वृत्ती -प्रवृत्ती / कुणासमोर आपलं मन मोकळं करण्याआधी जरूर वाचा.









वृत्ती - प्रवृत्ती 

         दिल खोल दोगे  यारों के सामने तो 
नहीं खोलना पडेगा औजारो के सामने 

      यासारखे अनेक मेसेज दररोज सकाळी सकाळी आपल्या फोनवर  येत असतात. त्यात  माणसाला माणसाशी जोडण्याचा विचार असतो. माणूस एकटा पडत चालला आहे, मित्रपरिवार नातेवाईक यांच्याशी जवळीक निर्माण व्हायला हवी असा आशय असतो .
आतले कोवळे मन हे विचार वाचून भावविभोर होते. 
एखाद्या अस्वस्थ क्षणी ते विचार आठवतात आणि आपण आपल्या जवळच्या वाटणाऱ्या  व्यक्तीजवळ जी आपल्या नजरेत थोडीफार जबाबदारही असते आपलं मन मोकळं करतो . 
   मनाचा निचरा झाल्याने काही वेळासाठी हलकंही वाटतं.  
मात्र ज्या व्यक्तीला आपण आपल्या खाजगी जीवनातील सुखदुःख सांगितलेले असते ते ती व्यक्ती त्याच्याच जवळ न ठेवता सगळीकडे सांगत सुटली तर मात्र मनस्ताप अजून जास्त वाढतो . 
हे झालं कुणासमोर आपलं मन मोकळं करणाऱ्याच्या भावनांचा आपल्या गॉसिपसाठी मसाला म्हणून वापर करणाऱ्यासंबंधित . 
    दुसरा प्रकार असाही असतो की , एखाद्याच्या जीवनात काय चाललंय हे खोदून खोदून जाणून घेणं आणि त्याचा वाढवून चढवून प्रचार प्रसार करणं. त्या व्यक्तीच्या जिथे जिथे ओळखी असतील तिथपर्यंत जाऊन हे लोक त्या व्यक्तीच्या खाजगी जीवनाचा बाजार मांडतात . 

      आता हे असं का करतात लोक याविषयी जर विचार केला तर ते त्याच्याविषयी बोलतात त्याच्याबद्दल मनात असुया असते . किंवा त्या व्यक्तीपेक्षा आपण कुठेतरी लहान आहोत हा हीनभाव असल्याने स्वतःला श्रेष्ठ दाखवणं हा ही एक उद्देश असू शकतो . किंवा एखाद्या घटनेचा बदला घेण्यासाठीही असं केलं जातं .कधी कधी समोरच्या व्यक्तीची होत असलेली प्रगती, विकास बघवत नाही . तर कधी कधी निव्वळ विरंगुळा म्हणून अशी बेजबाबदारीची कृती केली जाते .
(  जे हे करत असतात त्यांच्या जीवनात सगळंच आलबेल आहे असंही नसतं) 
ही झाली यांची विकृती मात्र   ज्याच्याबद्दल बोललं जातं त्याला मनस्ताप सहन करावा लागतो. त्याच्या मनावर याचे खोल परिणाम होतात . कधी कधी समोरची व्यक्ती मानसिक पातळीवर निराशेच्या खोल  गर्तेत जाऊ शकते .

अशा घटनेवर माझ्या सासूबाई एका अभंगाचं कडवं त्यांच्या भाषेत सांगायच्या - 

निंदकाच्या तोंडी / साबनाची वडी
दिहाची पासुडी / सुद्द करी

आसं म्हणुन सोडुन द्याचं गं .. "

हे जरी खरं असलं तरी ,  साबनाची वडी घेऊन फिरणारे हे लोक समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्वाची कातडी सोलूवटून काढतात . मग हा सगळा प्रकार असह्य होऊन बसतो . आपण मन मोकळं करण्यासाठी चुकीच्या व्यक्तीची निवड केली हे लक्षात येई पर्यंत वेळ निघून गेलेली असते . 
कोणाचं नातं घटस्फोटापर्यंत आलं , कोण घटस्फोट   घेता घेता थांबल. 
किंवा कोणचा पोरगा बिघडेल आहे . कोणाच्या पोरीने प्रेमविवाह केला . कोणाची सुन आपल्या सासूसोबत कशी वागते तर कोणती सासू आपल्या सुनेला कशी वागते . विषयांची  यादी खूप मोठी असू शकते. 
 कधी माहिती मिळवून ,  तर कधी अंदाज बांधून हे लोकं दुसऱ्याच्या खाजगी जीवनाचा बाजार मांडतात. आणि जो आधीच समस्यांचा सामना करत असतो त्याच्या समस्या अजून वाढवण्याचं काम करतात . निसर्गातील प्रत्येक घटक सहकार्याच्या मदतीच्या उद्देशाने आपलं काम करत असतो . माणूस हाच घटक असा आहे की जो इतरांच्या आयुष्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. इथे स्त्री - पुरुष समान पातळीवर काम करत असतात . फरक एवढाच असतो की स्त्रिया सहसा आपल्या जीवनातील समस्यावर जास्त बोलतात तर पुरूष इतरांच्या जीवनात काय सुरू आहे यावर बोलत असतात . 
  इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचं लोकांना एवढं का पडलेलं असतं काही कळत नाही . आपण  माणूस म्हणून , किंवा समाजीक जबाबदारी म्हणून  काही मदत करू शकत असू तर ती करावी ,  नसेल शक्य तर सोडून द्यावं. माणूस म्हणून एवढं जर कळत नसेल तर उत्क्रांतीत माणसाची प्रगती झाली की अधोगती कळत नाही . आपली वेळ आपण चांगल्या कामासाठी वापरली. किंवा आपल्या जीवनातील समस्या सोडविण्यासाठी वापरली तर आपलं जीवन आणि आपला भोवताल सुंदर करण्यासाठी नक्कीच उपयोग होईल . 

आज एक विचार वाचनात आला त्यावरून मनात आलेले विचार मांडले आहेत.

  " काही लोकांना आपण आपलं समजून
आपण आपल्या जीवनातील गोष्टी सांगतो आणि ते त्याचा बाजार मांडतात . " हाच तो वाचनात आलेला विचार. 
ही खरोखरच वस्तुस्थिती आहे .
अडचणीत असताना 
कुणालाही काही सांगून आपल्या जीवनातील समस्या सुटत नाहीत . इतरांच्या सल्ल्याने उलट जास्त गोंधळात पडण्याचीच शक्यता असते . त्या पेक्षा एकांतात शांत बसून विचार केला तर मार्ग सापडू शकतो . अडचणीवर मात करणं सोपं जातं . 
साबनाची वडी घेऊन फिरणाऱ्यांनीही काम नसताना एकांतात बसुन  मनःशांती मिळवून घेतली तर कुणाच्या त्रासाला कारणीभूत ठरणं टाळलं जाऊ शकतं. 

@छाया बेले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .