परिवर्तनाचा विचार देणारी साहित्यकृती - चोळी | पुस्तक परिचय
परिवर्तनाचा विचार देणारी साहित्यकृती - चोळी
सुप्रसिद्ध लेखक, चित्रपट दिग्दर्शक सुरेश कृष्णाजी पाटोळे यांची 'चोळी' ही कादंबरी बऱ्याच प्रतीक्षेनंतर हाती आली व जराही उसंत न घेता कादंबरी वाचून काढली.
याचं कारण म्हणजे विषयाचं नाविन्य, वाचकाला खिळवून ठेवण्याची लेखकाची खुमसदार वर्णन शैली , घटना , प्रसंगांना असणारी गती,परिवर्तनवादी विचारांची सजगतेने केलेली मांडणी. लेखक सुरेश पाटोळे यांच्या लिखाणाचे हे सगळेच गुणविशेष घेऊन 'चोळी' ही कादंबरी वाचकांच्या भेटीला आली आहे.
भारतीय समाजाला पोखरून खिळखिळ्या करणाऱ्या अशा अनेक रूढी परंपरा आजही समाजात चालू आहेत, ज्याने स्त्रियांचा आत्मसन्मान पायदळी चिरडला जातो.खेदाची बाब अशी की ज्यांच्या बाबतीत हे सगळं घडतं, आपलं शोषण होत आहे हे त्यांच्या ध्यानीमनीही येत नाही. या बाबतीत कसलीच खंतही वाटत नाही. याला कारण म्हणजे शोषण अंगवळणी पडलेले असते. आपलं शोषण होत आहे हेच त्यांना माहीत नसते.
आपल्या आजूबाजूला हे घडत असताना सरावाने निगरगट्ट झालेला समाज त्याकडे कधी सहज, तर कधी मुद्दाम कानाडोळा करतो .
मात्र संवेदनशील मनाच्या लेखकाला भवतालातील होणारे हे शोषण अस्वस्थ करून सोडते. जर ही अस्वस्थता नसेल तर तो लेखक कसला.
अशाच अस्वस्थतेतून निर्माण झालेली 'चोळी' ही साहित्यकृती आहे.
'चोळी' ही कादंबरी वडार समाजातील स्त्रीयांनी चोळी न घालण्याच्या कुप्रथेवर भाष्य करते.
पुराणातल्या कुठल्यातरी एखाद्या गोष्टीशी संबंध जोडून अज्ञानी, अशिक्षित समाजात अशा अनेक रुढी, परंपरा रूढ करण्यात आल्या. त्याचेच ओझे अज्ञानी समाज आजतागायत वाहतो आहे.
अशा प्रकारे कैक वर्षे या उपेक्षित भोळ्या भाबड्या समाजाचे शोषण सुरूच आहे. हे लोक समाजातील स्त्री असो की पुरुष , देव आपलं काही बरं वाईट करेल या नाहक भीतीपोटी लादलेल्या त्या रुढीचं विंचवानं बिऱ्हाड वाहवं तसं वाहत अत्याचार सहन करीत जगत राहतात. रुढी परंपरा मग त्या वाईट असल्या तरी त्या त्या समाजाची अस्मिता बनून जाते. त्यांचा दुराभिमानही बाळगला जातो. त्याच समाजातील एखादा माणूस या चुकीच्या गोष्टींना विरोध करत असेल तर त्याचाच समाज त्याला टोकाचा विरोध करतो. विरोध करणारे बहुसंख्य असल्याने या गोष्टी नष्ट करणे अवघड होते.
संत महात्म्यांनी, महापुरुषांनी या शोषितांना अंधारातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांना त्याच घटकांच्या विरोधाला तोंडही द्यावे लागले. याचं उदाहरण द्यायचं झालं तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलाची घटना घेता येईल.
महामानवांच्या विचारांची, कार्याची पताका प्रामाणिकपणे खांद्यावर घेऊन काही लोक सतत आपला वाटा उचलत आहेत, राहतील. अशा एका नायकाची व त्यांच्या अंधकारमय भोवतालाची कहाणी चोळी या कादंबरीतून लेखक सुरेश पाटोळे यांनी मांडली आहे.
सुरेश पाटोळे यांनी वडार समाजाचा व्यवसाय इतिहास, त्यांच्या धार्मिक चालीरीती, त्यांचा जिवन संघर्ष ,श्रद्धा-अंधश्रद्धा, याचं सूक्ष्म निरीक्षण या कादंबरीतून मांडले आहे.
कादंबरीचा नायक 'जगन'हा डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा आहे, शिक्षित होऊन जागृत झालेल्या समाजातील मित्रांच्या सोबत राहिल्यामुळे त्याच्या विचारात परिवर्तन होऊन तोही आपल्या समाजातील अन्यायकारक रूढी-परंपरांना नकार द्यायला सरसावतो खरा,पण शोषण व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करणाऱ्याचा मार्ग कधीही काट्यानेच भरलेला असतो. जगनही समाज, आप्तस्वकीय, स्वतःच्याच घरातल्यांच्या रोषाला बळी पडलेला परिवर्तनाचा विचारवाहक आहे.टोकाचा होणारा विरोध, त्याला वेड लागलंय म्हणून घरातल्यांकडून होणारी अवहेलना या मुळं कधीकधी उद्विग्नतेने त्याचे मन भरून येतं, चीडही येते. मात्र मित्र कायम सावलीसारखे त्याच्या सोबत असतात.
त्याच कवडशाने जगन अंधारातून उजेडाकडे वाटचाल करीत राहतो.
वर्ण व्यवस्थेतील उंतरंडीत जे सर्वात खाली ढकलले गेले किंवा गाडले गेले. त्या घटकातील
स्त्रियांनी चोळी न घालण्याची प्रथा ही सर्वच प्रांतात श्रेष्ठ कनिष्ठत्वावर आधारित समाज रचनेत कनिष्ठाचे अवमूल्यन करण्यासाठी रुढ केलेली दिसून येते.
केरळातील नांगेलीची कहाणी ही याची साक्ष देते.
तीने या प्रथेच्या विरोधात बंड करून प्राणाची आहुती दिली. अन्यायाच्या विरोधात न्यायासाठी संघर्ष करणारे, काळाच्या प्रवाहात प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारे आपली छाप मागे ठेवून जातात. मागाहून या वाटेवर येणाऱ्यांसाठी आपल्या पायखुणा मागे ठेवतात.
कादंबरीचा नायकही या वाटेवरचा प्रवासी आहे त्याला आपल्या समाजातील स्त्रीयांनी चोळी न घालण्याचं दुःख
काळजाला डागण्या देत असतं. नायकाच्या उरातील ही वेदनेची खदखद कुप्रथेविरुद्ध विद्रोह करण्याचं बळ पुरवीत राहते.
चोळी या कादंबरीत समाजातील स्त्रीयांच्या बाबतीत होत असलेल्या अनेक पातळ्यांवरच्या अन्यायावरचा पडदा लेखकाने ओरबाडून काढला आहे.
यात जातपंचायतीचे क्रौर्य दाखवणारा प्रसंग लेखकाने अतिशय समर्थपणे हाताळला आहे.
मनाबाईचा नवरा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन जातपंचायत बसवतो. जातपंचायतीने मनाबाईला आपली बाजू मांडण्याची संधी न देताच
उकळत्या तेलातील नाणं काढायला लावते. उकळत्या तेलात हात घालताच
तिचा हात त्या तेलाने (विज्ञानाच्या नियमानुसार) भाजल्यामुळे तिला गुन्हेगार ठरवले जाते.
जातपंचायत तिचं नाक व थान कापण्याचा आदेश देते. हे सगळे घडत असताना कोणीच तिला वाचवण्यासाठी समोर येत नाही.
पाच शुर पुरुषांची पत्नी असलेल्या द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी तिच्या पतींसह
सगळा राजदरबार तिची विटंबना उघड्या डोळ्यांनी पाहतो .
सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागते. तिची निष्ठा, प्रेम, आत्मसन्मान याची जपणूक करण्यासाठी कोणीही समोर येत नाही. अहिल्या चूक नसताना शिळा केली जाते. हेच मौन आजही कायम आहे. जणू बाई या मानवी समुहाचा भाग नाही अशी वागणूक दिली जाते.
तेच आजच्या काळातील मनाबाईच्याही बाबतीत घडतं.दोन दिवसांनी मनाबाई आत्महत्या करते.
पितृसत्ताक व्यवस्थेत स्त्रियावरील क्रौर्याची परिसीमा गाठणारा हा प्रसंग हृदयाचा ठाव घेणारा आहे.
हे सगळं कौर्य बघून मातृहृदयी जगन हळहळतो मात्र तो काहीच करू शकत नाही.
कचरूने लग्नाआधी वैदुवाडीतील पोरीला हनुमान टेकडीच्या कपारीत घोळसली होती. त्याचा बोभाटा झाला नाही म्हणून तो राम!जगनच्या मनात चाललेल्या मनसंवादातून लेखक व्यवस्थेचा ढोंगीपणा ,दुटप्पीपणा उघडा पाडून व्यवस्थेला आव्हान देतात.
या कादंबरीतील अजून एक हृदयस्पर्शी घटना म्हणजे जगनची आज्जी उघड्या शरीराने दगडं फोडत असताना छातीत दगडाचा तुकडा घुसून रक्त वाहुन गेल्यामुळे तिचा मृत्यू होतो.ही घटना कथनाकाचं बीज आहे,ती अंकुरीत होत असताना लेखकाने वडार समाजातील जन्म-मृत्यू, लग्नसोहळे, रुसवे-फुगवे, भाऊबंदकी, मानपान, या सगळ्यांची तपशीलवार मांडणी करीत कथानकात उत्सुकता वाढवली आहे.
आपल्या समाजातील स्त्रियांनी इतर समाजातील स्त्रियांप्रमाणे चोळी घालावी, आपल्या समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, समाज सुधारायला हवा हा जगनचा ध्यास असतो.
त्यासाठी तो प्रबोधनाची सुरुवात आपल्या घरापासून करतो. जगनने आपल्या आईला चोळी घालण्यास प्रवृत करून यशाच्या दिशेने एक पाऊल टाकलेले असते.मात्र आप्तस्वकीयाकडून त्याला तीव्र निषेधाला सामोरं जावं लागतं. नानातऱ्हेने त्याचं मनोबल खचवण्याचा प्रयत्न केला जातो.
मात्र जगन डॉ.बाबासाहेबांच्या विचारधारेने आपल्या समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी समोर येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी सज्ज असतो.
आणि त्यात यशस्वीही होतो.
शेवट, जगनची नात विमानचालक होवून आकाशात भरारी घेते.चोळी न घालण्याची प्रथा असती तर आपली नात विमान चालवताना कशी दिसली असती याचं दृश्य नजरेसमोर तरळल्यावर तो भानावर येतो.
या कादंबरीद्वारा समाजाला प्रबोधनकारी, क्रांतीकारी संदेश सुरेश कृष्णाजी पाटोळे यांनी दिलेला आहे. समाजात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर. आपल्यापैकीच कोणीतरी त्याची सुरुवात करायला हवी.तरच सकारात्मक बदल घडून येतील. हा या साहित्यकृतीचा संदेशात्मक सारं आहे.
अनेक भाषा अवगत असलेले लेखक सुरेश पाटोळे यांनी या कादंबरीत वडार समाजाच्या बोली भाषेचा जागोजागी केलेला वापर भाषा समृद्ध करताना आढळतो. कादंबरी वाचत असताना भाषा समजायला कुठेही अडचण येत नाही.इतक्या सहजतेने तिचा झालेला वापर अभिनंदनीय आहे.
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांना गुरू मानणारे सुरेश कृष्णाजी पाटोळे यांनी अण्णा भाऊंचा विचारवारसा चालवणारं, अजून असंच कसदार भरपूर लिहावं.. त्यांच्या लेखणीस आभाळभर शुभेच्छा !!
छाया बेले, नांदेड.
पुस्तक: चोळी ( कादंबरी)
लेखक: सुरेश कृष्णाजी पाटोळे.
प्रकाशन: यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे-३०
पृष्ठे:२८०
किंमत:३००
ताई, परीक्षण खूप छान लिहिलंय..!
उत्तर द्याहटवाअभिनंदन..!💐
मनापासून धन्यवाद दादा 🙏
हटवाताई अतिशय उत्तम परीक्षण लिहिल तुम्ही
उत्तर द्याहटवाएकूण कादंबरीच्या सर्व अंगाने नेमक्या मुद्द्यांवर छान परीक्षण ...
मनापासून धन्यवाद दादा 🙏🙏
हटवाताई छान परीक्षण लिहिलं.
उत्तर द्याहटवा