समष्टीच्या कल्याणाच पसायदान मागणारी आभाळमाया!!

समष्टीच्या कल्याणाच पसायदान मागणारी आभाळमाया!!

यावर्षीचा बालसाहित्याचा पुरस्कार जेष्ठ साहित्यिक, आचार्य डॉ. सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कविता संग्रहाला मिळाला. 
एखाद्या साहित्यकृतीला साहित्य अकादमी मिळते तेव्हा , सगळ्या साहित्यप्रेमींचं लक्ष त्याकडे वेधले जाते. 
त्या साहित्य कृतीचे नेमके काय विशेष असेल याची वाचकांना उत्कंठा लागून राहते. याच उत्कंठेपोटी मी ही साहित्यकृती बरीच शोधाशोध करून मागवली व ती मनापासून भावली. 
   आभाळमाया मधून अवघा निसर्गच आपल्या समोर अवतरतो . झाडे, वेली, फळं, फुलं व निसर्गातील सर्व घटक साधेपणाने, परोपकारी जीवन जगण्याची कशी शिकवण देतात याची सुरेख  मांडणी डॉ. सुरेश सावंत यांनी केली आहे. 

जेव्हा मला रडायला येतं 
तेव्हा झाड अश्रू ढाळतं 
जेव्हा मला आनंद होतो 
तेव्हा झाड फुलं माळतं 

माझ्या मनातील भावना 
झाडाला बरोबर कळतात 
माझ्या भुकेच्या वेळेला 
झाडाची पिकली फळं गळतात 

   निसर्गाच्या ठायी असलेली उदारता, त्याच्यातील दातृत्वभाव निस्वार्थीपणे माणसाला सर्व काही देणाऱ्या झाडाचे मोठेपण या ओळीं मधून डॉ. सुरेश सावंत यांनी संवेदनशीलतेने टिपले आहे. 

तर ' जंगलंवाचन ' या कवितेतून ते मानवाला निसर्गाच्या जवळ जाण्याचे आवाहन करतात.
 निसर्गाच्या सौंदर्याचा साक्षात्कार घडविणाऱ्या 

झऱ्यात वाहे झुळझुळ पाणी 
वारा गातो मंजुळ गाणी 

दाट पसरली हिरवी कुरणे 
त्यावर चरती असंख्य हरणे 
या सारख्या ओळी  जंगलाची सैर घडवून आणतात. 
आभाळमाया ही साहित्यकृती जरी बालसाहित्य प्रकार असली तरी ती मोठ्यांनाही तेवढीच खिळवून ठेवते. 

गुहा- गुंफातून विहरताना 
अज्ञाताची ओळख पटते 
हे सांगताना 
निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी देहाला हजार डोळे फुटावेत अशी उत्कटता  कविता वाचकाच्या मनात निर्माण निर्माण करते. 

मानवी जीवन खरं तर पुर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. मानवही याच निसर्गाचा घटक आहे याचा विसर अलिकडील पन्नास वर्षांच्या काळात माणसाला जास्तच  पडला आहे . त्या आधी म्हणजे टिव्ही मोबाईलचा वापर कमी होता. खेड्यापाड्यांना शहरी संस्कृतीचा संसर्ग झाला नव्हता. किंवा त्याचे प्रमाण कमी होते त्या काळात माणूस निसर्गाशी जवळीक साधून होता.  पिंपळाचं ज्येष्ठत्व,  वडाचं आजोबापण टिकून होतं . याचा गावाला आधार वाटायचा. अनेक  महत्त्वाच्या गोष्टी या ज्येष्ठांच्या साक्षीने घडायच्या. 
तो काळ 'वड आजोबा' ही कविता वाचत असताना वाचकाच्या डोळ्यात अवतरतो. 
या कविता कधी निसर्गातल्या अद्भूत सौंदर्याचं दर्शन घडवतात तर कधी  अंतर्मनात डोकावून आत्मचिंतन करायला भाग पाडतात . 

मावळतीचा सुर्य / मित्रा, या कविता मनावर साचत चाललेले नैराश्याचे मळभ दूर करून  त्यावर उपचार 
 करणाऱ्या व काय चांगले काय वाईट व आपण काय निवडावे याची जाण निर्माण करून मनाला बळ पेरून,
 उभारी देणाऱ्या आहेत . 
तर , रागामुळे काय काय नुकसान होते व रागावर नियंत्रण कसं करावं हे राग आला राग या कवितेत रागा सारखा रुक्ष विषय डॉ सुरेश सावंत यांनी अतिशय रंजक पद्धतीने  मांडला आहे. 

प्रकाश गीत /कोरी पाटी / बलवंत तू गुणवंत तू / कोलंबसासारखा/ संकटाच्या छातीवर / यांसारख्या कविता बालमनावर सकारात्मक विचारांचे बीज पेरणाऱ्या तर मोठ्यांच्या मनात विवेक जागृत करणाऱ्या 
प्रेरणादायी कविता आहेत . एकुणच आभाळमाया ही साहित्यकृती म्हणजे समष्टीच्या कल्याणाच पसायदान आहे. 
लहान थोर सर्वांनी वाचायला हवा अशीच ही साहित्यकृती आहे. 
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आभाळमाया व  डॉ. सुरेश सावंत सर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!!
पुढील निर्मितीसाठी आभाळभर शुभेच्छा !!

- छाया बेले.





 

 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .