फुटलेली बरणी : अनित्यतेचा स्वीकार व जगण्याचा अर्थ .


फुटलेली बरणी : अनित्यतेचा स्वीकार व जगण्याचा अर्थ


        आज सकाळी सकाळी नाश्ता बनविण्याच्या घाईत हातातून निसटलेल्या मिठाच्या बरणीचे फरशीवर तुकडे तुकडे होऊन विखुरले. मला त्या बरणीचं झाकण खूप आवडलं होतं, म्हणून मी तिला खूप जपत होते. ती एका क्षणात काचेच्या असंख्य तुकड्यांत रूपांतरित झाली . हळहळ करीत सगळ्या काचा भरून कचऱ्यात टाकल्या. पण त्या काचाही टाकाव्याशा वाटत नव्हत्या. त्या सुंदर झाकणाला मिनिटभर हातात घेऊन निरखत राहिले. खरं तर त्या झाकणामुळेच ती बरणी घेतली होती. आता झाकण हातात होतं, पण ज्यासाठी ते होतं ती बरणी नव्हती. काही गोष्टींचं असंच असतं. आपण ज्या गोष्टीवर जीव लावतो, तीच एखाद्या क्षणी हातातून निसटून जाते. मागे फक्त आठवणी उरतात आणि हातात काहीच राहत नाही.
अशा कितीतरी बरण्या क्षणात फुटून काचेत रूपांतरित होतात. त्यात नेहमी मीठच असेल असं नाही.
कधी त्यात छोटी छोटी सुंदर स्वप्नं असतात. मनाच्या कप्प्यात अलगद अनेक वर्षे जपून ठेवलेली. कधी त्यात नाजूक भावना असतात. एका चुकीच्या शब्दानेही तडकणाऱ्या. कधी आपण ठरविलेली ध्येयं असतात. त्यांच्यासाठी घेतलेले कष्ट असतात. कधी जीवापाड जपलेली, जीवाच्या समतुल्य समजलेली नाती असतात. त्या नात्यांवर आपण इतका विश्वास ठेवलेला असतो की ती कधी तुटतील, याची कल्पनाही मनाला शिवत नाही. पण जीवन कधी कोणती बरणी हातातून निसटवेल, हे कुणालाच माहीत नसतं.
मिठाची बरणी फुटल्याने एवढं व्याकूळ होणाऱ्या मनाची इतर बरण्या फुटल्यानंतर काय अवस्था होत असेल?
हे फक्त ज्याचं त्यालाच कळो जाणे. लोक त्यावर अंदाज लावू शकतात. सांत्वनाचे शब्द बोलू शकतात. धीर देऊ शकतात. पण ज्या मनातून ती वेदना वाहत असते, त्या मनाचा आवाज फक्त त्यालाच ऐकू येत असतो. दुसऱ्याला फक्त काचा दिसतात; पण त्या काचांत विखुरलेलं आयुष्य दिसत नाही.
या बरण्या फुटल्यानंतर आपण स्वतःला गमावून बसलो असं काहीसं होतं. आता शिल्लक काही उरले नाही. आभाळ आणि धरती दोन्हींचा लोप झाला आहे, असंच वाटतं. जणू जगण्याचा आधारच निसटून गेला आहे. मनातलं घर कोसळलं आहे. शब्द असूनही बोलता येत नाही आणि अश्रू असूनही रडता येत नाही.
आता काय करायचं? कसं जगायचं? कशासाठी, कुणासाठी जगायचं? असे अनेक प्रश्न समोर येऊन शत्रुत्व निभावत असतात. उत्तरं कुठेच सापडत नाहीत. प्रत्येक प्रश्न आणखी एका प्रश्नाला जन्म देत राहतो. आपलं अस्तित्व निरर्थक वाटायला लागतं. सगळं गोठून जातं. वेळ पुढे सरकत असतो; पण मन मात्र त्याच फुटलेल्या बरणीजवळ बसून राहतं.
आपण कुठे कमी पडलो, किंवा काय द्यायचं राहून गेलं, जे ही तोडफोड वाचवू शकले असते? विचारांच्या मुंग्या मेंदूचा भुगा करीत राहतात. प्रत्येक आठवण पुन्हा पुन्हा डोकं वर काढते. प्रत्येक प्रसंग नव्याने जगावा लागतो. काळासोबत प्रत्येक शब्दाचा अर्थ बदलत जातो.
मग आपण आपलेच सगळे चोरखिसे पुन्हा पुन्हा चाचपून पाहतो. आपल्यासहित सगळंच देऊन झालेलं असतं. हातचं राखून काहीही ठेवलेलं दिसत नाही. तरीही प्रश्न संपत नाहीत. आपण अजून काय देऊ शकलो असतो, याचाच शोध सुरू राहतो. स्वतःला दोष देण्याची सवय इतकी घट्ट झालेली असते की, दोष नसतानाही आपण स्वतःलाच शिक्षा देत राहतो.
फुटलेल्या बरणीच्या सुतकात आपण स्वतःला अपराधभावात लोटून घेतो. त्या अपराधभावाचं ओझं दिवसेंदिवस वाढत जातं. आणि नकळत आपणच आपल्या मनाच्या काचांवर पुन्हा पुन्हा चालत रक्तबंबाळ होत राहतो.
    रिकामी बरणी फुटल्यानंतर आपण तिच्यात आपल्या कल्पकतेने प्रेमभाव, सद्गुण, विश्वास, आपुलकी, माया, जिव्हाळा भरून तिलाच आपल्या जगण्याचा आधार बनवून टाकतो. नकळत तिच्याशिवाय स्वतःला असहाय करून घेतो. त्या बरणीभोवतीच आपल्या जगण्याचा केंद्रबिंदू निर्माण होतो. मग तिचं अस्तित्व म्हणजेच आपलं अस्तित्व वाटू लागतं.
तर कधी सगळा दोष त्या बरणीच्या कच्च्या काचेला देत काचा फोडत राहतो. जे तुटून गेलं, त्याचाच राग मनात धरून जगत राहतो. तुटलेले तुकडे पुन्हा पुन्हा उचलत राहतो. त्यात स्वतःचेच हात रक्तबंबाळ होत आहेत, हेही लक्षात येत नाही. कारण त्या वेळी दुःखापेक्षा राग जास्त बोलत असतो, आणि विवेक शांतपणे कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसलेला असतो.
प्रत्येकाच्या जीवनात अशा अनेक बरण्या फुटत असतात. या फुटण्यामागे कधी स्वार्थ असतो, कधी अहंकार, कधी गैरसमज, कधी अपेक्षांचं ओझं, कधी आपण कारणीभूत नसतो , तर कधी कोणतंच कारण नसतं. 
काही गोष्टींची उत्तरं आयुष्यभर मिळत नाहीत. त्या फक्त घडतात. त्यांचा स्वीकार करायचा की त्यांच्यातच अडकून पडायचं, एवढाच पर्याय आपल्यासमोर उरतो.
हा सगळा मेंदूचा, भावनांचा उपद्रव थांबता थांबत नाही. मनाला शांत बसता येत नाही. कधी आठवणींचे लोंढे येतात, तर कधी पश्चात्तापाचे. कधी स्वतःवर राग येतो, तर कधी समोरच्यावर. मन एकाच वर्तुळात फिरत राहतं. त्यातून बाहेर पडण्याचा रस्ता दिसत नाही.
    अशा वेळी झाडांकडे पाहावंसं वाटतं.
झाडं कशी सगळे ऋतू शांतपणे झेलून घेतात. तरीही आपलं हिरवेपण हरवू देत नाहीत. शिशिर सगळी पानं ओरबाडून घेऊन जातो. झाडं क्षणभरही त्याचा प्रतिकार करत नाहीत. ती त्या ऋतूचा स्वीकार करतात. कारण त्यांना माहीत असतं की, प्रत्येक शिशिराच्या पाठीवर एक वसंत बसलेला असतो.
वसंत आला की तीच झाडं पुन्हा नव्या पालवीने बहरून येतात. कोणी मुळांवर कुऱ्हाडीने घाव घालून त्यांना धराशायी केलं, तरी काही दिवसांनी त्याच खोडावर इवलेसे हिरवे कोंब फुटतात. पुन्हा तेवढ्याच आनंदाने, तेवढ्याच आत्मविश्वासाने ती डोलू लागतात. जगणं थांबवत नाहीत. कारण त्यांना जगण्याचा धर्म माहीत असतो.
माणूस मात्र एका फुटलेल्या बरणीजवळ वर्षानुवर्षे बसून राहतो. जे निसटून गेलं, त्यालाच धरून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहतो. त्यात वर्तमानही हरवतो आणि भविष्यही.

     अशा असहायतेच्या क्षणी बुद्ध आपला अनित्यवाद घेऊन मदतीला धावून येतो.
सगळी सृष्टी प्रत्येक क्षणी बदलत आहे. हा बदलच तिचा स्वभाव आहे. या बदलाच्या प्रक्रियेत आपणही आहोत. आपणही सृष्टीच्या जीवनचक्राचा एक भाग आहोत. 

  मुठभर मातीत जीवन स्पंदतं. त्या मातीला आकार मिळतो. नाती तयार होतात. स्वप्नं जन्म घेतात. आनंद उमलतो. दुःखही येतं. आणि पुन्हा एक दिवस सगळं त्याच मातीत विलीन होतं.

या परिवर्तनाचा, या वास्तवाचा स्वीकार न करणं, हेच माणसाच्या दुःखाचं आणि संघर्षाचं मूळ कारण आहे.
      कुणाला काही क्षण, कुणाला काही तास, कुणाला काही दिवस, तर कुणाला अनेक वर्षं देऊन निसर्ग मातीतून जीवांची उगवण करतो आणि पुन्हा त्याच मातीत त्यांना सामावून घेतो. म्हणूनच जे जे आपल्या हक्काचं आहे असं आपण समजतो, त्यावर खरं तर आपला हक्क नसतो. आपल्याला ते फक्त काही काळासाठी लाभलेलं असतं.
हा काळ मर्यादित आहे, हे लक्षात घेऊन जगता आलं तर फुटलेल्या बरणीचं फार दुःख होणार नाही. कारण आपल्या अस्तित्वासोबत जग अस्तित्वात आलेलं असतं आणि आपल्या लयासोबत आपल्यापुरतं जगही लय पावतं.
जीवनासाठी बरणी असते; बरणीसाठी जीवन नसतं.
एकमेकांवर अवलंबून राहणं हा जीवनाचा सुंदर भाग आहे. प्रेम, माया, जिव्हाळा, नाती यांशिवाय जीवन अपूर्ण आहे. पण त्या नात्यांना, त्या व्यक्तींना, त्या वस्तूंना किंवा त्या स्वप्नांना जीवनापेक्षा मोठं करून चालत नाही.
बरणी फुटली तरी जीवनावर तडे जायला नकोत.
कारण जीवन पुन्हा उभं राहू शकतं. झाडांसारखं पुन्हा पालवी धरू शकतं. मातीसारखं पुन्हा आकार घेऊ शकतं. नदीसारखं पुन्हा वाहू शकतं.
कारण... 

सगळंच अनित्य आहे.

— छाया बेले





टिप्पण्या

  1. माझ्या मते आपला हा लेख फुटलेली बरणी ह्या प्रतिकात्मक विचारातून दिलेला आहे , फुटलेली बरणी म्हणजेच महत्वाकांक्षी स्त्रीयांच्या मनसुब्यांना मूठमाती देणं होय अशा स्त्रीयांना काय वाटतं असेल या भावविश्वा विषयी कुणीच विचार करत नाही , बरणी जशी मीठ भरुन ठेवण्याच्या हेतूने आणली होती , वापरात होती तसंही काहीसं स्त्री जीवनही आहे , तिला आपल्या मतलबापुरतं महत्व दिलं जातं ,
    आपल्या ह्या लेखातील एक वाक्य आहे -- काही गोष्टींचं असंच असतं ह्यातील अदृश्य सूचकता लक्षवेधी आहे , आणि हेच वाक्य वाचकाला अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडतं , आणि पुढे काय , पुढे काय असं करत पूर्ण लेख वाचला जातो , हे ह्या वाक्यमुळेच लेखाची यशस्वीता आहे असं मी म्हणेन ,
    स्त्री जीवनावर भाष्य करणारा हा लेख वाचनीय तर आहेच आहे , महत्वाचाही आहे ,
    ~~~~~~~~~~~~ निर्मोही , भुसावळ , 9272303212

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .