जोडते आणि आयुष्याला एक अर्थ देते.
या संग्रहातील रेखाटने, मध्ये मध्ये आलेल्या मिर्झा गालिब यांच्या ओळी, कवितासंग्रहाची उंची वाढवून जातात. पाठराखणच्या रूपाने प्रज्ञा पवार यांच्या शब्दांचं कौतुककोंदण या संग्रहाला लाभलेली अजून एक जमेची बाजू आहे. प्रज्ञा ताईंचं पाठराखणपर मनोगत या कवितेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं.
कविता समीक्षेसाठी नसते, पण चांगली कविता आपल्याला जगण्याचं बळ देते, स्वतःकडे बघण्याची नवी दृष्टी देते. राजश्री देशपांडे यांची कविता तेच बळ आणि तीच दृष्टी देते.
राजश्री देशपांडे यांनी अजून असंच दर्जेदार खूप लिहावं, त्यासाठी त्यांना आभाळभर शुभेच्छा.
- छाया बेले, नांदेड
संग्रह : अन्वयांची अक्षरलिपी
कवयित्री : डॉ. राजश्री देशपांडे
प्रकाशक : साहित्याक्षर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा