स्त्रीच्या आयुष्यात सासरची नाती श्रेष्ठ का मानली जातात? : पुरुषसत्ताक समाजरचनेचे वास्तव
स्त्रीच्या आयुष्यात सासरची नाती श्रेष्ठ का मानली जातात? : पुरुषसत्ताक समाजरचनेचे वास्तव
भारतीय समाजात विवाहानंतर स्त्रीच्या जीवनातील सर्वच स्तरांवर खूप मोठा बदल घडून येतो. तिच्या आयुष्यातल्या सगळ्याच भूमिका बदलतात. माहेर हे तिच्या जन्माचं ठिकाण नसतं तर ते अस्मितेशी जोडलेलं असतं तेही बदलतं. तिच्या आयुष्यातील नात्यांचा क्रमही बदलून जातो.
विवाहानंतर सासरकडील नात्यांनाच महत्त्व दिलं जातं. आता सासर हेच “तुझं खरं घर” असं सांगितलं जातं. ‘बाबूल का घर गोरी कुछ दिन का ठिकाना है’ असं म्हणून तिला आपल्या घरापासून वेगळं केलं जातं. ते दुय्यम ठरवलं जातं. यात तिच्या रक्ताच्या नात्याच्या रूपात व्यवस्थाच काम करते.
ही केवळ भावनिक बाब नसून समाजरचनेत खोलवर रुजलेली एक संकल्पना आहे.
पुढे एक प्रश्न असा आहे की माहेरच्या नात्यांपेक्षा सासरकडील नात्यांना श्रेष्ठत्व कसं आणि का मिळालं?
पुरुषसत्ताक समाजरचनेचा प्रभाव
या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण समाजातील सत्तासंबंध समजून घ्यावे लागतात. भारतीय पारंपरिक समाजव्यवस्था ही मुख्यतः पुरुषसत्ताक (पितृसत्ताक) आहे. या व्यवस्थेत सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक सत्ता प्रामुख्याने पुरुषांच्या हातात केंद्रित असते. घराचा वारसा, मालमत्ता, निर्णयक्षमता आणि सामाजिक प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी पुरुषाशी जोडलेल्या आहेत.
पुरुष हा कुटुंबाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे त्याच्यासह, त्याच्याशी संबंधित असलेलं सर्व काही श्रेष्ठ ठरवलं गेलं. नवऱ्याला देव, मालक, स्वामी या व्याख्येत परिभाषित केलं गेलं. यानुसार त्याचा परिवार देवपरिवार ठरतो. ती दास, गुलाम म्हणून तिचा परिवार दासपरिवार.
त्यामुळे नवऱ्याचे आई-वडील, भाऊ, बहिणी, काका ही सर्व नाती सामाजिकदृष्ट्या श्रेष्ठ मानली जातात. सामाजिक रचनाच अशी केली गेली आहे की या संरचनेत पुरुषाशी संबंधित असलेलं सगळंच श्रेष्ठ ठरतं.
त्याचाच परिणाम असा की विवाहानंतर स्त्री ज्या घरात जाते त्या घरातील नात्यांना श्रेष्ठ स्थान दिलं जातं. नवऱ्याच्या कुटुंबातील, नात्यातील आपल्या पेक्षा लहान सदस्यांना एकेरी उल्लेख न करणे, पाया पडणे, नवऱ्याच्या आधी, सासरच्या लोकांच्या आधी जेवण न करणे — तिचं कनिष्ठत्व सिद्ध करण्यासाठी अशा अनेक रूढी परंपरा निर्माण केल्या गेल्या आहेत.
स्त्रीचे विस्थापन आणि सामाजिक स्थान
स्त्रीच्या आयुष्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विस्थापन.
मुलगी ज्या घरात जन्मते, वाढते, तिच्या आयुष्याची ओळख जिथे तयार होते ते घर तिला कायमचं मिळत नाही. विवाहानंतर तिला त्या घरातून बाहेर पडून दुसऱ्या घरात स्थायिक व्हावं लागतं. ही प्रक्रिया इतकी सामान्य मानली जाते की तिच्यामागील सामाजिक संरचना अनेकदा दुर्लक्षित राहते. पण प्रत्यक्षात हे विस्थापन स्त्रीचं सामाजिक स्थान अधोरेखित करणारं असतं.
मुलगा आपल्या जन्मघरातच राहतो. त्याची ओळख, वारसा आणि अधिकार त्या घराशी जोडलेले तसेच राहतात. परंतु मुलगी विवाहानंतर नवीन घरात जाते. माहेरचं सगळं मागे सुटतं. त्या घरातील परंपरा, नियम याचं पालन करण्याचा दबाव तिच्यावर येतो.
ती त्या घरात नवखी असते, त्या घरातील सत्तेशी तिचा काही संबंध नसतो. तिच्या बाजूने ना समाज, ना नाते, ना कोणतंही बळ. त्यामुळे तिचं स्थान आश्रित स्वरूपाचं बनतं. (तिचे मूलभूत अधिकार केवळ कागदोपत्री असतात.)
सासरकडील नात्यांचं श्रेष्ठत्व अबाधित राहतं. त्या घरातील सत्ता पुरुषाशी आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधित असते. स्त्री त्या घरात प्रवेश करताना व त्या आधीही ती त्या सामाजिक संरचनेचा भाग असते. तिच्याकडे माहेरी असतानाही स्वतंत्र अधिकार नसतात. त्यामुळे सासरी गेल्यावर शरणागती पत्करून राहणं एवढंच तिच्या हाती राहतं.
घरातील नात्यांना मान देणं, त्यांना प्राधान्य देणं हे तिच्यासाठी व्यावहारिकदृष्ट्या आवश्यक ठरतं.
वारसा आणि संपत्तीची रचना
या संपूर्ण प्रक्रियेत वारसा आणि संपत्तीचा प्रश्नही अत्यंत महत्त्वाचा आहे. पारंपरिक समाजरचनेत कुटुंबाची जमीन, घर आणि इतर मालमत्ता प्रामुख्याने मुलाकडे जाते. मुलगा आपल्या जन्मघरातच राहतो, त्यामुळे त्या घराचा वारसा, संपत्ती आणि अधिकार त्याच्याशी जोडलेले राहतात. उलटपक्षी मुलगी विवाहानंतर सासरी जाते. ती ज्या घरात जन्मते त्या घरातील संपत्तीवर तिचा प्रत्यक्ष वापराचा अधिकार राहत नाही. परिणामी आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या तिचं माहेराशी असलेलं स्थान कमकुवत होतं. दुसरीकडे ती ज्या घरात जाते त्या घरात तिला सुरुवातीला वारसाहक्क किंवा सत्तेचं स्थान मिळत नाही. अशा प्रकारे संपत्तीची रचना आणि वारसाहक्काची परंपरा ही देखील सासरकडील नात्यांना श्रेष्ठत्व देणाऱ्या सामाजिक व्यवस्थेला बळ देत आली आहे.
सांस्कृतिक संकेत आणि सामाजिक मानसिकता
समाज या प्रक्रियेला अनेक सांस्कृतिक संकेतांमधून मजबूत करतो. उदाहरणार्थ —
“मुलगी परक्याचं धन आहे.”
“सासरचं घरच खरं घर आहे.”
अशा म्हणी आणि समजुती मुलीच्या मनात लहानपणापासून रुजवल्या जातात. यामुळे तिच्या मनात एक कल्पना तयार होते की माहेर हे तात्पुरतं आहे आणि सासर हेच अंतिम स्थान आहे. याशिवाय जगात दुसरा आधार नाही.
या विचाराचा परिणाम असा होतो की स्त्री स्वतःच सासरकडील नात्यांना अधिक महत्त्व देऊ लागते. ती माहेराशी असलेलं नातं जपते, मात्र प्राथमिकता सासरला असते. माहेरची ती पाहुणी झालेली असते.
स्त्रियांच्या आपसातील नात्यांमधील संघर्ष
या व्यवस्थेचा आणखी एक परिणाम स्त्रियांच्या आपसातील नात्यांवर दिसून येतो.
या संपूर्ण व्यवस्थेचा मुख्य हेतू म्हणजे स्त्रिया आपसात जोडल्या जाऊ नयेत, त्यांचे आपसात सख्य निर्माण होऊ नये. हे पुरुषकेंद्रित सामाजिक रचना टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. पुरुष हा केंद्रस्थानी राहावा आणि त्याच्याशी संबंधित नात्यांना सर्वोच्च स्थान मिळावं यासाठी सामाजिक नियम आणि परंपरा तयार केल्या गेल्या आहेत.
मात्र काळ बदलत आहे. शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक जागृतीमुळे स्त्रियांच्या आयुष्यात बदल दिसू लागले आहेत. अनेक स्त्रिया आता माहेर आणि सासर या दोन्ही नात्यांकडे समानतेने पाहू लागल्या आहेत. त्या दोन्ही कुटुंबांना आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग मानतात.
पण तरीही परंपरेतून आलेल्या अनेक संकल्पना अजूनही समाजात टिकून आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे विचारपूर्वक पाहण्याची गरज आहे.
सासर आणि माहेर या नात्यांमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठतेचा भेद निर्माण करण्याऐवजी त्यांना समान मानवी नात्यांच्या रूपात स्वीकारणं अधिक योग्य ठरेल. स्त्री ही केवळ एका घराची सदस्य नसून दोन कुटुंबांना जोडणारी व्यक्ती आहे. तिला तिच्या मुळापासून तोडणं हे अमानवी कृत्य आहे.
हे जेव्हा थांबेल तेव्हा दोन्ही घरं स्पर्धक न राहता विस्तृत परिवार होतील. कौटुंबिक जीवनात संघर्ष कमी होतील. मानवी समाजाला करूणामय होण्याची गरज आहे.
स्त्रीची, तिच्या नात्यांची व्याख्या सत्तेच्या आधारावर नव्हे, तर सन्मान आणि समतेच्या आधारावर झाली पाहिजे.
शेवटी प्रश्न असा नाही की सासर श्रेष्ठ की माहेर.
खरा प्रश्न असा आहे की स्त्रीच्या नात्यांना समान सन्मान देणारी सामाजिक वास्तव दृष्टी आपण तयार करू शकतो का?
— छाया
हेही वाचा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा