महात्मा ज्योतिराव फुले : समता, शिक्षण, सामाजिक न्यायाची क्रांती
महात्मा ज्योतिराव फुले : समता, शिक्षण, सामाजिक न्यायाची क्रांती
भारतीय समाजाच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत की, ज्यांनी केवळ आपल्या काळातील समस्यांकडे लक्ष वेधले नाही, तर त्या समस्यांच्या मुळाशी जाऊन समाजपरिवर्तनाची पाया भरणी केली. महात्मा ज्योतिराव फुले (क्रांतीबा) हे अशा युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.
अज्ञान, अंधश्रद्धा, जातीय विषमता, सामाजिक अन्याय यांच्या विरोधात त्यांनी
उभा केलेला लढा हा केवळ समाज सुधारणांचा नव्हता, तर तो एक व्यापक सामाजिक क्रांतीचा पाया होता.
शिक्षण, समता आणि विवेक या मूल्यांवर आधारित समाजरचना उभी करण्याचे त्यांचे कार्य येत्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.
एकोणिसाव्या शतकातील भारतीय समाज अत्यंत विषम आणि रूढीग्रस्त होता. जातिव्यवस्थेची कीड समाजाच्या प्रत्येक स्तरांवर मानवी जीवन पोखरून खात होती.
माणसाचे स्थान आणि जगण्याचे मूलभूत अधिकार हे त्याच्या जन्मावरून ठरत होते. उच्चवर्णीयांना शिक्षण, सत्ता आणि सन्मान मिळत होता, तर शूद्र आणि अतिशूद्र घटकांना मानवी हक्कांपासून वंचित ठेवले जात होते.
स्त्रियांची परिस्थिती तर अत्यंत दयनीय होती. बालविवाह, विधवांचे हाल, शिक्षणाचा अभाव आणि सामाजिक बंधने यामुळे त्यांचे जीवन अत्यंत कठीण झाले होते.
धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धेला ऊत आला होता. वर्णव्यवस्थेतील जातीच्या आधारावर शोषणाला वैधता मिळत होती. अशा परिस्थितीत या शोषण व्यवस्थेला आव्हान देणे हे अत्यंत धैर्याचे काम होते. व्यवस्थेला आव्हान देत, क्रांतीबांनी ते काम करून दाखविले.
महात्मा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला.
सामाजिकदृष्ट्या खालच्या समजल्या जाणाऱ्या घटकात जन्म झाल्यामुळे त्यांना बालपणापासूनच भेदभावाचा सामना करावा लागला.
त्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग म्हणजे ब्राह्मण मित्राच्या लग्नात झालेला अपमान. या घटनेने त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला
“माणूस माणसाशी भेदभाव का करतो?”
या प्रश्नाने त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले.
त्यांनी समाजातील अन्यायाचे मूळ शोधण्यास सुरुवात केली.
महात्मा फुले यांचे शिक्षण स्कॉटिश मिशनरी शाळेत झाले. या शिक्षणामुळे त्यांना पाश्चिमात्य उदारमतवादी विचारसरणी, मानवाधिकार, समता व तर्कशुद्धतेचा परिचय झाला.
या कारणांमुळे त्यांनी परंपरांचा आंधळेपणाने स्वीकार न करता त्यांची चिकित्सक समीक्षा करण्याची वृत्ती विकसित केली.
समाजातील प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर तपासली पाहिजे, हा दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला. हीच बौद्धिक जडणघडण त्यांच्या पुढील कार्याचा आधार ठरली.
महात्मा फुले यांनी समाजपरिवर्तनाचा मार्ग शिक्षणातून निवडला. त्यांच्या मते अज्ञान हे सर्व समस्यांचे मूळ आहे, हे लक्षात आल्यामुळे,
विद्येविना मती गेली।
मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली।
गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
असं म्हणत, त्यांनी सामाजिक सुधारणेची सुरुवात शिक्षणापासून केली. त्या काळात शिक्षण केवळ उच्चवर्णीय पुरुषांपुरते मर्यादित होते. स्त्रिया आणि खालच्या जातींना शिक्षणापासून दूर ठेवले जात होते. ही अन्यायकारक व्यवस्था मोडून काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे, ही भूमिका त्यांनी ठामपणे मांडली.
या कार्यात त्यांना सावित्रीमाई फुले यांचे अमूल्य सहकार्य लाभले. १८४८ मध्ये त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. हा निर्णय त्या काळात प्रतिगाम्यांना न पचणारा होता. कार्य जेवढं उदात्त समाजाचा विरोधही तेवढाच टोकाचा होत होता.
तरीही त्यांनी आपले कार्य थांबवले नाही. समाजाला शोषणमुक्त करायचे असेल, तर शिक्षण हाच उपाय आहे. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजात बदल घडवून आणता येतो, या त्यांच्या विचाराने त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा दिली.
महात्मा फुले व माय सावित्री या दोहोंनी स्त्री-शिक्षणासाठी, मुक्तीसाठी, स्त्री उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात महात्मा फुले हे स्त्रीशिक्षणाची सुरुवात करणारे पहिले भारतीय समाज सुधारक होत. म्हणून त्यांचे कार्य शैक्षणिक क्रांतीची सुरुवात होती. त्यामुळेच आज ते महात्मा म्हणून ओळखले जातात.
सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी समाजातील एक मोठी क्रांती घडवून आणली. त्या काळात स्त्रियांना शिक्षण देणे हे पाप मानले जात होते, त्यामुळे फुले दाम्पत्याला प्रचंड सामाजिक विरोध सहन करावा लागला. त्यांच्यावर दगडफेक, शिवीगाळ आणि बहिष्कारही टाकण्यात आला. प्राणघातक हल्ला करण्यात आला. तरीही त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. मुक्ता साळवे सारखी विवेकशील व विद्रोही लेखिका घडविली. स्त्री शिक्षणाचा पाया मजबूत केला.
या कार्यामुळे स्त्रियांमध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान, स्वतंत्र विचारशक्ती निर्माण झाली, ज्यामुळे पुढील स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीला दिशा मिळाली.
महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या सन्मानासाठी लढताना विधवांवरील अन्यायकारक प्रथांनाही ठामपणे विरोध केला. त्या काळात विधवांचे केशवपन म्हणजेच डोके मुंडण करणे ही एक अमानवीय प्रथा प्रचलित होती, ज्यामुळे स्त्रीचे व्यक्तिमत्त्व आणि स्वाभिमान दोन्ही नष्ट होत होते. फुले यांनी या प्रथेला मानवतेविरुद्ध मानले आणि तिच्याविरोधात समाजजागृती केली. त्यांनी नाभिक समाजाला आवाहन करून विधवांचे केस कापण्यास नकार देण्याचे सांगितले.
याशिवाय त्यांनी विधवांसाठी आश्रयस्थाने उभी केली आणि त्यांच्या पुनर्विवाहाला समर्थन दिले. विधवांसाठी आश्रयस्थान उभारले, बालहत्या प्रतिबंधक केंद्र सुरू केले. अनाथ बालकांसाठी अनाथालय उभारले. स्त्रीला समाजात सन्मानाचे स्थान मिळावे, तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा व तिला स्वाभिमानाने जगता यावे, हा त्यांच्या कार्याचा उद्देश होता.
त्या काळात स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य या संकल्पना व्यवस्थेविरोधातील विद्रोह मानल्या जात होत्या. समाज स्त्रीच्या शिक्षणाला विघातक कृत्य समजत होता. या दोन्ही संकल्पना अत्यंत क्रांतिकारक होत्या.
महात्मा फुलेंनी त्या प्रत्यक्षात आणल्या.
१८७३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश समाजातील जातीय भेदभाव नष्ट करून समता व न्याय प्रस्थापित करणे हा होता. त्याकाळात सत्यशोधक समाजाने धार्मिक विधींमध्ये ब्राह्मणांचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न केला. समाजात माजलेले कर्मकांडाचे स्तोम कमी करून सामान्य जनतेला भयमुक्त केले.
स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. सत्यशोधक विवाहाच्या माध्यमातून विवाहासारख्या हुंडा पद्धत नाकारत, विधींमध्ये साधेपणा आणून त्यांनी सामाजिक रूढी व बंधने सैल केली. ही चळवळ समाजातील समतेच्या विचारांना बळकट करणारी ठरली.
जातिव्यवस्थेविषयी महात्मा फुले यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि ठाम होती. त्यांनी ही व्यवस्था मानवनिर्मित व अन्यायकारक आहे हे स्पष्ट केले. माणूस जन्माने श्रेष्ठ ठरत नाही, तो आपल्या कर्माने महान ठरतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले,व ते आपल्या कृतीतून सिद्धही केले.
१८६८ साली त्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद सर्व जातींसाठी खुला केला. त्या काळात अस्पृश्यांना सार्वजनिक विहिरी किंवा हौदातून पाणी घेण्यास सक्त मनाई होती. ही मनाई धर्माच्या नावाखाली योग्य ठरवली जात होती. अशा परिस्थितीत सर्वांसाठी पाण्याचा हौद खुला करणे ही क्रांतिकारी घटना होती. माणसाची प्रतिष्ठा वाढविणारीही होती.
या कृतीला समाजातील उच्चवर्णीयांचा तीव्र विरोध झाला, परंतु फुले यांनी मानवतेला धर्मापेक्षा अधिक महत्त्व दिले. त्यांच्या या कृतीने वंचित समाजात स्वाभिमानाची भावना जागृत झाली .
समान हक्कांच्या विचाराची ज्योत पेटली. ज्योतिबांनी धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या शोषणाचा त्यांनी पर्दाफाश केला. समाजातील वंचित घटकांना आत्मभान दिले. त्यांच्या विचारांमुळे सामाजिक जागृतीला चालना मिळाली.
महात्मा फुले यांनी शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांकडेही गांभीर्याने लक्ष दिले. त्याकाळात शेतकरी कर्जबाजारीपणात अडकून सावकारांच्या शोषणाला बळी पडत होते. करप्रणाली अन्यायकारक होती. त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. ‘शेतकऱ्याचा असूड’ हा त्यांचा ग्रंथ ग्रामीण जीवनातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे कठोर वास्तव मांडणारा आहे.
हा ग्रंथ शेतकरी प्रश्नांची जाणीव करून देणारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
महात्मा फुले हे एक प्रभावी लेखक होते. ‘गुलामगिरी’ या ग्रंथात त्यांनी सामाजिक विषमतेवर कठोर टीका केली आहे. त्यांच्या लेखनात केवळ भावना नाहीत, तर तर्कशुद्ध विश्लेषण आणि सामाजिक जाणीव यांचा मिलाफ आहे.
त्यांनी लेखनाला समाजजागृतीचे प्रभावी साधन बनवले.
महात्मा फुले यांचे तत्त्वज्ञान अत्यंत व्यापक आणि मानवतावादी होते. त्यांनी समान न्याय,
समता, शिक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यावर कार्य केले. त्यांच्या विचारांमध्ये आधुनिक लोकशाही मूल्ये, मानवाधिकार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट दिसतो.
समाजातील प्रत्येक व्यक्तीला निसर्गात: समान अधिकार आहेत. त्यामुळे सर्वांना
समान संधी मिळावी, असा आग्रह होता .
त्यांच्या कार्य पाहता, ते केवळ समाजसुधारक नव्हते, तर एक विचारक्रांती घडवणारे नेते होते.
त्यांनी समाजाच्या मूलभूत रचनेवर प्रश्न उपस्थित केले आणि परिवर्तनाची दिशा दिली. त्यांच्या विचारांना सुरुवातीला विरोध झाला, परंतु कालांतराने त्यांचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. आजच्या काळात महात्मा फुले यांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. शिक्षणातील विषमता, स्त्री सक्षमीकरण, सामाजिक अन्याय आणि अंधश्रद्धा या समस्या समाजात अजूनही तशाच आहेत.
अशा परिस्थितीत त्यांच्या विचारांकडे पाहणे अत्यावश्यक ठरते. त्यांनी दिलेला समतेचा संदेश हा आजच्या लोकशाही व्यवस्थेचा आधार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचे महत्त्व हे केवळ त्या काळापुरते मर्यादित नाही, तर ते वर्तमान आणि भविष्य घडवणारे आहे—दिशा देणारे आहे.
महात्मा फुले यांनी समाजाला विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात नव्या जागृतीची सुरुवात झाली.
त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हीच खरी मानवता आहे. शिक्षण हेच खरे स्वातंत्र्य आहे आणि समता हीच समाजाची खरी ओळख असायला हवी.
महात्मा फुले हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून ते एक जिवंत विचार आहेत, जे आजही समाजाला दिशा देत आहेत. म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना आपले गुरू मानले व त्यांच्या मानवमुक्तीच्या कार्याची पताका पुढे नेली.
क्रांतीबास जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!
-छाया बेले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा