आत्मनिष्ठ हुंकाराचा वैश्विक अविष्कार:माधव कौशिक यांची निवडक कविता !!


आत्मनिष्ठ हुंकाराचा वैश्विक अविष्कार:माधव कौशिक यांची निवडक कविता

छाया बेले
नांदेड


सर्वभाषा पब्लिकेशन नवी दिल्ली यांनी माधव कौशिक यांची निवडक कविता(२०२५) हे बाळासाहेब लबडे यांनी हिंदीतुन मराठीत अनुवादित केलेले पुस्तक आहे. याची अर्पण पत्रिका मला मनापासून आवडली.
कविता असो किंवा कोणत्याही प्रकारचे लिखाण असो , माणसाच्या जगण्याला आधार देणारी , सगळ्यात आधी मानवाला केंद्रस्थानी ठेवणारी साहित्यकृती ही एक स्वयंप्रकाशी नीती असते. धर्म, जात, पंथ, लिंग किंवा कोणत्याही प्रकारचे शोषणाच्या बुडाला आग लावणारे साहित्य हेच खरे साहित्य असते.याच कुळातील ' माधव कौशिक यांची निवडक कविता ' हा डॉ. बाळासाहेब लबडे यांनी अनुवादित केलेला कविता संग्रह नुकताच वाचनात आला.
याची हिंदी आवृत्तीही वाचली . 
मराठी वाचकांसाठी देश विदेशातील साहित्याचे दालन खुले करून देण्याचा अनुवाद हा अत्यंत महत्वाचा दुवा आहे . 
डॉ. बाळासाहेब लबडे यांनी हे काम अगदी तंतोतंत पार पडले आहे . 
कवितेचा आशय नेमकेपणाने वाचकांपर्यंत पोहोचलेला आहे. 
या कविता संग्रहातील पहिल्याच कवितेत समकालीन भवतालचा नेमका वेध घेतला आहे.
"फारच आश्चर्ययाची गोष्ट आहे 
न्यायाला धर्माची 
सत्याला शिवाची 
जीवात्म्याला परमात्म्याची 
वसुंधरेला कुटूंबाची 
जोड आहे का ?
नराला नारायण म्हणणारे लोक 
असत्याच्या आंधळ्या गुहेमध्ये ......
घृणेला शरणागत होवून बसले आहेत"....
"जिवंत त्वचेमध्ये संस्कृतीचा 
जिवंत भुसा भरून 
वेळेच्या भिंतीवर टांगले आहेत
माणसाचे केवळ सापळे "
आजचा काळ हा असाच आहे .आपली नितीमत्ता, माणूस असण्याची सार्थकता हरवून,सगळीकडे  जिवंत त्वचेमध्ये पेटता भुसा भरलेल्या माणसांचे बेहोश तांडे भटकताना दिसत आहेत. कुणाच्या जगण्याच्या हिरवळीवर कधी, कुठे, कसा विध्वंस घडवून आणतील सांगता येत नाही. 
भांडवली सत्ताधिपतींनी आपला  हेतू साध्य करण्यासाठी माणसाचं खेळणं करून टाकलं आहे. बाजार आता माणसाची गरज भागविण्याचं साधन आहे.हेच माणसाच्या मनातून पुसून टाकले आहे.बाजाराची गरज भागविण्यासाठी माणूसाने,अशी नवीन शोषण पद्धती निर्माण केली गेली आहे. हेच अंतिम सत्य आहे हे मनावर बिंबवले जात आहे. जेणेकरून सामान्य माणसाचे अनिर्बंध आर्थिक शोषण करता येईल. 
याची नेमकी मांडणी कवीने पुढील कवितेतून केली आहे.
"खेळण्याची किंमत 
बिछान्यापेक्षा दुप्पट आहे 
तेव्हाच मी समजून गेलो होतो 
प्रजातंत्राच्या मुळांना 
वाळवीने खाऊन टाकले आहे 
प्रजातंत्राची फळे 
रक्तपिपासू नागांनी खाल्ली 
आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी 
सुरक्षितपणे ठेवून दिली आहेत
ग्रीन हाऊसमध्ये 
मी या व्यापक 
सत्याचे तथ्य 
ओळखले आहे 
खेळण्याची किंमत काय आहे ?
आणि बिछाना काय आहे ?
जमिनीवर पसरून मी ओरडलो 
" जनगनमन आधी नायक जय हे भारत भाग्य विधाता !"
कवीला या शोषण व्यवस्थेची जाण आहे. तो सगळी कारस्थाने ओळखून आहे. 
देश सगळ्यांचा असुनही सामान्य जनतेच्या वाट्याला केवळ संघर्ष. मुठभर लोक सगळी आर्थिक, राजकीय,सगळ्याच सत्ता आपल्या ताब्यात घेतलेली आहे . 
अशा वेळी या व्यवस्थेला नकार देण्यासाठी कवी 
जमिनीवर लोळण घेत, 
हा देश आमचाही आहे. आम्ही या लोकशाहीचे भाग्यविधाते आहोत. हे ओरडून सांगतो. 
कारण कोणत्याही पातळीवरचे शोषण मानवी जीवनाचे अवमूल्यन मानवतेच्या बाजूने असलेल्या खऱ्या लेखकाला सहन होत नाही. 
"जमीन खोदा 
गर्भार प्रश्नांची उत्तरे 
गोड पाण्याचे झरे 
ओसंडून वाहू लागतील 
जमीन खोदने 
ही अनिवार्य अट आहे जगण्याची 
काळाची ती मागणी आहे 
जमिनीखाली लपलेले आहे आभाळ 
जे तुम्हाला खुणावत आहे." 
कवी,आमआदमीच्या मनातील शोषकसत्तांप्रती असलेल्या भक्तीला आग लावण्याचं काम करतो आहे.
जागं होण्याचं, उठून उभं राहण्याचं आवाहन करतो आहे. सर्वच स्तरावर व्यवस्थेची चिकित्सा करण्याची इच्छा आहे आणि हे शोषितांनाच करावं लागेल. कारण ज्यांचे या व्यवस्थेशी हित संबंध जुळून आहेत ते तर व्यवस्था जपण्याचाच प्रयत्न करतील. मात्र हजारो वर्ष ज्यांचं नुकसान होत आलं आहे, होत आहे अश्यांनी आता, या व्यवस्थेमधून बाहेर पडून, नवीन न्याय, समता, बंधुता या तत्त्वांवर आधारित व्यवस्था निर्माण करण्यासाठी कटिबद्ध व्हायला हवं, ही हाळी माधव कौशिक यांची कविता देते.
"बांधलेल्या जखमेला सोडून 
चालणाराच्या नशिबात तर 
दुःख असणारच आहे "
गुळगुळीत परिभाषेत जो गुलामीला स्विकारणार नाही .त्यांच्या पायात बेड्या टाकण्याची स्पर्धा सगळीकडे सुरू आहे.
परंतु हे जग अशाच बंडखोर आणि विद्रोही 
लोकांच्या जीवावर जिवंत आहे.
शरण जाणे, गोठणे, थांबणे हे लेखकपण नाही. परंपरांच्या अधीन राहून लिखाण करणे हेही कवीपण किंवा लेखकपण नाही. असं लिखाण करणारे फक्त परंपरेचे लेखनिक ठरतात .परंपरा त्यांना लेखक अशी पदवी देऊन आपल्या दरबारात भाटगिरी करण्यासाठी ठेवून घेते . 
खरा कवी जीवनाविषयीचे सखोल सामंजस्य निर्माण करणारी दृष्टी देत असतो. सर्वन्यायी, नीती व सौहार्दाच्यापायी कवीने / लेखकाने जाती, धर्म,पंथ, वंश लिंगभेदाधारीत अशा सर्व चौकटीचे तुरुंग उद्ध्वस्त करायचे असतात. 
कवी माधव कौशिक यांची कविता हे काम प्रामाणिकपणे करते. 
त्यांच्या कवितांत 'म्हातारा भूतकाळ विचारत आहे' मधील स्मरणवेदना, 'कवितेचे मर्म' मधील शब्दांचे मौन, 'लॉकडाऊन' मधील एकाकीपणा, 'नदीचा प्रवाह', 'नव्या आशेचे जगचा आशावाद', 'गझलची सोज्वळता', मदर डेचे ममत्व, कविताची जीवनलय, पदरामध्ये विस्तवचा स्त्रीसंघर्ष, बासरी वादनचा शांत नाद, शब्द प्रत्येक शब्दची भाषा-जबाबदारी, स्वप्नाळू डोळेच्या आकांक्षा, माणूसचे गुंतागुंतीचे रूप, प्रतीक्षाचा कोंडलेला श्वास, मोजमापचे नातेसमीकरण, अवघड वळणचे द्वंद्व, पाणीचे अस्तित्व, बुद्ध हसला आहेची करुणा, सुंदर दिवसचा विरह, महासागरची विशालता, एकाकीपणची पोकळी, विद्रोहची ज्वाला, क्षणची नाजूकता, संघर्षचे जीवनतत्त्व, गर्दीचे शास्त्रचे मानवी गणित आणि सगळे क्षण हळूहळूची संथ जीवनलय — असा मानवी अनुभवाची सघनता, संवेदनशीलता, आणि साधेपणातला खोल आशय आहे. कवितांची भाषा सुंदर दिसते.
माधव कौशिक "कवी की दृष्टि से" मधील कवितांचा अनुवाद बाळासाहेब लबडे यांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि भाषिक सौंदर्याने केला आहे. कौशिक यांच्या कवितांमध्ये माणसाच्या अंतर्मनातील गुंतागुंती, निसर्गाशी असलेले आत्मीय नाते आणि अस्तित्वाच्या प्रश्नांची गहिरी जाणीव या सर्वांचा अप्रतिम संगम दिसतो. त्यांच्या कवितांमधील प्रतीकात्मकता आणि लयबद्धता अनुवादात जपताना लबडे यांनी मराठी भाषेच्या लवचिकतेचा सुंदर वापर केला आहे. त्यामुळे मूळ कवितेची अनुभूती हरवू न देता त्या मराठी वाचकांच्या मनात नवे अर्थविश्व निर्माण करतात.
कौशिक यांच्या कवितांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील चिंतनशीलता, सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि मानवी अस्तित्वाच्या ताणतणावांवरील तात्त्विक दृष्टिकोन. त्यांच्या कवितांमधून जीवनातील क्षणभंगुरता, विरह, प्रेम, काळ आणि स्मृती यांचा अंतर्मुख प्रवास दिसतो. बाळासाहेब लबडे यांच्या अनुवादात हीच गहनता आणि भावस्पर्शी अनुभूती तितक्याच प्रभावीपणे उतरली आहे. भाषेची सजीवता, भावनांची पारदर्शकता आणि कवितेतील विचारांचे भारतीय आणि वैश्विक संदर्भ यामुळे या अनुवादित कविता मराठी साहित्यात एक स्वतंत्र स्थान निर्माण करते.


छाया बेले 
नांदेड 
Mob +91 73500 14622


पुस्तकाचे नाव :माधव कौशिक यांची निवडक कविता 
मूळ कवी :माधव कौशिक 
अनुवाद: बाळासाहेब लबडे 
प्रकाशक: सर्व भाषा पब्लिकेशन नवी दिल्ली 
प्रकाशन वर्ष: २०२५
पृष्ठे: 104 
मुखपृष्ठ :सर्व भाषा पब्लिकेशन 
किंमत:210rs

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .