परिस्थितीचं भेसूर तोंड... // रसग्रहण
भाकरीच्या दूल्डीतले कुटके
आर्धे उंदरायनं कतरले तं राहेल आर्ध्यावर
लेकरं ध्यान ठेवून हे.
चाळणी होयेल दूल्डीतून भाकर झाकणारं उपरणं
आर्ध दूल्डीत तं आर्ध भुयीवर टेकू राह्यलं
मांजरीनं डोळे लावून प्यावं दूध आशीच गत
मही बी झालीय भामट्यावानी..
घरातलं तेल, मिठ, पिट, आटल्यानं
बायकूची हाय खचली
तीचे खोल जायेल डोळे मला,
आटत जाणार्या ईहिरीवानी दिसू राह्यले
घरात मुंगीला मुताचा पूर झालाय
लेकरायची भाकर भेटन हे सपनं पाहणारी नादान नजर
टोचू राह्यली काळजाला आरपार..
परिस्थितीचं भुताडावानी हे भेसूर तोंड
आझूनच भेसूर होत चाललंय दिवसेंदिवस...
किशोर त्रिंबक भालेराव
जालना
9168160528
==================================
देशाला स्वातंत्र्य मिळून पाऊणशे वर्ष उलटून गेली . संविधान लागू होवून पाऊणशे वर्ष पूर्ण झाली तरीही
देशातील सामान्य जनतेच्या भुकेचा प्रश्न सुटलेला नाही .
महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर
अण्णा भाऊ साठे यांच्या स्वप्नातील भारत अजुनही साकरलेला नाही.
याचं कारण इथली जातीव्यवस्था,इथले स्वार्थाचे राजकारण भ्रष्ट प्रशासन व्यवस्था,
वंचित उपेक्षित घटकांच्या जगण्याच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत.
याला इथली मनुवादी , विषमतावादी शोषण जबाबदार आहे.
इथल्या काही समुहांनी सगळी संपत्ती संसाधने यावर अतिक्रमण करून वंचित उपेक्षित घटकांना वंचित ठेवले आहे .
मानवाला गौरवपूर्ण जीवन जगता यावं यासाठी बाबासाहेबांनी अनेक तरतुदी केलेल्या असल्या तरी वंचित घटकांच्या वाट्याला अजुनही गौरवपूर्ण जीवन आलेले नाही.
त्यांचा अजून भाकरीचाच प्रश्न सुटलेला नाही .
कवी किशोर भालेराव यांनी वरील कवितेतून जे दुःख दैन्य मांडले आहे ते नैसर्गिक नसून. ते शोषण व्यवस्थेने लादलेलं आहे. संविधानानुसार सगळे मानव समान आहेत . मात्र प्रत्यक्ष जीवनात ही समानता कुठेही दिसून येत नाही .
लेकरायची भाकर भेटन हे सपनं पाहणारी नादान नजर
टोचू राह्यली काळजाला आरपार..
परिस्थितीचं भुताडावानी हे भेसूर तोंड
आझूनच भेसूर होत चाललंय दिवसेंदिवस...
कवितेतील या ओळी काळजाचा ठाव घेणाऱ्या आहेत . इथल्या विषमतेचे भयावह रुप दाखवून देणाऱ्या आहेत.
कवीचं हे दुःख अस्सल आहे . त्यात कोणतीही कृत्रिमता नाही . म्हणून ती वेदना काळजाला हात घालते .
कुठे तरी हे बदलायला हवं. मानवता रुजविण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे .
तो पर्यंत लिहिणाऱ्यांनी माणसातल्या माणसाला हलवून जागं करीत राहणे आवश्यक आहे. किशोर भालेराव यांना खूप खूप शुभेच्छा !!
छाया बेले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा