मानसिक शांती कशी मिळवावी? कबीराच्या एका दोह्यात दडलंय उत्तर






मानसिक शांती  कशी मिळवावी? - जेव्हा धावणं थांबतं तेव्हांच मानसिक शांती अनुभवास येते.

मनाच्या अशांततेवर कबीराचा एक सुंदर व समर्पक दोहा आहे- 

जग में बैरी कोई नहीं, जो मन शीतल होय।
या आपा को डारि दे, दया करे सब कोय॥ 

अशांत मनापेक्षा मोठा शत्रू जगात दुसरा कोणीही नाही, अस्थिर अशांत माणसाला मन सर्वात जास्त त्रास देतं‌. शांत विकार रहित मन असेल तर आनंद प्राप्ती होते. कारण अशा व्यक्तीशी सगळेजण प्रेमाने वागतात असं कबीर म्हणतात. आणि हे आपणही बघत असतो. अनुभवत असतो. मात्र मनाची शांती टिकविणे खरोखरच खूप अवघड काम आहे, हेही तितकेच खरे आहे. 


    आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली जाते की, धावत राहायचं. पहिला नंबर आणण्यासाठी , चांगली नोकरी मिळवण्यासाठी , लोकांपेक्षा पुढे जाण्यासाठी धावत रहायचं. 
या धावण्यात आपण इतके गुंतून जातो की आपण कुठे चाललोय हेच विसरून जातो.

मग एक दिवस अचानक लक्षात येते की आपण खूप थकलोय. एक पाऊलही पुढे टाकणं शक्य नाही इतकं थकलोय. 
 मग मनात प्रश्न येतो - हे सगळं कशासाठी? सगळं मिळवलं तरी समाधान का नाही? आणि कधी कधी नेमका तिथूनच आपल्या आतला प्रवास सुरू होतो, शांत अवस्थेकडे जाणारा .

शांत अवस्था म्हणजे सगळं सोडून हिमालयात जाऊन बसणं नाही. तर गोंगाटात सुद्धा मन शांत असणं मानसिक शांती होय, असं माझं मत आहे. 

कशाच्याही मागे धावणं थांबवणं,  ही सगळ्यात कठीण आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे.

आपलं मन खरं तर नेहमी 'अजून' मध्ये जगत असतं. अजून पैसा आला की मी सुखी होईन, अजून मोठं घर घेतलं की शांतता मिळेल. पण हे 'अजून' कधीच संपत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी तयारच असते.
 आपण कायम पळतच राहतो.  

यातून बाहेर कसं पडायचं? हा प्रश्न स्वतःला विचारणं व त्यासाठी प्रयत्नही स्वतःलाच करावे लागतात. 

आपल्या मनाच्या शांतीसाठी 
काही गोष्टी करायला हव्यात. सोशल मीडियावर दिसणाऱ्या गोष्टीवरून 
आपली इतरांशी तुलना करणं बंद करायला हवं.
आपण जे 
पाहतो ते तेवढं सुंदर किंवा सत्य आहे असं असणं शक्य नाही कारण प्रत्येकाच्या जीवनात काही तरी अडचणी असतातच कारण,
 घरोघरी मातीच्या चुली. मानवी नाती व मानवी जीवन थोड्या फार फरकाने सारखंच असतं. फक्त जगण्याचे प्रश्न वेगळे असतात. काही सुंदर क्षण सोशल मीडियावर शेअर केले जातात. कोणीही आधार कार्डवरचा फोटो डिपीला लावत नाही. एआय वरून सुंदर केलेला फोटोच लावतात.  तसंच काहीसं मिडियावर शेअर केलेल्या सुखाचं असतं . 

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे
'पुरेसं आहे' चा मंत्र आपल्याच कानात सांगत राहणे, व आपल्या जवळ जे आहे त्यासाठी कृतज्ञ असणे हे आपल्याला आनंदी व सकारात्मक राहण्यास मदत करते. 
यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याकडे असं काय आहे जे आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देतं, किंवा ज्या साठी आपण जगतो. उद्या त्यासाठीच झोपेतून उठायचं असतं 
 त्या गोष्टी लिहून काढायला हव्यात. एकदा आपण अशा गोष्टींची नोंद घ्यायला सुरुवात केली तर आपल्याकडे खूप काही आहे जे इतरांकडे नाही त्यासाठी आपण कृतज्ञ असायला हवे, हे लक्षात येईल. 
एक कप गरम चहा, आईचा फोन, वेळेवर मिळालेली बस या गोष्टींनी सुद्धा आनंदात भर घातलेली असते या विषयी सुद्धा आपण कृतज्ञ असायला हवे.
व आपल्या मेंदूला जे आहे ते 'पुरेसं आहे' हे शिकवावं लागतं.

जेव्हा आपलं धावणं थांबतं, तेव्हा लक्षात येतं की आपण ज्या गोष्टीच्या मागे धावत होतो, ती गोष्ट म्हणजे मनाची शांती आपल्याजवळ आधीपासूनच होती.

 तक्रार थांबवून स्वीकृतीचा स्वीकार करणे, हेही मनःशांती साठी आवश्यक आहे. 

तक्रार करणं हे  मनासाठी विषासारखं असतं. एखादा माणूस  दुसऱ्याची सतत तक्रार 
 करतो,  उणीदुणी  काढतो मात्र आतून स्वतःच होरपळून निघत असतो. मनाची शांती गमवून बसतो. 
पाऊस पडतोय, ट्रॅफिक आहे, बॉस वाईट आहे, नशीब साथ देत नाही. बायको माझ्या म्हणण्यानुसार ऐकत नाही . किंवा नवरा ऐकत नाही. 
मुलं अभ्यास करत नाहीत सतत अशा तक्रारी करून काय बदलणार आहे? काहीच नाही , उलट आपलीच ऊर्जा वाया जाते.
स्वीकृती म्हणजे परिस्थितीला शरण जाणं नाही. स्वीकृती म्हणजे वास्तवाला जसं आहे तसं पाहणं.  आपल्या हातात आहे ते करणं, जे हातात नाही त्याचा स्विकार करणं. यामुळे मन अशांत होणार नाही. मानसिक आरोग्यात वृद्धी होईल. 

एक सुंदर वाक्य आहे - 
"दुःख = वेदना x विरोध."
 वेदना तर येणारच, आयुष्य आहे. पण आपण त्याला जितका विरोध करतो, तितकं दुःख वाढतं. स्वीकृतीने विरोध संपतो.

हळूहळू याचा सराव करायला हवा. 
पुढच्या वेळी काही वाईट घडलं की लगेच प्रतिक्रिया न देता, एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला म्हणा - "ठीक आहे, हे घडलंय. मी हे स्वीकारतो. आता यात मी काय करू शकतो जे माझ्या हातात आहे?"
हा  प्रश्न तुमचं आयुष्य बदलून टाकेल. कारण तुमचं लक्ष समस्येवरून समस्येच्या निराकरणवर येईल.

आपल्या मानसिक शांतीसाठी आपण अपेक्षांचं ओझं खाली उतरून ठेवायला हवं. 

माणसाच्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे अपेक्षा. आपण लोकांकडून अपेक्षा ठेवतो की त्यांनी आपल्या मनासारखं वागावं, आपल्याला समजून घ्यावं. त्यांनी त्यांचं जीवन आपल्या मर्जीनुसार जगावं. 
जेव्हा ते तसं वागत नाहीत, तेव्हा मन दुखावले जाते. मन अशांत होते. उद्विग्न होते . 
खरं तर कोणीही कोणाला 
 दुखावत नाही, आपल्या अपेक्षाच आपल्याला दुखावतात.

यासाठी एकच उपाय आहे - अपेक्षा स्वतःकडून ठेवा, जगाकडून नाही.

मी चांगलं वागेन, पण समोरच्यानेही चांगलं वागावं ही अपेक्षा मी ठेवणार नाही. मी शंभर टक्के प्रयत्न करेन, पण यश शंभर टक्के यश मिळालंच पाहिजे ही अपेक्षा मी ठेवणार नाही.
असं सातत्याने स्वतःला सांगायला हवं. 

जेव्हा आपण अपेक्षेशिवाय जगायला लागतो, तेव्हा प्रत्येक छोटी गोष्ट तुम्हाला आनंद देऊ लागते. कारण आता तुम्ही आनंदासाठी कोणावरही अवलंबून नाही.

याचा जर सराव केला आणि ते आपल्या आचरणात उतरलं तर फक्त जगणं उरतं. आणि ते सुंदर असतं. 

सकाळी उठून चहाचा पहिला घोट घेताना तो स्वाद ती उब अनुभवणं म्हणजे खरं जगणं आहे. कामावर जाताना घाई न करता आजूबाजूची झाडं पाहणं म्हणजे जगणं आहे. कोणी काही बोललं तर लगेच मनावर न घेता हसून सोडून देणं म्हणजे जगणं आहे.

शांत अवस्थेत पोहोचलेली व्यक्ती अशी दिसते -
ती कोणाच्याही मागे धावत नाही, कारण तिला माहितीये ती जिथे आहे तिथेच पूर्ण आहे.
ती तक्रार करत नाही, कारण तिने प्रत्येक परिस्थितीला शिक्षक मानलंय.
ती अपेक्षा ठेवत नाही, म्हणून ती कधीच निराश होत नाही.
ती फक्त जगते, जे आहे ते स्वीकारते आणि आयुष्य जे काही समोर आणेल ते शांतपणे अनुभवते. सोडून देते. 

आणि म्हणूनच अध्यात्मात म्हणतात, जीवनाचा अंतिम उद्देश यश मिळवणं नाही, तर या शांत अवस्थेपर्यंत पोहोचणं आहे. म्हणजेच बुद्धत्वा पर्यंत पोहोचणे/ शिवत्वात विलिन होणे 
ही अवस्था मिळेलच असे नाही. मात्र वरील गोष्टी आचरणात आणल्या तर जीवन शांतपणे जगता येतं . एवढं मात्र नक्की !
आजपासून फक्त एकच गोष्ट करून पहा, दहा मिनिटं शांत बसा, काहीच करू नका. फक्त श्वास घ्या आणि सोडा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की मन हळूहळू शांत होत आहे. 

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण ।मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥

संत तुकाराम महाराज सर्व मानवांना उपदेश करताना म्हणतात की, सर्वात आधी तुम्ही तुमचे मन प्रसन्न, शांत आणि पवित्र करा. कारण मनाची प्रसन्नता हेच जगातील सर्व प्रकारच्या सिद्धींचे यशाचे आणि आत्मज्ञानाचे मूळ कारण आहे.

त्यामुळे मनाची काळजी घेणे आवश्यक आहे.

@छाया

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .