व्हाया मणिपूर: आपण खरंच माणूस आहोत का? - माणुसकीच्या शोधातला आक्रोश

             





सुचना: हा लेख केवळ माणुसकीच्या दृष्टीकोनातून लिहिला आहे



         खरंच आपण माणूस आहोत ? माणूस असलोच तर माणसाची जात ही प्राण्यातील सर्वश्रेष्ठ जात असू शकते ?  हेच प्रश्न सतत डोक्यात फिरत आहेत . याला कारण म्हणजे मणिपूरमधील जळत्या जातीय दंगलीत  महिलांची झालेली सामूहिक विटंबना. प्राण्यांमध्ये असलं कौर्य पहाण्यात येत नाही . मग उगाच आपण त्या पशूंना नावं ठेवतो . 
      सोशल मीडियावर मणिपूरमधील दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराचे फोटो ,थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल झाले , ते बघून  लकवा मारावा तसं मन , विचार, मेंदू सगळं सुन्न झालं . या घटनेने मानवतेची हत्या केली आहे . 
   पुर्वीपासूनच या देशात स्त्रियांची विटंबना होत आलेली आहे . द्रौपदी , सीता , अहिल्या , वृंदा , तारका , शुर्फणका , स्तनकराच्या विरुद्ध बंड करून स्वतःचे स्तन कापून हौतात्म्य पत्करणारी नांगेली , अगदी अलीकडे स्वतःच्या झालेल्या विटंबनेचा बदला घेत बॅन्डिड क्वीन म्हणून नावारूपाला आलेली  फुलनदेवी   अशा  घटनांनी इतिहासाची पाने रक्तरंजित झालेली आहेत . जातीय संघर्षात नेहमीच महिलांना कौर्याला सामोरं जावं लागतं . ज्या मातृअंगाची पुजा व्हायला हवी तेच  नागवलं जातं . 
       माणूस उत्क्रांत होत दोन पायांवर आला खरा पण त्याची चेतनाही उत्क्रांत झाली आहे का ? जर झाली असेल तर एवढ्या मोठ्या समुहापैकी कुणाच्याही आतली मानवता कशी जागली नाही ? दोन महिलांना विवस्त्र करून त्यांच्या शरीराला खुलेआम ओरबाडले जात असताना सगळा समुह त्याचा विकृत आनंद साजरा करताना दिसत आहे . हे कुठले माणूसपण ?  त्यातल्या कुणालाही आपल्याला जन्माला घालणाऱ्या आईची कुस किंवा ज्यावर पुरूष देह पोसला तो अमृतघट  आठवू नये ? हा कसला पुरूषार्थ ?   हा कसला जातीचा माज ?  
            दोन कोवळ्या मुलींच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी उतावीळ झालेल्या नराधमांना कशाचीही भीती वाटत नाही हे इथल्या राजकारणाचं , त्याचबरोबर न्यायव्यवस्थेचं अपयश आहे . म्हणूनच अशा नराधमांना कशाचाही धाक राहिलेला नाही . 
स्वार्थानं बरबटलेल्या राजकारणाला त्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचं काही सोयरसुतक नाही . छोट्या मोठ्या गोष्टींवर गळे फाडून रात्रं दिवस ओरडणाऱ्या मिडियालाही काही घेणं देणं नाही. कारण इथे त्यांचा कोणताही लाभ नाही . भारतीय समाज वेगवेगळ्या जातीच्या पिंजऱ्यात अडकून आपलं माणूसपण विसरून गेला आहे . स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या जाती आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी किंवा ते अबाधित ठेवण्यासाठी कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातीतील स्त्रियांवर अन्याय अत्याचार करतात . स्त्रीयांना बेअब्रू करतात . का जात माणसापेक्षा मोठी होते ? विश्वगुरू होण्याच्या बाता मारणाऱ्या देशात स्त्रियांसोबत एवढे निघृण कृत्ये होत असतील तर जगाला शिकवण देण्यासारखे आपल्याकडे काय आहे ? याचं उत्तर कुणाकडेही नाही . 
    स्वतंत्र भारतात जर अशा घटना घडतात  मग काय अर्थ उरतो इथल्या स्वातंत्र्याला ? बेटी बचाव बेटी पढाओ सारख्या घोषणांना काय अर्थ उरतो ? अॉलंपिक जिंकून आणलेल्या महिला खेळाडूंवर अत्याचार होतो , त्यांना अपमानित केले जाते . मग कोणता गौरवशाली इतिहास निर्माण केला जात आहे ? 
           एकीकडे  यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः । असं म्हणायचं . दुसरीकडे तिच्यावर अत्याचार करायचे.  एकीकडे मंदिरात देवी म्हणून पुजा करायची , दुसरीकडे  जीवंत स्त्रीदेहाची अशी विटंबना करायची . कुठपर्यंत चालायचं हे ?  
आम्ही समाज म्हणून फक्त सोशल मीडियावर संताप व्यक्त करून आपली जबाबदारी पार पाडतो . तेही जात, धर्म प्रांत बघून . एवढी भीषण घटना घडते तरीही कुठे निषेध नाही , मोर्चे नाही , बंद नाही . समाजकारण, राजकारण, न्यायव्यवस्था सगळेच मुग गिळून गप्प आहेत.
पिडीत महिलांनी कुणाकडे न्याय मागावा ? 
माणूस म्हणून कुठे चाललोय आपण यावर चिंतन व्हायला हवे . जातींच्या जात्यात स्त्रीचा हकनाक बळी जातोय . ज्या तिने निर्माणही केल्या नाहीत . स्त्री जननी आहे मग ती कोणत्या का समुहातील असेना , हे कधी उमगणार आहे ? सगळ्याच व्यवस्था फक्त स्त्रियांवर अन्याय करण्यासाठीच आहेत असाच अर्थ निघतो . 
उकळत्या तेलाच्या कढईत टाकलेल्या जीवाची तडफड व्हावी तशीच होणारी तडफड या इथे व्यक्त केली आहे . 
आतला माणूस जागी असलेल्यांना ती कळून यावी .

@छाया बेले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .